लोकसहभागातून शेती अन् ग्रामविकासाला मिळाली चालना

उंबरीवाडी (ता.जावली,जि.सातारा) हे लहानसे गाव. डोंगरी भाग असल्याने मर्यादित शेती आणि वर्षभर उत्पन्नाची साधने कमी असल्याने लोकांचे रोजगारासाठी स्थलांतर होत होते. परंतु ॲवॉर्ड संस्था, कृषी विभागाचे मार्गदर्शन आणि लोकसहभागातून गावकऱ्यांनी गेल्या तीन वर्षांपासून ग्राम विकासाची दिशा पकडली आहे.
watershed development work by villagers
watershed development work by villagers

उंबरीवाडी (ता.जावली,जि.सातारा) हे लहानसे गाव. डोंगरी भाग असल्याने मर्यादित शेती आणि  वर्षभर उत्पन्नाची साधने कमी असल्याने लोकांचे रोजगारासाठी स्थलांतर होत होते. परंतु ॲवॉर्ड संस्था, कृषी विभागाचे मार्गदर्शन आणि लोकसहभागातून गावकऱ्यांनी गेल्या तीन वर्षांपासून ग्राम विकासाची दिशा पकडली आहे. सातारा जिल्ह्यातील बामणोली विभागात डोंगराच्या पायथ्याशी वसलेले उंबरीवाडी (ता.जावली) हे १२५ उंबऱ्यांचे गाव. गावामध्ये जाधव उंबरी आणि चोरगे उंबरी या दोन वाड्या आहेत. शेती हाच ग्रामस्थांचा मुख्य व्यवसाय. भात, नाचणी, गहू ही महत्त्वाची पिके. गावाची लोकसंख्या सुमारे ६१४ असून बहुतांशी पुरुष मंडळी रोजगारानिमित्त स्थलांतरित झाली आहेत. गाव परिसर मोठ्या प्रमाणात जैवविविधतेने समृद्ध आहे. वन विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या व्याघ्र प्रकल्पाच्या ‘बफर झोन' मध्ये गावाचा समावेश आहे. गावाचे भौगोलिक क्षेत्रफळ ५७७ हेक्टर असून २६० हेक्टरवर जंगल आहे. उर्वरित ३१७ हेक्टरपैकी सुमारे ४० हेक्टरवर शेती केली जाते. उत्पन्नाची साधने मर्यादित असल्याने सिंचन व्यवस्थेचा अभाव, शेती करण्यासाठी मनुष्यबळाची कमतरता, बदलते निसर्गचक्र आणि जंगली प्राण्यांचा मोठा त्रास शेतीसाठी होतो. गवे, माकडे व अन्य वन्यप्राण्यांकडून पिकांना मोठा धोका असल्याने पिकाखालील क्षेत्रात सातत्याने घट झाली. यामुळे  गावातील बहुतांश पुरुष मुंबई, पुणे येथे रोजगारासाठी स्थलांतरित झाले. त्यामुळे  गावात वयस्कर मंडळी आणि महिलावर्ग जास्त प्रमाणात दिसतो. 

ग्राम विकासाला सुरुवात  उंबरीवाडी गावाची लोकसंख्या कमी असल्याने सर्वच स्तरावर दुर्लक्ष झाले होते. २०१० पासून अॅवॅार्ड संस्थेने निसर्ग बायोटेक आणि अवेदा कार्पोरेशनच्या मदतीने गावातील समस्यांचा अभ्यास केला. त्यानुसार पर्यावरणपूरक कामे आणि उपजीविका विकास यावर भर दिला. जी कामे केली जातील त्या कामात १५ टक्के लोकसहभाग ही महत्त्वाची अट ग्रामस्थांपुढे ठेवण्यात आली. कोणत्याही कामात आर्थिक सहभाग न देता तेवढ्या रकमेचे श्रमदान करण्यावर गावकऱ्यांनी होकार दिला. त्यानुसार विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि गाव शिवार भेटी यातून  ग्राम विकासाचा आराखडा तयार झाला. त्यानुसार नियोजनास सुरुवात झाली. 

शुद्ध, मुबलक पिण्याचे पाणी भरपूर पावसाचा भाग असूनही एप्रिल, मे महिन्यात गावकऱ्यांना पाण्याची टंचाई भासायची. परिणामी तीन ते पाच किलोमीटर अंतरावरावरून महिलांना डोक्यावरून पाणी आणावे लागत असे.  यावर ग्रामस्थ आणि संस्थेने गावशिवारात लोकांच्या श्रमदानातून डोंगरातील पाण्याचे स्रोत बळकट केले. त्यांची स्वच्छता करून, स्रोतापासून लोखंडी पाइपलाइनच्या माध्यमातून  गावात पाणी आणले. गावात पाण्याची टाकी बांधून नळाद्वारे पिण्याचे पाणी प्रत्येक वॉर्डात देण्यात आले.  डोंगरात कोणत्याही यंत्राशिवाय लोखंडी पाईप श्रमदानकरून नेण्यात आल्या. यामध्ये महिलांनी सर्वाधिक कष्ट घेतले. वन्यप्राण्याकडून पाण्याच्या स्रोताचे नुकसान टाळण्यासाठी तारेचे कंपाऊंड करण्यात आले आहे.  वृक्षारोपण आणि औषधी वनस्पती लागवड   गाव शिवारातील सार्वजनिक जागा, खाजगी पडीक जागेमध्ये विविध फळवर्गीय, जंगली व औषधी रोपांची लागवड करण्यावर  ग्रामस्थांनी भर दिला आहे. गेल्या तीन वर्षात लोकसहभागातून सुमारे तीन हजार रोपांची लागवड करण्यात आली. यामध्ये जांभूळ, कोकम, चिक्कू, पेरू, अंजीर, फणस, काजू, लिंबू, शिकेकाई , मसाला पिकांची लागवड ग्रामस्थांनी केली आहे. पुढील चार वर्षात यातून लोकांना उत्पन्न अपेक्षित आहे.  व्यावसायिकदृष्टीने औषधी वनस्पतींच्या लागवडीसाठी संस्थेने भर दिला आहे.गावातील तीन शेतकऱ्यांच्या शेतावर शतावरीची लागवड केली आहे. वृक्षारोपण व औषधी वनस्पती लागवड याअंतर्गत पाच एकर पडीक क्षेत्र लागवडीखाली आले आहे. या सर्व कामांमुळे रोजगारासाठी शहराकडे स्थलांतरित झालेले अनेक युवक गावाकडे पुन्हा येण्याच्या तयारीत आहेत. आजअखेर चार युवकांनी गावामध्ये येऊन शेती आणि अन्य पूरक व्यवसायाला सुरुवात केली आहे.         ग्रामविकासामध्ये उंबरीवाडी ग्रामपंचायत, सर्व ग्रामस्थांचे योगदान मिळत आहे. ॲवॉर्ड संस्थेचे अध्यक्ष प्रा.डॉ. भास्करराव कदम, सचिव अॅड. नीलिमा खांडे- कदम, प्रकल्प संचालक किरण कदम, प्रकल्प समन्वयक संतोष धुमाळ, तालुका कृषी अधिकारी श्री. देशमुख, वनविभाग (सह्याद्री व्याघ्र) यांचेही चांगले सहकार्य आणि मार्गदर्शन लाभत असल्याचे संरपच कविता जाधव यांनी सांगितले. 

शेतीसाठी पाण्याची उपलब्धता

  • शेतीला बारमाही पाणी उपलब्ध व्हावे किंवा किमान वर्षातून दोन पिके घेता यावीत यासाठी शेतीसाठी पाण्याच्या सोय करावी अशी ग्रामस्थांची मागणी होती. या बाबींवर विचार करून संस्थेने या क्षेत्रातील तज्ज्ञ अजित गोखले यांचे मार्गदर्शन घेतले. गाव परिसर आणि जंगलातील पाण्याचे स्रोत बळकट करणे, भूगर्भातील पाणी साठ्यात वाढ करणे, पाण्याची अनावश्यक गळती थांबविणे या बाबींवर ग्रामस्थांनी भर दिला. श्रमदानातून समतल चर काढणे, दगडी बांध घालणे, जाळीचे बंधारे (गॅबियन) तयार करणे, मातीचा बंधारा बांधणे यासारखी कामे गावकऱ्यांनी दोन वर्षांत पूर्ण केली.
  • पाटातील पाणी गळती कमी करण्याच्या उद्देशाने २५०० मीटर एचडीपीइ पाइपलाइन करण्यात आली. हे पाणी एक लाख लिटर क्षमतेची टाकीत साठवण्यात येणार आहे. हे पाणी येत्या काही दिवसात सिमेंट पाइपच्या माध्यमातून शेतापर्यंत पोहोचविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 
  •  शासनाच्या मागेल त्याला शेततळे या योजनेतून चोरगे उंबरी येथील अंकुश कदम, यशवंत कदम या दोन शेतकऱ्यांनी शेततळी घेतली आहेत. या शेततळ्यांना कृषी विभागाकडून अनुदान मिळाले आहे. सध्या दोन्ही शेततळ्यात मत्स्यबीज सोडले असून मासे विक्रीतुनही उत्पन्न वाढवण्यावर भर दिला आहे.
  • गेल्या दोन वर्षापासून पाणलोट उपचार पद्धती राबविल्यामुळे मागील वर्षी ५० एकरावर रब्बी पिकांची लागवड करण्यात आली. पीक पद्धती बदल, सुधारित जातीचे बियाणे यामुळेही उत्पादनात किमान २० टक्यांची वाढ झाल्याचे उपसरपंच तुकाराम कदम, काशीनाथ जाधव यांनी सांगितले.    
  • शेती विकासावर भर  

    शेती हेच लोकांचे एकमेव उत्पन्नाचे साधन असल्याने पीक पद्धती, लागवडीचे तंत्र, सुधारित बियाणांचा वापर, मिश्रपीक पद्धती, पडीक जमिनीवर औषधी वनस्पतींची लागवड, भाजीपाला लागवड, जुन्या जातींचे संवर्धन यावर भर देण्यात आला. गावकऱ्यांनी शेती विकासाच्या माध्यमातून उपजीविकेत सुधारणा करण्याचे ठरविले. त्यानुसार भात, कडधान्ये, गहू, हरभरा, यांच्या देशी जातींच्या संवर्धनासोबतच पिकांच्या सुधारित जातींचा वापर, आंतरपिकांची लागवड, सेंद्रिय निविष्ठांचा वापर, बीजप्रक्रिया याबाबत सातत्याने  शेतकऱ्यांना  मार्गदर्शन करण्यात आले. यासाठी शेती प्रशिक्षणे, शेती शाळा, अभ्यासदौरा, पीक प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून शेती उत्पन्न वाढीवर भर देण्यात आला.  शेतीमध्ये यांत्रिकीकरण व्हावे या उद्देशाने शेतकरी गट तयार करून पेरणी यंत्र, सायकल कोळपे,  कीडनाशक फवारणी पंपाचे वाटप करण्यात आले. आता शेतकरी या यंत्रांचा नियमितपणे वापर करत आहेत. गेल्या तीन वर्षापासून गावात फरस बी लागवडीत वाढ होत असून यातून कमी कालावधीत शेतकऱ्यांना चांगले आर्थिक उत्पन्न मिळत आहे. या सर्वांचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे.  

    ग्रामस्थांचा सहभाग  

  • कुटुंबातील एका सदस्याकडून आठवड्यातून एकदा श्रमदान.
  • श्रमदानात पुरुषांच्या तुलनेत महिलांचा अधिक सहभाग. 
  • कामानिमित्त बाहेर असणाऱ्या ग्रामस्थांकडून आर्थिक मदत. 
  •  भांडवल टंचाईवर मात करण्यासाठी गटशेतीवर भर.
  • गावात महिला तसेच पुरुषांच्या बचत गटाला सुरुवात. 
  • - कविता जाधव (सरपंच),९४२०७८७२४७.  - तुकाराम कदम (उपसरंपच),९४२३६८८२३३.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com