थेट भाजीपाला विक्रीतून शेती झाली सक्षम

थेट ग्राहकांना शेतीमाल विक्रीसाठी शेतकरी स्वतःहून पुढाकार घेऊ लागले आहेत. यापैकीच एक आहेत चिंबळी (ता. खेड, जि. पुणे) येथील महिला शेतकरी सीमा चंद्रकांत जाधव.
vegetable sale
vegetable sale

थेट ग्राहकांना शेतीमाल विक्रीसाठी शेतकरी स्वतःहून पुढाकार घेऊ लागले आहेत. यापैकीच एक आहेत चिंबळी (ता. खेड, जि. पुणे) येथील महिला शेतकरी सीमा चंद्रकांत जाधव. पुणे शहरातील ग्राहकांची गरज ओळखून शेतकरी गटाच्या माध्यमातून त्यांनी दर्जेदार पीक उत्पादनाच्या बरोबरीने थेट ग्राहकांना भाजीपाला विक्रीचे नियोजन बसविले आहे.

शेतीतून चांगले पीक उत्पादन मिळत असले, तरी विक्रीचे योग्य नियोजन नसेल तर काहीवेळा आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. पुणे शहरातील भाजीपाला मागणी आणि ग्राहकांचा कल लक्षात घेऊन चिंबळी (ता. खेड, जि. पुणे) येथील महिला शेतकरी सीमा चंद्रकांत जाधव यांनी भाजीपाला विक्री व्यवस्थेत बदल केला. गेल्या पाच वर्षांपासून त्या स्वतःच्या शेतातील भाजीपाल्यासह परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाचीही त्या विक्री करतात. शेतकऱ्यांपर्यंत नवीन तंत्रज्ञान पोहोचविण्यासाठी त्यांनी सहा वर्षांपूर्वी इंद्रायणी महिला कृषी विकास गट स्थापन केला. या माध्यमातून ३० शेतकरी जोडले गेले आहेत. सीमा जाधव यांच्याकडे तीन एकर शेती आहे. यामध्ये दोडका, अळू, मेथी, कोथिंबीर, काकडी, मिरची आणि परदेशी भाजीपाल्यामध्ये ब्रोकोली, रेड कॅबेज, आईसबर्गची लागवड असते. याचबरोबरीने सहा गुंठे शेडनेटमध्ये रंगीत ढोबळी मिरची, ब्रोकोली, कोथिंबिरीची लागवड केली जाते. पहिल्या टप्प्यात उत्पादित भाजीपाल्याची विक्री करताना त्यांना अडचणी येत होत्या. लॉकडाउनमध्ये शेतीमाल विक्रीचा मोठा प्रश्न होता. सर्व बाजारपेठा बंद होत्या. भाजीपाल्याचे नुकसान टाळण्यासाठी त्यांनी परिसरातील शेतकरी महिला, पुरुष यांच्याशी चर्चा करून त्यांचा भाजीपाला एकत्रितपणे पुणे शहरात विक्री केला. त्यातून शेतकऱ्यांना अपेक्षित दरदेखील मिळाला.

कुटुंबाची मिळाली साथ भाजीपाल्याच्या विक्रीसाठी पुढाकार घेतल्यानंतर शेतकऱ्यांच्या शेतातून भाजीपाला आणणे आणि ग्राहकांपर्यंत भाजीपाला बॉक्स पोहोचविण्यासाठी सीमाताईंना पती चंद्रकांत यांची मदत होते. भाज्यांची प्रतवारी, बॉक्स गाडीत भरण्यासाठी मुलांची मदत होते. जाधव यांनी भाजीपाला वाहतुकीसाठी एक टेम्पो घेतला आहे. त्यामुळे वाहतुकीची समस्या संपली. तसेच, ग्राहकांना वेळेत ताजा भाजीपाला पोहच करणे शक्य झाले आहे.

थेट विक्रीतून शाश्‍वत उत्पन्न पुणे शहरातील सहा सोसायट्यांमधील ग्राहकांची वर्षभर भाजीपाल्याला मागणी चांगली असल्याने सीमाताईंची चांगली आर्थिक उलाढाल होते. दर महिन्याला भाजीपाला वाहतूक, मजुरी असा सुमारे ७५ हजार रुपये खर्च येतो. ज्या शेतकऱ्यांनी शेतीमाल विक्रीसाठी दिला अशा शेतकऱ्यांना सरासरी चार लाखांपर्यंत रक्कम अदा केली जाते. हा सगळा खर्च वजा जाता सुमारे एक लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते, असे  सीमाताई सांगतात. लॉकडाउन काळातही विकला भाजीपाला लॉकडाउनच्या काळात पुणे शहरातील ग्राहकांना ताजा भाजीपाला मिळत नव्हता. त्यामुळे अनेक ठिकाणी भाजीपाल्याचे दर वाढले. या काळात ताजा भाजीपाला उपलब्ध करण्याच्या उद्देशाने सीमा जाधव यांनी थेट ग्राहकांना भाजीपाला विक्री सुरू ठेवली होती. त्यामुळे आता हक्काने आमच्या सोसायटीत भाजीपाला घेऊन या, असे अनेक ग्राहक सीमाताईंना आवर्जून सांगतात. लॉकडाउनमध्ये भाजीपाला विक्रीसाठी पुण्यातील काही निवडक सोसायट्यांमधील सभासदांशी त्यांनी फोनवरून संपर्क साधला. भाजीपाला गुणवत्ता  आणि उपलब्धतेची माहिती दिली. ग्राहकांच्या भाजीची ऑर्डर व्हॉट्सॲपवर नोंदवून घेण्यास सुरुवात केली.  त्यानुसार गटातील शेतकऱ्यांना भाजीपाला काढणीचे नियोजन दिले. हा सर्व ताजा भाजीपाला प्रतवारी करून पुण्यातील ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यास सुरुवात  केली.  भाजीपाला विक्रीच्या अनुभवाबाबत सीमाताई म्हणाल्या की, आमच्याकडून ताजा आणि स्वच्छ भाजीपाला योग्य दरात मिळाल्यामुळे ग्राहक समाधानी आहेत. या काळात परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी त्यांना भाजीपाला विक्री करण्याची विनंती केली होती. अशा शेतकऱ्यांचा भाजीपाला खरेदी करून आम्ही थेट ग्राहकांना विकला. लॉकडाउनच्या काळात एका सोसायटीमध्ये १०० ते १२५ ग्राहकांकडून भाजीची मागणी येत होती. सोसायटीमधील कमिटी मेंबर्सची मदत घेऊन येणाऱ्या अडचणींवर आम्ही मात केली. भाजीपाला विक्री करताना वेळेचे नियोजन चांगले  केले होते. त्यामुळे थेट विक्री करणे सोपे गेले.

थेट ग्राहकांना विक्री गेल्या पाच वर्षांपासून सीमा जाधव पुणे शहरातील सोसायटीमध्ये थेट ग्राहकांना भाजी विक्री करीत आहेत. त्या अगोदर सीमाताई पुणे शहरात आठवडी बाजारामध्ये भाजीविक्री करीत होत्या. या माध्यमातून काही सोसायट्यांमधील ग्राहक परिचयाचे झाले. त्यांच्या ओळखीतून एक, दोन सोयायटीमध्ये सीमाताईंनी थेट भाजीपाला विक्री सुरू केली. सध्या सहा सोसायट्यांमध्ये भाजीपाला विक्री सुरू आहे. प्रत्येक सोसायटीमध्ये भाजीपाला विक्रीसाठी आठवड्यातील एक वार ठरलेला आहे. त्या अगोदर दोन दिवस संबंधित सोसायटीमधील ग्राहकांना भाजीपाल्याची उपलब्धता आणि दर व्हॉट्सॲपवर पाठविला जातो. त्यांच्या मागणीनुसार ठरलेल्या दिवशी भाजीपाला पुरवठा केला जातो. सध्या सुमारे ६०० हून अधिक ग्राहकांना सीमाताई थेट भाजीपाला पुरवठा करीत आहेत.

पॅकिंगमध्ये केला बदल सीमा जाधव पहिल्यांदा भाजी पॅकिंगसाठी गोणीचा वापर करीत होत्या. परंतु, पुण्यातील ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन भाजीपाला पॅकिंगमध्ये बदल केला. ग्राहकांच्या वैयक्तिक मागणीनुसार कोरोगेटेड बॉक्समध्ये भाजीपाला पॅकिंग करण्यास सुरुवात केली. ग्राहकांना मागणीनुसार योग्य प्रमाणात ताजा भाजीपाला उपलब्ध होऊ लागला. यामुळे ग्राहकांकडूनही मागणी वाढू लागली. 

पुरस्कारांनी गौरव

  • महिला शेती पुरस्कार (अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती)
  • उत्कृष्ट महिला शेतकरी पुरस्कार (महाराष्ट्र सिंचन सहयोग)
  • वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठान, पुसद
  • उद्योगजननी कमल पुरस्कार (सेंद्रिय शेती)
  • -  सीमा जाधव, ९५५२७२७९७०

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com