Agriculture Agricultural News Marathi success story of Sopan Shinde, Village Panaga Shinde,Dist.Hingoli | Agrowon

रेशीम शेतीने दिली आर्थिक साथ

माणिक रासवे
मंगळवार, 29 सप्टेंबर 2020

पांगरा शिंदे (ता.वसमत,जि.हिंगोली) येथील प्रयोगशील शेतकरी सोपान शिंदे यांनी पारंपारिक शेतीला रेशीम शेतीची जोड दिली. यातून महिन्याकाठी शाश्वत उत्पन्नाचा स्रोत तयार झाला. त्यांच्या प्रेरणेतून गावासह राज्याच्या विविध जिल्ह्यातील शेतकरी रेशीम शेतीमध्ये उतरले आहेत.

पांगरा शिंदे (ता.वसमत,जि.हिंगोली) येथील प्रयोगशील शेतकरी सोपान शिंदे यांनी पारंपारिक शेतीला रेशीम शेतीची जोड दिली. यातून महिन्याकाठी शाश्वत उत्पन्नाचा स्रोत तयार झाला. त्यांच्या प्रेरणेतून गावासह राज्याच्या विविध जिल्ह्यातील शेतकरी रेशीम शेतीमध्ये उतरले आहेत.

पूर्णा ते अकोला रेल्वे मार्गावरील पांगरा शिंदे (ता.वसमत,जि.हिंगोली) येथील सोपान रामराव शिंदे यांच्या एकत्रित कुटुंबाची सात एकर शेती आहे. शेतीमध्ये कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, हरभरा, हळद लागवडीवर भर आहे. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत शेताजवळील नाल्यावर बंधारा झाल्याने हंगामी सिंचनाची सुविधा तयार झाली.त्यामुळे विहिरीची पाणी पातळी वाढण्यास मदत झाली. मात्र दुष्काळ तर कधी अतिवृष्टीच्या संकटांमुळे पारंपारिक पीक पद्धतीतून हाती फारसे उरत नव्हते. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्यामुळे सोपान शिंदे यांना बारावीनंतर शिक्षण सोडावे लागले. परंतु निराश न होता शेती विकासाकडे त्यांनी लक्ष देण्यास सुरवात केली. कृषी विभाग, कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांच्या सल्ला घेत कमी खर्चामध्ये सुधारित पीक व्यवस्थापनाकडे लक्ष दिले. बीज प्रक्रिया, निंबोळी अर्काचा वापर, एकात्मिक कीड,रोग नियंत्रण पद्धतीच्या वापरामुळे खर्च कमी होऊन पीक उत्पादन वाढले. 
जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी शिंदे गांडूळ खत, कंपोष्ट खत, हिरवळीच्या खतांचा वापर करतात. शिंदे यांनी बायोगॅस बांधलेला असून त्याची स्लरीदेखील पिकांना दिली जाते. शेताजवळील नाल्यावर शिंदे यांनी वनराई बंधारे बांधले आहेत. पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्यासाठी उताराला आडवी पेरणी केली जाते.  पाण्याच्या कार्यक्षम वापरासाठी ठिबक, तुषार सिंचनाचा वापर केला जातो. याचबरोबरीने पाणी टंचाईवर मात करण्यासाठी त्यांनी दोन लाख लिटर साठवण क्षमतेचे शेततळे केले आहे. 

रेशीम शेतीला सुरवात 
सुधारित पीक व्यवस्थापनाच्या बरोबरीने सोपान शिंदे यांनी रेशीम शेतीची जोड दिली. यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील प्रयोगशील शेतकऱ्यांकडे जाऊन तुती लागवड, रेशीम कोष उत्पादनाचे बारकावे जाणून घेतले.  गावामध्ये गटाच्या माध्यमातून रेशीम शेती सुरू करण्याबाबत शेतकऱ्यांशी चर्चा केली. परंतु त्यावेळी शेतकऱ्यांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. परंतु सोपान शिंदे यांनी ‘एकटा चलो रे‘ ही भूमिका घेतली. सन २०१४ मध्ये शिंदे यांनी दीड एकर क्षेत्रावर तुतीच्या व्ही-१ जातीची लागवड केली. परंतु पावसाचा खंड पडला. तुतीची वाढ खुंटली. प्रतिकूल परिस्थितीत तुतीची झाडे जिवंत ठेवणे आवश्यक होते.त्यासाठी जिद्द न सोडता टॅंकरव्दारे पाणी विकत घेऊन तुती लागवड वाचविली.

रेशीम शेतीचे टप्पे

 • रेशीम कोष उत्पादनासाठी शेतामध्ये माफक खर्चात २५ फूट बाय ५० फूट आकाराच्या रेशीम कीटक संगोपनगृहाची उभारणी. रेशीम विभागाकडून अनुदान.
 •  तुती लागवडीनंतर चार महिन्याने रेशीम कोष उत्पादनासाठी १०० अंडीपुंजाची खरेदी.
 • योग्य व्यवस्थापनासाठी प्रयोगशील शेतकरी आणि रेशीम विभागातील अधिकारी श्री.ढावरे यांच्याकडून मार्गदर्शन. योग्य पद्धतीने संगोपन केल्यानंतर पहिल्या बॅचपासून ९० किलो कोष उत्पादन. पुढील बॅच घेण्यापूर्वी संगोपनगृहाचे निर्जंतुकीकरण. दुसऱ्या बॅचमध्ये १०० अंडीपुंजांपासून ८७ किलो कोष उत्पादन.
 • रेशीम कोषांची कर्नाटकातील रामनगरम मार्केटमध्ये ३२० रुपये प्रति किलो दराने विक्री.
 • पहिल्या वर्षी दोन बॅच मिळून खर्च वजा जाता ६० हजार रुपयांचे उत्पन्न. दुष्काळामुळे सोयाबीनसह अन्य पिकांच्या उत्पादनात मोठी घट, मात्र रेशीम शेतीने आर्थिक उत्पन्न मिळवून दिले.  
 • दुसऱ्या वर्षी प्रत्येकी दिडशे अंडी पुंजाच्या चार बॅचचे मिळून ५६० किलो कोष उत्पादन. रामनगरम मार्केटमध्ये प्रति किलोस ३८० रुपये दर.
 • एका पाठोपाठ एक बॅचपासून कोष उत्पादन घेण्यासाठी शेतामध्ये दुसऱ्या संगोपनगृहाची उभारणी.

रेशीम शेतीतील प्रयोग 

 •    कोष उत्पादन वाढीसाठी तुतीच्या दर्जेदार पानांची आवश्यकता असते. रेशीम किटकांचे संगोपन करताना तुतीच्या पानांवर गहू आणि सोयाबीन पीठ शिंपडून रेशीम कीटकांना अधिकची प्रथिने देण्याचा प्रयोग शिंदे यांनी केला. त्यामुळे जास्त कालावधीच्या तुती पानांचे पोषणमूल्य वाढण्यास मदत. 
 •    गुटी कलम करुन कमी कालावधी, कमी खर्चात तुती रोपे तयार करण्याचा प्रयोग यशस्वी.

लॉकडाऊनमुळे दराचा फटका 
रामनगरम येथील मार्केटमध्ये रेशीम कोषांना चांगले दर मिळतात. शिंदे बंगलोर एक्स्प्रेसने रेशीम कोष रामनगरामला पाठवितात. परंतू सध्या लॉकडाऊनमुळे रेल्वे बंद असल्यामुळे पूर्णा (जि.परभणी) येथील मार्केटमध्ये कोष विक्री करावी लागल्याने कमी दर मिळाले आहेत. 

गावामध्ये रेशीम शेतीचा विस्तार
अलीकडच्या काळात पांगरा शिंदे गावाची ‘रेशीम क्लस्टर' म्हणून ओळख निर्माण झाली. याचे श्रेय रेशीम शेतीची सुरवात करणाऱ्या सोपान शिंदे यांच्याकडे जाते. दोन वर्षातील शिंदे यांच्या उत्पन्नाच्या अनुभवावरून रेशीम शेती किफायतशीर असल्याचे गावातील तरुण शेतकऱ्यांच्या लक्षात आले.त्यामुळे अनेक शेतकरी रेशीम शेतीकडे वळाले. जिल्हा रेशीम विकास अधिकारी कार्यालयांतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेमधून गावातील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांनी रोकडेश्वर रेशीम उत्पादक गटाची स्थापना केली.या शेतकऱ्यांना गावामध्ये तुती रोपे उपलब्ध करून देण्यासाठी सोपान शिंदे यांनी स्वतःच्या शेतामध्ये रोपवाटिका तयार केली. या रोप विक्रीतून शिंदे यांना दीड लाख रुपये उत्पन्न मिळाले. गावात एकूण ४० शेतकऱ्यांनी १०० एकरावर तुती लागवड केली असून सध्या २९ शेतकरी रेशीम शेतीमध्ये कार्यरत आहेत. दर महिन्याला उत्पन्न मिळत असल्यामुळे  शेतकऱ्यांच्या अर्थकारणाला बळकटी मिळाली.

शेळीपालनाची जोड 
पूरक व्यवसायातून खात्रीशीर उत्पन्न मिळत असल्यामुळे रेशीम शेतीसोबत शिंदे यांनी बंदिस्त शेळीपालन सुरु केले. सध्या त्यांच्याकडे १२ उस्मानाबादी शेळ्या आहेत. शेळ्यांचा चारा म्हणून तुतीची पानांचा वापर केला जातो. शेळी पालनातून शिंदे यांना वर्षाकाठी एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. शिंदे यांच्याकडे एक बैलजोडी, दोन गावरान गाई आणि एक गीर गाय आहे.  पशूपालनामुळे शेतीला पुरेसे शेणखत उपलब्ध होते.

ग्रामविकासामध्ये सहभाग 
शेतीसोबतच ग्रामविकासाच्या विविध उपक्रमामध्ये शिंदे यांचा सक्रिय सहभाग असतो. ग्राम स्वच्छता अभियान, जलस्वराज्य अंतर्गत पाणीपुरवठा, पाणलोट क्षेत्र विकास, तंटामुक्ती, महिलांच्या माध्यमातून गावामध्ये दारुबंदी, व्यसन मुक्ती, बचत गटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण, पर्यावरण संतुलनासाठी वृक्ष लागवड, एक गाव-एक गणपती, शेतकऱ्यांच्या अभ्यास सहलीच्या आयोजनासाठी शिंदे पुढाकार घेतात.

शेतकऱ्यांना मार्गदर्शन 
सोपान शिंदे यांच्या शेतावर रेशीम शेती सुरु करण्यासाठी इच्छुक तसेच नव्याने रेशीम शेतीमध्ये उतरलेले राज्याच्या विविध भागातील शेतकरी भेट देण्यासाठी येत असतात. त्यांच्यासाठी शिंदे निःशुल्क मार्गदर्शन करतात. जम्मू काश्मीर राज्यातील शेतकरी सुद्धा शिंदे यांच्या शेतावर प्रशिक्षणासाठी येऊन गेले आहेत. याचबरोबरीने शेतकरी मेळावे, कृषी प्रदर्शन, जिल्हा रेशीम विकास कार्यालय आणि कृषी विज्ञान केंद्रामध्ये मार्गदर्शनासाठी शिंदे यांना बोलावले जाते. रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना जिल्हा रेशीम विकास अधिकारी स्वप्नील तायडे, अशोक वडवाले यांचे नेहमी मार्गदर्शन मिळते.

कुटूंब राबतेय शेतात
सोपान शिंदे यांच्यासह वडील रामराव, आई अन्नपूर्णाबाई, पत्नी सत्यभामा, बंधू कुंडलिक,भावजय प्रतिभा हे कुटुंबातील सदस्य शेती तसेच रेशीम शेतीमध्ये रमलेले आहेत. त्यामुळे मजुरांची गरज भासत नाही. खर्चात मोठी बचत होते. फक्त रेशीम कोष काढणीसाठी गरजेनुसार मजूर घेतले जातात. रेशीम शेतीमुळे अन्य पिकांचे उत्पन्न शिल्लक राहू लागले. या शिल्लकीतून शिंदे यांनी  शेती तसेच गावामध्ये घर बांधकाम आणि विहिरीचे काम पूर्ण केले.

पुरस्कारांनी गौरव 

 • हिंगोली जिल्हा रेशीम कार्यालयातर्फे रेशीम रत्न पुरस्कार.
 •  जिल्हास्तरीय प्रगतशील शेतकरी पुरस्कार.
 •  वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा आदर्श शेतकरी पुरस्कार.
 •  रेशीम संचालनालयाचा महारेशीम अभियान पुरस्कार. 
 •  पद्मश्री भंवरलाल जैन  शेतकरी सन्मान पुरस्कार.
 •   गाव पातळीवर गुणवंत रेशीम शेतकरी पुरस्कार.

- सोपान शिंदे ः९७६४१९८२१७, ८७८८७४४०८२

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


फोटो गॅलरी

इतर कृषिपूरक
मिथेन उत्सर्जनावर नियंत्रणाची गरजजनावरे रवंथ करताना मोठ्या प्रमाणात मिथेन वायू...
सांसर्गिक गर्भपाताचे नियंत्रणसर्व वयोगटातील जनावरे सांसर्गिक गर्भपात आजारास...
लाळ्या खुरकूत आजाराचे नियंत्रणलाळ्या खुरकूत आजारामुळे जनावराच्या तोंडातून सतत...
गाई, म्हशींचे गाभण काळ, व्यायल्यानंतरचे...गाई, म्हशी गाभण असताना शेवटचे दिवस खूप महत्त्वाचे...
भातशेतीत कीड नियंत्रणासाठी बेडूक...भातशेतीमध्ये विविध किडींचे नैसर्गिक नियंत्रण...
गाई,म्हशीतील गर्भधारणेसाठी योग्य काळ वाढत्या दुग्धोत्पादन क्षमतेसोबतच उच्च उत्पादक गाई...
जनावरांतील फऱ्या आजाराचे नियंत्रणफऱ्या हा गायी आणि म्हशींचा तीव्र, ज्वर सूचक...
शेळ्या-मेंढ्यामधील मावा आजारमावा हा विषाणूपासून होणारा संसर्गजन्य आजार आहे....
रेशीम शेतीने दिली आर्थिक साथपांगरा शिंदे (ता.वसमत,जि.हिंगोली) येथील प्रयोगशील...
रेबीजकडे नको दुर्लक्ष...कुत्र्यांच्या चाव्यामुळे रेबीज आजाराचा प्रसार...
घटसर्पावर नियंत्रण, वाढवी दुग्ध उत्पादनघटसर्प आजार अतितीव्र आणि अत्यंत घातक आहे. बऱ्याच...
संगोपन शेळ्यांच्या स्थानिक जातींचेस्थानिक जाती नैसर्गिक निवडपद्धतीतून निर्माण...
शेतकऱ्यांना उभारी देणारी संत ज्ञानेश्‍...किनखेडा (ता.रिसोड,जि.वाशीम) येथील प्रगतशील शेतकरी...
व्यवस्थापन म्हशींच्या माजाचेदुग्ध व्यवसाय किफायतशीर होण्यासाठी म्हशीने दर १३...
सुधारीत पद्धतीने लाव्ही पक्षीपालनजपानी लाव्ही पक्षांची खाद्याची गरज फार कमी असते....
जनावरांची रक्त तपासणी महत्त्वाची...आजार करणारे रोगजंतू जनावरांच्या शरीरामधील आंतरिक...
गोठ्यातील माश्यांचे एकात्मिक व्यवस्थापनगोठ्यात होणाऱ्या अस्वच्छतेमुळे कीटकवर्गीय...
जनावरांतील परोपजिवींचे नियंत्रण...सध्याच्या काळातील परोपजिवींच्या प्रादुर्भावामुळे...
पावसाळ्यातील जनावरांचे व्यवस्थापनपावसाळ्यात मोठ्या प्रमाणात आर्द्रता वाढते आणि अशा...
दुधाळ जनावरांच्या आहारात कॅल्शिअम...जनावरांच्या खाद्यामध्ये विकसित होणारी बुरशी तसेच...