अफार्मतर्फे ‘ग्रामीण विकासात स्वयंसेवी क्षेत्राची भूमिका’ विषयावर उद्या परिषद

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  : अॅक्शन फॉर अॅग्रीकल्चर रिन्युअल इन महाराष्ट्र (अफार्म) या संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्ताने उद्या (ता. १) पुण्यात राज्यस्तरीय परिषद होत आहे. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते परिषदेचे उद्‌घाटन होणार आहे. 

राज्याच्या ग्रामीण भागात कृषिविकास, जलव्यवस्थापन आणि उपजीविकानिर्मितीच्या क्षेत्रात गेल्या ५० वर्षांपासून कार्यरत असलेल्या ‘अफार्म’ने राज्यातील स्वयंसेवी संस्थांना सामायिक व्यासपीठ म्हणून प्रेरणा दिली आहे. ‘अफार्म’च्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या सांगता समारोहाच्या निमित्ताने ‘ग्रामीण विकासात स्वयंसेवी क्षेत्राची भूमिका’ या विषयावर राज्यस्तरीय परिषद होत आहे. 

‘अफार्म’चे कार्यकारी संचालक सुभाष तांबोळी म्हणाले, की श्री. पवार यांच्या हस्ते ‘अफार्म’च्या सुवर्ण महोत्सवी स्मरणिकेचे प्रकाशन होत आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री दादा भुसे, खासदार श्रीनिवास पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या वेळी उपस्थित राहणार आहेत. सहकारनगरमधील राजीव गांधी अकादमीच्या सभागृहात रविवारी सकाळी ११ वाजता परिषदेला सुरुवात होईल. सुवर्ण महोत्सवी वाटचालीवर ध्वनिचित्रफीत या वेळी दाखविली जाणार आहे.

परिषदेच्या दुसऱ्या सत्रात माजी कुलगुरू डॉ. व्यंकट मायंदे ‘कृषिविकास आणि स्वयंसेवी क्षेत्र’, वॉटरचे व्यवस्थापकीय विश्वस्त क्रिस्पिनो लोबो ‘जलव्यवस्थापन आणि स्वयंसेवी क्षेत्र’ या विषयांवर मार्गदर्शन करतील. कोल्हापूरच्या स्वयंसिध्दा संस्थेच्या संचालिका कांचन परुळेकर या उपजीविकानिर्मिती आणि स्वयंसेवी क्षेत्र याविषयी मार्गदर्शन करतील. अध्यक्षीय समारोप ‘अफार्म’च्या विश्वस्त वसुधा सरदार करतील.  

परिषदेच्या समारोप सत्रात वाणी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्ष जेटली हे स्वयंसेवी क्षेत्रातील आव्हाने व उपाय तर स्वयंसेवी चळवळीची भावी दिशा यावर डॉ. नीलम गोऱ्हे बोलणार आहेत. ‘अफार्म’चे अध्यक्ष प्रमोद देशमुख यांच्या अध्यक्षीय भाषणाने परिषदेचा समारोप होणार आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com