Agriculture Agricultural News Marathi success story of Vicharkranti NGO, Jakhori,Dist.Nashik | Agrowon

ग्राम परिवर्तनासाठी तरुणाईने घडविली विचार क्रांती

मुकुंद पिंगळे
रविवार, 14 जून 2020

लोकसहभागातून काम केल्यास ग्रामीण भागाचा जलद गतीने विकास शक्य असल्याची तरुणाईची भावना आहे. याच हेतूने जाखोरी (ता.जि.नाशिक) येथील तरुणांनी एकत्र येत ‘विचारक्रांती’ संस्थेच्या माध्यमातून ग्रामपरिवर्तनास सुरुवात केली. ग्रामविकास, शेती सुधारणा, शैक्षणिक सुविधा, वृक्ष संवर्धन आणि आरोग्य या विषयांमध्ये संस्था कार्यरत आहे.

लोकसहभागातून काम केल्यास ग्रामीण भागाचा जलद गतीने विकास शक्य असल्याची तरुणाईची भावना आहे. याच हेतूने जाखोरी (ता.जि.नाशिक) येथील तरुणांनी एकत्र येत ‘विचारक्रांती’ संस्थेच्या माध्यमातून ग्रामपरिवर्तनास सुरुवात केली. ग्रामविकास, शेती सुधारणा, शैक्षणिक सुविधा, वृक्ष संवर्धन आणि आरोग्य या विषयांमध्ये संस्था कार्यरत आहे.

गावातील शिकलेले तरूण नोकरीच्या निमित्ताने मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरामध्ये स्थिरावलेले आहेत. यातील काहीजण  ग्रामीण भागाचा विकास व्हावा या हेतूने एकत्र येत कार्यरत झाले. याचपैकी एक आहेत जाखोरी (ता.जि.नाशिक) येथील सुहास खाडे.  सध्या ते मुंबईमध्ये अभियंता म्हणून कार्यरत आहेत. जाखोरी गावात नव्या पिढीला अभ्यासाच्या संधी उपलब्ध व्हाव्या या हेतूने सुरुवातीला काही निवडक सोबत्यांनी काम सुरु केले. यातून २०१७ साली ‘विचारक्रांती सार्वजनिक वाचनालय व अभ्यासिका’ या संस्थेची स्थापना केली. अन् पुढे हेच काम विस्तारत गेले. संस्थेच्या माध्यमातून फक्त वैचारिक क्रांती न करता सामाजिक क्रांतीच्या हेतूने शैक्षणिक उपक्रमांसह घनकचरा व्यवस्थापन, वृक्षलागवड व वनसंवर्धन, कृषी क्षेत्रामध्ये विविध उपक्रम राबवून ग्रामीण भागाला एक दिशा देण्याचा एक कार्यक्रम संस्थेने आखला.

तरुणांचा प्रमुख सहभाग असलेला या संस्थेने जाखोरी गावासाठी काम करण्याचा संकल्प केला असून श्रमप्रतिष्ठादेखील जपली आहे. लोकसहभागावर संस्थेने भर दिला आहे. श्रमदान कार्यात तरुणाई एकत्र येऊन त्यांचे संघटन अजून मोठ्या प्रमाणावर मजबूत होत आहे. या कार्यात गावातील शिक्षित,अशिक्षित अशा तरुणाईचे संघटन उभे राहिले असून नावीन्यपूर्ण कामाने विकासाला चालना मिळू लागली आहे. संस्थेच्या कमिटीमध्ये सात सक्रिय सदस्य आहेत. यामध्ये सुहास खाडे (अध्यक्ष), किशोर कळमकर (उपाध्यक्ष), देविदास राजपूत(सचिव), संदीप बनकर (कोषाध्यक्ष) आणि अनुप कळमकर, कैलास धात्रक, विवेक कळमकर हे सदस्य म्हणून कार्यरत आहेत.

सुंदर गावाचा ध्यास 
कचरा व्यवस्थापन नसल्याने होणारी दुर्गंधी व उद्भवणारे आरोग्याचे प्रश्न यावर अभ्यास करून गाव स्वच्छ करण्यासह घनकचरा व्यवस्थापन करण्याची योजना संस्थेने आखली.यासाठी संस्थेने जनजागृतीवर भर दिला. ओला व सुका कचरा विलगीकरण,पर्यायी प्रक्रिया करून वापर याबाबत घरोघर महत्त्व पटवून दिले. विशिष्ट प्रश्नावली तयार करून नागरिकांची मते जाणून घेतली. नंतर प्रत्यक्ष कामकाज सुरु झाल्यानंतर टाकाऊ कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्यात येत आहे. यासाठी ‘वनक्रांती’ उपक्रमाच्या परिसरात सध्या कचरा जमा केला जातो. घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी नवीन प्रकल्प आखला असून जिल्हा परिषदेने यासाठी निधी मंजूर केला आहे. लवकरच हे काम गती घेणार आहे.

विचारक्रांती सायकल अभियान  
ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना वाहतुकीची सुविधा नसल्याने त्यांना सायकल उपलब्ध व्हाव्यात यासाठी ‘विचारक्रांती सायकल अभियान’ सुरु करण्यात आले. अनेकांकडे असलेल्या जुन्या, वापरात नसलेल्या सायकल संस्थेकडे द्या असे आवाहन करण्यात येते. त्या सायकली संस्थेद्वारे दुरुस्त करून ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना देण्यात येतात.

आरोग्य शिबिरांचे आयोजन 
ग्रामीण भागात ज्येष्ठ व गरजू घटकांना वेळेवर उपचार मिळत नाही, हे लक्षात घेऊन संस्थेतर्फे  दर तीन महिन्यांनी नाशिकमधील नामवंत दवाखान्याच्या माध्यमातून गावामध्ये आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात येते.

स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन  
ग्रामीण भागातील अनेक तरुणांना अभ्यासक्रम निवड, व्यावसायिक संधी, स्पर्धा परीक्षांची तयारी याविषयी सखोल माहिती नसते. यासाठी वाचनालयातर्फे महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थ्यांसाठी वर्षभर उपक्रमाचे आयोजन सुरु असते. यासाठी शासकीय अधिकारी, शिक्षण क्षेत्रातील नामवंत व्यक्ती, तज्ज्ञांना निमंत्रित केले जाते. 
व्यक्तिमत्त्व विकासासाठी शिबिरांचे आयोजन केले जाते. यासह ग्रामीण होतकरू तरुणांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सामाजिक विषयांवर आधारित राज्यस्तरीय निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा तसेच स्टँड अप कॉमेडी स्पर्धांचे आयोजन केले जाते.

महिला सक्षमीकरण 
ग्रामीण भागातील महिला सक्षमीकरण हा उद्देश समोर ठेऊन हक्काचे व्यासपीठ असावे यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. महिला सक्षमीकरण चर्चासत्र, बचत गट मार्गदर्शन शिबिर, महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम, पाककला स्पर्धांचा समावेश आहे. यांसह ‘विचारक्रांती महिला बचत गट’ची स्थापना करण्यात आली आहे. महिलांसाठी अभ्यास भेटीचे आयोजन करून त्यांना पूरक उद्योगासाठी प्रोत्साहन दिले जाते.  

शेतीविकासासाठी पुढाकार
ग्रामीण भागातील प्रत्येक तरुण शेतकरी हा केंद्रबिंदू मानून त्याच्यामध्ये प्रयोगशीलता रुजविण्यासाठी  विचारक्रांती संस्थेने विशेष काम हाती घेतले आहे. पारंपारिक शेतीपद्धतीमध्ये बदल करत  ग्रामस्तरावर अभ्यासू व प्रयोगशील तरुणाईसाठी कृषिविषयक विविध उपक्रम सुरु आहेत. शेतीच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती हा उपक्रमाचा मुख्य भाग आहे. गेल्या दोन वर्षांपासून बदलते शेती तंत्रज्ञान, पिकांच्या माध्यमातून नवीन संधी, उत्पादन व विक्री व्यवस्था या विषयांवर मुख्यत्वे भर देण्यात आला आहे. गावशिवारात विषयवार चर्चासत्रे व मार्गदर्शन शिबिरे घेण्यात आली आहेत. यातून प्रेरणा घेत गावातील तरुण शेतकऱ्यांनी विदेशी व व्यावसायिक भाजीपाला लागवडीचा प्रयोग केला आहे.

विचारक्रांती कट्टा
ग्रामविकासाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सर्व स्तरातील घटकांचा सहभाग मोलाचा आहे. वैचारिक देवाण घेवाण आणि एकीतून परिवर्तन शक्य आहे. या उद्देशाने आश्वासक वातावरण तयार करण्यासाठी ‘विचारक्रांती कट्टा’ ही संकल्पना नावारूपास आली. गावाचा विकास हा केवळ ग्रामपंचायतीची जबाबदारी नसून, सर्वांचा सहभाग ही भूमिका घेऊन ग्रामस्थांना या उपक्रमांतर्गत एकत्र केले जाते. रविवारी एखाद्या विशिष्ट विषयावर सर्व एकत्र जमून चर्चा घडवून आणली जाते.

समृद्ध पर्यावरणासाठी वनक्रांती अभियान 
  संस्थेने ‘वनक्रांती अभियान’ हा उपक्रम हाती घेतला आहे. सुरुवातीला जाखोरी ग्रामपंचायत आणि  विचारक्रांती वाचनालयाचा सर्वात मोठा व महत्त्वाकांक्षी उपक्रम होता. ग्रामपंचायतीचे उत्पन्न कसे वाढविता येईल? यावर मंथन करून नियोजन केले. त्यानुसार २०१९ मध्ये वर्षाच्या सुरुवातीला संस्थेच्या सदस्यांसह गावातील तरुण एकत्र येत गावालगतच्या डोंगराळ पडीक २१ एकर क्षेत्रावर सुमारे ६,५०० झाडे लावण्यात आली. त्यामध्ये चिंच,जांभूळ,आंबा, मोह व फणस या झाडांचा समावेश आहे. काही प्रमाणात औषधी वनस्पतींचा समावेश आहे. ग्रामपंचायत स्वावलंबी बनावी तसेच उत्पन्न वाढावे हा प्रमुख उद्देश ठेवण्यात आला आहे.  वृक्ष लागवडीसाठी बेजॉन देसाई फौंडेशनचे संस्थापक डॉ. अश्विनीकुमार भारद्वाज यांनी विशेष मदत केली आहे. लागवडीसह वृक्षांचे संवर्धन हा उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

असे आहेत उपक्रम 

  • कृषी क्षेत्रातील विषयांवर प्रयोगशील शेतकरी व तज्ज्ञांचे मार्गदर्शन. 
  • शेतकऱ्यांसाठी एखाद्या रविवारी विविध क्षेत्रातील यशस्वी उद्योजक, अधिकारी वर्गाचे मार्गदर्शन.
  • नवीन शेती तंत्रज्ञान व पीक पद्धतीची माहिती.
  •  जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकरी व कृषी संबंधित उद्योगांना भेटी.

- सुहास खाडे, ७०२१०९९०६७

 


फोटो गॅलरी

इतर ग्रामविकास
कांदा, लसूण शेतीत बहिरवाडीने मिळवली...बहिरवाडी (ता. जि. नगर) हे छोटे गाव कांदा व लसूण...
महिला बचत गटांच्या माध्यमातून हळद...सहकाराच्या धर्तीवर संघटित झालेल्या राजापूर...
गावातच होणार शेती नियोजनगावच्या शेतीचे नियोजन आता गावातच होणार आहे. कृषी...
लोकसहभागातून देशवंडी झाले पाणीदारजिल्ह्यातील देशवंडी(ता.सिन्नर) हे डोंगराळ भागात...
मावळंगे बनले रोपवाटिकांचे गावसाधारणपणे १९६५ मध्ये मावळंगे (जि.रत्नागिरी) गावात...
शेती, जलसंधारण, ग्रामविकासामधील ‘दिलासा‘ग्रामीण भागातील वंचित घटकांचा उत्कर्ष नजरेसमोर...
दर्जेदार डाळिंबाची खांजोडवाडीखांजोडवाडी (ता.आटपाडी,जि.सांगली) दुष्काळी...
जैवविविधता, कृषी अन् शिक्षणाचा जागरबत्तीस शिराळा (जि.सांगली) या तालुक्यातील युवकांनी...
लोकसहभागातून दुष्काळावर केली मात कोठली (जि.नंदुरबार) गावातील पाणीटंचाई...
पुणेवाडीचे शिवार एकीतून झाले पाणीदारपुणेवाडी (ता. पारनेर, जि.नगर) या पठारावरील...
तंत्रज्ञानावर आधारीत शेतीतून लाखेगावची...औरंगाबाद जिल्ह्यातील लाखेगावातील शेतकऱ्यांनी...
जलसंधारण मोहिमेतून पाणी टंचाईवर मातआजही माण, खटाव हे  दुष्काळी तालुका म्हणून...
लोकसहभागातून शेती अन् ग्रामविकासाला...उंबरीवाडी (ता.जावली,जि.सातारा) हे लहानसे गाव....
पिराचीवाडी झाली उपक्रमशील गावकोल्हापूर जिल्ह्यातील पिराचीवाडी(ता.कागल) हे...
‘कोरडवाहू‘ला दिशा देण्यासाठी संस्था...कोरडवाहू क्षेत्राचे पुनरुज्जीवन करण्यासाठी...
आदर्श कामांच्या उभारणीतून ठसा उमटवलेले...द्राक्ष, डाळिंब,कांद्यासाठी जगभर प्रसिद्ध नाशिक...
कुडावळेमध्ये `शत प्रतिशत भात लागवड'...गाव आणि शेतीचा शाश्वत विकास करायचा असेल तर...
कृषीसंपन्नता, आरोग्य, पर्यावरण हेच...कोटमगावाने (ता. जि. नाशिक) कृषीसंपन्न, आरोग्य व...
कांदा बीजोत्पादनातून मिळवली शिवापूर...अकोला जिल्ह्यातील शिवापूर गावाने कांदा...
जलसंधारणातून शिवार फुलले, समाधानाचे...मामलदे (जि.जळगाव) गावाने शिवारातील पाण्याची टंचाई...