Agriculture Agricultural News Marathi success story of women self group,Morde,Dist.Ratnagiri | Agrowon

शेतीला मिळाली पूरक उद्योगांची जोड

राजेश कळंबटे
रविवार, 4 जुलै 2021

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मोर्डे गावातील महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून अतिरिक्त उत्पन्नाचे साधन तयार केले. भात, भाजीपाला शेतीला दुग्ध आणि कुक्कुटपालनाची जोड देत महिलांनी उत्पन्नाचे स्रोत वाढविले आहेत.

मोर्डे (ता. संगमेश्‍वर, जि. रत्नागिरी) हे डोंगराळ भागातील गाव. येथील कुटुंबांचा उदरनिर्वाह शेतीमधील रोजगार आणि पारंपरिक भातशेतीवर चालतो. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मोर्डे गावातील महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून अतिरिक्त उत्पन्नाचे साधन तयार केले. भात, भाजीपाला शेतीला दुग्ध आणि कुक्कुटपालनाची जोड देत महिलांनी उत्पन्नाचे स्रोत वाढविले आहेत.

संगमेश्‍वर तालुक्यात (जि. रत्नागिरी) ओझरे प्रभागातील शेतकरी आणि महिला गटांनी शेतीच्या बरोबरीने उपजीविकाचे स्रोत तयार करण्यावर भर दिला आहे. ओझरे प्रभागात मोर्डे गावातील उपक्रमशील महिलांनी एकत्र येत २५ मे, २०१६ मध्ये धनीनदेवी स्वयंसाह्यता समूहाची सुरुवात केली. सध्या या गटामध्ये सानिका शरद पंदेरे (अध्यक्षा), रिया रामचंद्र काबदुले, निकिता बाळकृष्ण पंदेरे, सुनंदा कृष्णा पंदेरे, अस्मिता दत्ताराम वाघे, शेवंती रघुनाथ काबदुले, जयवंती पांडुरंग काबदुले, अनिता रमेश काबदुले, सुलोचना सुरेश महाडीक, सरिता राजाराम खोतकर, सुप्रिया सुनील काबदुले, सुरेखा भानुदास महाडीक, सुनीता सखाराम वाजे या महिला कार्यरत आहेत. या सदस्यांनी एकत्र येऊन शेती व्यतिरिक्त उपजीविकांचे स्रोत निर्माण करण्यासाठी पावले उचलली. भातशेतीच्या बरोबरीने महिलांनी बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन भाजीपाला लागवडीला सुरवात केली. त्यानंतर दुग्धपालन आणि पुढे कुक्कुटपालनातून उत्पन्नाचा स्रोत तयार केला आहे. 

पूरक उद्योगांना गती देण्यासाठी स्वयंसहायता समूहामधील महिलांनी उमेद अभियानांतर्गत १५,००० रुपये खेळते भांडवल गटातून घेतले. त्यानंतर सूक्ष्म गुंतवणूक म्हणून ६० हजार रुपये घेतले. गटातील सहा सदस्यांनी भाजीपाला लागवड आणि विक्री व्यवसायासाठी या भांडवलाचा उपयोग केला. चार सदस्यांनी बँकेकडून ५० हजार रुपये कर्ज घेऊन गाई, म्हशींची खरेदी केली. पहिल्या कर्जाची परतफेड केल्यानंतर गटाने तीन लाख रुपयांचे दुसरे कर्ज घेतले. पशुपालन व्यवसाय वाढविण्यावर गटाने भर दिला आहे.

भाजीपाल्याचे नियोजन 
भातशेतीची कामे संपल्यानंतर गटातील सदस्या दरवर्षी किमान पाच एकरांवर भाजीपाला लागवड करतात. मार्गशीर्ष महिन्यात गावठी भाजीपाल्यास चांगली मागणी असते. याचा विचार करूनच निवडक भाजीपाल्याची लागवड केली जाते. गटातील महिलांनी डिसेंबर, २०१७ मध्ये भाजीपाला लागवडीला सुरुवात केली. यातून टप्प्याटप्प्याने उत्पन्न वाढवत नेले. घरगुती वापराबरोबरच विविध भाजीपाल्याची विक्री केली जाते. गटातील महिला प्रामुख्याने चवळी, मुळा, पालेभाजी, वांगी, मिरची, वाल यांसारख्या भाजीपाल्याचे उत्पादन घेतात. भाजीपाला व्यवस्थापन संपूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने केले जाते. खतासाठी शेणखत आणि कोंबडी खताचा वापरावर गटाने भर दिला आहे. डोंगराळ भागात मोर्डे गाव वसलेले आहे. त्यामुळे भाजीविक्रीसाठी काही किलोमीटर अंतरावर असलेल्या साखरपा येथील बाजारपेठेत महिलांना जावे लागते. गटातर्फे महिन्याला सरासरी सहा हजार रुपयांची भाजी विकली जाते. बियाणे वगळता व्यवस्थापनासाठी गटाला मोठा खर्च लागत नाही. त्यामुळे प्रत्येक सदस्याला सरासरी दोन ते तीन हजार रुपये नफा होतो. 

पशुपालनाला चालना
गटातील चार महिलांनी पशुपालनामधून उत्पन्नाचा स्रोत तयार केला आहे. पशूपालनासाठी महिलांनी जर्सी गाय आणि गावठी म्हशींची निवड केली. गटातील सदस्या निकिता पंदेरे यांच्याकडे चार गाई आहेत. उर्वरित सदस्यांकडे दोन, तीन म्हशी आहेत. जवळच असलेल्या कनकारी गावामध्ये दुधाची विक्री केली जाते. या गावात खासगी डेअरीचे दूध संकलन केंद्र कार्यरत आहे. गटामध्ये दिवसाला सरासरी १५ लिटर दूध जमा होते. सध्या सरासरी २७ रुपये प्रति लिटर असा दर मिळतो. पावसाळ्यात गावशिवारात चांगल्या प्रकारे हिरव्या चाऱ्याची उपलब्धता असते. त्यामुळे चाऱ्याच्या खर्चात बचत होते. गाई, म्हशींना दूधवाढीसाठी गहू भुस्सा, सरकी पेंड दिली जाते. योग्य प्रमाणात हिरवा चारा, पशुखाद्य दिल्याने दूध उत्पादनात सातत्य राहिले आहे. येत्या काळात पशुपालन व्यवसाय वाढविण्याचा गटाचा प्रयत्न आहे.

कुक्कुटपालनाची जोड 
महिला गटातील सदस्या उत्पन्नवाढीसाठी वेगवेगळे प्रयोग करतात. भाजीपाल्याबरोबरच गटातील सदस्या निकिता पंदेरे यांनी गेल्या वर्षीपासून कुक्कुटपालनास सुरुवात केली. कोंबडीपालनाबाबत त्यांनी उमेदमधून प्रशिक्षणही घेतले आहे. जून महिन्यात त्यांनी देवरुख येथून गावरान कोंबडी जातीची २० पिले आणली. एक महिन्याचे पिलू त्यांना १०० रुपयाला मिळाले. या पूरक व्यवसायामध्ये पहिल्यांदा त्यांनी दोन हजार रुपयांची गुंतवणूक केली. साधारणपणे तीन महिन्यांत कोंबडे विक्रीयोग्य झाले. एका कोंबड्याला किमान ५०० रुपये दर मिळाला. महिन्यातून चार ते पाच कोंबड्यांना ग्राहक असतो. वीस कोंबड्यांसाठी खाद्याचा खर्च १,४०० रुपये आला. कोंबड्यांचे वेळापत्रकानुसार लसीकरण केले जाते.  गेल्या वर्षभरात शिमगा सणाच्या कालावधीत आठ ते दहा कोंबड्यांची एकाचवेळी त्यांनी विक्री केली. खर्च वजा जाता त्यांना पाच हजारांचा नफा झाला. भाजीपालाच्या बरोबरीने कुक्कुटपालनातूनही आर्थिक नफा वाढल्याचे पंदेरे सांगतात.  

गटातून वाढली आर्थिक उलाढाल
गटातील सदस्यांनी भांडवल, कर्ज यासाठी गटाचा उपयोग आणि वैयक्तिक पूरक व्यवसायातून उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. गटातील प्रत्येक सदस्याला भातशेती व्यतिरिक्त घरखर्चाला उपयोगी पडेल एवढी रक्कम मिळते. भाजीपाला विक्रीतून मिळणारा नफा घरखर्चासाठी वापरला जातो. गटाच्या आर्थिक उलाढालीबाबत ‘उमेद’ अभियानाचे समन्वयक दयानंद हरणे म्हणाले, की या गटातील महिलांना विविध पूरक उद्योगातून वर्षाला साडेचार लाख रुपये नफा मिळतो. वर्षभरात मिळणाऱ्या नफ्यातून गटातील सदस्या बँक कर्ज तसेच स्वनिधीची वेळेत परतफेड करतात. त्यामुळे अभियानातील इतर गटातील महिलांनाही या गटापासून प्रेरणा मिळाली आहे. गटाच्या विविध उपक्रमांसाठी समूह संसाधन सौ. सायली भोजने यांचे चांगले मार्गदर्शन मिळते. याचा महिलांना चांगला फायदा होत आहे.

- निकिता पंदेरे  ७७२०८०९०७४
- दयानंद हरणे, समन्वयक, उमेद अभियान ,९४०३६४४१५१ 


फोटो गॅलरी

इतर महिला
केळी प्रक्रियेतून गटाची आर्थिक प्रगतीशिंदखेडा (ता. रावेर, जि. जळगाव) येथील ‘सरस्वती...
पौष्टिक आहारासाठी क्विनोआक्विनोआ हा धान्याचा एक प्रकार असून एखाद्या...
जाणून घ्या अंडी खाण्याचे फायदेशरीराला अत्यंत आवश्यक असणारी आणि आपले शरीर स्वतः...
भरड धान्ये : पोषक तत्त्वांचे आगरभारताच्या शिफारशीनुसार संयुक्त राष्ट्राने २०२३ हे...
रक्तक्षय होण्याची कारणे अन् उपाययोजना...मुलांच्या वाढीच्या काळात, स्त्रियांच्या गरोदरपणात...
आहाराची पोषकता वाढविण्यासाठी प्रयत्न...सप्टेंबर महिना हा देशपातळीवर ‘राष्ट्रीय पोषण...
सुदृढ बालकांसाठी स्तनदा मातांना पोषक...ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जागतिक...
मत्स्यबीज केंद्रामुळे महिला झाल्या...भिगवण (जि. पुणे) येथील पाच उपक्रमशील महिलांनी...
रानभाज्यांचे आहारातील महत्त्वमहाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरणानुसार, तिथे...
शेतीला मिळाली दुग्ध प्रक्रियेची जोडघोटावडे (ता. मुळशी, जि. पुणे) प्रियांका जालिंदर...
शेतीला मिळाली बचत गटाची साथ शेणे (ता. वाळवा, जि. सांगली) येथील सुनंदा उदयसिंह...
शेतीला मिळाली पूरक उद्योगांची जोडमोर्डे (ता. संगमेश्‍वर, जि. रत्नागिरी) हे डोंगराळ...
गृहोद्योगातून मिळाला उन्नतीचा मार्गज्या कुटुंबातील महिलांनी पुढाकार घेऊन शेतीपूरक...
आहारात असावेत मोड आलेली कडधान्येप्रथिने, खनिजे, जीवनसत्त्वे आणि कर्बोदके यांचा एक...
दूषित अन्नापासून सावध राहा...म्यूकरमायकोसिस दुर्मीळ बुरशीजन्य संसर्ग आहे. याला...
वनरोपवाटिकेतून गटाने तयार केली ओळखसांगली जिल्ह्यातील खंडोबाचीवाडी  (ता. पलूस)...
जवस एक सुपरफूडअलीकडच्या काळात जवस एक सुपरफूड म्हणून उदयास येत...
महिला शेतकऱ्यांसाठी उत्पादक कंपनीगावपातळीवरील १० शेतकरी महिला किंवा महिला शेतकरी...
आरोग्यदायी द्राक्ष द्राक्षापासून तयार केलेल्या मूल्यवर्धित...
काकडीवर्गातील आरोग्यदायी झुकिनीझुकिनी ही कुकुरबीटासी कुळातील असून, खरबूज,...