Agriculture Agricultural News Marathi success story of Social Networking Foram,Nashik | Agrowon

‘सोशल नेटवर्किंग' मधून ग्राम,आरोग्य अन् शिक्षणाला गती

मुकुंद पिंगळे
सोमवार, 13 जानेवारी 2020

नाशिक शहरातील प्रमोद गायकवाड यांनी विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या उपक्रमशील तरुणांना सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र आणले. सोशल नेटवर्किंग फोरम या संस्थने २०१० सालापासून ग्रामविकासाच्या कामाला सुरुवात केली. दुर्गम भागातील गावांचा विकास, जलव्यवस्थापन, आरोग्य आणि शिक्षणामध्ये दिशादर्शक काम या संस्थेने उभे केले आहे. 

नाशिक शहरातील प्रमोद गायकवाड यांनी विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या उपक्रमशील तरुणांना सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र आणले. सोशल नेटवर्किंग फोरम या संस्थने २०१० सालापासून ग्रामविकासाच्या कामाला सुरुवात केली. दुर्गम भागातील गावांचा विकास, जलव्यवस्थापन, आरोग्य आणि शिक्षणामध्ये दिशादर्शक काम या संस्थेने उभे केले आहे. 

सोशल नेटवर्किंग साइट्स संवादापेक्षा विसंवादाच्या साधन बनताहेत की काय? अशी परिस्थिती असताना नाशिक शहरातील प्रमोद गायकवाड यांनी दहा वर्षांपूर्वी फेसबुक, ट्विटर आणि व्हाट्सअपसारख्या समाजमाध्यमांचा वापर करून  उपक्रमशील तरुणांचा गट तयार केला. दुर्गम आदिवासी भागातील जनतेचे प्रश्न समजून घेत ग्राम विकासाच्यादृष्टीने उपक्रम सुरू केले. सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत अनेक कामे उभी राहिली. नाशिकमधून राज्य, देश आणि आता देशाच्याही सीमा ओलांडून ही चळवळ अनिवासी भारतीयांपर्यंत पोहोचली. त्यातून राजेश बक्षी, लक्ष्मीकांत पोवनीकर, योगेश कासट यांसारखे परदेशस्थ भारतीय संस्थेसोबत जोडले गेले. लोकसहभाग आणि कॉर्पोरेट कंपन्यांच्या सीएसआर योजनांतून  दुर्गम भागातील गावांच्यामध्ये आरोग्य, शिक्षण आणि पाणी उपलब्धतेच्या प्रश्नांवर मात करण्यात येत आहे. आत्तापर्यंत या उपक्रमांसाठी अंदाजे तीन कोटी रुपयांचा निधी पैसे, वस्तू आणि सेवा या स्वरूपात उभारण्यात आला आहे. 

तज्ज्ञांच्या समूहातून पाणीदार काम 
नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, इगतपुरी व त्र्यंबकेश्वर या तालुक्यांतील अनेक गावे दुर्गम भागात आहे. डोंगराळ भाग असल्याने या ठिकाणी वर्षभर पिण्याचा पाण्याचा मोठा प्रश्न असतो. महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागते. हे लक्षात घेऊन संस्थेने ‘जलाभियान’ प्रकल्प हाती घेऊन अनेक गावांना टँकरमुक्त केले आहे. २०१६ सालच्या दुष्काळ सदृश परिस्थितीत संस्थेच्या सदस्यांनी पाण्याचे गांभीर्य ओळखले. जल व्यवस्थापनातील कामाचा अनुभव असणारे प्रमोद गायकवाड, डॉ. पंकज भदाणे, इंजि. प्रशांत बच्छाव, जीवन सोनवणे, जिऑलॉजिस्ट डॉ. जयदीप निकम, रामदास शिंदे, ॲड. गुलाब आहेर, डॉ. उत्तम फरतळे अशा तज्ज्ञांची टीम संस्थेने उभी केली. या टीमने पाणीटंचाई असलेल्या गावांची पाहणी करून तेथील समस्या, उपलब्ध साधन सामग्रीचा अंदाज घेत ग्रामस्थांच्या सहकार्याने पाणी उपलब्धतेबाबत आराखडा तयार केला. संस्थेच्या माध्यमातून सामाजिक जाण असलेले नागरिक या उपक्रमात सहभागी झाले.  केवळ लोक सहभागातून तीन वर्षांत पंधरा आदिवासी गावांना टँकर मुक्त करून ग्रामस्थांच्या दारात पाणी पोहोचण्यात सोशल नेटवर्किंग फोरमला यश आले. जलसंधारण, ग्रामविकास, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात केलेले काम लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाचा आदिवासी सेवक पुरस्कार, आदिवासी सेवा संस्था पुरस्कार, केशवसृष्टी पुरस्कार आणि सकाळ समूहातर्फे जलयोद्धा पुरस्काराने संस्थेला गौरविण्यात आले आहे.

उल्लेखनीय उपक्रम 
कुपोषण मुक्ती कार्यक्रम  

 आदिवासी पाड्यावरील बालकांच्यामध्ये कुपोषणाचे मोठे प्रमाण आहे. यावर मात करण्यासाठी आहार, निदान व उपचार या त्रिसूत्रीवर आधारित काम उभारले आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील अठरा गावांतील सुमारे २८३ बालकांना कुपोषणमुक्त करण्यात संस्थेला यश आले आहे. 

अभ्यासिका निर्मिती 

ग्रामीण भागातील हुशार मुलांना अभ्यासाची साधने उपलब्ध नाहीत. अशा मुलांना अभ्यासाची सोय करून देण्यासाठी संस्थेने पुढाकार घेतला आहे. या माध्यमातून आदिवासी मुलांना उच्चशिक्षणाची गोडी लागली. पेठ येथील हुतात्मा स्मारक तसेच शेवखंडी येथे अभ्यासिका सुरू करण्यात आली आहे. यांसह स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तके व मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येते.
संगणक साक्षरता अभियान 
आदिवासी पाड्यांवर तंत्रज्ञान जागृतीचा मोठा अभाव आहे. या गावांमधील विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाची गोडी लागावी, येथील मुले संगणक साक्षर होण्यासाठी संगणक साक्षरता अभियानाच्या माध्यमातून माळेगाव, शेवखंडी, गणेशगाव, हरसुल, नाचलोंढी, कोकणगाव, आंबे, खोकरतळे येथील शाळांमध्ये अद्ययावत संगणक कक्ष उभारण्यात आले आहेत.

आरोग्य तपासण्या 
नाशिक शहरातील नामवंत डॉक्टरांच्या सहकार्याने दूषित पाण्यामुळे होणारे साथीचे आजार व कर्करोग निदान शिबिरांचे आयोजन आदिवासी पाड्यावर करण्यात येते. 

शहीद जवान निधी
देशाच्या रक्षणार्थ शहीद झालेल्या १३ जवानांच्या कुटुंबीयांना ५० हजार ते १ लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे.

रानभाज्या महोत्सव

डोंगराळ भागात येणाऱ्या हंगामी रानभाज्या शहरी ग्राहकांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी नाशिक शहरात गेल्या दोन वर्षांपासून रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या महोत्सवात आदिवासी पाड्यावरील महिला मोठ्या संख्येने सहभागी होतात. या माध्यमातून आदिवासी शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध होत आहे.  

जलसंधारण आणि पाणीपुरवठा 
आदिवासी पाड्यांवरील बहुतेक गावे डोंगरावर व खोल दरीत आहेत. त्यामुळे बहुतेक ठिकाणी पाण्याचे स्रोत उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांची मोठी फरपट होते. यावर मात करण्यासाठी फोरमचे सदस्य असलेले अभियंते, भूगर्भ तज्ज्ञ यांचे मार्गदर्शन घेऊन अनेक गावांमध्ये विहिरी खोदून पाण्याचे स्रोत तयार केले आहेत. लांब अंतरावर विहिरी असल्याने पाणीपुरवठ्यात सुलभता येण्यासाठी जलवाहिनीद्वारे गावातील टाक्यांमध्ये पाणी साठवण्याची सोय करण्यात आली.

टॅंकरमुक्त केलेली गावे 

 • त्र्यंबकेश्वर तालुका : माळेगाव, सापगाव, मेटघरकिल्ला, हेदपाडा, पांगूळघर, तोरंगण
 • सुरगाणा तालुका :  कोटंबी
 • पेठ तालुका : शेवखंडी, फणसपाडा, खोटरेपाडा, वाजवड, वडपाडा, केळबारी, कोळूष्टी

या गावांमध्ये काम सुरू

 •  त्र्यंबकेश्वर तालुका : वाळीपाडा, वेळे
 •  सुरगाणा तालुका : बाफळून, म्हैसमाळ
 •  पेठ तालुका : तोंडवळ, एकदरा, खोकरतळे

विहीर खोदलेली गावे

 • माळेगाव, सापगाव, मेटघरकिल्ला, पांगूळघर, कोटंबी, म्हैसमाळ, फणसपाडा, खोटरेपाडा, वाजवड, केळबारी

जलवाहिनी झालेली गावे 

 • माळेगाव, सापगाव, मेटघरकिल्ला, हेदपाडा, पांगूळघर, कोटंबी, शेवखंडी, फणसपाडा खोटरेपाडा, वाजवड, तोरंगण, वडपाडा, केळबारी, कोळुष्टी

 

संस्थेचे उपक्रम

 • टँकरमुक्त गावासाठी पुढाकार
 • महिलांच्या आरोग्य सुधारणेवर भर
 • दहा आदिवासी शाळांचे डिजिटल     स्कूल्समध्ये रूपांतर
 • आदिवासी शाळांमध्ये संगणक कक्ष तसेच संगणक साक्षरता अभियान
 • ग्रामीण भागात मुलांना क्रीडासाहित्याची मदत
 • आदिवासी पाड्यांवर कुपोषणमुक्तीसाठी विशेष अभियान
 • १३ शहीद जवानांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत
 • अनाथालये, वृद्धाश्रमांना मदत
 • विविध गावांमध्ये सुमारे तीन हजार रोपांची लागवड आणि संगोपन

- प्रमोद गायकवाड : ९४२२७६९३६४ 
  -संदीप ढगळे ः ९४२१६०९९८७

 

 

 

 

 

 

 

 

 


फोटो गॅलरी

इतर ग्रामविकास
शेती, जलसंधारण अन् शिक्षणाचा घेतला वसामांडाखळी (जि. परभणी) येथील मातोश्री जिजाऊ ग्राम...
कुऱ्हा गावाने तयार केली भाजीपाला पिकांत...अमरावती जिल्ह्यातील वरुड, मोर्शी हे तालुके संत्रा...
सावित्रीच्या लेकींचा जागर करीत घराच्या...नाशिक : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीचे...
शाश्वत ग्राम, शेतीविकासाची 'जनजागृती'औरंगाबाद येथील जनजागृती प्रतिष्ठान या स्वयंसेवी...
वेळूकरांनी एकजुटीने दूर केली पाणीटंचाईसातारा जिल्ह्यातील वेळी गावाने एकजुटीने...
महिला बचत गटातून पूरक उद्योगांना गतीगेल्या वर्षी मी लोकनियुक्त सरपंच झाले....
‘सोशल नेटवर्किंग' मधून ग्राम,आरोग्य अन्...नाशिक शहरातील प्रमोद गायकवाड यांनी विविध...
लोकसहभागातून ग्रामविकासाला दिशासप्टेंबर २०१५ मध्ये मी गावाच्या सरपंचपदाचा...
निसर्ग अन् लोकसंस्कृतीतून ग्रामविकासाला...भंडारा निसर्ग व संस्कृती अभ्यास मंडळाच्या...
रेशीम शेतीतून देवठाणाच्या अर्थकारणास गतीपरभणी जिल्ह्यातील देवठाणा (ता. पूर्णा) येथील...
शेततळ्यांतील मत्स्यशेतीचे ‘बेडग मॉडेल’जिथं एका एका पाण्याच्या थेंबासाठी वणवण हिंडावे...
वडनेरभैरव ग्रामपालिका उचलणार मुलींच्या...नाशिक : सुरक्षेचा प्रश्न किंवा आर्थिक परिस्थिती...
लोकसहभागातून पुणतांब्याची  विकासाकडे...नगर जिल्ह्यामधील पुणतांबा (ता. राहाता) हे पौराणिक...
ग्रामपंचायत कायद्यात ‘दुरुस्ती’ करतानाच...पुणे : पंचायतराज सक्षमीकरणासाठी राज्यघटनेत ७३ वी...
‘अफार्म’ची जलनियोजनातून कृषिविकासाची...महाराष्ट्रातील स्वयंसेवी संस्थांची मध्यवर्ती शिखर...
शेती, ग्रामविकास अन् स्वच्छतेचा जागरअकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी जागर फाउंडेशनच्या...
शेती, ग्रामविकासात नांगनूर अग्रेसरमहाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील नांगनूर (ता....
फळबागांच्या माध्यमातून प्रगतिपथावर वडकी पुणे शहरापासून जवळ असलेले वडकी हे दुष्काळी गाव...
पणज गावाने आणली केळी पिकातून सुबत्ताअकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात पणज हे छोटे गाव...
पर्यावरण, जलसंवर्धन, व्यावसायिक शेतीचा...वऱ्हा (ता. तिवसा, जि. नागपूर) येथील गावकऱ्यांनी...