Agriculture Agricultural News Marathi success story of Sujata Chavan ,Sangli | Agrowon

तेलनिर्मिती उद्योगात तयार केली ओळख

अभिजित डाके
सोमवार, 14 डिसेंबर 2020

लाकडी तेल घाणा या प्रक्रिया उद्योगाची लहान प्रमाणात सुरुवात केली. केवळ हा छोटा उद्योग न राहता त्याचे मोठ्या व्यवसायामध्ये रूपांतर कसे होईल याचा दररोज अभ्यास करते. व्यवसाय करताना यश, अपयश, नफा-तोटा  होतच राहतो. सातत्य आणि चिकाटी असेल तर निश्‍चितपणे शेतीपूरक उद्योगात यश मिळते. हा माझा अनुभव आहे.
 

सांगली शहरातील सौ. सुजाता विठ्ठल चव्हाण यांनी बाजारपेठांचा अभ्यास करून तीन वर्षांपूर्वी लाकडी तेल घाणा सुरू केला. सध्या त्या सात प्रकारच्या तेलाचे उत्पादन घेतात. दर्जेदार तेलबिया उपलब्ध होण्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांशी करार शेती केली आहे. मार्केटमध्ये वेगळी ओळख तयार करण्यासाठी ‘कोसंत’ ब्रॅण्ड तयार केला आहे.

सांगली हे माहेर असलेल्या सुजाता चव्हाण यांची कौटुंबिक आर्थिक परिस्थिती बेताची होती. वडिलांनी शेती आणि टेलरिंग व्यवसाय पाहत एक मुलगा आणि तीनही मुलींना चांगल्या पद्धतीने शिकविले. सुजाताताईंचा एम.कॉम. शिक्षण पूर्ण करताना घरच्या तीन एकर शेती नियोजनात त्यांचा चांगला सहभाग होता. त्यामुळे शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करण्याची आवड निर्माण झाली होती. या दरम्यान ऐतवडे खुर्द येथील कृषी पदवीधर विठ्ठल चव्हाण यांच्याशी त्यांचा २००२ मध्ये विवाह झाला. पती नोकरीनिमित्त नागपूरला असल्याने त्यांनी सांगली शहर सोडले.

पूरक व्यवसायाला सुरुवात
सुजाताताईंचे पती नोकरीनिमित्त सातत्याने फिरतीवर असायचे. दरम्यानच्या काळात त्यांनी नागपूर येथे इव्हेंट मॅनेजनेंटचे एका वर्षाचे प्रशिक्षण घेतले. त्यातूनच पूरक व्यवसाय करण्याची संधी त्यांना चालून आली. बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन सुजाताताईंनी ‘आदिती फूड्स’ या नावाने व्यवसाय सुरू केला. यामध्ये त्यांनी कोल्हापूर पद्धतीची चटणी, कोल्हापुरी चप्पल अशी विक्री सुरू केली. त्यानंतर इव्हेंट मॅनेजमेंट शिक्षणाचा उपयोग करून काही इव्हेंट सुरू केले. त्याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याने आत्मविश्‍वास वाढला.
याच दरम्यान २००८ मध्ये सुजाताताईंच्या पतीची बदली सांगली येथे झाली. नागपूरमध्ये पूरक व्यवसायात मिळालेले यश हे त्यांना ऊर्जा देणारे होते. आपल्या गावी काही तरी पूरक व्यवसाय असावा, यादृष्टीने त्यांचा विचार सुरू झाला. सांगली परिसरातील बाजारपेठेचा अभ्यास करून कोणता नवीन व्यवसाय करता येईल, याची त्यांनी चाचपणी सुरू केली. दरम्यानच्या काळात त्यांच्या पतीने सांगली येथे शेती सेवा केंद्र सुरू केले. याचबरोबरीने नावीन्यपूर्ण व्यवसायाबाबत त्यांची पतींशी चर्चा होत होती. परंतु कोणता व्यवसाय सुरू करायचा याचा मार्ग सापडत नव्हता. प्रत्येक ठिकाणी जाऊन विविध व्यवसायांची माहिती घेण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू होता. यामध्ये तीन वर्षांचा कालावधी गेला. या अभ्यासातून त्यांनी २०१६ मध्ये सांगलीमध्ये लाकडी तेल घाणा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यादृष्टीने बाजारपेठेत यंत्राची पाहणी केली. परंतु घाण्याची तेल काढण्याची क्षमता आणि किंमत याचा ताळमेळ लागत नव्हता. त्यामुळे मार्केटमधील विविध क्षमतेच्या घाण्यांचा त्यांनी अभ्यास केला. गरजेनुसार घाण्यासाठी लागणारे साहित्य खरेदी करून तेल काढण्यासाठी योग्य क्षमतेचा घाणा त्यांनी तयार केला. याचबरोबरीने लाकडी घाण्यावर तेल काढण्याबाबत नाशिक येथे प्रशिक्षण देखील पूर्ण करून २०१७ मध्ये सांगली शहराजवळच स्व मालकीच्या जागेत लाकडी घाण्यावर तेलनिर्मिती उद्योगाला सुरुवात केली.

गुणवत्तापूर्ण तेलाचे उत्पादन 
सुजाताताईंनी लाकडी घाण्यावर नियोजनपूर्वक तेलाची निर्मिती सुरू केली. व्यवसायाची अधिकृत नोंदणीदेखील केली. तेलाची गुणवत्तादेखील कसोशीने जपली. यासाठी त्यांनी म्हैसूर येथे एका दिवसाचे तेल तपासणीचे प्रशिक्षण घेतले. या प्रशिक्षणामुळे उत्पादित तेलाची गुणवत्ता जपणे त्यांना शक्य झाले. तेल उत्पादन आणि विक्री नियोजनाबाबत सुजाताताई म्हणाल्या, की बाजारपेठेत आपल्या उत्पादनाचा ब्रॅण्ड टिकवायचा असेल तर तेलाच्या गुणवत्तेच्या बरोबरीने पॅकिंगदेखील महत्त्वाचे आहे. मॉलमध्ये तेलाची विक्री करायची असल्याने पाऊच पॅकिंग लागते. या दरम्यान विविध ठिकाणी माहिती घेत असताना नवी दिल्ली येथे वर्ल्ड फूड इंडियाच्या प्रदर्शनाची बातमी दैनिक ‘ॲग्रोवन’मध्ये वाचनात आली. त्यानुसार मी या प्रदर्शनाला भेट देऊन आले. या   प्रदर्शनात तेल पॅकिंगसाठी लागणाऱ्या यंत्र तसेच इतर उत्पादनांचीदेखील सविस्तर माहिती मिळाली.  या मोठ्या प्रदर्शनाला भेट दिल्यामुळे पूरक व्यवसायाची निवड बरोबर केली असल्याची खात्री झाली. तसेच भविष्यात रसायनमुक्त खाद्य तेलाची मागणी वाढणार आहे, याचा अंदाज देखील आला.

प्रदर्शनांतून तेल विक्रीला चालना
बाजारपेठेत वेगळेपण जपण्यासाठी त्यांनी तेलाचा ‘कोसंत' ब्रॅण्ड तयार केला. लाकडी घाण्यातील तेल ही संकल्पना सांगली परिसरातील शहरी ग्राहक आणि बाजारपेठेमध्ये फारशी पोहोचलेली नव्हती. त्यामुळे पहिल्या टप्प्यात तेल विक्रीला अडचणी आल्या. परंतु न डगमगता तेल विक्रीसाठी विविध पर्याय शोधण्यास सुरुवात केली. याबाबत सुजाताताई म्हणाल्या, की तेल विक्रीच्या नियोजनात मला माझ्या पतीची चांगली साथ मिळाली. माझे पती पहिल्यापासूनच मार्केटिंग फिल्डमध्ये काम करत होते. त्यांनी तेलाच्या विक्रीची जबाबदारी घेतली. लाकडी घाण्यावर तेलनिर्मिती सुरू झाल्यावर विक्रीच्या दृष्टीने सांगली शहरात भरणाऱ्या विविध प्रदर्शनामध्ये सहभागी होण्यास सुरुवात केली. प्रदर्शनातील स्टॉलवर जाहिरातीसाठी ‘लाकडी घाण्यावरील तेल’ हा फलक लावला होता. त्यामुळे प्रदर्शनात येणाऱ्या ग्राहकांना याबाबत उत्सुकता तयार झाली. प्रदर्शनाच्या ठिकाणी १०० मिलि, २०० मिलि पाऊचमध्ये तेलाची विक्री सुरू केली. त्यापासून विक्रीचा नवा मार्ग सापडला. तसेच मित्र परिवाराचीही तेलाची प्रसिद्धी आणि विक्रीच्या नियोजनामध्ये चांगली मदत झाली. यातून व्यवसायाला गती मिळाली. उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास सुरुवात झाली. 

सध्या ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन आम्ही शेंगदाणा, करडई, सूर्यफूल, बदाम, खोबरे, तीळ तेलाचे उत्पादन घेत आहोत. शेंगदाणा, करडई आणि सूर्यफूल तेलाचा विक्री दर सरासरी ३०० ते ३४५ रुपये प्रति लिटर असा आहे. खोबरे, तीळ आणि बदाम तेलाची २०० मिलि ते एक लिटर पॅकिंगमध्ये विक्री केली जाते. खोबरेल आणि तीळ तेल २०० मिलि ११० रुपये आणि १०० मिलि बदाम तेल ३२० रुपये दराने विकले जाते. सध्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल दहा लाखांपर्यंत असून, सर्व खर्च वजा जाता १० ते १५ टक्के निव्वळ नफा शिल्लक राहतो. बाजारपेठेतील मागणी आणि कच्च्या मालाची उपलब्धता लक्षात घेता दरामध्ये चढ-उतार होत असतात.

संकटावर केली मात 
गतवर्षी सांगली शहरात कृष्णा नदीला आलेल्या महापुरामुळे सुजाताताईंच्या तेलनिर्मिती प्लांटमध्ये पाणी साचले होते. त्यामुळे कच्चा माल, तयार तेलाचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीतून सावरत असतानाच कोरोना प्रसारामुळे बाजारपेठ बंद झाली. परिणामी, उत्पादन कमी झाले, विक्रीमध्ये अडचणी आल्या. परंतु सुजाताताईंनी न खचता अपार कष्ट आणि सातत्य या दोन्हींची सांगड घालून अथडळे दूर करत पुन्हा नव्या जोमाने लाकडी घाण्यावर तेलनिर्मितीचा व्यवसाय सुरू ठेवला आणि संकटातून त्या बाहेर पडल्या.

तेलनिर्मिती उद्योगाची सूत्रे 

  • शेतकरी आणि मार्केटमधून कच्च्या मालाची खरेदी.
  • शेतकऱ्यांशी करार शेती पद्धतीचा अवलंब.
  •  शेतकऱ्यांना तज्ज्ञांकडून वेळोवेळी सल्ला सेवा.
  • कच्चा माल आणि तेलाच्या गुणवत्तेमध्ये तडजोड नाही.
  • रसायनमुक्त कच्च्या मालाची खरेदी.
  • १०० मिलि ते पाच लिटरपर्यंत तेलाचे पॅकिंग उपलब्ध.
  • सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबई बाजारपेठेत तेलाची विक्री.

अ‍ॅग्रोवन’ची शिदोरी
दैनिक ‘अ‍ॅग्रोवन’ सुरू झाल्यापासून सुजाताताई वाचक आहेत. याबाबत त्या म्हणाल्या, की यातील तांत्रिक विषय, बातम्यांमुळे राज्य, परराज्यांतील माहिती मिळते. तसेच यशकथांमधून प्रेरणा मिळते. यामुळे येणाऱ्या संकटावर मी मात करू शकले. नवीन तंत्रज्ञानासह विविध माहितीची शिदोरी मला मिळाली आहे.

- सौ. सुजाता चव्हाण,   ८८०५८३१७०९


फोटो गॅलरी

इतर महिला
पूरक उद्योगातून महिला गट झाला सक्षमग्रामीण भागातील महिलांना योग्य प्रशिक्षण,...
फळबागेला प्रक्रिया उत्पादनांची जोडशेतीची आवड जोपासण्यासाठी कुटुंबाचे चांगले पाठबळ...
बचत गटाने दिली आर्थिक ताकद.आगसखांड (ता. पाथर्डी, जि. नगर) येथील बारा...
टार्गेट ठेवूनच करतेय शेतीपतीची बॅंकेत नोकरी असल्याने बदली ठरलेली. त्यामुळे...
सविताताईंनी जिद्दीने ठरविले की लढायचेपतीचे हृदविकाराने झालेले निधन, डोक्यावर सात...
कणेरीच्या ‘सिद्धगिरी’ने बनवले महिलांना...कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी (ता. करवीर) येथील...
वातदोषावर उपाय ः हादग्याची फुले, शेंगाआयुर्वेदानुसार त्रिदोषांपैकी वातदोष कमी...
शेळीपालनाने दिली आर्थिक प्रगतीची दिशाजळवंडी (ता.जुन्नर, जि.पुणे) या दुर्गम आदिवासी...
तेलनिर्मिती उद्योगात तयार केली ओळखसांगली शहरातील सौ. सुजाता विठ्ठल चव्हाण यांनी...
आरोग्यवर्धक तांदूळअन्नपदार्थात ‘तांदूळ’ सर्वांना सुपरिचित आहेच. या...
सामाजिक दायीत्वातून जीवनात फुलले ‘...आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा पत्नी आणि...
चटणी, मसाल्याचा बनविला ब्रॅण्डकोल्हापूरची खाद्य संस्कृती म्हटलं की, तिखटाबरोबर...
आरोग्यदायी आले आल्यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्वे आणि खनिजे...
संतुलीत आहार स्रोत ः सीताफळसीताफळाची लोकप्रियता कोरडवाहू लागवडयोग्य, कीड...
शेतीला मिळाली पूरक उद्योगांची जोडभोके (ता. जि.रत्नागिरी) या दुर्गम गावातील देवयानी...
जाणून घ्या पळसाचे आरोग्यदायी गुणधर्मआपल्या सर्वांना पळस ही वनस्पती परिचित आहे....
आरोग्यदायी आवळाआवळा हे फळ प्रक्रिया केल्यास आपल्याला वर्षभर औषध...
सीताफळातून होतो जीवनसत्त्वांचा पुरवठासीताफळात जीवनसत्त्व क अत्यंत चांगल्या प्रमाणात...
हळदीचे औषधी गुणधर्महळद ही अत्यंत गुणकारी असून, त्यातील जंतूनाशक...
गुणकारी वाळावाळा म्हटले की उन्हाळ्याच्या दिवस आठवतात. माठ...