नाचणी, भाजीपाला लागवडीतून महिला गट झाला स्वयंपूर्ण

गावातील ७५ टक्के जमीन कातळाची, उरलेला भाग डोंगराळ. जेमतेम पिण्याचे पाणी पुरेल एवढीच सुविधा असताना चवे (ता.जि.रत्नागिरी) येथील जांभुळेश्‍वर स्वयंसहायता समूह गटातील महिलांनी नाचणी आणि भाजीपाला लागवडीतून उत्पन्नाचे साधन शोधले.
finger millet cultivation
finger millet cultivation

गावातील ७५ टक्के जमीन कातळाची, उरलेला भाग डोंगराळ. जेमतेम पिण्याचे पाणी पुरेल एवढीच सुविधा असताना चवे (ता.जि.रत्नागिरी) येथील जांभुळेश्‍वर स्वयंसहायता समूह गटातील महिलांनी नाचणी आणि भाजीपाला लागवडीतून उत्पन्नाचे साधन शोधले. मोलमजुरी आणि भातशेती एवढ्यावरच कुटुंबाची गुजराण करणाऱ्या महिलांनी गावातील शेतीला नवी दिशा दिली आहे.  शासनाच्या ‘उमेद' अभियानात महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी रत्नागिरी तालुक्यात गावागावात बैठका घेऊन विविध उपक्रमांची माहिती महिला बचत गटांच्यापर्यंत पोहोचविण्याची मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेच्या माध्यमातून ऑक्टोबर, २०१७ मध्ये चवे गावातील बारा महिलांनी एकत्र येऊन जांभुळेश्‍वर स्वयंसहाय्यता समूह गटाची स्थापना केली. पहिल्यावर्षी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार गटाचे काम सुरू झाले. दुसऱ्यावर्षी महिलांनी शेती विकासाला चालना देण्यासाठी नाचणी लागवडीचा निर्णय घेतला. या गटामध्ये निकिता विनोद गावणकर (अध्यक्ष), आकांक्षा अनिल गावणकर (सचिव), स्वाती विलास गावणकर, समिक्षा संतोष गावणकर, दर्शना चंद्रकांत गावणकर, दीपिका दिनकर गावणकर, शालिनी चंद्रकांत गावणकर, शेवंती पांडुरंग गावणकर, राजश्री राजेंद्र सुफल, माधवी महेंद्र गावणकर, रंजना रामचंद्र गावणकर, कल्पना गोविंद गावणकर या महिला सदस्या आहेत.

नाचणी लागवडीत वाढ  नाचणी पिकातून चांगले उत्पन्न मिळू शकते हे लक्षात आल्यावर गटाने एक एकर क्षेत्रावर नाचणी लागवड केली. यातून साडे पाचशे किलो उत्पादन मिळाले. गावशिवारामध्येच गटाने पन्नास रुपये प्रति किलो दराने नाचणी विक्री केली. यातून २६,००० रुपये मिळाले. बियाणे आणि खतांचा खर्च वगळता ८० टक्के नफा मिळाला. गेल्यावर्षी गटाने डिसेंबर महिन्यात पाच गुंठे क्षेत्रावर भाजीपाला लागवड केली. यातून लाल माठ, पालक, मुळा,  कोथिंबिरीचे उत्पादन मिळाले. या भाजीपाला विक्रीतूनही गटाला चांगली मिळकत झाली. घरगुती वापरासाठी आपापल्या परसबागेमध्ये गटातील महिलांनी हळद लागवड केली आहे. त्यातून प्रत्येकीला साधारणपणे २ ते ३ किलो हळद मिळते. पीक उत्पादन वाढीसाठी गटातील सदस्या कृषी विभागातील मंडळ कृषी अधिकारी विनायक अव्हेरे, कृषी सेवक तुषार देसले यांचे सातत्याने  मार्गदर्शन घेतात.  

कृषी विभागाची विविध प्रात्यक्षिके  गेल्या तीन वर्षात महिला गटासाठी गावामध्ये कृषी विभागाकडून विविध प्रात्यक्षिके घेण्यात आली. राष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य विकास  कार्यक्रमांतर्गत गांडूळ खत, बियाणे, झिंक सल्फेटचा पुरवठा करण्यात आला. विविध पिकांना खत मात्रा कशी द्यायची याचेही मार्गदर्शन करण्यात आले. गटाने यंदा नाचणीच्या बरोबरीने उडीद लागवडीचा प्रयोग केला.तीन नाचणीच्या रोपात एक उडीदाचे बी टोकले. तसेच शेती बांधावर वरी लागवड केली आहे.  पुढील वर्षी गट सेंद्रिय पद्धतीने भात आणि नाचणीचे उत्पादन घेणार असल्याची माहिती कृषी अधिकारी विनायक  अव्हेरे यांनी दिली.

महिला गटांना मिळाली चालना  

  • गावातील ७५ टक्के जमिनी कातळाची. त्यावर कोणतीही पिकाची लागवड होऊ शकत नाही. पाण्याचा पत्ता नाही. या परिस्थिती चवे गावातील महिलांनी तग धरुन उपलब्ध जागेचा भातशेतीसह भाजीपाला लागवडीसाठी उपयोग केला, उत्पन्नाचे साधन निर्माण केले.  
  •  कोरोनाच्या टाळेबंदीत अखेरच्या टप्प्यात या गटाने पिकविलेल्या भाजीपाल्याला चांगली मागणी होती. मोलमजुरी करणारे पुरुष घरात असताना बचत गटाच्या भाजीतून महिलांना घरखर्च चालवणे सोपे झाले. त्यांचा हा उपक्रम पाहिल्यानंतर गावातील आणखी काही महिला गटामध्ये काम करण्यास उत्सुक झाल्या आहेत. या महिलांनी पावणाई, आरती अशा दोन  बचत गटांना नुकतीच सुरूवात केली आहे.   
  • नाचणी,भाजीपाला लागवडीला सुरवात  

  •  गटातील प्रत्येक महिलांची गुंठ्यांमध्ये भातशेती आहे. गटाला चालना देण्यासाठी अध्यक्षा निकिता गावणकर यांनी आपली काही  शेती कराराने महिला गटासाठी दिली. पहिल्या वर्षी  गटाने काही क्षेत्रावर नाचणी लागवड केली. उत्पादित नाचणी विक्रीपेक्षा घरगुती वापरासाठी प्राधान्य दिले. त्याचवर्षी कापणी झाल्यानंतर महिलांनी घराजवळील  शेत जमिनीत भाजीपाला लागवडीला सुरूवात केली. मुख्य बाजारपेठेपासून गाव दुर्गम भागात असल्याने  गाव परिसरात भाजीपाल्याला चांगली मागणी होती. 
  • गटातील महिलांनी डिसेंबर महिन्यात लाल माठाची लागवड केली. याचे जानेवारीत उत्पादन सुरु झाले. गावामध्ये गटाने भाजी विक्रीकरून दोन हजार रुपये कमावले. लागवड केलेल्या क्षेत्रात पाणी टंचाई असल्याने  गटाने खासगी विहिरीतील पाणी सिंचनासाठी वापरले.  दुसऱ्यावेळी गटाने लाल माठ, मुळा, कोथिंबिरीची लागवड केली. पाच महिन्यात तीन वेळा गटाने पालेभाज्यांची लागवड केली. या भाजीपाला लागवडीतून सात हजार रुपये गटाकडे जमा झाले. बियाणे आणि खते यांचा खर्च वगळता उर्वरित सगळा नफा होता. हे पैसे गटाच्या बँक खात्यात जमा झाले.मे महिन्यात पाणी टंचाईमुळे  गटाने भाजीपाला लागवड केली नाही. 
  • कुक्कुटपालनाची जोड

    गटाच्या सचिव आकांक्षा अनिल गावणकर यांनी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून कुक्कुटपालन सुरू केले. त्यांचे पती अपंग असल्यामुळे घरच्या घरी हा व्यवसाय आर्थिक उत्पन्न मिळवण्यासाठी फायदेशीर ठरला. कावेरी,  डी पी क्रॉस, गावठी कोंबडीची पिल्ले आणून संगोपन केले जाते. गावणकर यांनी २०१६ मध्ये पहिल्यांदा कोंबडीपालन सुरु केले. पहिल्यांदा १०० पिल्लांची बॅच आणली. लसीकरण, खाद्य व्यवस्थापनाबाबत आकांक्षा आणि अनिल यांनी स्वतः प्रशिक्षण घेतले आहे. कोंबड्यांसाठी लहान शेड तयार केली आहे. वर्षभरात तीन बॅच घेतल्या जातात. या मधून त्यांना सरासरी तीस हजार रुपये मिळतात. खाद्यावर सर्वाधिक खर्च होतो. खाद्याचा खर्च वगळता साठ टक्के नफा शिल्लक रहातो. चवे गावाबरोबरच परिसरातील राई भातगाव, बोंड्ये, देऊड या गावात कोंबड्यांची विक्री केली जाते.

    वर्षाच्या शेवटी लाभाचे वाटप भाजीपाला, नाचणीच्या लागवडीतून मिळालेल्या उत्पन्नाचे वितरण वर्षाच्या शेवटी केले जाते. बचत गटाला पहिल्या वर्षी ‘उमेद'मधून मिळालेल्या पंधरा हजार रुपयांच्या रकमेतून खर्च झालेली रक्कम वळती करून उरलेल्या रक्कमेचे महिलांच्या मेहनतीनुसार वाटप केले. यातून प्रत्येक सदस्याला चार हजार रुपये मिळाले. घरातील पुरुष वर्ग मोलमजुरी करतात, महिला गृहिणीची जबाबदारी स्वीकारतात. बचत गटामुळे हात खर्चाला लागणारा पैसा प्रत्येक  महिलेला मिळू लागला आहे. काहीवेळा गटाकडे जमा असलेल्या रक्कमेतून गरज असलेल्या महिलेला परत देण्याच्या बोलीवर निकषानुसार पैसे दिले जातात. दिलेल्या कालावधीत हे पैसे परत मिळतात. गटातील बचतीमुळे अडचणीच्यावेळी सदस्यांना आर्थिक आधार मिळत आहे.

    गटाचा झाला फायदा  गटामार्फत भाजीपाला, नाचणी लागवडीमुळे अधिकचे उत्पन्न सुरु झाले आहे. त्यातून घरखर्च चालवण्यात मदत होत आहे. भविष्यात कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली नवनवीन प्रयोग करून उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करणार आहोत. - निकिता विनोद गावणकर, अध्यक्षा, ९०२११८८१०४ 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com