नाचणी प्रक्रियेतून मिळवली आर्थिक समृद्धी

अष्टविनायक गटाने लागवड सुरु करण्यापूर्वी खेड तालुक्यात नाचणीचे उत्पादन अत्यंत नगण्य होते. नाचणी आरोग्यवर्धक असल्यामुळे महिला बचत गटांनी नाचणीची लागवड सुरू केली. सुरवातीला १९ महिला एकत्र आल्या होत्या. आता तालुक्यात साडे तीनशे महिला गट कार्यरत आहेत. एक एकरापासून नाचणी लागवडीला सुरवात झाली. गेल्या सात वर्षात दोनशे एकरावर नाचणीची लागवड होते. नाचणी उत्पादनामुळे आंबये गावातील आठ बचत गटातील ७० महिलांसह तालुक्यातील सुमारे तीनशेहून अधिक महिला शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्नाचे साधन मिळाले आहे. - दीप्ती सावंत
finger millet process products
finger millet process products

कोकणात भातशेतीबरोबर नाचणीची लागवड मोठ्या प्रमाणात होत होती; मात्र काळाच्या ओघात त्याकडे दुर्लक्ष झाले. मात्र बाजारपेठ लक्षात घेऊन आंबये (ता.खेड,जि.रत्नागिरी) येथील आठ महिला बचत गटांनी नाचणी लागवडीस सुरवात केली. त्याचबरोबरीने प्रक्रिया उद्योग सुरू करून वीस प्रकारचे पदार्थ बाजारपेठेत आणले आहेत. या उपक्रमातून खेड तालुक्यातील सुमारे तीनशेहून अधिक महिलांना चांगला रोजगार मिळाला आहे.

कोकणपट्टीचा विचार केला तर बचत गटाच्या माध्यमातून शेतीमालावर आधारित प्रक्रिया उद्योग सुरू झाले आहेत. आंबये (ता.खेड,जि.रत्नागिरी) गावातही आठहून अधिक बचत गट कार्यरत आहेत. या गटातील महिलांना स्वयंपूर्ण बनविण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाने पावले उचलली. याचबरोबरीने खेड तालुक्यात ३०० बचत गटांची स्थापना केली. खेडमधील आंबये  गावातील अष्टविनायक बचत गटाने बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन नाचणी लागवडीला महत्त्व दिले. या उपक्रमाला दापोली येथील डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आणि लोटे येथील श्री विवेकानंद रिसर्च ॲन्ड ट्रेनिंग इंन्स्टिट्यूट चे पाठबळ मिळाले.    अष्टविनायक महिला बचत गटाने २०१३ साली पहिल्या वर्षी प्रयोग म्हणून दीड एकर क्षेत्रावर नाचणीची लागवड केली. या क्षेत्रातून ८ क्विंटल नाचणीचे उत्पादन मिळाले. या नाचणीला प्रति किलो ३२ ते ३५ रुपये दर मिळाला. गटातील महिलांनी गावकऱ्यांसह मुंबईतील नातेवाइकांना नाचणी विकली. यातून गटाला चांगले उत्पादन मिळाले. चार महिन्यांच्या मेहनतीतून चांगले  पैसे मिळाल्याने महिलांचा आत्मविश्‍वास वाढला. अष्टविनायक गटातील महिलांनी गावातील आठ बचत गटातील महिलांना एकत्र केले. दुसऱ्या वर्षी ५० एकरावर नाचणी लागवड केली. त्यानंतर या उपक्रमात गेल्या सात वर्षात खेड तालुक्यातील महिला गट सहभागी झाल्याने नाचणी लागवडीचे क्षेत्र दोनशे एकरापर्यंत गेले आहे. 

तंत्रज्ञानाचा प्रसार   खेड तालुक्यात नाचणी लागवड करणाऱ्या गटातील महिलांनी दीप्ती सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे विस्तार संचालक डॉ. संजय भावे यांची भेट घेतली. विद्यापीठातील तज्ज्ञांच्याकडून नाचणी लागवड, व्यवस्थापन आणि प्रक्रिया उद्योगाबाबत गटांना चांगले मार्गदर्शन मिळाले. विद्यापीठाने महिलांसाठी अभ्यास दौरे आणि प्रशिक्षण वर्ग घेतले. श्री विवेकानंद रिसर्च ॲन्ड ट्रेनिंग इंन्स्टिट्यूटने बचत गटाला १०० किलो नाचणीचे बियाणे उपलब्ध करून दिले.    लागवडीच्या नियोजनाबाबत माहिती देताना डॉ. संतोष वरवडेकर म्हणाले की, जून महिन्यात नाचणीची लागवड लावणी पद्धतीने होते. पारंपरिक पद्धतीत चांगले उत्पादन मिळत नसल्याने गटातील महिलांनी सुधारित लागवड तंत्राचा वापर सुरू केला.गटाने दापोली नं १, दापोली सफेद- १ या अधिक उत्पादन देणाऱ्या जातींची लागवड सुरू केली.या जातीमध्ये  प्रथिने, लोह, मॅंगेनिजचे प्रमाण अधिक असते. गटातील महिलांना प्रमोद चिखलीकर यांनी प्रक्रिया पदार्थ बनविण्यासाठी मार्गदर्शन केले. सध्या गटातील महिलांना दरवर्षी दीड टन नाचणीची मागणी असते.

वर्षाला लाखो रुपयांची उलाढाल  बचत गटातील महिलांनी २०१५ पासून नाचणीचे विविध पदार्थ तयार करण्यास सुरवात केली.  नाचणी सत्त्वाला शहरी बाजारपेठेत चांगली मागणी आहे. गेल्या वर्षी गटाने दोन टन नाचणी सत्त्वाची विक्री केली. यंदाच्या वर्षी खेड तालुक्यातील गटांनी २० टन नाचणीचे उत्पादन मिळाले. त्यातील तीन टन नाचणीवर प्रक्रिया करण्यात आली. बाजारपेठेत नाचणी सत्त्व १८० ते २५० रुपये, लाडू ४५० ते ५०० रुपये, बिस्कीट ३०० रुपये, शेवया २५० रुपये किलो या दराने विक्री होते. दिवाळीमध्ये नाचणीच्या चकलीला चांगली मागणी असते. ही चकली ३५० रुपये प्रति किलो दराने विकली जाते. प्रक्रिया उद्योग सरासरी पाच ते सहा महिने चालतो. दरवर्षी तालुक्यातील बचत गटांची नाचणी विक्री आणि प्रक्रिया उत्पादनातून एकत्रितपणे सरासरी पाच लाखांची उलाढाल होते. प्रत्येक महिलेला वार्षिक पंधरा हजार रुपयांचे उत्पन्न प्रक्रिया उद्योगातून मिळते. पापड, लोणची या सारख्या पारंपरिक पदार्थांबरोबरच नाचणी लागवडीबरोबरच प्रक्रिया पदार्थांमधून व्यवसायाचे नवीन दालन या गटांना उपलब्ध झाले आहे, अशी माहिती मनिषा निवासे (अध्यक्षा,अष्टविनायक बचत गट) आणि अंकिता शिगवण (सचिव, साईधाम बचत गट) यांनी दिली.

प्रक्रिया पदार्थाची निर्मिती गटातील महिलांनी सुधारित पद्धतीने नाचणी लागवडीला सुरवात केल्याने उत्पादनात वाढ मिळत गेली. त्यामुळे केवळ नाचणी विकण्यापेक्षा प्रक्रिया पदार्थांच्या निर्मितीकडे गटातील महिला वळाल्या. महिलांनी पहिल्या टप्यात मुंबईतील नातेवाइकांच्या  मदतीने ५ टन नाचणीची विक्री केली. तसेच माविम संचालित  लोकसंचलित साधन केंद्रामार्फत दोन टन नाचणीची विक्री केली. विविध गटातील महिलांना माविम आणि कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांनी महिलांना नाचणीच्या विविध पदार्थ निर्मिती तसेच विक्रीबाबतही मार्गदर्शन केले. गटातील महिलांनी नाचणी लाडू, नाचणी सत्त्व, डोसे पीठ, इडली पीठ, घावन पीठ, चकली, शेव, वडे, उत्ताप्पा पीठ, मोदक निर्मितीला सुरवात केली. पदार्थ बनविण्यासाठी श्री विवेकानंद रिसर्च ॲन्ड ट्रेनिंग इंन्स्टिट्यूटने गटाला पीठ बनविण्याचे युनिट दिले. सध्या आठ गटातील महिला एकत्रित येऊन नाचणीचे विविध पदार्थ तयार करतात. 

आंबये गावातील बचत गट  अष्टविनायक, लक्ष्मी, साईधाम, रमाई, दुर्गामाता, लक्ष्मीनारायण, एकता

दृष्टिक्षेपात आंबये नाचणी लागवड प्रकल्प 

  • गावातील आठ बचत गटांचा सहभाग
  • तीन टन नाचणीवर प्रकिया करून पदार्थ निर्मिती.
  • प्रत्येक महिलेला वार्षिक १० ते १५ हजार रुपये उत्पन्न.
  • मुंबई, पुणे शहर, प्रदर्शन, कोकण कृषी विद्यापीठ आणि खेड बाजारपेठेत विक्री.
  •  - दीप्ती सावंत,   ः८३२९९७१९९७ (व्यवस्थापक, लोकसंचलीत साधन केंद्र, खेड)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com