बचत गटाने दिली आर्थिक ताकद.

आगसखांड (ता. पाथर्डी, जि. नगर) येथील बारा महिलांनी एकत्र येऊन पंधरा वर्षांपूर्वी भैरवनाथ महिला बचत गटाची स्थापना केली. सुरुवातीच्या बचतीतून अंतर्गत व्यवहार केले. बॅंकेच्या मदतीने कर्ज उपलब्ध करून विविध व्यवसायांतून रोजगारनिर्मिती केली.
women self help group members
women self help group members

आगसखांड (ता. पाथर्डी, जि. नगर) येथील बारा महिलांनी एकत्र येऊन पंधरा वर्षांपूर्वी भैरवनाथ महिला बचत गटाची स्थापना केली. सुरुवातीच्या बचतीतून अंतर्गत व्यवहार केले. बॅंकेच्या मदतीने कर्ज उपलब्ध करून विविध व्यवसायांतून रोजगारनिर्मिती केली. या गटाने महिला आर्थिक विकास महामंडळाच्या मदतीने प्रगतीची दिशा पकडली आहे. 

साडेतीन हजार लोकसंख्या असलेल्या आगसखांड (ता. पाथर्डी, जि. नगर) गावशिवारात सिंचनाचा अभाव. त्यामुळे बहुतांश कुटुंबाचा जिरायती शेती आणि ऊसतोडणी हाच रोजगार. यामुळे गावातील महिलांनी एकत्र येऊन पूरक उद्योगासाठी महिला बचत गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला. गावातील संजना त्रिंबक घुले (अध्यक्षा), शीला अर्जुन सातपुते (सचीव), कुसुम विठ्ठल भाबड, यमुना लक्ष्मण भाबड, अंजना रामदास भाबड, पारुबाई भीमराव भाबड, गंगूबाई बबन घुले, विजया मोहन सानप, कुसुम रामराव भाबड, कमलबाई गहिनीनाथ भाबड, शीतल भास्कर भाबड, आशा मच्छिंद्र कराड यांनी एकत्र येत २००५ मध्ये भैरवनाथ महिला बचत गटाची स्थापना केली. बचत गटाचे नियोजन  पहिले सहा महिने गटातील सदस्यांनी प्रत्येकी ५० रुपये, पुढे पाच वर्षे प्रत्येक महिन्याला शंभर रुपये आणि २०१५ पासून प्रत्येकी २०० रुपये महिना बचत करण्यास सुरुवात केली. अंतर्गत बचतीतून आतापर्यंत गटाने ३ लाख ६४ हजार ८०० रुपये वैयक्तिक बचत केली आहे. बचतीतून प्रत्येक महिलेचे ३०,४०० रुपये जमा आहेत. बचतीतून केलेला अंतर्गत व्यवहार पारदर्शक ठेवल्याने गटाची चांगली पत तयार झाली. महिला आर्थिक महामंडळाच्या हिरकणी लोकसंचालीत साधन केंद्राच्या मदतीने भैरवनाथ महिला बचत गटाला पहिल्यांदा २००८ मध्ये साडेतीन हजार, २००९ मध्ये प्रत्येक महिलेला १० हजार रुपयांप्रमाणे १ लाख २० रुपये आणि २०११ मध्ये प्रत्येकी २० हजार रुपयांप्रमाणे २ लाख २० हजार रुपयांचे बॅंकेकडून कर्ज मिळाले. त्यातून महिलांनी रोजगारासाठी विविध व्यवसाय सुरू केले. बचत गटाने शोषखड्डे आणि अन्य चांगली कामे केल्यामुळे २०१३-१४ मध्ये कृषी विभागाकडून २५ हजार रुपयांची प्रोत्साहन मदत मिळाली, अशी माहिती महिला आर्थिक विकास महामंडळाचे तालुका समन्वयक बाबासाहेब बांगर यांनी दिली.  सामाजिक उपक्रमात सहभाग  भैरवनाथ महिला बचत गटासह अन्य गटांतील महिला गावातील सामाजिक कामातही सक्रिय सहभागी असतात. प्रजासत्ताक व स्वातंत्र्यदिनी शाळकरी मुलांना शालेय साहित्याचे वाटप, महापुरुषांची जयंती आणि पुण्यतिथी, महिला, मुलींसाठी आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिर, बांधावर वृक्षलागवड आदी विविध उपक्रम राबविले जातात. महिलांचा ग्रामसभेतही सक्रिय सहभाग असतो. आतापर्यंत गटातील प्रत्येक सदस्याने प्रत्येकी १३ झाडे लावून त्यांचे संगोपन केले आहे. यंदा गटाने प्रत्येकी दहा झाडे लावण्याचे नियोजन केले आहे.  मदतीचा आधार आगडखांड येथील भैरवनाथ महिला बचत गटाच्या सदस्य अंजना रामदास भाबड यांचे पती, सासरे आणि मुलाचे एकापाठोपाठ निधन झाले. त्यांच्या कुटुंबावर सातत्याने दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची, मुलाला सोबत घेऊन असलेली मोजकी शेती कसण्याची धडपड, पण बैलजोडी नाही. अशा काळात गटाची मदत कामी आली. अंजनाताईंना गटातील महिलांनी पाठबळ देत बैलजोडी खरेदी करण्यासाठी एक लाख रुपये दिले. दुःखातून सावरायला गटातील महिलांनी आधार दिला.

समन्वयाने व्यवसायाला हातभार 

  • भैरवनाथ महिला बचत गटातील महिलांनी एकमेकींना समन्वयातून व्यवसायासाठी मदत केली आहे. वैयक्तिक बचतीतून उपलब्ध झालेल्या पैशातून पहिल्या वर्षी गटाने नऊ महिलांना शेळ्या घेऊन दिल्या. दुसऱ्या वर्षी दर तीन महिन्याला प्रत्येकी ५० हजार रुपयांची दुभती जनावरे खरेदीसाठी पैसे दिले. शेती नसलेल्या महिलांना शिवणकाम यंत्र व बांगडी व्यवसाय उभा करून दिला. आता गरजेनुसार कर्जाने पैसे उपलब्ध करून दिले जातात.
  • सध्या दहा महिलांकडे शेळीपालन, तीन महिलांकडे पिठाची गिरणी, चार महिलांचा दूध व्यवसाय आहे. दोन महिलांनी रिक्षा आणि एका महिलेने टेम्पो खरेदी केला आहे. दोन महिलांनी कुक्कुटपालन सुरू केले आहे. गटाच्या मदतीने सर्व सदस्यांनी कच्च्या घराची पक्की घरे केली आहेत. एका महिलेने विहीर खोदली असून, एकीने कूपनलिका खोदली आहे. त्यामुळे भाजीपाला आणि इतर हंगामी पिकांची लागवड वाढली आहे. आरोग्य, शिक्षण, विवाह यासाठीही गटाचा आर्थिक आधार महत्त्वाचा ठरला आहे.   
  • एक टक्का दराने कर्ज 

  •   रोजगाराचा अभाव, पुरेसे उत्पन्न नसल्याने मुलांचे शिक्षण, घराचे बांधकाम आणि इतर कामांसाठी अनेकांना व्याजाच्या पैशाचा आधार घ्यावा लागत असे. व्याजाच्या पैशाला साधारण प्रति शेकडा तीन ते चार रुपये प्रति महिना व्याज असायचे. महिलांनी बचत गट केल्यानंतर रोजगार सुरू झाला आणि व्याजाच्या पैशाची गरज कमी होत गेली.  
  •  गटाकडे असलेले पैसे व्याजाने दिले जातात. वेळेत परतफेड न केल्यास दंड आकारला जातो. 
  • गटाकडे आतापर्यंत व्याज आणि दंडाचे २ लाख २१ हजार रुपये जमा झाले. याचबरोबरीने बचतीचे मिळून गटाकडे सध्या ५ लाख ८५ हजार रुपयांचे भांडवल आहे. गटातील महिलेला एक लाख रुपयाच्या मर्यादेत अवघ्या एक टक्का दराने कर्ज उपलब्ध होते. त्यातून आलेल्या व्याजातून गावांत सामाजिक उपक्रमात सहभाग घेतला जातो. 
  • यंदा कोरोना प्रादुर्भावामुळे अडचण झाल्याने प्रत्येक महिलेला २० हजार रुपये उपलब्ध झाले. घेतलेल्या कर्जाची वेळेत परतफेड केल्यामुळे गटातील महिला व्यवसायात यशस्वी होत आहेत, असे महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक संजय गर्जे यांनी सांगितले.
  • आमच्या गावातील महिला एकत्र आल्या आणि बचत गट केला. बचत केली, मिळालेल्या बॅंक कर्जाची प्रामाणिकपणे परतफेड केली. त्यामुळे गटाच्या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध करता आला. सक्षम होता आले. - संजना घुले, (अध्यक्षा, भैरवनाथ महिला बचत गट, आगसखांड )

    महिला आर्थिक विकास महामंडळाकडून गावातील महिलांना बचत गटाचे फायदे सांगितले. गट करण्याची संकल्पना, नेतृत्व प्रशिक्षण, उद्योगात भांडवल गुंतवणुकीबाबत माहिती दिल्यावर महिला सक्रिय झाल्या. आता गटाच्या माध्यमातून प्रत्येक महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली आहे. - भारती काटकर,  ९९२२८३११९५  (सहयोगिनी, हिरकणी लोकसंचालीत साधन केंद्र)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com