ग्राम, शेती विकासाला ‘रोटरी’ची साथ

नाशिक शहरामध्ये ७५ वर्षांपासून रोटरी क्लब ऑफ नाशिक, गंजमाळ ही स्वयंसेवी संस्था कार्यरत आहे. संस्थेने नाशिक जिल्ह्यातील आदिवासी पट्ट्यात कृषी, ग्रामविकास, जलसंधारण, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण संवर्धन या कामांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.
watershed development work
watershed development work

नाशिक शहरामध्ये ७५ वर्षांपासून रोटरी क्लब ऑफ नाशिक, गंजमाळ ही स्वयंसेवी संस्था कार्यरत आहे. संस्थेने नाशिक जिल्ह्यातील आदिवासी पट्ट्यात कृषी, ग्रामविकास, जलसंधारण, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण संवर्धन या कामांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. याचबरोबरीने संस्थेमार्फत विविध गावांमध्ये कृषी तंत्रज्ञान प्रशिक्षण, आरोग्य शिबीर, तसेच शेतीमाल विक्रीसाठी विशेष उपक्रम राबविले जातात. 

बेलगाव ढगा (ता.जि. नाशिक) येथे गावालगत असलेल्या संतोषा ओढ्यावरील बांधलेल्या बंधाऱ्यामध्ये गाळ साचून जलसाठा कमी झाला होता. त्यामुळे ओलिताखालचे क्षेत्र घटून पिकांसाठी सिंचनाची अडचण होती. या अडचणीवर मात करता यावी, यासाठी ग्रामस्थांनी पाच वर्षांपूर्वी मृद्‍, जलसंधारणाची कामे होण्यासाठी रोटरी क्लब ऑफ नाशिक, गंजमाळ संस्थेकडे मदतीची मागणी केली.  संस्थेच्या मदतीने मृद्‍, जलसंधारणाचे कामे होऊन बंधाऱ्यांचे पुनरुज्जीवन झाले, पाणीसाठा वाढला. भूजल पुनर्भरण प्रक्रियेला गती मिळाल्याने परिसरात भूजलपातळी वाढली. रोटरीच्या पुढाकाराने जलसंधारण काम यशस्वी होऊन गाव शिवार हिरवेगार करण्यात यश मिळाले. हाच उपक्रम लोकसहभागातून विविध दुर्गम गावांमध्ये राबविला जात आहे. 

ग्राम, शेती विकासाला चालना  नाशिक शहरात रोटरी क्लब ऑफ नाशिक, गंजमाळ ही स्वयंसेवी संस्था ७५ वर्षांपासून कार्यरत आहे. संस्थेने गेल्या पाच वर्षांपासून आदिवासी पट्यात कृषी, ग्रामविकास, जलसंधारण, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण संवर्धन या कामांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.  पर्जन्यमान समाधानकारक होऊनही बेलगाव ढगा गावातील ग्रामस्थांच्या डोळ्यांसमोर पावसाचे पाणी वाहून जायचे. गावालगत असलेल्या संतोषा ओढ्यावर जिल्हा परिषद, नाशिक आणि कृषी विभाग यांच्या माध्यमातून ५ सिमेंट बंधाऱ्यांची निर्मिती करण्यात आली होती. मात्र गेल्या काही वर्षांत या ओढ्यातून पावसाच्या पाण्यासह माती वाहून जात असल्याने बंधारे गाळाने भरले, साठवण क्षमता कमी झाली.जानेवारी अखेरीस पाण्याच्या टंचाईमुळे बागायती क्षेत्र घटले. या परिस्थितीत रोटरी क्लब ऑफ नाशिककडे मृद्‍, जलसंधारणाची कामे करण्याचा प्रस्ताव सरपंच दत्तू ढगे यांनी सादर केला. गाव प्रयोगशील असल्याने रोटरीचे कम्युनिटी सर्व्हिस डायरेक्टर हेमराज राजपूत यांनी हा प्रस्ताव तत्कालीन अध्यक्ष राधेय येवले यांच्याकडे मांडला. त्यांनी तो तत्काळ मान्य करत जल, मृद्‍संधारणाच्या कामाला होकार दिला.      डोंगररांगेच्या परिसरातून संतोषा हा प्रमुख ओढा गावाच्या मध्य भागातून वाहतो. या ओढ्यावर एकनाथ बंधारा, बबनराव बंधारा, सुदामराव बंधारा, जनार्दन बंधारा आणि माणिक बंधारा असे एकूण ५ सिमेंट प्लग बंधारे बांधण्यात आले होते. या बंधाऱ्यातील गाळ उपसा करण्यात आला. धोरण सुरुवातीपासून स्पष्ट असल्याने ग्रामस्थांच्या देखरेखीत कामे गुणवत्तापूर्ण झाली. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून मृद्‍, जलसंधारण कामांच्या माध्यमातून भूजलपुनर्भरण झाल्याने पाण्याची चांगली उपलब्धता. 

  • मृद्‍, जलसंधारण कामांमुळे ओढ्यांवरील एकूण पाच बंधाऱ्यामध्ये पाणीसाठवण क्षमता एक कोटी लिटरपेक्षा वाढली. यामुळे पाण्याच्या वापराचे योग्य नियोजन, शेती आणि संबंधित घटकांचा विकास. 
  •  भूजल, पृष्ठभाग, मातीची आर्द्रता आणि पावसाचे पाणी या घटकांना विशेष महत्त्व. 
  •  संतोषा ओढ्यातील १.५ ते २ मीटर साचलेला गाळ हा खडकाळ व नापीक जमिनीवर पसरण्यात आला. यामुळे जमिनीचा पोत सुधारला. 
  •  जलसाठा वाढल्याने शंभरहून अधिक शेतकऱ्यांना शाश्‍वत सिंचनाचा फायदा. 
  •  वैयक्तिक विहिरी, कूपनलिकेत पुरेसा पाणीसाठा. 
  •  जलसाठ्यामुळे रब्बी पिके घेतल्यानंतर भाजीपाला पिकांची लागवड. गाव शिवारात टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, कांदा विविध प्रकारचा पालेभाज्या, वेलवर्गीय पिके, पेरू, द्राक्ष लागवड वाढली.
  • शेतकऱ्यांची उत्पादन क्षमता वाढल्याने अर्थकारण उंचावले. 
  • पशुपक्ष्यांचा वाढला अधिवास  गावशिवारात पूर्वी पाणी नसल्याने वनसंपदा अडचणीत होती. मात्र आता पाण्याच्या उपलब्धतेमुळे परिसर हिरवागार आहे. गावाने जैवविविधता संवर्धनावर भर दिला आहे. गावात विविध प्रजातींचे वृक्षारोपण आणि संवर्धन होते आहे. त्यामुळे पक्ष्यांचा किलबिलाट पुन्हा परिसरात ऐकू येऊ लागला आहे. त्यामुळे समृद्ध पर्यावरणाला गावशिवारात चालना मिळाली आहे.

    प्राचीन विहिरींचे पुनरुज्जीवन  पुण्यश्‍लोक अहल्याबाई होळकर यांनी गावात प्राचीन बारव बांधली आहे. मात्र त्यात गाळ असल्याने पाणीसाठा होत नव्हता. तसेच गावातील राजवाड्यामधील आडामधील १२ ते १३ फूट गाळ होता. संस्थेची मदत आणि लोकसहभागातून अहल्याबाई होळकर प्राचीन बारवामध्ये २ फूट गाळ, जुन्या मातोश्री विहिरीमध्ये २ फूट गाळ काढण्यात आला. त्यासाठी ४७  हजार रुपये मदतनिधी रोटरीने दिला. ग्रामस्थांनी गाळ काढण्यासाठी श्रमदान केले. त्यामुळे विहिरींतील पाणासाठी वाढला. पाणीटंचाईच्या काळामध्ये या विहिरीतील पाण्याचा उपयोग ग्रामस्थांकडून केला जातो. 

    संस्थेचे विविध उपक्रम

  • ग्राम विकासासह जल, मृद्‍संधारण, कृषी तंत्रज्ञान प्रसारावर भर.
  • नाशिक शहरात दुसऱ्या आणि चौथ्या रविवारी सेंद्रिय बाजार. यामध्ये पाच तालुक्यांतील १० शेतकरी गटांचा सहभाग. शेतीमाल विक्रीच्या बरोबरीने महिला बचत गटांच्या उत्पादनांची विक्री.
  • कृषी तंत्रज्ञान प्रसार, प्रशिक्षणासाठी कृषी मंथन उपक्रम.
  • जिल्हा परिषद शाळांमध्ये आरोग्यविषयक उपक्रम, उपक्रमशील शिक्षकांचा गौरव.
  • सध्या पेठ तालुक्यातील चार गावांमध्ये ग्रामविकासाचे उपक्रम.
  • शेतीमाल प्रक्रिया आणि पूरक उद्योगाबाबत ग्रामीण युवकांना प्रशिक्षण.
  • अकरा गावांमध्ये ग्रामविकासासाठी उपक्रमशील युवकांच्या गटांची बांधणी.
  • गावाने वनतळी, समतल चर, दगडीबांध निर्मिती, वृक्षारोपणामध्ये चांगले काम केले आहे. याची कल्पना संस्थेच्या सदस्यांना असल्याने त्यांनी आमच्या गाव विकासाला चालना दिली. संस्था आणि लोकसहभागातून परिसरात जलसमृद्धी आल्याने शेतकऱ्यांच्या जीवनमानात बदल झाला. शेती बारमाही झाली आहे. -दत्तू रामभाऊ ढगे, (लोकनियुक्त सरपंच आणि प्रयोगशील शेतकरी, बेलगाव ढगा.)  

    रोटरीने आदिवासी पट्ट्यातील गावांमध्ये विकास कामे हाती घेतली आहेत. विशेषतः कृषी, पर्यावरण आणि जलसंधारणावर भर दिला आहे. या उपक्रमातून ग्रामीण भागातील घटकांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न यशस्वी होत आहे. संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष राधेय येवले, सेक्रेटरी मुग्धा लेले आणि संचालक मंडळाचे ग्राम विकासामध्ये चांगले सहकार्य लाभले आहे.  - हेमराज राजपूत,  ९४२२७७३६०२

    (कम्युनिटी सर्व्हिस डायरेक्टर, रोटरी क्लब ऑफ नाशिक) 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com