जमिनीची सुपीकता जपत पीक उत्पादनात वाढीचे ध्येय

Sankita Pagar discuss with family members
Sankita Pagar discuss with family members

नाशिक जिल्ह्यातील कारसूळ (ता. निफाड) येथील संकिता माधवराव पगार ही लहानपणापासून हुशार अन्‌ उद्यमशील तरुणी. कृषी शिक्षण पूर्ण होताच तिने कुटुंबाच्या शेती व्यवस्थापनात लक्ष देण्यास सुरुवात केली. जमिनीची सुपीकता जपत दर्जेदार पीक उत्पादनावर भर दिला. प्रयोगशील शेतकरी, कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेत संकिता पगार हिने शेतीला नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे. 

कारसूळ (ता. निफाड, जि. नाशिक) येथे पगार कुटुंबीयांची एकत्रित शेती आहे. शेतीमध्ये द्राक्ष, हंगामानुसार भाजीपाला आणि गहू लागवड असते. पगार कुटुंबातील संकिता हिने शेती क्षेत्रामध्येच करिअर करण्याचे ठरवून कृषी पदवीधर झाली. त्यानंतर वडिलांच्या बरोबरीने कुटुंबाच्या शेतीमध्ये पीक व्यवस्थापनाला सुरुवात केली. जमिनीची सुपीकता जपत संकिताने व्यवस्थापन खर्च कमी करत दर्जेदार पीक उत्पादनावर भर दिला. प्रयोगशील कृषी पदवीधर म्हणून संकिताची वेगळी ओळख तयार झाली आहे.

शेतीच्या आवडीतून कृषी पदवीधर संकिताचे वडील माधवराव पगार हे प्रयोगशील शेतकरी. पगार कुटुंबाची एकत्रित पंधरा एकर द्राक्ष शेती आहे. पारंपरिक शेती किफायतशीर व्हावी हा संकिताचा ध्यास. हेच ध्येय समोर ठेऊन तिने नाशिक येथील के. के. वाघ कृषी महाविद्यालयात प्रवेश घेतला. २०१७ साली कृषी पदवी पूर्ण होताच तिने घरच्या शेतीकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. जमीन सुपीकतेवर भर देत उत्पादन खर्च कसा कमी करता येईल? याकडे तिने लक्ष केंद्रित केले. रासायनिक खतांचा मर्यादित वापर करीत सेंद्रिय खते, जिवाणू खतांचा वापर वाढविला. त्याचे चांगले परिणाम दिसून आले. याच दरम्यान कृषिपूरक व्यवसाय सुरू करण्यासाठी बाभळेश्वर येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये ॲग्री क्लिनिक आणि ॲग्री बिझनेस मॅनेजमेंटचा कोर्स केला. या ठिकाणी जिवाणू संवर्धकाचे उत्पादन आणि विक्री व्यवस्थापनाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण पूर्ण केले. काही दिवस तिने एका नामवंत संस्थेच्या प्रयोगशाळेत काम केले. हा सर्व अनुभव घेऊन संकिता पूर्णवेळ घरच्यांना शेतीकामात मदत करू लागली.  जिवाणू संवर्धकाचे उत्पादन  संकिता पगार हिने शेतीच्या बरोबरीने पूरक उद्योग उभारणीचा ध्यास घेतला. त्यानुसार बाभळेश्वर येथील कृषी विज्ञान केंद्रातून जिवाणू संवर्धक उत्पादन आणि विक्रीबाबत शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतले. एका खासगी कंपनीत नोकरीचा अनुभव घेतला. जिवाणू संवर्धक उत्पादन सुरू करण्यासाठी दहा लाख रुपये भांडवलाची गरज होती. तिने वडिलांना सांगितले, की माझ्या लग्नासाठी जो खर्च होईल, तो अत्यंत कमी करा; मात्र व्यवसायासाठी भांडवल द्या. संकिताची धडपड पाहून वडिलांनी पुरेसे आर्थिक भांडवल देत पाठबळ दिले.   २०१७ साली जैविक संवर्धकांच्या उत्पादनासाठी तांत्रिक नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून तिने परवाना मिळवला. उपलब्ध भांडवलातून आवश्यक यंत्रसामग्री खरेदी केली. कुटुंबाच्या जुन्या घरामध्ये योग्य सुधारणा करीत प्रयोगशाळा उभारली. ॲझोटोबॅक्टर, रायझोबियम, पीएसबी, ॲझोस्पिरीलम, केएसबी उत्पादन सुरू झाले. या उत्पादनांच्या चाचण्या तिने स्वतःच्या व प्रयोगशील शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रावर घेतल्या. त्याचे चांगले परिणाम दिसून येऊ लागले. शेतकरी या जिवाणू संवर्धकची मागणी करू लागले. यातून तिचा आत्मविश्वास वाढला. घरात पाच भावंडे असल्याने तिने लघु उद्योगाचे नाव ‘पंचरत्न’ असे ठेवले, तर उत्पादनांची विक्री ‘कादवा बायोटेक’ या नावाने करते. सध्या या उद्योगात दोन मुले जिवाणू संवर्धन प्रक्रिया, उत्पादन, पॅकिंग आणि विक्री नोंदी ठेवण्याचे काम पाहतात. तर एक महिला प्रयोगशाळेत मदतनीस म्हणून काम करते. 

जमीन सुपीकतेवर भर

संकिता हिचे वडील माधवराव आणि चुलते कैलास हे कुटुंबाची सर्व शेती पहातात. कृषी शिक्षण संपल्यानंतर संकिताने द्राक्ष शेती व्यवस्थापनात मदत करण्यास सुरुवात केली. जमिनीची सुपीकता आणि सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी जिवाणू खतांचा वापर, जिवामृत आणि हिरवळीची पिके, पाचट आच्छादनावर भर देण्यास सुरुवात केली. रासायनिक खते, कीडनाशकांचा मर्यादित वापर करत सेंद्रिय खते आणि जैविक कीडनाशकांच्या वापरावर भर दिला आहे. सध्या ६० टक्के जैविक आणि ४० टक्के रासायनिक खते, कीडनाशकांच्या वापरण्याचे तिचे नियोजन असते. गेल्या तीन वर्षांपासून एकरी १५ टनाचे सातत्य ठेवण्यात यश मिळविले आहे.  खर्च कमी करत रसायन अंश मुक्त दर्जेदार द्राक्ष उत्पादनावर भर दिला आहे. त्यामुळे बाजारपेठेत अपेक्षित दरही मिळू लागला आहे. द्राक्ष शेतीच्या बरोबरीने टोमॅटो तसेच गहू लागवडदेखील पगार यांच्या शेतीमध्ये असते. या पिकांच्या उत्पादनातही चांगली वाढ दिसू लागली आहे. रासायनिक अंशमुक्त उत्पादनाच्या बरोबरीने शेतमाल पौष्टिक, आरोग्यदायी असावा, अशी तिची धारणा आहे. संकिता पगार हिला महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघाचे माजी अध्यक्ष डॉ. जे. एम. खिलारी, प्रयोगशील शेतकरी रमेश मेनकर आणि कृषी विज्ञान केंद्र, बाभळेश्वर येथील पीक संरक्षण विशेषज्ञ भरत दवंगे यांचे मार्गदर्शन मिळते. प्रयोगशील शेतकऱ्यांच्या संपर्कातून शेतीमध्ये विविध प्रयोग करत उत्पादन वाढीचा तिचा प्रयत्न असतो.

शेतकरी गट उभारणीचे नियोजन संकिता पगार यांच्या शेतीला परिसरातील शेतकरी भेट देतात. शेतकऱ्यांनी शंका उपस्थित केल्यानंतर त्यांच्या नोंदी ठेऊन त्यावर ती काम करते. आता कांदा, सोयाबीन, हरभरा, डाळिंब, टोमॅटो या पिकांच्या उत्पादनवाढीसाठी तिचे काम सुरू आहे. संकिताने परिसरातील शेतकऱ्यांचे पीक निहाय व्हॉटसॲप ग्रुप तयार केले आहेत. दर रविवारी शेतकऱ्यांना पूर्णवेळ मार्गदर्शन करते. याचबरोबरीने राज्यभरातील प्रयोगशील शेतकऱ्यांच्या शेतीला भेटी देऊन पीक व्यवस्थापनाचे बारकावे ती शिकत असते.     कृषी शिक्षण घेतल्याने संकितामध्ये जिज्ञासूपणा वाढला. त्यातूनच तिची व्यावसायिक प्रगती झाली. वडिलांचा विश्वास, चुलत्यांसह  कुटुंबीयांचे पाठबळ यातूनच संकिताने शेती विकासाच्या दिशेने प्रवास सुरू केला. एके काळी वडिलांच्या नावावरून संकिताची ओळख होती, मात्र आज तिच्या कामाने वडिलांना नवी ओळख मिळवून दिली आहे. येत्या काळात शेतकरी गट स्थापन करून भाजीपाला उत्पादन आणि विक्रीचे नियोजन संकिताने केले आहे. महिला बचत गटाच्या माध्यमातून आळिंबी प्रक्रिया उत्पादन प्रकल्प उभारण्याचे तिचे ध्येय आहे.

जीवामृत, गांडूळ खतनिर्मिती 

  • शेण, गोमूत्रासाठी गीर गाईचे संगोपन.
  • जीवामृत, गांडूळखतनिर्मितीचे युनिट, व्हर्मिवॉशनिर्मिती.
  • जीवामृताचा द्राक्ष बागेत वापर.
  • कुटुंबासाठी लागणारा विविध हंगामी भाजीपाल्यासाठी किचन गार्डन.
  • - संकिता पगार: ८९९९८१५९७८

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com