Agriculture Agricultural News Marathi success story of Yahvant Samajik Prtisthan, Sonai,Dist.Nagar | Agrowon

ग्रामविकास, जलसंधारण, शिक्षणासाठी ‘यशंवत प्रतिष्ठान’चा पुढाकार

सूर्यकांत नेटके
रविवार, 9 फेब्रुवारी 2020

सोनई (ता. नेवासा, जि. नगर) येथील यशवंत सामाजिक प्रतिष्ठान या स्वयंसेवी संस्थेने ग्राम आणि सामाजिक विकासामध्ये पुढाकार घेतला आहे. गेल्या वीस वर्षांपासून प्रतिष्ठानने जलसंधारण, ग्रामविकास, व्यसनमुक्ती, तंटामुक्ती, सामुदायिक विवाह सोहळा, शेतकरी, गरीब कुटुंबातील मुलींचे शैक्षणिक पालकत्व, महिला बचतगटाची उभारणी केली. यातून ग्रामीण भागाला विकासाची दिशा मिळाली आहे.

सोनई (ता. नेवासा, जि. नगर) येथील यशवंत सामाजिक प्रतिष्ठान या स्वयंसेवी संस्थेने ग्राम आणि सामाजिक विकासामध्ये पुढाकार घेतला आहे. गेल्या वीस वर्षांपासून प्रतिष्ठानने जलसंधारण, ग्रामविकास, व्यसनमुक्ती, तंटामुक्ती, सामुदायिक विवाह सोहळा, शेतकरी, गरीब कुटुंबातील मुलींचे शैक्षणिक पालकत्व, महिला बचतगटाची उभारणी केली. यातून ग्रामीण भागाला विकासाची दिशा मिळाली आहे.

सोनई येथील प्रशांत गडाख-पाटील यांच्या कुटुंबाला राजकीय पार्श्वभूमी. माजी खासदार व राज्याच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख-पाटील यांचे प्रशांत हे चिरंजीव आणि सध्याचे राज्याचे जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख-पाटील यांचे बंधू. मात्र, प्रशांत गडाख यांनी यशवंत सामाजिक प्रतिष्ठानला कधीच राजकारण जोडले नाही. वीस वर्षांपूर्वी शिक्षण घेऊन प्रशांत गडाख हे सोनई या गावी आल्यानंतर ग्राम आणि सामाजिक विकासाच्या दृष्टीने तरुणांना बरोबर घेत ग्रामविकासाचा आराखडा तयार केला. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि पोपटराव पवार यांच्या कामाची प्रेरणा घेऊन १९९९ साली तरुणांना सोबत घेऊन त्यांनी यशवंत सामाजिक प्रतिष्ठानची स्थापना केली. गेल्या काही वर्षांत लोकसहभाग, श्रमदानातून नेवासा तालुक्यातील प्रत्येक गावात स्वयंस्फूर्तीने ग्रामविकासाचे काम उभे राहिले आहे. ग्रामविकास, जल-मृदसंधारण आणि शिक्षणातील कामामुळे संस्थेला विविध नऊ पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

दत्तक गाव योजनेतून सुरुवात 
नेवासा तालुक्यातील मोरया चिंचोरे हे विकासापासून वंचित असलेले दुष्काळी गाव. अनेक समस्यांनी वेढलेले. यशवंत सामाजिक प्रतिष्ठान संस्थेने पहिल्याच वर्षी हे गाव विकास कामासाठी दत्तक घेतले. ग्रामस्थांना एकत्र करून गाव शिवारात श्रमदान व लोकसहभागातून जल, मृदसंधारणाची सुमारे १,८०० हेक्टरवर कंपार्ट बंडिंगची कामे झाली. श्रमदानातून १३ बंधारे, एक पाझर तलाव खोदण्यात आला. जलसंधारणाच्या कामामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढली आणि  हळूहळू दुष्काळी गाव पाणीदार झाले. शेतीला शाश्वत पाणी मिळाले. रोजगारासाठी गावांतून होणारे स्थलांतर थांबले. संस्थेने गावात व्यसनमुक्ती अभियान राबवले. गाव शिवाराच्या माळरानावर एक लाख रोपांची लागवड केली. राज्य सरकारनेही गावाचा आदर्श गाव योजनेत समावेश केला.

मुलींचे शैक्षणिक पालकत्व 
 गुणवत्ता असून केवळ आर्थिक, सामाजिक कारणामुळे शिक्षणापासून वंचित राहत असलेल्या मुलींना शिकता यावे, यासाठी २०११ पासून मुलींचे शैक्षणिक पालकत्व हा उपक्रम संस्थेने सुरू केला. आत्तापर्यंत ५२ मुलींचे पालकत्व प्रतिष्ठानने घेतले आहे. यामधील काही जणी सीए, फार्मसी, एमसीए, एमफार्म यांसह उच्चशिक्षण घेतलेल्या आहेत. काही मुलींना नोकरी मिळाली आहे. शिक्षणासाठी या मुली दत्तक घेताना त्यांनी शिकून नोकरी मिळाल्यानंतर त्यांनी एक गरीब घरची मुलगी शिक्षणासाठी दत्तक घ्यायची, अशी संकल्पना प्रतिष्ठानने राबविली आहे.

आठशे लोकांना मिळाली दृष्टी 
संस्थेने नगर जिल्ह्यासह राज्याच्या अनेक भागांत नेत्रदान चळवळ उभी केली आहे. उपक्रमाच्या पहिल्याच दिवशी सुमारे वीस हजार लोकांनी नेत्रदानचा संकल्प केला. आत्तापर्यंत सुमारे ३५ हजार लोकांनी नेत्रदानाचा संकल्प करत अर्ज भरून दिले आहेत. आत्तापर्यंत सुमारे चारशे लोकांनी नेत्रदान केले असून त्यामुळे ८०० अंधांना दृष्टी मिळाली. संस्थेचे कार्यकर्ते नेत्रदानाबाबत विविध गावांतील लग्नसोहळे, वाढदिवस यांसह वेगवेगळ्या कार्यक्रमात जनजागृती करतात. 

बचत गटातून आर्थिक प्रगती 
महिलांच्या विकासातूनच कुटुंब व ग्रामविकासाला चालना मिळत असल्याने प्रतिष्ठानने गेल्या बारा वर्षांत सुमारे १३२ गावांत १,८०० महिला बचतगट उभारून २२ हजार महिलांचे संघटन उभे केले आहे. प्रतिष्ठानमार्फत गटातील महिलांना व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते. गटातील महिलांना कुटीर उद्योग सुरू करण्यासाठी आर्थिक पाठबळ मिळावे म्हणून  चार टक्के व्याजदराने   बॅंकेकडून अर्थसाहाय्य देण्यात येते. महिला बचतगटाच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी ‘मुळा माहेर यात्रे’चे आयोजन केले जाते.
 

प्रतिष्ठानचे सामाजिक उपक्रम 

  • लोकसहभागातून दरवर्षी किमान दहा हजार झाडे लावण्याचा संकल्प केला जातो. आत्तापर्यंत नेवासा तालुक्यातील १३० गावांत पन्नास हजारांवर झाडांची लागवड झाली आहे.
  • शेतकरी, कष्टकरी गरीब कुटुंबातील तरुणांना स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन मिळावे, यासाठी अल्पदरात सोनई, नेवासा येथे आठ वर्षांपासून यशवंत स्टडी क्लब (स्पर्धा परीक्षा केंद्र) सुरू झाला आहे. येथे ग्रामीण भागातील दोनशे मुले शिक्षण घेत असून त्यातील पन्नास मुलांना नोकरी लागली आहे.
  • दहा वर्षांपासून शास्त्रज्ञ, कला, साहित्य, शिक्षण, आरोग्य, पत्रकार आदी समाजात विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या व्यक्तींचा कृतज्ञता पुरस्काराने गौरव केला जातो.
  •  ग्रामीण भागात लग्नसोहळ्यावरील अनावश्यक खर्च कमी करून साध्या पद्धतीने लग्न करण्यासाठी चळवळ उभी केली आहे. 

गाव तेथे वाचनालय

ग्रामीण भागात लोक चळवळ राबविताना शेतकरी, कष्टकरी, कामगार, तरुणांना वाचनाची आवड निर्माण व्हावी, यासाठी प्रतिष्ठानने  मे २०१६ पासून `गाव तेथे वाचनालय' ही संकल्पना सुरू केली. आत्तापर्यंत ६४ गावांत वाचनालय सुरू झाले आहे. प्रतिष्ठानने आत्तापर्यंत या वाचनालयांना एक लाखांपेक्षा अधिक पुस्तके भेट दिली आहेत. माजी खासदार यशवंतराव गडाख, प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख वाढदिवस करताना पुस्तके भेट देण्याचे आवाहन करतात. प्रशांत यांना आत्तापर्यंत वाढदिवसाच्या भेटीतून सोळा लाख रुपयांची पुस्तके भेट मिळाली. ही पुस्तके वाचनालयाला भेट देण्यात आली. लग्नसोहळ्यातही दाम्पत्याला पुस्तके भेट दिली जातात.

 मिळाली खरी भेट...
 प्रतिष्ठानच्या पंधरा वर्षांतील सामाजिक कामातून काय मिळाले, याबाबतचा एक अनुभव सांगताना प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख म्हणाले, की प्रतिष्ठान गरीब कुटुंबातील मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेते. अशाच एका कुटुंबातील मुलीचे शैक्षणिक पालकत्व प्रतिष्ठानने घेतले. मुलगी उच्चशिक्षित झाली. तिला चांगल्या पगाराची नोकरी देखील मिळाली. पहिला पगार घेऊन माझ्याकडे आली आणि तिने पेढे दिले. यापेक्षा माझ्याकडे देण्यासाठी एवढे मोठे काहीच नाही, असे तिने सांगितले. तिच्याजवळ एक पिशवी होती. त्यात तिने आईसाठी चप्पल घेतली होती. आत्तापर्यंत माझ्या आईकडे चप्पल नव्हती, मी पहिल्या पगारातून ती खरेदी केलीय, असे तिने सांगताच मी तिला म्हणालो, अगं, दीदी पंधरा वर्षांतील प्रतिष्ठानच्या कामातून मिळालेली ही खरी भेट आहे.’’  

- प्रशांत गडाख-पाटील ः ९८२२१३५५५५.  

- राहुल राजळे ः ९५२७११०८०९.

 

 

 

 


फोटो गॅलरी

इतर ग्रामविकास
स्वयंसेवी संस्था निवडीचे निकषआदर्शगाव ही योजना स्वयंसेवी संस्थांमार्फत...
तयार करा ग्रामविकास आराखडासरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलिस पाटील,...
जलतंत्रज्ञानाच्या वापरातून प्रगतीची उंच...अकोला जिल्ह्यातील अन्वी मिर्झापूर येथील केशवराज...
शहर अन् गावाचा अनोखा मिलाफ - सिलेज‘सिलेज' ही संकल्पना ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ ...
केळी, मका पिकांसह दुग्धव्यवसायात...दापोरी (जि. जळगाव) गावाने केळी, मका, कापूस...
शेती, शिक्षण अन् ग्रामविकासाचा वसालोटे-परशुराम (जि. रत्नागिरी) येथील श्री विवेकानंद...
नागापूरमध्ये झाली धवलक्रांतीविविध कारणांमुळे विदर्भात दुग्ध व्यवसायाला उतरती...
ग्रामस्वच्छता, जलसंधारणातून मधापुरीची...सामूहिक प्रयत्नातून गावाचा कसा कायापालट करता येऊ...
शेतकऱ्यांना खते, बियाणे अन् महिलांना...शुद्ध पाणीपुरवठा, गावाअंतर्गत सिमेंट रस्ते,...
स्मार्ट गावाच्या दिशेने...स्वच्छतेचा ध्यास मनाशी बाळगून सावळवाडी गावाने...
शेती, पूरक उद्योग अन् आरोग्याचा जागरशेतकरी आणि ग्रामीण महिलांच्या जीवनात आश्वासक बदल...
प्रयोगशील शेतीच्या आधारे चिंचवलीने...पारंपरिक भातशेतीत बदल करून ऊसशेती व त्यास...
ग्रामविकास, जलसंधारण, शिक्षणासाठी ‘...सोनई (ता. नेवासा, जि. नगर) येथील यशवंत सामाजिक...
जल, मृद्संधारणातून विकासाच्या दिशेनेउत्तर सोलापूर तालुक्यातील शेवटच्या टोकाकडील...
नावीन्यपूर्ण उपक्रमांतून वनकुटेची वेगळी...नगर जिल्ह्यातील वनकुटे (ता. पारनेर) गावाची वाटचाल...
शेती, जलसंधारण अन् शिक्षणाचा घेतला वसामांडाखळी (जि. परभणी) येथील मातोश्री जिजाऊ ग्राम...
कुऱ्हा गावाने तयार केली भाजीपाला पिकांत...अमरावती जिल्ह्यातील वरुड, मोर्शी हे तालुके संत्रा...
सावित्रीच्या लेकींचा जागर करीत घराच्या...नाशिक : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीचे...
शाश्वत ग्राम, शेतीविकासाची 'जनजागृती'औरंगाबाद येथील जनजागृती प्रतिष्ठान या स्वयंसेवी...
वेळूकरांनी एकजुटीने दूर केली पाणीटंचाईसातारा जिल्ह्यातील वेळी गावाने एकजुटीने...