देशी गोपालनातून शेती केली शाश्वत

किणी (ता.हातकणंगले,जि.कोल्हापूर) येथील सुमित अशोक दणाणे या अभियंता युवकाने नोकरी सोडून सेंद्रिय शेतीची दिशा धरली आहे.आरोग्यदायी शेती करण्याकडे त्यांचा कल आहे. सेंद्रिय शेतीला देशी गोपालनाची जोड दिल्याने उत्पन्नामध्ये देखील वाढ झाली आहे.
cow shed
cow shed

किणी (ता.हातकणंगले,जि.कोल्हापूर) येथील सुमित अशोक दणाणे या अभियंता युवकाने नोकरी सोडून सेंद्रिय शेतीची दिशा धरली आहे.आरोग्यदायी शेती करण्याकडे त्यांचा कल आहे. सेंद्रिय शेतीला देशी गोपालनाची जोड दिल्याने उत्पन्नामध्ये देखील वाढ झाली आहे. 

पुणे-बेंगळुरू महामार्गावर कोल्हापूरपासून सुमारे वीस किलोमीटर अंतरावर किणी हे गाव आहे. या गावातील युवा शेतकरी सुमित दणाणे यांनी सेंद्रिय शेतीकडे वाटचाल सुरू केली आहे. एम.टेक (मेटॅलर्जी) पदवी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी एका कॉलेजमध्ये अधिव्याख्यातापदी नोकरी केली.परंतु शेतीची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. याच विचारातून त्यांनी नोकरी सोडून घरच्या शेतीला प्राधान्य दिले.  देशी गाईंचे संगोपन  शेतीसाठी पुरेशा प्रमाणात शेणखत,गोमूत्र उपलब्ध होण्यासाठी सुमित दणाणे यांनी पाच वर्षांपूर्वी दोन देशी गाई घेतल्या. याचवेळी गाईंच्या संगोपनाबाबत प्रशिक्षण देखील घेतले. गाईंसाठी दहा गुंठे क्षेत्रावर गोठा तयार केला. सध्या त्यांच्याकडे १३ देशी गाई आणि चार कालवडी आहेत. खिलार, गीर, हरियानवी थारपारकर या देशी गाईंचे  त्यांनी संगोपन केले आहे.  असे आहे नियोजन 

  • दररोज सकाळी सुमारे पंचवीस लिटर आणि संध्याकाळी वीस लिटरपर्यंत दूध संकलन. सकाळी काढण्यात येणारे पंचवीस लिटर दूध पॅकिंग करून ग्राहकांना विक्री. 
  • सकाळी साडे सात वाजेपर्यंतचे अर्ध्या, एक लिटर दुधाचे पिशवी पॅकिंग.  किणी,वडगाव, वाठार आदि भागातील ग्राहकांना दणाणे स्वतः दूध पोहोच करतात. 
  • महिन्याला साडेपाचशे लिटर दुधाची विक्री.७० रुपये लिटर दराने दुधाची विक्री. तूप, ताक निर्मिती
  • सायंकाळी संकलित होणाऱ्या २० लिटर दुधाचा तूप निर्मितीसाठी वापर. 
  •  तूप निर्मितीमध्ये दणाणे यांना आई सौ.मीनाक्षी, पत्नी सौ.अरुणा यांची मदत. 
  •  दर महिन्याला सात किलो तूप निर्मिती. ग्राहक घरी येऊन तूप खरेदी करतात.प्रति किलो २५०० रुपये दराने विक्री.
  •  फेब्रुवारी ते मे महिन्यात दररोज सरासरी १५ लिटर ताक निर्मिती. ३० रुपये लिटर दराने ताक विक्री.
  •  दूध,तूप,ताक विक्रीसाठी ‘आयुर्धन' ब्रॅंन्ड.
  • शेण,गोमुत्रामधून मिळकत 

  •  शेणापासून कंपोस्ट खत निर्मिती. जीवामृत निर्मितीसाठी शेतकऱ्यांकडून ताज्या शेणाला मागणी. ताजे शेण ७ रुपये किलो दराने विक्री. 
  •  स्वतःच्या शेतीमध्ये गोमुत्राचा वापर. जीवामृत निर्मिती, दशपर्णी अर्क निर्मितीसाठी शेतकऱ्यांना २५ रुपये लिटर दराने गोमूत्र विक्री.महिन्याला सुमारे एक हजार रुपयांची मिळकत. 
  •  गोमूत्र अर्क, अग्निहोत्र कांड्या, दंतमंजन, नेत्राऔषधींची मागणीनुसार निर्मिती.  
  •      दणाणे यांनी देशी गोपालनातून आर्थिक सक्षमता मिळविण्याचा प्रयत्न केला आहे. दर महिन्याला सरासरी ५५० लिटर दूध आणि सात किलो तुपाची विक्री होते. यातून चारा, गाईंचे व्यवस्थापन, औषधोपचार,मजुरी खर्च वजा जाता दर महिन्याला पंधरा हजाराचा नफा शिल्लक रहातो. 

    सेंद्रिय पद्धतीने पीक व्यवस्थापन  सुमित दणाणे यांनी चार वर्षांपासून पाच एकर शेती पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने विकसित केली आहे. गेल्या चार वर्षांपासून ते पाच एकरांमध्ये विविध प्रकारची पिके घेतात. सध्या रासायनिक शेतीच्या तुलनेत पीक उत्पादन जास्त नसले तरी पिकांची गुणवत्ता चांगली आहे. जमिनीचा पोतही चांगल्या प्रकारे सुधारला आहे.  पाच एकरांपैकी तीन एकरांमध्ये ऊस लागवड असते. एकरी ४५ टनांचा उतारा आहे. उसामध्ये भुईमुगाचे आंतरपीक घेतले जाते. एक एकरावर काळ्या हुलग्याची लागवड असते. गेल्यावर्षापासून एक एकरावर हळद लागवडीला त्यांनी सुरवात केली.गेल्यावर्षी पुरामुळे पिकाचे नुकसान झाल्याने उत्पादनात घट आली. हळकुंडांपासून ७०० किलो हळदीची निर्मिती केली. परीसरातील ग्राहकांना ३०० रुपये किलो या दराने हळदीची विक्री करण्यात आली. यंदा हळदीचे चांगले पीक आले आहे. पीक व्यवस्थापनामध्ये कंपोस्ट खत, जीवामृत, कृषी पंचगव्य, दशपर्णी अर्काचा वापर केला जातो. याशिवाय गोमूत्र अर्क, ताकाची पिकावर फवारणी केली जाते. तसेच पाट पाण्यातूनही दिले जाते. 

    शेतकरी गटातून उपक्रमांना चालना

    सुमित दणाणे यांनी नोकरी सोडून सेंद्रिय शेतीचा मार्ग पत्करला. पण केवळ स्वतः:च्या शेतीपुरते मर्यादित न राहता गाव परिसरातील समविचारी शेतकऱ्यांच्या क्रांती उत्पादक शेती गटाला कृषी विभागाच्या माध्यमातून चालना दिली. गटामध्ये  ११ शेतकरी कार्यरत आहेत. या गटाअंतर्गत २२ एकर शेतीचे प्रमाणीकरण करण्यात येत आहे. गटातील शेतकरी सेंद्रिय पद्धतीने ऊस, हळद, हुलगा, हरभरा, उडीद मूग, भाजीपाला आदि पिकांची लागवड करतात. गटाला कृषी विभाग आणि कृषी विज्ञान केंद्र, तळसंदे यांच्या वतीने सुरू असलेल्या प्रशिक्षणांचा फायदा होतो. दणाणे यांना नीतेश ओझा, डॉ. रणजित फुले आदींचे मार्गदर्शन मिळत असते. 

    - सुमित दणाणे ९०९६२८२००३

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com