काटेकोर पाणी व्यवस्थापनातून गुणवत्तापूर्ण उत्पादन

कर्नलवाडी (ता. पुरंदर, जि. पुणे) येथील विराज रामचंद्र निगडे यांनी उपलब्ध पाण्याचे गणित मांडत वीस एकर क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणले. डाळिंब, ऊस पिकाच्या गरजेनुसार पाणीपुरवठा आणि पाचट आच्छादनाचा वापर करत पाण्याची बचत केली. निर्यातक्षम डाळिंबाचे उत्पादन घेत निगडे यांनी शेतीला नवी दिशा दिली आहे.
Drip Irrigation and mulching
Drip Irrigation and mulching

''पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुका कायम दुष्काळी पट्टा. साठ एक वर्षापूर्वी वडिलोपार्जित सहा एकर क्षेत्राला पाणी देण्यासाठी दिवसभर बैलांची मोट चालायची. जमीनही विकसित नसल्याने उंचावर पाणी नेणे शक्य नव्हते. त्यासाठी पाट काढून साठवण विहिरीत पाणी सोडले जायचे. या पाण्यावर ज्वारी, बाजरी, हुलगा, तूर, चवळी, मटकी या पिकांची लागवड सुरू झाली. १९६५ मध्ये ऑइल इंजिन आले. बऱ्यापैकी पाणी उपसा झाल्याने भाजीपाला, कांदा, गहू, ज्वारी, ऊस लागवड सुरू झाली. त्यानंतर विजेवर चालणारे पंप आले. आता आम्ही ठिबक सिंचनाचा वापर करत आहोत. जसजसे तंत्रज्ञान बदलेल त्यानुसार पाणी बचत आणि पीक उत्पादन वाढीचे सूत्र आम्ही ठेवले आहे''... एकंदर शेती विकासाचा आलेख रामचंद्र श्रीरंग निगडे मांडत होते. आता त्यांचा मुलगा विराज हा शेतीचे नियोजन पहातो. फळे, भाजीपाला, फूलशेतीवर भर कर्नलवाडी परिसरातील साठ शेतकऱ्यांनी पुरेशा पाण्याच्या उपलब्धतेसाठी सामूहिक उपसा सिंचन योजना राबविली. याबाबत माहिती देताना विराज निगडे म्हणाले की, आम्ही निरा डावा कालव्यालगत विहीर घेऊन तेथून आठ किलोमीटरची पाइपलाइन करत कर्नलवाडीत शिवारात पाणी आणले. या योजनेमुळे सुमारे पाचशे एकर शेतीला पाण्याची सोय झाली. त्यातील २०० एकर क्षेत्र वर्षभर बागायती झाले. सध्या माझ्याकडे ५० एकर क्षेत्रापैकी २० एकर क्षेत्र बारमाही पाण्याखाली आले आहे. यामध्ये दहा एकर डाळिंब, दोन एकर ऊस, चार एकर कांदा, एक एकर निशिगंध, एक एकर गहू, हरभरा, भाजीपाला पिके आणि दोन एकरावर चारा पिकांची लागवड असते. उर्वरित क्षेत्रावर पावसाच्या पाण्यावर कोरडवाहू पिकांची लागवड असते.  ठिबकमुळे वाढले बागायती क्षेत्र  विराज निगडे यांनी ठिबक सिंचनावर जास्तीत जास्त भर दिला आहे. डाळिंब, ऊस, कांदा,गहू, हरभरा, चारा पिकांना ठिबक सिंचनाचा वापर केला आहे. यासाठी एकरी ४५ हजारांचा खर्च आला. उपलब्ध पाण्याचा पाट पद्धतीने वापर केला असता तर केवळ दोन एकर क्षेत्र बागायती झाले असते, परंतू ठिबक सिंचन आणि आच्छादन तंत्रामुळे वीस एकर क्षेत्राला पाणी पुरविणे शक्य झाले. पाणी व्यवस्थापनाबाबत विराज निगडे म्हणाले की, निरा कालव्यावरून आणलेले पाणी दीड कोटी लिटर क्षमतेच्या शेततळ्यात साठवले जाते. तेथून शेतातील दोन विहिरीत सोडले जाते. या दोन्ही विहिरीतून ठिबक सिंचनामार्फत वीस एकराला पाणी पुरवठा होतो. याचबरोबरीने शेतात तीन कूपनलिका आहेत. ठिबक सिंचनाचा वापर केल्याने पिकांसाठी ५० टक्के कृषी निविष्ठा आणि पाणी वापर कमी करणे शक्य झाले, खर्चातही बचत झाली. ठिबकमुळे पिकाच्या गरजेनुसार विद्राव्य खतांचा योग्य वेळी वापर केला जातो. गाळलेले जिवामृत पिकांना देणे शक्य होत आहे. पिकाच्या गरजेनुसार वाफसा स्थितीमध्येच पाणी दिले जाते. याचा पीक वाढीवर चांगला परिणाम होतो. तण नियंत्रणदेखील झाले. 

ठिबक सिंचन, आच्छादनातून पाणी बचत  निगडे यांनी दहा एकर डाळिंब बागेत पहिल्यापासून ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केला आहे. जमिनीत ओलावा टिकून रहाण्यासाठी पाचट आच्छादनावर भर दिला.यामुळे जमीन फारशी तापत नसल्याने बाष्पीभवन कमी होते. यामुळे दोन दिवसाला द्यावे लागणारे पाणी सहा दिवसाने देता येते. जमिनीतील ओलावा टिकून राहिल्याने पांढऱ्या मुळ्या अधिक प्रमाणात वाढल्या. पाचट कूजून जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढले. त्याचा झाडांची वाढ आणि फळ गुणवत्ता सुधारण्यासाठी मदत झाली. जुलै महिन्यात डाळिंब बागेची छाटणी केल्यानंतर पाणी देण्यास सुरवात होते. जानेवारी महिन्यात फळांची काढणी सुरू होते. पुढे तीन महिने आवश्यकतेनुसार पाणी दिले जाते. त्यानंतर मे ते जुलै या कालावधीत बागेचे पाणी तोडले जाते. शेततळ्यातील शिल्लक पाण्यातून गहू, हरभरा, तसेच भाजीपाला पिके घेतली जातात.

पाणी नियोजनामुळे नगदी पिके शक्य  पीक नियोजनाबाबत निगडे म्हणाले की, डाळिंबाच्या दहा एकर क्षेत्रापैकी आठ एकर क्षेत्रातून निर्यातक्षम उत्पादन मिळत आहे. बागेची ‘अनारनेट''मध्ये नोंदणी केली आहे. बागेचे काटेकोर व्यवस्थापन ठेवले जाते. एकरी नऊ ते दहा टन उत्पादन मिळते. उत्पादनापैकी ७० टक्के फळे  कंपनीच्या माध्यमातून युरोप बाजारपेठेत निर्यात होतात. उर्वरित फळे पुणे,मुंबई बाजारपेठेत विक्रीस पाठवली जातात. यंदा निर्यात झालेल्या डाळिंबाला १२१ रुपये आणि पुणे, मुंबई बाजारपेठेत ५० रुपये प्रति किलोस दर मिळाला. उसाच्या फुले-२६५ जातीची पट्टा पद्धतीने लागवड केली आहे. यास देखील ठिबक सिंचन आणि पाचटाचे आच्छादन आहे. उसाचे एकरी सरासरी ७० टन उत्पादन मिळते.  शहरी बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन एक एकर क्षेत्रावर निशिगंधाची लागवड केली आहे. या पिकास देखील ठिबक सिंचन केले आहे. सध्या दररोज ३० किलो फुलांचे उत्पादन होते. प्रति किलोस ६० ते १०० रुपये दर मिळतो. एप्रिल, मे महिन्यात प्रति किलोस १५० रुपये दर मिळण्याची शक्यता असते. फुलांची विक्री मुंबई बाजारपेठेतील व्यापाऱ्यास केली जाते.   

स्वयंचलित यंत्रणेकडे कल

  पाण्याच्या काटेकोर वापराबाबत विराज निगडे म्हणाले की, येत्या काळात मी स्वयंचलित ठिबक सिंचन प्रणालीचा वापर करणार आहे. तसेच प्रत्येक क्षेत्रामध्ये टेन्शोमीटरचा वापर करून पिकाच्या गरजेनुसार पाणी देणार आहे. यामुळे उपलब्ध पाण्याचा योग्य वापर होऊन आणखी पाच एकर क्षेत्र बागायती होईल. प्रत्येक क्षेत्राला गरजेनुसार पाणी, विद्राव्य खतांचा मोजून वापर होईल. पाण्यातील वाढत्या क्षारांचे प्रमाण लक्षात घेऊन वॉटर कंडिशनर बसवत आहे. तसेच फळबागेत डिफ्यूजर तंत्र वापराचे नियोजन केले आहे.

- विराज निगडे, ८६६९२२८१८१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com