SHG work
SHG work

महिलांमध्ये तयार झाली स्वयंरोजगाराची ‘उमेद’

ग्रामीण भागातील महिलांना छोट्या उद्योगातून रोजगार निर्माण करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचा मोठा वाटा आहे. अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात या अभियानामुळे सर्व सामान्य कुटुंबातील महिलांच्या आयुष्यात ‘उमेद’ जागविण्यात यश मिळाले. यातून ग्रामीण पातळीवर विविध पूरक उद्योगांची सुरवात झाली आहे.

ग्रामीण भागातील महिलांना छोट्या उद्योगातून रोजगार निर्माण करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचा मोठा वाटा आहे. अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात या अभियानामुळे सर्व सामान्य कुटुंबातील महिलांच्या आयुष्यात ‘उमेद’ जागविण्यात यश मिळाले. यातून ग्रामीण पातळीवर विविध पूरक उद्योगांची सुरवात झाली आहे.

अकोला जिल्ह्यामध्ये उमेद   महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान राबविले जाते. अगोदर या कार्यक्रमाची अंमलबजावणी स्वर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजनेच्या माध्यमातून होत होती. त्याचे रूपांतर राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानात झाले. त्यालाच आता ‘उमेद’ म्हटले जाते.  या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना स्वयंरोजगाराची दिशा मिळाली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुभाष पवार आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सूरज गोहाड यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यामध्ये विविध उपक्रम राबविले जातात. ‘उमेद’ मध्ये गरीबी निर्मूलनासाठी आवश्‍यक समुदाय विकासापासून  शाश्‍वत उपजीविका निर्मितीपर्यंतचा समावेश आहे. ग्रामीण महाराष्ट्रातील गरीब आणि जोखीम प्रवण कुटुंबांना समृद्ध, आत्मसन्मान आणि सुरक्षित जीवन जगता यावे यासाठी उमेद अंतर्गत एकात्मिक प्रयत्न करण्यात येतात. त्याच प्रमाणे स्वयंसहायता गट, बचत गट याद्वारे स्त्रियांचे संघटन करून त्यांच्यातील उद्योजकतेला चालना दिली जाते.        ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसंघ आणि जिल्हा परिषद प्रभाग स्तरावर प्रभाग संघ तयार केले जातात. त्याचप्रमाणे अभियानांतर्गत जिल्ह्यात वर्धिनी, प्रेरिका, पशू सखी, कृषी सखी, कृतिसंगम सखी अशा पद्धतीने समुदाय संसाधन व्यक्ती म्हणून १२०० महिलांना काम करण्याची संधी मिळाली आहे. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत ९,५२० स्वयंसहायता समूह, ३५८ ग्राम संघ आणि सहा प्रभाग संघाची निर्मिती करण्यात आली आहे. या अभियानामध्ये ग्रामीण भागातील एक लाख महिला जोडलेल्या आहेत.  

पीठ गिरणीतून स्वयंरोजगार

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत बेलुरा खुर्द (ता. पातूर) गावामध्ये महिला स्वयंसहायता समूह तयार करण्यात आले. त्यातील तुळजाभवानी महिला स्वयंसहायता समूहाची स्थापना २०१८ मध्ये झाली. यामध्ये गटातील सदस्यांचे दशसुत्रीचे प्रशिक्षण झाले. या प्रशिक्षणाप्रमाणे गटाच्या बैठकाही झाल्या. दशसुत्री समजलेल्या या गटाने पहिल्या बैठकीपासून अंतर्गत कर्जवाटप सुरू केले. महिलासुद्धा तितक्याच नियमितपणे कर्जाची परतफेड  करू लागल्या. आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी गटातील महिलांना गटाकडून गरजेनुसार पैसे मिळू लागले. गटाच्या बैठकीत शाश्वत उपजीविकेवर होणाऱ्या चर्चेतून महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हायला सुरुवात झाली.  तुळजाभवानी स्वयंसहायता गटातील शीतल किरणराव देशमुख यांची दोन एकर कोरडवाहू शेती. शेतीमध्ये शाश्वत उत्पन्न नसल्याने काहीवेळा त्यांना मजुरी करावी लागायची. त्यांचे पती वायरिंगची कामे करतात. परंतु कुटुंबासाठी पुरेशी आर्थिक मिळकत होण्यासाठी त्यांनी गटाच्या माध्यमातून कर्ज घेतले.  गावातील लोकांची गरज लक्षात घेऊन त्यांनी कलर प्रिंटर, सेकंड हँन्ड लॅमिनेशन यंत्र, सेकंड हँन्ड अँन्ड्रॉईड मोबाईल खरेदी करण्याचा व सोबत पीठगिरणी सुरू करण्याचा निर्णय घेतला. याकरिता त्यांनी पतीच्या मदतीने प्रिंटर, लॅमिनेशन यंत्र, मोबाईल तसेच पीठ गिरणी असे एकूण ४३ हजार ५०० रुपये किमतीचे साहित्य खरेदी केले. आता त्या कटलरीचा व्यवसाय देखील करणार आहोत. यासाठी त्यांनी गटाकडून दहा हजार रुपये कर्ज घेतले आहे. झेरॉक्स, कलर प्रिंट, पासपोर्ट फोटो, पीठगिरणी अशा विविध माध्यमातून शीतल देशमुख  यांना दैनंदिन  पाचशे रुपयांची मिळकत होते.  - शीतल देशमुख,९३०९१४४३८०  

भाजीपाला विक्री केंद्र

चरणगाव (ता. पातूर, जि. अकोला) येथील सुषमा संजय क्षिरसागर यांचे बारावीपर्यंत शिक्षण झाले आहे.  कुटुंबाकडे केवळ दोन एकर शेती आहे. २०१८ मध्ये त्यांनी 'कृष्णा स्वयंसहायता समूह’ तयार केला. गट सुरळीत सुरु असतानाच त्यांनी ‘उमेद’ अभियानांतर्गत कृषी सखीच्या जागेसाठी अर्ज भरला. लेखी परीक्षा व मुलाखतीमध्ये त्यांची कृषी सखी म्हणून निवड झाली. यापूर्वी त्या कधीही गाव सोडून एकट्या बाहेर पडल्या नव्हत्या. परंतू आता गेल्या दोन वर्षांपासून चार गावांमध्ये जाऊन शेती तंत्रज्ञानाबाबत महिला शेतकरी आणि महिला समूहाला मार्गदर्शन करतात. हंगामानुसार शेती प्रात्यक्षिकांचे आयोजन करतात. या कामासाठी त्यांना मानधनदेखील मिळते.   उमेद अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनातून प्रेरित होत त्यांनी स्वबळावर काहीतरी व्यवसाय करण्याची उत्सुकता दाखवली. समूहाकडून दहा हजारांचे कर्ज घेत त्यांनी भाजीपाला विक्री केंद्र सुरू केले. यातून दिवसाला चारशे रुपये मिळतात. या उत्पन्नातून त्यांनी  काही दिवसातच समूहाचे पैसे परत करण्यास सुरवात केली. त्यांनी स्वतःच्या दीड एकर शेतीमध्ये हळदीचे पीक घेतले. गटातील महिलांना सोबत घेऊन हळद पावडर तयार करून विक्री सुरू केली. यातून अतिरिक्त उत्पन्न सुरू झाले. या गटातील महिलांनी नवी मुंबई येथे सप्टेंबर, २०१९ मध्ये झालेल्या महालक्ष्मी सरस मार्टमध्ये हळद आणि मसाला विक्री केली. यातून गटाला दहा हजारांचे उत्पन्न मिळाले. यामुळे महिलांचा पूरक उद्योगाच्यादृष्टीने आत्मविश्‍वास वाढला आहे.  - सुषमा क्षीरसागर, ७८२१०४०४४५

किराणा दुकान, दुग्ध व्यवसायाला सुरवात

पट्टे अमराई (शिर्ला) येथील उर्मिला रामकृष्ण महल्ले यांचे शिक्षण बी.ए. पर्यंत झाले आहे. मजुरीवरच कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून होता. पातूर पंचायत समितीच्या माध्यमातून २००२ मध्ये त्यांना बचत गटाची माहिती मिळाली. पंचायत समितीच्या मार्गदर्शनातून गट चालू लागला. २००३ साली त्यांनी गटांतर्गत कर्ज काढले आणि गावामध्ये एक छोटेसे किराणा दुकान सुरू केले. हे किराणा दुकान चांगल्या पद्धतीने सुरू आहे. एके काळी २५ रुपये रोजाने मजुरी करणाऱ्या उर्मिलाताई यांची आता किराणा दुकानामुळे चांगली मिळकत होऊ लागली आहे.       किराणा दुकानाव्यतिरिक्त उर्मिलाताईंना दूग्ध व्यवसाय करण्याची इच्छा होती. यासाठी त्यांनी गटातून  २००७ मध्ये दोन लाखांचे कर्ज घेतले. या रकमेतून त्यांनी म्हैस विकत घेऊन दुग्ध व्यवसायाला सुरवात केली. त्याचबरोबर गटांतर्गत कर्ज काढून पतीला चहा व्यवसाय सुरु करून दिला. गट आणि किराणा दुकानासाठी असलेल्या कर्जाचा नियमितपणे भरणा सुरु आहे. उमेद प्रकल्पात वर्धनी म्हणूनही त्यांची निवड झाली आहे. या माध्यमातून त्या महिला बचत गटांना मार्गदर्शन करतात.  

अनिल गुंजे, ८०५५१५११२३

(उमेद,जिल्हा अभियान व्यवस्थापक,अकोला) 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com