उमाताईंनी मिळवली आयुष्याची भाकरी

गाडीवर फिरून ज्वारीच्या कडक भाकरीची विक्री करत कुंभारी (ता. दक्षिण सोलापूर,जि.सोलापूर) येथील सौ. उमा विठ्ठल सुतार यांनी खऱ्या अर्थाने आयुष्यासाठी कायमची भाकरी मिळवली.आज प्रति दिन किमान ५०० भाकरींची विक्री करतात. यातून त्यांनी स्वतःचा संसार उभा केलाच, याचबरोबरीने तीन महिलांना रोजगारही दिला आहे.
Uma Sutar
Uma Sutar

गाडीवर फिरून ज्वारीच्या कडक भाकरीची विक्री करत कुंभारी (ता. दक्षिण सोलापूर,जि.सोलापूर) येथील सौ. उमा विठ्ठल सुतार यांनी खऱ्या अर्थाने आयुष्यासाठी कायमची भाकरी मिळवली.आज प्रति दिन किमान ५०० भाकरींची विक्री करतात. यातून त्यांनी स्वतःचा संसार उभा केलाच, याचबरोबरीने तीन महिलांना रोजगारही दिला आहे.  

सोलापूर-अक्कलकोट मार्गावरील कुंभारी हे सौ. उमा सुतार यांचे गाव. त्यांचे पती विठ्ठल सुतार सोलापुरात एका खासगी कंपनीत काम करतात. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा. मोठी मुलगी दीपालीचे लग्न झाले आहे. दुसरी मुलगी रुपाली आणि मुलगा संकेत पदवीचे शिक्षण घेत आहेत. त्या स्वतः दहावीपर्यंत शिकलेल्या आहेत. सतत नावीन्याचा ध्यास आणि पडेल त्या कष्टाची तयारी या बळावर त्यांनी आजपर्यंतचा प्रवास केला. आधीपासूनच घरामध्ये त्यांचा कपडे विक्रीचा व्यवसाय होता. परंतु सोलापूरपासून अगदी जवळ असणारे गाव आणि गावातही काही महिला कपडे विक्रीचा व्यवसाय करत असल्याने त्यातून फारसे हाती लागत नव्हते. त्यामुळे  अजून काही तरी जोडव्यवसाय करण्याचा त्यांनी विचार केला. बाजारपेठेचा अभ्यास करून कडक भाकरी निर्मिती व्यवसाय करण्याचे त्यांनी ठरवले.त्यामध्ये अडचणी होत्या. परंतु त्यांनी जिद्द सोडली नाही. बचत गटातून उद्योगाला चालना   दोन वर्षापूर्वी सौ. उमा सुतार यांचा बोरामणीच्या यशस्विनी अॅग्रो फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या अध्यक्षा सौ. अनिता माळगे यांच्याशी संपर्क झाला. आधीपासून स्वतः उमाताई गावातील महिला बचत गटामध्ये काम करत होत्या. यशस्विनीच्या माध्यमातून त्यांनी शिवज्योती महिला शेतकरी गटाची सुरुवात केली. त्याचा मोठा आधार त्यांना मिळाला. या कंपनीने समूह गटाच्या कर्जवाटप योजनेतून उमाताईंना ५० हजारांचे कर्ज दिले आणि उमाताईंच्या कडक भाकरी निर्मिती व्यवसायाला  चालना मिळाली.

मार्केटचा घेतला शोध  तीर्थक्षेत्र श्री स्वामी समर्थांच्या अक्कलकोट नगरीकडे जाणाऱ्या मार्गावरच कुंभारी हे गाव आहे. ज्वारीची कडक भाकरी ही सोलापूरची ओळख. हे लक्षात घेऊनच उमाताईंनी कडक भाकरी निर्मिती आणि विक्री व्यवसाय निवडला. या परिसरात अनेक हॅाटेल्स आणि धाबे आहेत. तसेच आशिया खंडातील सर्वांत मोठी कामगारांची घरकुल वसाहत याच गावात आहे. या मार्गावर वर्षभर भक्तांची गर्दी असते. याशिवाय कामगार वसाहतीतूनही काही व्यावसायिक आणि घरगुती ग्राहकांकडूनही भाकरीची मागणी असते. ही बाजारपेठ त्यांनी शोधली आणि  भाकरी निर्मितीला सुरुवात केली. तीन महिलांना रोजगार पांढरी शुभ्र आणि पापडासारखी पातळ भाकरी चुलीवर भाजली जाते. त्यामुळे या भाकरीला येणारी चव काहीशी वेगळीच. आज त्या स्वतः घरी भाकरी करतातच, पण मागणी वाढत असल्याने आपल्याच गटातील तीन महिलांकडूनही त्या भाकरी करून घेतात. त्यासाठी शेरभर ज्वारीचे पीठ महिलांना दिले जाते. त्यातून किमान ४० भाकरी केल्या जातात. त्यासाठी प्रति भाकरी दोन रुपये रोजगार दिला जातो. एक महिला दिवसाला १०० भाकरीतून २०० रुपयांचा रोजगार सहज मिळवते. 

गटातील शेतकऱ्यांकडून ज्वारीची खरेदी    ज्वारीच्या कडक भाकरीसाठी उमाताईंना दर तीन महिन्याला पाच क्विंटलहून अधिक ज्वारी लागते. पांढरी शुभ्र आणि चवदार भाकरीसाठी अस्सल सोलापुरी मालदांडी ज्वारी त्या खरेदी करतात. ज्वारीची खरेदी त्या एकाचवेळी करतात. खरेदीसाठी बाजारात न जाता, आपल्याच महिला शेतकरी गटातील सदस्यांकडून एकदाच ज्वारी खरेदी करतात. त्यामुळे पैशाची बचत होते,तसेच गटातील शेतकऱ्यांनाही जागेवरच ज्वारीची विक्री होऊन पैसे मिळतात.

भाकरी विक्रीचे नियोजन  उमाताईंच्या भाकरी निर्मिती व्यवसायाची सुरुवात काहीशी कठीणच झाली. पहिल्यांदा भाकरीला फारशी मागणी मिळत नव्हती. तेव्हा हॅाटेल्स, धाबे, दुकाने, घरगुती ग्राहक यांच्याकडे त्यांनी भाकरी विक्री सुरू केली. अनेकदा पहिल्यांदा भाकरी ठेवून घ्या, आवडल्यानंतर, विक्री झाल्यानंतर पैसे द्या, असे सांगून त्यांनी भाकरीसाठी ग्राहक तयार केला. आता मात्र त्यांना दररोज थेट फोनवर भाकरीसाठी ऑर्डर येते. आज दिवसाला किमान ५०० ते ६०० भाकरीची त्या विक्री करतात. 

मोटारसायकलवरून भाकरीची विक्री आज कुंभारी आणि परिसरातील दोन हॅाटेल्स, काही धाबे, १५ ते २० किरकोळ दुकाने आणि काही कुटुंबांच्याकडून भाकरीची मागणी असते. प्रत्येकाचे दिवस आणि आठवड्याची मागणी ठरलेली आहे. त्यानुसार भाकरीची विक्री होते.  उमाताईंना मुलगा, मुलगी भाकरी विक्रीसाठी मदत करतातच. त्या स्वतःही मागे हटत नाहीत. त्या स्वतः दररोज मोटारसायकलवरून भाकरीची ऑर्डर हॉटेल, धाब्यावर पोहोचवितात. 

भाकरीचे पॅकिंग  प्लॅस्टिक पिशवीमध्ये भाकरीचे पॅकिंग केले जाते. एका पॅकेटमध्ये पाच भाकरीचे पॅकिंग असते. प्रति पाकीट २५ रुपये याप्रमाणे विक्री होते. किरकोळ विक्रीत एक भाकरी पाच रुपयांना विकली जाते. भाकरीची खरेदी संख्या जास्त असल्यास चार रुपये दर ठेवला आहे. ज्वारी, त्याचे पीठ, महिलांचा रोजगार, पॅकिंग असा सगळा खर्च वजा जाता दिवसाकाठी उमाताईंना २०० ते २५०  रुपये मिळतात.

- सौ. उमा सुतार, ९१७५९५५९४८, ९८५०२५८३२४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com