दुधी अळिंबी लागवडीसाठी जागेची निवड, वाढीसाठी लागणारे माध्यम आणि वातावरण तसेच काडाचे निर्ज
ग्रामविकास
शेती, शिक्षण अन् ग्रामविकासाचा वसा
लोटे-परशुराम (जि. रत्नागिरी) येथील श्री विवेकानंद रिसर्च अॅण्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट या स्वयंसेवी संस्थेने पुढाकार घेऊन ६७ गावांत लोकसहभागातून जलसंधारणाची कामे सुरू केली. याचबरोबरीने शेती, आरोग्य, स्वयंरोजगार, शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून संस्थेने ग्रामविकासाला चालना दिली आहे.
लोटे-परशुराम (जि. रत्नागिरी) येथील श्री विवेकानंद रिसर्च अॅण्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट या स्वयंसेवी संस्थेने पुढाकार घेऊन ६७ गावांत लोकसहभागातून जलसंधारणाची कामे सुरू केली. याचबरोबरीने शेती, आरोग्य, स्वयंरोजगार, शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून संस्थेने ग्रामविकासाला चालना दिली आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण, शेतकऱ्यांपर्यंत नवीन तंत्रज्ञानाचा प्रसार तसेच लोकसहभागातून जल मृद संधारणाचे धोरण आखत पाणीटंचाईवर मात करण्याचा प्रयत्न लोटे - परशुराम (जि. रत्नागिरी) येथील श्री विवेकानंद रिसर्च अॅण्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटने केला आहे. १९८५ पासून संस्थेचे काम सुरू आहे. या संस्थेला एक्सेल इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अश्विनभाई श्रॉफ यांचे पाठबळ मिळाले आहे. संस्थेचे प्रकल्प अधिकारी सुरेश पाटणकर आणि समन्वयक विवेक शेंड्ये हे विविध उपक्रमांचे नियोजन करतात.
लोकसहभागातून जलसंधारण
ग्रामस्थांनी संस्थेशी संपर्क केल्यानंतर प्रथम गावात बैठक घेतली जाते. गावाची गरज लक्षात घेऊन जल, मृद संधारण आणि उपलब्ध पाणी वापराचा आराखडा तयार केला जातो. याबाबत सुरेश पाटणकर म्हणाले की, संस्थेतर्फे तांत्रिक मार्गदर्शन आणि गरजेनुसार साहित्यांचा पुरवठा केला जातो. लोकसहभागातून जल, मृद संधारणाची कामे केली जातात. आत्तापर्यंत रत्नागिरी जिल्ह्यातील ६७ गावांमध्ये संस्थेतर्फे २५ पक्के बंधारे, तीन हजार वनराई बंधारे, वीस कूपनलिकांचे पुनर्भरण, वीस शेततळी बांधण्यात आले. यामुळे संबंधित गावात पिण्याच्या पाण्यासह शेती आणि जनावरांच्यासाठी शाश्वत पाण्याची सोय झाली.
नवीन तंत्रज्ञानाचा प्रसार
ग्राम विकासातील महत्त्वाचा भाग म्हणजे शेती. संस्थेने शेती विकासाच्यादृष्टीने विविध उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. गेल्या सहा वर्षांत संस्था पन्नास गावातील सुमारे १ हजार १२१ शेतकऱ्यांपर्यंत पोचली आहे. शेती विकासाच्या उपक्रमातून आत्तापर्यंत पाचशेहून अधिक हेक्टर क्षेत्र विविध पिकाखाली आले आहे. वर्षातील तीनही हंगामात शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन आणि शेती यांत्रिकीकरण करून पीक उत्पादकता वाढवण्यावर संस्थेने भर दिला आहे. भात पिकानंतर उपलब्ध ओलाव्यावर रब्बी हंगामात यंदा २०० एकर क्षेत्रावर सूर्यफूल, वाल, भाजीपाला, भुईमूग लागवड झाली आहे. उपलब्ध जमीन, मजूर आणि निविष्ठांचा योग्य पद्धतीने वापर होण्यासाठी संस्थेने सामूहिक शेती व्यवस्थापनावर भर दिला आहे. याचे चांगले फायदे दिसून आले आहेत.
शेतीला पूरक उद्योगांची जोड
परिसरातील बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन संस्थेने शेतकऱ्यांना पूरक उद्योगांच्या उभारणीसाठी मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली. संस्थेतर्फे कुक्कुटपालन, शेळीपालन, दुग्ध व्यवसायाबाबत प्रशिक्षणाचे आयोजन केले जाते. पूरक उद्योगाच्यादृष्टीने आठ गावातील ७५ शेतकरी संस्थेशी जोडले गेले आहेत. जनावरांचे आरोग्य, चारा व्यवस्थापन, स्वच्छ दूध उत्पादन आणि दुग्धजन्य पदार्थांच्या मूल्यवाढीसाठी पशुपालकांना सातत्याने प्रशिक्षण दिले जाते. ग्रामीण भागातील महिलांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी काजू प्रक्रिया, शिवणकाम, पापड-मिरगुंड निर्मिती, बेकरी उत्पादनाबाबत प्रशिक्षणाची सोय संस्थेने केली आहे. बांबू लागवडीबाबत मार्गदर्शन आणि रोपांची उपलब्धता संस्था करून देते. सोनगाव, दाभोळ येथे संस्थेने मच्छीमारांसाठी चौपाळे बांधून दिले आहेत. चाळकेवाडी, कुंभवली, दाभोळ येथे समाजमंदीर बांधण्यात आले असून त्याचा वापर सामाजिक उपक्रमांसाठी होतो.
पर्यावरण संवर्धनाचे उपक्रम
संस्थेने लायन्स क्लब, लोटे, रोटरॅक्ट क्लब, लोटे, विविध उद्योग समूह, खेड पंचायत समिती, चिपळूण पंचायत समिती, सोनगाव भोई समाज उन्नती मंडळ, महिला आर्थिक विकास महामंडळ, रत्नागिरी यांच्या सोबत विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. लोटे चाळकेवाडी येथे आठवड्यातून दोनवेळा रुग्णांची तपासणी करून प्राथमिक उपचार केले जातात. गावागोवी मोफत आरोग्य शिबीर, मोतिबिंदू शिबिरांचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी व महिलांसाठी हिमोग्लोबीन तपासणी केली जाते. शाळा, महाविद्यालय व इतर संस्थांच्या सोबत कर्दे, मुरूड समुद्र किनारपट्टीची दरवर्षी स्वच्छता केली जाते. प्रत्येक दोन महिन्यांनंतर गावोगावी प्लॅस्टिकमुक्त अभियान राबविले जाते. कळंबणी उपजिल्हा प्राथमिक रुग्णालय परिसरात रुग्णांच्या विश्रांतीसाठी नक्षत्र उद्यान बांधण्यात आले आहे.
कंदपिके, हळद लागवडीला प्रोत्साहन
संस्थेने कंद पिकांची मागणी लक्षात घेऊन शेतकऱ्यांच्यापर्यंत घोरकंद, कणगर, शेवरकंद, सुरण, अळू या पिकांच्या लागवडीचे तंत्र पोचवले . यंदा पंधरा गावातील साठ शेतकऱ्यांनी परसबागेत विविध कंद पिकांची लागवड केली आहे. परिसरातील बाजारपेठेत कंदपिकांना ८० ते १०० रुपये प्रति किलो दर मिळतो. याचा शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा झाला आहे. गेल्यावर्षी सहा गावातील आठ शेतकऱ्यांनी वीस गुंठे क्षेत्रावर हळद लागवड केली होती. उत्पादित हळदीची पावडर तयार करून गावामध्ये विक्री करण्यात आली. ग्राहकांच्याकडून या हळदीला चांगली मागणी आहे.
नाचणीच्या शेवया, लाडू, बिस्किटे
कोकणात गेल्या काही वर्षांत नाचणी पिकाखालील क्षेत्र कमी होत आहे. परंतु लहान मुलांपासून ते वयोवृद्धांच्या आरोग्यासाठी महत्त्व लक्षात घेऊन संस्थेने नाचणी लागवडीसाठी प्रसार मोहीम हाती घेतली. संस्थेने खेड, दापोली, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांना नाचणी लागवडीसाठी प्रोत्साहित केले आहे. या उपक्रमामुळे गेल्या चार वर्षांत नाचणी लागवडीचे क्षेत्र आणि उत्पादनदेखील वाढले. त्यांचा चांगला फायदा शेतकऱ्यांना होऊ लागला आहे. यंदाच्या वर्षी २८७ एकर क्षेत्रावर नाचणी लागवड करण्यात आली आहे. नाचणी लागवडीच्या बरोबरीने संस्थेने मूल्यवर्धनावरही लक्ष केंद्रित केले. महिला बचत गटातील सदस्यांना नाचणीपासून बिस्किटे, लाडू, चकली, मंन्चुरियन, थालीपीठ, इडली, शेवया निर्मितीचे प्रशिक्षण दिले आहे. या प्रक्रिया उद्योगातून महिलांना शाश्वत रोजगार उपलब्ध झाला आहे.
शाळांमध्ये गुणवत्ता विकास कार्यक्रम
खेड, चिपळूण तालुक्यातील ग्रामीण भागातील शाळांमध्ये १५ वर्षांपासून गुणवत्ता विकास कार्यक्रम सुरू आहे. सध्या तीस शाळांमध्ये हा उपक्रम चालतो. शैक्षणिक प्रगतीबरोबर विद्यार्थांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले जातात. संस्थेने दहावी, बारावीच्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळविण्याच्यादृष्टीने विद्यार्थ्यांसाठी खास मार्गदर्शनाची व्यवस्था केली आहे. सुमारे १७ गावातील एक हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ झाला आहे. गेल्या तीन वर्षांपासून संस्थेतर्फे पेढे- परशूराम येथे स्पर्धा परिक्षा केंद्राची सुरू करण्यात आले आहे.
- सुरेश पाटणकर, ९४२२४३३९१५, ८८०५१७७६६३
फोटो गॅलरी
- 1 of 16
- ››