महिला गटांमुळे मिळाली प्रगतीची दिशा

goat farming
goat farming

नांदेड जिल्ह्यातील सगरोळी (ता. बिलोली) येथील सावित्रीबाई फुले महिला विकास मंडळाअंतर्गत महिला स्वयंसहाय्यता बचत गटांची स्थापना करण्यात आली. कृषी विज्ञान केंद्रातर्फे महिलांना शेतीपूरक व्यवसाय आणि गृह उद्योगाचे प्रशिक्षण देण्यात आले. यातून महिलांना उत्पन्नाचे विविध पर्याय उपलब्ध झाले आहेत.

महाराष्ट्र -तेलंगणाच्या सीमेवरील सगरोळी (ता. बिलोली, जि. नांदेड) गावातील शेतकरी, भूमिहिन शेतमजूर कुटूंबातील महिलांच्या प्रगतीसाठी सुनंदा प्रमोदराव देशमुख यांच्या पुढाकारातून १९८२ मध्ये सावित्रीबाई फुले महिला विकास मंडळाची स्थापना करण्यात आली. गावातील महिलांमध्ये आर्थिक साक्षरता नव्हती. विविध शासकीय योजनांची माहिती त्यांच्यापर्यंत पोचत नव्हती. हे लक्षात घेऊन महिला आत्मनिर्भर, निर्णयक्षम व्हाव्यात, यासाठी सुनंदा देशमुख यांनी महिलांना एकत्र केले. पापड निर्मिती, शिवणकाम आदी व्यवसायाचे प्रशिक्षण तसेच यशस्वी महिलांच्या व्याख्यानांचे आयोजन केले. यामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. तांत्रिक मार्गदर्शन, प्रशिक्षण  सगरोळी येथील संस्कृती संवर्धन मंडळातर्फे शिक्षण, पाणलोट क्षेत्रात काम करत असताना या भागातील शेतकऱ्यांमध्ये आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी २०१२ मध्ये कृषी विज्ञान केंद्राची स्थापना करण्यात आली. कृषी विज्ञान केंद्रातील गृहविज्ञान विभागातील विशेषज्ञ माधुरी रेवणवार यांच्याकडे गावातील महिला स्वयंसहाय्यता गटांतील महिलांच्या सक्षमीकरणाची जबाबदारी सोपविण्यात आली. रेवणवार यांना सहयोगीनी कुसुम लवटे यांचे सहकार्य मिळाले. गेल्या काही वर्षांत सगरोळी गावात सावित्रीबाई फुले महिला विकास मंडळाअंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या महिला बचत गटांची संख्या चाळीसपर्यंत पोचली आहे.  महिला बचत गटांतील सदस्यांना विविध व्यवसाय, गृहउद्योग सुरू करण्यासाठी तांत्रिक मार्गदर्शन तसेच प्रशिक्षणाचे नियमित आयोजन करण्यात येते. त्याद्वारे महिलांमध्ये विपणन कौशल्याचा विकास होत आहे. महिला विकास मंडळांतर्गत बचत गटांच्या माध्यमातून गावातील ४०० महिला जोडल्या गेल्या आहेत. बचत गटांतील महिलांना उद्योग, व्यवसायासाठी संस्कृती संवर्धन मंडळातर्फे ३० ते ५० हजार रुपयांचे अर्थसाह्य करण्यात आले. २०१७ मध्ये महिला स्वंयसहाय्यता बचत गट हे महिला आर्थिक विकास महामंडळाशी जोडण्यात आले. महिला आर्थिक विकास महामंडाळाने २० महिला बचत गटांना प्रत्येकी एक लाख रुपये कर्ज मंजूर केले. तसेच अनेक महिलांनी बचत गटांअंतर्गत कर्ज घेतले. शेतीपूरक, गृहउद्योगामुळे उत्पन्नात वाढ  महिला आर्थिक विकास महामंडळ तसेच संस्थेकडून अर्थसाह्य मिळाल्यामुळे सगरोळीमधील विविध महिला बचत गटांतील ५२ महिलांनी नवीन व्यवसाय सुरू केले आहेत. कर्जरुपी भांडवल मिळाल्यामुळे अनेक महिलांनी पूर्वीच्या व्यवसायाचा विस्तार केला आहे. या भागातील गरजानुरूप शेतीपूरक दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन, मत्स्यपालन आदी व्यवसाय, शिवणकाम, किराणा दुकान, कापड दुकान, फळे-भाजीपाला विक्री, बांबूच्या वस्तू, घरगुती डाळ तसेच पीठगिरणी आदी व्यवसाय सुरू केले आहेत. नवीन व्यवसायामुळे उत्पन्नाचे साधन मिळाले. जुन्या व्यवसायासाठी भांडवल मिळाल्यामुळे महिलांच्या मासिक उत्पन्नात १५०० ते ५,००० रुपयांपर्यंत वाढ झाली. या व्यतिरिक्त बचत गटांतील २५ महिलांनी विविध व्यवसाय सुरू केले आहेत.

दुग्धव्यवसायाची जोड 

  • संगीता पारटवार या भूमिहीन शेतमजूर. पूर्वी त्यांना मजुरीची कामे करावी लागत. बचत गटाचे सदस्य झाल्यानंतर महिन्याकाठी १०० रुपयांची बचत होऊ लागली. संस्थेने त्यांना म्हैस खरेदीसाठी ५० हजार रुपयांचे कर्ज दिले. म्हशीपासून त्यांना दररोज ५ लिटर दूध मिळते. दुग्ध व्यवसायातून त्यांना दररोज २०० ते २५० रुपयाचे उत्पन्न सुरू झाले. 
  •   शकुंतला महाजन यांच्या कुटुंबाची दोन एकर शेती आहे. चार वर्षांपूर्वी त्या बचत गटांच्या सदस्य झाल्या. महिन्याकाठी १०० रुपये बचत होऊ लागली. घरी तीन म्हशी, एक गाय आहे. बचत गटामार्फत ५० हजार रुपये कर्ज घेऊन त्यांनी एक म्हैस खरेदी केली. त्यामुळे वर्षभर दूध व्यवसाय सुरू राहतो. प्रतिलिटर ५० रुपये या प्रमाणे गावात दुधाची विक्री होते. संस्कृती संवर्धन मंडळाने परिसरातील दूध उत्पादकांसाठी केशव दूध संकलन केंद्र सुरू केले आहे. या केंद्राशी बचत गटातील ३० महिला पशुपालक तसेच परिसरातील शेतकरी जोडले गेले आहेत.
  •   शोभा गिरगावकर यांनी बचत गटाकडून अर्थसाह्य घेत सगरोळी येथील बाजारपेठेत फळे, भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे.
  • बांबू व्यवसायाला मिळाला आधार  नंदाबाई जोरगेवार यांचा बांबूपासून विविध वस्तू निर्मितीचा व्यवसाय आहे. कुटूंबाच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी व्यवसायाचा विस्तार करणे आवश्यक होते. त्यासाठी नंदाबाईंनी संस्था तसेच महिला बचत गटाकडून ३० हजार रुपये कर्ज घेतले. यामुळे बांबू खरेदीसाठी भांडवल मिळाले. बांबूपासून टोपली, सूप, परड्या आदींची निर्मिती करून त्या सगरोळी तसेच परिसरातील गावात विक्री करतात.

    कापडी पिशव्याची निर्मिती  सगरोळी येथील शांता हराळे, मोहसीना कोरबो, सुनीता कोळनुरे, सुषमा मुत्तेपौळ यांनी एकत्र येऊन शिक्षण संस्थेच्या परिसरात शिवणकाम व्यवसाय सुरू केला. या महिला सोयाबीन काढणीसाठी आवश्यक हातमोजे, कापूस वेचणी कोट, बियाणे पॅकिंगसाठी पिशवी, सन कोट, किचन ॲप्रन, शालेय गणवेशांची निर्मिती करतात. पूर्वी या महिला घरगुती शिवणकाम व्यवसाय करत असत. या महिलांना संस्कृती संवर्धन मंडळाकडून ५० हजार रुपये कर्ज भांडवल आणि कृषी विज्ञान केंद्रातर्फे तांत्रिक प्रशिक्षण मिळाले. यामुळे महिलांनी विद्यालयाच्या परिसरात प्रगती टेक्सटाईल या नावाने शिवणकाम व्यवसाय तसेच लेडीज एम्पोरियम सुरू केले. त्यामुळे संस्थेतील निवासी विद्यार्थिनींना विविध वस्तू खरेदी करण्यासाठी सुविधा उपलब्ध झाली. प्रगती टेक्साटईल आणि लेडीज एम्पोरियच्या माध्यमातून या महिलांना वर्षाकाठी एक लाख ते सव्वा लाख रुपयाचे उत्पन्न मिळते, असे शांता हराळे यांनी सांगितले. लेडीज गारमेंटची सुरुवात  निता महाजन या उच्च शिक्षित गृहिणी असून, सोमेश्वर महिला बचत गटाच्या सदस्या आहेत. त्यांना उद्योग व्यवसायाची आवड होती. बचत गटाकडून अर्थसाह्य घेऊन गावात लेडिज गारमेंट सुरू केले. घरकाम सांभाळून त्या कापड व्यवसाय करतात. यातून महिन्याकाठी चार ते पाच हजार रुपये उत्पन्न मिळते.

    डाळ मिल, पीठ गिरणीचा व्यवसाय  मीनाक्षी किशोर जाधव या गृहिणी कापसाच्या वाती निर्मिती आणि विक्री करत असत. बचत गटाच्या अर्थसहाय्यातून त्यांनी छोटी डाळ मिल खरेदी केली. डाळ मिलमुळे विविध प्रकारच्या डाळिंची निर्मिती त्यांनी सुरू केली. याचबरोबरीने धान्याचे दळणही त्या करतात. त्यांच्या परिसरातील नागरिक डाळ तसेच पीठ तयार करून घेण्यासाठी त्यांच्याकडे येतात. यातून त्यांना दररोज दोनशे ते तीनशे रुपये उत्पन्न सुरू झाले.

    परसबागेत भाजीपाला उत्पादन  सुनंदा देशमुख यांनी गावातील महिलांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करत असताना स्वतःच्या घरातील परसबागेत पालक, शेवगा, फ्लॉवर, कोथिंबीर, टोमॅटो तसेच विविध वेलवर्गीय भाजीपाल्यांची लागवड केली. यातून कुटूंबासाठी ताजा भाजीपाला मिळतो. त्या स्वतः परसबागेचे व्यवस्थापन करतात.

    सुनंदा देशमुख ः ९८२३८२१२५४,  

    माधुरी रेवणवार ः ८९९९५६०६८२

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com