Agriculture Agricultural News Marathi success story of Wonen self help group,Tike,Dist.Ratnagiri | Agrowon

भाजीपाला, फुलशेतीतून गटाने दिली नवी दिशा

राजेश कळंबटे
रविवार, 5 जानेवारी 2020

टिके (जि. रत्नागिरी) गावातील नवलाई आणि पावणाई या दोन महिला बचत गटांतील सदस्यांनी एकत्र येऊन हंगामी भाजीपाला, हळद, झेंडू लागवडीतून उत्पन्नाचा पर्याय शोधला.  श्रावण महिन्यात भाजी, दसऱ्याला झेंडूची फुले आणि जोडीला गावठी भाताचा प्रयोग यशस्वी करत गटातील महिलांनी आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण बनण्यासाठी पावले उचलली आहेत.

टिके (जि. रत्नागिरी) गावातील नवलाई आणि पावणाई या दोन महिला बचत गटांतील सदस्यांनी एकत्र येऊन हंगामी भाजीपाला, हळद, झेंडू लागवडीतून उत्पन्नाचा पर्याय शोधला.  श्रावण महिन्यात भाजी, दसऱ्याला झेंडूची फुले आणि जोडीला गावठी भाताचा प्रयोग यशस्वी करत गटातील महिलांनी आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण बनण्यासाठी पावले उचलली आहेत.

रत्नागिरी शहरापासून सुमारे सतरा किलोमीटर अंतरावर वसलेल्या टिके गावामध्ये २०१६ मध्ये शासनाच्या उमेद अभियानांतर्गत ग्रामपंचायतीमध्ये महिलांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी कांबळेवाडीतील महिला उपस्थित होत्या. महिलांना उमेदच्या अधिकाऱ्यांनी बचत गटाच्या फायद्याबाबत मार्गदर्शन केले. त्यानुसार कांबळेवाडीतील महिलांनी एकत्र येऊन नवलाई आणि पावणाई महिला बचत गटाची मुहूर्तमेढ रोवली. नवलाई गटाच्या प्राजक्ता प्रभाकर गोवीलकर, पावणाई गटाच्या रोशनी रवींद्र गोवीलकर या अध्यक्षा झाल्या. दोन्ही गटात मिळून एकवीस सदस्या आहेत.

असा आहे बचत गट
नवलाई ः प्राजक्ता गोवीलकर (अध्यक्षा), वनिता गोवीलकर, शर्मिला गोवीलकर,  दिपाली गोवीलकर, विमल गोवीलकर, मधुरा गोवीलकर, अनुजा गोवीलकर, पल्लवी गोवीलकर.
पावणाई ः रोशनी गोवीलकर (अध्यक्षा), शलाका गोवीलकर, विमल गोवीलकर, प्रिया गोवीलकर, चैत्राली गोवीलकर, सविता गोवीलकर, श्रध्दा गोवीलकर, तुजा गोवीलकर, गायत्री गोवीलकर, कल्पना गोवीलकर.

भाजीपाला लागवडीला सुरुवात 
शेती नियोजनाबाबत नवलाई गटाच्या अध्यक्षा प्राजक्ता गोवीलकर म्हणाल्या की, कांबळेवाडीतील बहुतांश घरातील पुरुष हे बांधकाम आणि फळबागेत मजुरी करणारे आहेत. प्रत्येकाची घरापुरती भात शेती आणि काजूची झाडे आहेत. गटातील महिलांना पारंपरिक पद्धतीने शेती करण्याचा अनुभव होता. जोडीला उमेद आणि कृषी विभागातील अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन मिळाले. कांबळेवाडी डोंगरात वसलेली आहे. वाडीच्या एका बाजूला कातळ आहे. त्याठिकाणी प्रत्येक महिलेची पाच गुंठे जमीन आहे. या जमिनीवर पावसाळ्यात चिबूड, काकडी, लालमाठ, मुळा, दोडका, पडवळ, कारली, भेंडी, गवार यासह हळद, झेंडू लागवडीचा निर्णय बचत गटाने घेतला.
गटातील महिलांना परसबागेत भाजी लागवड आणि विक्रीचा अनुभव होता. गटाने याला व्यापारी स्वरूप देण्याचा निर्णय घेतला. बचत गट स्थापन केल्यानंतर खेळते भांडवल म्हणून पंधरा हजार रुपये मिळाले. दोन्ही गटाला मिळालेल्या रकमेतून खत, बियाणे आणि शेतीसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यात आले. भाजीपाल्याचे बियाणे कृषी विभागाकडून मिळाले.

गटातील महिला एकमेकींना सहकार्य करत असल्यामुळे मजुरीचा प्रश्नच उरला नाही.  पावसाळ्याच्या अगोदर गादीवाफ्यावर भाजीपाल्याची रोपे तयार केली जातात. जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाला सुरवात होते. त्यानंतर मुख्य शेतात आळ्यामध्ये विविध वेलवर्गीय भाजीपाला रोपांची लागवड केली जाते. रोपांच्या वाढीच्या टप्प्यात योग्य देखभाल केली जाते. वाढीच्या टप्प्यात खतांची मात्रा दिली जाते. पहिल्या वर्षी गटाने रासायनिक खतांचा वापर केला होता. गेल्या दोन वर्षांपासून सेंद्रिय खते आणि जैविक कीडनाशकांच्या वापरावर भर दिला आहे. योग्य व्यवस्थापनामुळे भाजीपाल्याची चांगली वाढ होते. 
भाजीपाला विक्रीचे नियोजन 
 भाजी विक्रीबाबत पावणाई गटाच्या अध्यक्षा सौ. रोशनी गोवीलकर म्हणाल्या की, कोकणात श्रावणामध्ये बहुतांश लोक मासे, मटण खात नाहीत. त्यामुळे भाजीपाल्यास चांगली मागणी असते, किफायतशीर दरही मिळतो. त्यानंतर गणेशोत्सव असतो. त्यामुळे आम्ही भाजीपाला लागवडीवर भर दिला आहे. या दोन महिन्यांच्या कालावधीत रत्नागिरी शहरातील धनजी नाका परिसरात गटातील महिला दररोज भाजीपाला विक्रीसाठी नेतात. थेट ग्राहकांना विक्री होते. 

दोन्ही गटांतील महिलांची मिळून सुमारे ४५ गुंठे जमिनीवर विविध हंगामी भाजीपाल्याची लागवड होते. प्रत्येकीला पावसाळ्याच्या चार महिन्यात खर्च वजा जाता किमान चार हजार रुपये नफा मिळतो. गटातील एका सदस्याने चार गुंठे जमिनीवर हळद लागवड केली होती. या हळदीपासून २२ किलो पावडर तयार केली. ही हळद २५० रुपये किलो या दराने विकली गेली. गटातील महिलांनी दसरा सणाची मागणी लक्षात घेऊन झेंडूच्या एक हजार रोपांची लागवड केली होती. दसऱ्याच्या काळात झेंडू फुलांचे हार करून रत्नागिरी शहरात थेट विक्री केली जाते. यंदाच्या हंगामात गटाने सुमारे दोन टन झेंडू सरासरी ७० रुपये किलो दराने विकला. गणेशोत्सवाच्या काळात एक टन चिबूड आणि सुमारे ७०० किलो काकडी गटातर्फे विकली. यातून चांगला नफा मिळाला. 

सेंद्रिय खत, दशपर्णी अर्काचा वापर 
महिला गटाने भाजीपाला आणि भात शेतीसाठी गेल्या वर्षीपासून सेंद्रिय खताच्या वापरावर भर दिला आहे. आवश्यकता भासल्यास युरिया-डीएपी ब्रिकेटचा वापर केला जातो. सेंद्रिय खत बनविण्यासाठी आयसीसी फाउंडेशनकडून गटाला प्रशिक्षण मिळाले आहे. गटातील महिला मे महिन्यात गांडूळ खत तयार करतात. गरजेनुसार जीवामृत, दशपर्णी अर्क तयार केला जातो. भाजीपाला लागवडीवेळी गांडूळ खत, जीवामृत दिले जाते. कीड नियंत्रणासाठी दशपर्णी अर्काचा वापर केला जातो. 

 

पूरक उद्योगाच्या दिशेने 
गटातील महिला दर आठवड्याला दहा रुपये बचत करतात. गावामध्ये सण, समारंभ कार्यक्रमासाठी जेवण बनवण्याचे कंत्राट गटातर्फे घेतले जाते. त्यातून बचत केली जाते. टिके परिसरात २०१६ पूर्वी स्थापन झालेले गट मार्केटिंगअभावी टिकाव धरू शकले नाहीत; मात्र उमेदच्या सीआपी तुजा घवाळी तसेच अन्य अधिकाऱ्यांच्या योग्य मार्गदर्शनामुळे आता गावामध्ये १८ गट स्थापन झाले आहेत. नवलाई, पावणाई गटाने ग्रामपंचायतीचा १५ वा वित्त विकास आराखडा बनविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. ग्रामपंचायतीतर्फे फिनेल, साबण, मेणबत्ती, मसाले, अगरबत्ती बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात येते. येत्या काळात गटातील महिला या पूरक उद्योगाकडे वळणार आहेत. पुढील वर्षी गावातील एक एकर शेती भाडेतत्त्वावर घेऊन त्यामध्ये एसआरटी पद्धतीने गावठी भात लागवडीचे नियोजन गटाने केले आहे. 

गावठी भात जातीची लागवड 
गेली तीन वर्ष गटाने भाजीपाला लागवडीमध्ये सातत्य ठेवले आहे. यंदाच्या वर्षी गटाने  एसआरटी पद्धतीने चार गुंठे क्षेत्रावर भात लागवड केली. यंदा मुसळधार पाऊस होऊनही सुमारे १६० किलो भाताचे उत्पादन मिळाले आहे. गावठी तांदळाला ५० रुपये किलो इतका दर मिळाला. तसेच बियाण्यासाठी गावातच मागणी आहे.

गटाची कामगिरी 

  • नवलाई, पावणाई गटाच्या २१ सदस्या.
  • पहिल्या वर्षी ३० हजार रुपयांची गुंतवणूक.
  • भाजीपाला, हळद, झेंडूच्या लागवडीतून वाढविला नफा.
  • गटामध्ये सुमारे ४५ गुंठ्यांवर खरिपात विविध भाजीपाला लागवड.
  • रत्नागिरी शहरात ग्राहकांना थेट 
  • भाजीपाला, झेंडूची विक्री.
  • पुढील काळात पूरक उद्योगांच्या 
  • उभारणीचे नियोजन.

-  प्राजक्ता गोवीलकर, ७७९८९४५५०१


फोटो गॅलरी

इतर महिला
जमिनीची सुपीकता जपत पीक उत्पादनात...नाशिक जिल्ह्यातील कारसूळ (ता. निफाड) येथील संकिता...
थकवा, अशक्‍तपणावर शतावरी गुणकारीशतावरी ही औषधी वनस्पती सर्वांनाच सुपरिचित आहे....
फळबाग, भाजीपाला शेतीतून मिळविली आर्थिक...शेतीचा कोणताच अनुभव नसताना कुऱ्हा (ता. तिवसा, जि...
ग्रामीण महिलांच्या समृद्धीचा महामार्गराज्यातील महिला बचतगट वेगवेगळ्या लघूउद्योगाच्या...
जीवनसत्त्व, क्षार घटकांचा पुरवठा करणारे...अंजिरामध्ये ओमेगा ३ आणि ओमेगा ६ हे घटक मुबलक...
शेती, जलसंधारण अन् शिक्षणाचा घेतला वसामांडाखळी (जि. परभणी) येथील मातोश्री जिजाऊ ग्राम...
तापावर गुणकारी गुळवेलजळजळ होणे, बारीक ताप येणे, उष्णता वाढणे या...
पूरकउद्योग अन् शेती विकासात श्री भावेश्...बेलवळे खुर्द (ता. कागल, जि. कोल्हापूर) येथील श्री...
शेतीला दिली मधमाशीपालनाची जोडएखादा पूरक व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असेल तर...
भाजीपाला, फुलशेतीतून गटाने दिली नवी दिशाटिके (जि. रत्नागिरी) गावातील नवलाई आणि पावणाई या...
मिळून साऱ्या जणी, सांभाळू कंपनी  अवर्षणग्रस्त ८० गावांतील १२ हजार महिला ४०...
पापडनिर्मिती व्यवसायातून रोजगारासह...ज्वारी, तांदळाच्या पापडासह गव्हाची भुसावडी तयार...
ज्वारी पदार्थांच्या सेवनाचे प्रमाण...भारत हा जगातील ज्वारी उत्पादनात चौथ्या क्रमांकाचा...
शेती, दुग्धव्यवसायाने बनविले...कोल्हापूर जिल्ह्यातील शेळेवाडी (ता. राधानगरी)...
प्रक्रिया उद्योगातून सोयाबीनचे...शहरी बाजारपेठेची गरज लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवड...
महिला एकत्रीकरणातून बदलाला सुरुवातमासेमारी आणि शेतमजुरी करतो. त्यामुळे...
ममताबाई झाल्या परसबागेच्या गाइडअकोले (जि. नगर) तालुक्याच्या आदिवासी भागातील...
बांबू कलाकारीतून तयार केली ओळखकला पदवीधर असलेल्या सौ. संगीता दिलीप वडे यांनी...
हळद पावडर उद्योगात तयार केली ओळखसांगलीची बाजारपेठ हळकुंड आणि हळद पावडरीसाठी देश-...
कोकणी मेव्यातून मिळाला आश्वासक रोजगारभंडारपुळे (जि. रत्नागिरी) येथील मोरया स्वयंसहायता...