Agriculture Agricultural News Marathi success story of women self help group participated in Mahalaxmi saras exhibition,Mumbai | Agrowon

ग्रामीण महिलांच्या समृद्धीचा महामार्ग

मारुती कंदले
रविवार, 2 फेब्रुवारी 2020

राज्यातील महिला बचतगट वेगवेगळ्या लघूउद्योगाच्या माध्यमातून वैशिष्ट्यपूर्ण उत्पादने तयार करत आहेत. या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी राज्य सरकारकडून दरवर्षी मुंबईमध्ये महालक्ष्मी सरस प्रदर्शन व विक्री केंद्राचे आयोजन केले जाते. हे प्रदर्शन नावीन्यपूर्ण उत्पादने आणि ग्रामीण संस्कृती शहरापर्यंत पोचविण्याचे अनोखे व्यासपीठ म्हणून  पुढे आले आहे. 

राज्यातील महिला बचतगट वेगवेगळ्या लघूउद्योगाच्या माध्यमातून वैशिष्ट्यपूर्ण उत्पादने तयार करत आहेत. या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी राज्य सरकारकडून दरवर्षी मुंबईमध्ये महालक्ष्मी सरस प्रदर्शन व विक्री केंद्राचे आयोजन केले जाते. हे प्रदर्शन नावीन्यपूर्ण उत्पादने आणि ग्रामीण संस्कृती शहरापर्यंत पोचविण्याचे अनोखे व्यासपीठ म्हणून  पुढे आले आहे. 

एक महिला शिकते, तेव्हा एक घर साक्षर होते आणि जेव्हा एक महिला आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर होते, तेव्हा त्या कुटुंबाचे जीवनमान सुधारते. याचा प्रत्यय महालक्ष्मी सरस प्रदर्शनाच्या माध्यमातून स्पष्ट दिसून येतो. महालक्ष्मी सरसची उलाढाल एक कोटी रुपयांवरून पंधरा कोटी रुपयांवर पोचली आहे, यातूनच याचे महत्त्व अधोरेखित होते. मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील एमएमआरडीए मैदानावर १७ ते २९ जानेवारी या कालावधीत ‘महालक्ष्मी सरस प्रदर्शन’ संपन्न झाले. या प्रदर्शनात महाराष्ट्रासह २९ राज्यांतील पाचशेहून अधिक महिला बचतगट सहभागी झाले होते. ग्रामीण महिलांनी तयार केलेल्या विविध कलाकुसरीच्या वस्तू, ग्रामीण भागातील खाद्य पदार्थ हे प्रदर्शनाचे विशेष आकर्षण ठरले. जळगावचे भरीत, खानदेशचे मांडे, कोकणातील मच्छी व तांदळाची भाकरी, कोल्हापूरचा तांबडा-पांढरा रस्सा, सोलापुरची शेंगा चटणी, राज्यातील विविध भागांतील मसाले, हातसडीचा तांदूळ, कोल्हापुरी चप्पल, आदिवासी कलाकुसरीच्या वस्तू, पैठणी साड्या यांसह देशभरातील कारागिरांच्या वस्तूंनी प्रदर्शनाची रंगत वाढवली होती. सुमारे दोन हजारहून अधिक कारागीर स्वतःची विविध उत्पादने घेऊन प्रदर्शनात सहभागी झाले होते. प्रदर्शनात सहभागी ग्रामीण महिला उद्योजिकांचे स्वानुभवच प्रत्येक शब्दातून याची प्रचिती आणून देतात.

गटांची वाढली उमेद 

  • उमेद अभियानांतर्गत राज्यात ४ लाख २३ हजार बचतगटांची स्थापना. या माध्यमातून ४५ लाख कुटुंबे अभियानाशी जोडली. 
  • अभियानामार्फत जवळपास ८२३ कोटी रुपये इतका समुदाय निधी तर बँकामार्फत ६ हजार ६०० कोटी रुपयांचे कर्ज बचतगटांना उपलब्ध. 
  • राज्य शासनाची बचतगटांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज देण्याची महत्त्वाकांक्षी योजना.
  • अभियानांतर्गत सुमारे अकरा लाख कुटुंबांनी उपजीविकेचे विविध स्रोत निर्माण केले. त्यामुळे महालक्ष्मी सरस हे निव्वळ प्रदर्शन नाही तर हा गरीब, वंचित ग्रामीण जनतेच्या समृद्धीचा महामार्ग ठरले. 

ओमसाईचा दर्जेदार मनुका, बेदाणे 
गोळेगाव (ता. जुन्नर, जि. पुणे) येथे ओम साई महिला स्वयंसहायता समूह कार्यरत आहे. समूहाद्वारे मनुका, बेदाणे आणि आवळा प्रक्रिया पदार्थांचे उत्पादन घेतले जाते. समूहाच्या अध्यक्षा अनिता हेलम, सचिव मंगल डोंगरे यांनी समूहाच्या उभारणीपासून उद्योग पुढे नेण्यासाठी चांगले प्रयत्न केले आहेत. परिसरात मोठ्या प्रमाणात द्राक्ष बागा आहेत. गटातर्फे परिसरातील शेतकऱ्यांकडून द्राक्षे विकत घेऊन त्यापासून मनुका, बेदाणेनिर्मिती केली जाते. यातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही वाढ होऊ लागली आहे. समूहाला राज्य शासनाकडून फिरते भांडवल मिळाले असून त्याचा उद्योगाच्या वाढीसाठी चांगला लाभ झाला आहे. समूहामार्फत उत्पादनांच्या गुणवत्तेबाबत तडजोड केली जात नाही. त्यामुळे दर्जेदार उत्पादने ग्राहकांच्या पसंतीला उतरली आहेत. समूहाची उत्पादने पुण्यातील मॉल तसेच शहरी बाजारपेठेत विक्रीस पाठवली जातात. समूहाचे वार्षिक उत्पन्न सुमारे साडेतीन लाखापर्यंतचे असून यात वाढीसाठी समूह प्रयत्नशील आहे. महालक्ष्मी सरस, मानिनी यात्रा, सावित्री यात्रा या प्रदर्शनात देखील समूहाचा सहभाग असतो. त्यामुळे उद्योग वाढीला चालना मिळण्यास मदत होत असल्याचे या महिला सांगतात.

बांबूची वैविध्यपूर्ण उत्पादने 
 लवादा (ता. धारणी, जि. अमरावती) गावातील महालक्ष्मी स्वयंसहायता समूहाची वाटचाल आश्वासक आहे. समूहामार्फत बांबूपासून अनेक उत्पादने तयार केली जातात. बांबूपासून टोपली, आकाश कंदील, फुड स्टँड, ट्रे, ढोकळ्याचे पात्र, पेन, पेन स्टँड, फोटो फ्रेम, घड्याळ, नेकलेस, कानातले डूल, बांगड्या, हेअर पीन, मोबाईल स्टँड, चहाचा ट्रे, पेपर वेट, सूप आशा विविध वस्तू बनविल्या जातात. धारणी तालुक्यात बांबूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या व्यवसायात गुंतवणूक कमी व मिळणारे उत्पन्न चांगले असल्याने बांबूपासून विविध वस्तू उत्पादित करण्याचा निर्णय महिलांनी घेतला आणि तो पूर्णत्वास नेला. 
   स्थानिक महिलांना हक्काचा रोजगार उपलब्ध व्हावा, या उद्देशाने हा समूह स्थापन झाला. बचतगट सुरू करण्यासाठी सुशिला पटोरकर, फुल्लो धुर्वे यांनी विशेष योगदान दिले. बचतगटाची ऑनलाइन नोंदणी झाल्यानंतर गटाला उमेदमधून १५,००० रुपये मिळाले. तसेच उमेदच्या मार्गदर्शनामुळे एसबीआय बँकेकडून एक लाख रुपयांचे लिंकेज कर्ज मिळाले. या अर्थसहाय्यामुळे उद्योगाला नवीन दिशा मिळाली. जुलै ते ऑगस्ट २०१९ मध्ये धरणी येथे तालुक्याच्या ठिकाणी शासनाचे हिरकणी प्रदर्शन भरविण्यात आले होते. या वेळी बचतगटाने प्रदर्शनात सहभाग घेतला. प्रदर्शनात बांबूपासून तयार केलेल्या राख्यांना मोठी मागणी मिळाली. या प्रदर्शनात समूहाने प्रथम क्रमांक पटकावून ५२ हजार ५०० रुपयांचे परितोषिकही मिळविले. पारितोषिकात मिळालेल्या रकमेमुळे उद्योगाला आणखी भरारी मिळाली. महालक्ष्मी सरस प्रदर्शनात बचतगटाने सहभाग घेतल्यानंतर प्रदर्शनात समूहाला तब्बल चार लाख रूपयांची बांबू राख्या तसेच बास्केट आणि हेअर पिनच्याही हजारो रुपयांच्या ऑर्डर्स मिळाल्या. उद्योगाच्या विस्ताराच्या दृष्टीने समूहाचे कसोशीने प्रयत्न सुरू आहेत.

चिक्कूपासून पावडर, लोणचे, फेस वॉश 
प्रदर्शनात घोलवड (जि. पालघर) येथील संतोषी स्वयंसहाय्यता महिला समूहाच्या उत्पादनांनी  ग्राहकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. समूहामार्फत चिकूपासून चिप्स, लोणचे, पावडर, जॅम, मिल्कशेक पावडर, आइसक्रिम, फेस वॉश अशी विविध उत्पादने तयार केली जातात. कमीत कमी किंमतीत दर्जेदार चिकूचे पदार्थ कोणतीही रसायने न वापरता तयार केली जातात. चिकू उन्हात वाळवून पावडर, मसाला, लोणचे, चिप्स असे विविध प्रकारचे पदार्थ बनवले जातात. महाराष्ट्रासह केरळ, कर्नाटक, गोवा, राजस्थान आदी विविध राज्यांत समूहाने स्वतःची बाजारपेठ तयार केली आहे. विशेष म्हणजे, या महिलांनी स्वतःच्या उत्पादनांचा ब्रँड तयार करून त्याचे प्रभावी मार्केटिंग करण्यात सुद्धा त्या यशस्वी झाल्या आहेत. ग्रामीण महिलांची फक्त चूल आणि मूल सांभाळणे हीच ओळख आहे. हा समज खोटा ठरवून या महिलांमध्ये एक उत्कृष्ट गृहिणीसोबतच उद्योजिका लपली हे संतोषी स्वयंसहाय्यताने सिद्ध करून दाखवले आहे. घोलवडच्या या महिला गटाला संपूर्ण पालघर जिल्ह्यात ओळख निर्माण केली असल्याचे समूहाच्या सदस्या लक्ष्मी हाडळ यांनी सांगितले.

आळिंबी उत्पादनांचा `पायलट ब्रॅंड’

मानवी आरोग्याच्यादृष्टीने आळिंबीचे (मशरुम) महत्त्व आहे. ही बाब ओळखून पवनी (जि. भंडारा) गावातील लक्ष्मी स्वयंसहायता समूहाने आळिंबी उत्पादनाला सुरुवात केली. समूहातील सदस्या आळिंबीपासून सूप, पावडर, फेसपॅक, खीर, बासुंदी, पापड मसाला, पापड, लोणचे, जॅम निर्मिती करतात. आळिंबी व्यवसाय करणाऱ्यांसाठी समूहामार्फत विशेष प्रशिक्षणाची सोयही उपलब्ध करून दिली आहे. आळिंबी उत्पादनापासून ते मार्केट मिळवून देण्यापर्यंतचे प्रशिक्षण दिले जाते. बाजारभाव मिळत नसेल तर लक्ष्मी स्वयंसहायता समूहातर्फे आळिंबी खरेदी केली जाते.स्वतः आळिंबी उत्पादन, पॅकिंग, ब्रँडिंग आणि विक्रीचे नियोजन साधत या समूहाने ‘पायलट ब्रँड’ बाजारपेठेत आणला आहे. जो महाराष्ट्राच्याबरोबरीने देशभरात प्रसिद्ध होत आहे. या समूहाची सुरुवात पाच हजार रुपयांपासून झाली होती, आजघडीला समूहाची वार्षिक उलाढाल सहा लाखांवर पोहोचली आहे. हा समूह फेसबुक व युट्यूबवर चॅनेलवर असून याद्वारे आळिंबी उत्पादनाचे ऑनलाइन प्रशिक्षणही दिले जाते. गेल्यावर्षीच्या महालक्ष्मी सरसमध्ये या समूहाला इनोव्हेटिव्ह उत्पादनाचा पुरस्कार तसेच २०१८ चा कृषिथॉनचा सर्वोत्कृष्ट आळिंबी फार्मचा पुरस्कार मिळाला होता.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


फोटो गॅलरी

इतर महिला
मुलींना मिळाली जिल्हाधिकारी, पोलिस...बुलडाणा  ः राज्यात जागतिक महिला दिनानिमित्त...
सुनंदाताई भागवत बनल्यात शेकडो मुलींचा...नगर ः त्यांच्या घरची परिस्थिती सर्वसामान्य. मात्र...
राज्यातील चौदा टक्के शेतीक्षेत्राची ‘ती...पुणे: एकविसाव्या शतकात सर्वच क्षेत्रांत महिलांचा...
‘त्या’ पस्तीस जणींचा ‘ते’ बनलेत आधारकोल्हापूर : ‘त्या’ पस्तीस जणींचा ''ते'' गेल्या...
महिला बचत गटाच्या माध्यमातून शेती, पूरक...नांदेड ः जिल्ह्यातील महिला स्वंयसहाय्यता गटांच्या...
आहारातील अंड्याचे महत्त्व..मानवी आहारामध्ये हजारो वर्षांपासून अंड्यांचा...
बहुगुणी नारळपूजाअर्चा, सणवार, लग्नकार्य, बारसे, डोहाळेजेवण...
रानमेवा प्रक्रियेतून साधली आर्थिक प्रगतीकोल्हापूर जिल्ह्याच्या शाहूवाडी तालुक्यातील...
बचत गटांच्या उत्पादनांचा ‘रुरल मार्ट’परभणी ः महिला आर्थिक विकास महामंडळाअंतर्गत परभणी...
..ही आहेत दुधातील आरोग्यदायी खनिजेदुधामधून मिळणारे कॅल्शिअम हे हाडे व दात मजबूत...
आरोग्यदायी आले, सुंठ पावडरमहिलांना आले आणि सुंठ पावडर परिचित आहे. ओल्या...
आरोग्यदायी शेवगा पावडरलहान मुलांच्या हाडांची वाढ योग्य प्रमाणात...
महिला गटांमुळे मिळाली प्रगतीची दिशानांदेड जिल्ह्यातील सगरोळी (ता. बिलोली) येथील...
शेती, पूरक उद्योग अन् आरोग्याचा जागरशेतकरी आणि ग्रामीण महिलांच्या जीवनात आश्वासक बदल...
गुणकारी डाळिंबडाळिंब हे अत्यंत गुणकारी फळ असून भारतात सर्वत्र...
जमिनीची सुपीकता जपत पीक उत्पादनात...नाशिक जिल्ह्यातील कारसूळ (ता. निफाड) येथील संकिता...
थकवा, अशक्‍तपणावर शतावरी गुणकारीशतावरी ही औषधी वनस्पती सर्वांनाच सुपरिचित आहे....
फळबाग, भाजीपाला शेतीतून मिळविली आर्थिक...शेतीचा कोणताच अनुभव नसताना कुऱ्हा (ता. तिवसा, जि...
ग्रामीण महिलांच्या समृद्धीचा महामार्गराज्यातील महिला बचतगट वेगवेगळ्या लघूउद्योगाच्या...
जीवनसत्त्व, क्षार घटकांचा पुरवठा करणारे...अंजिरामध्ये ओमेगा ३ आणि ओमेगा ६ हे घटक मुबलक...