संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

शेतकऱ्यांच्या मदतीवरून विधानसभेत गदारोळ

नागपूर ः शेतकऱ्यांना मदत देण्याच्या मागणीवरून मंगळवारी (ता. १७) विधिमंडळात गोंधळ झाला. विधानसभेत कापडी फलकाच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजपचे आमदार एकमेकांना भिडले. दोन्ही बाजूंच्या आमदारांमध्ये धक्काबुक्की झाल्याने सभागृहात तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले.

विधानसभेत कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपयांची मदत द्यावी आणि मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळावा, अशी मागणी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांच्या मागणीची आठवण करून देण्यासाठी भाजपच्या आमदारांनी कापडी फलक सभागृहात फडकवला. 

या फलकावरून दोन्ही बाजूच्या आमदारांमध्ये घोषणायुद्ध सुरू झाले. भाजपचे अभिमन्यू पवार व नारायण कुचे यांनी हा बॅनर थेट उद्धव ठाकरे यांच्यासमोर धरला. त्यानंतर जयंत पाटील बोलायला उभे राहिल्यानंतर त्यांनाही बॅनर दाखवण्यात आला. या बॅनरमुळे शिवसेना आमदारांमध्ये संताप निर्माण होऊन शिवसेना आमदार डॉ. संजय रायमूलकर यांनी थेट बॅनर हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड, नितीन देशमुख तर भाजपचे अभिमन्यू पवार आणि हरीश पिंपळे यांचा धक्काबुक्की करणाऱ्यांमध्ये समावेश होता.

तसेच या प्रयत्नात या आमदारांमध्ये बाचाबाची होऊन दोघांनी एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेचे भास्कर जाधव, राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे, मंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे गिरीश महाजन, आशिष शेलार यांनी मध्यस्थी करीत दोन्ही बाजूच्या आमदारांना शांत ठेवण्याचा प्रयत्न केला. या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज दोन वेळा अनुक्रमे अर्धा तास आणि दहा मिनिटांसाठी तहकूब करावे लागले.

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सभागृहातील फलकबाजीची गंभीर दखल घेत आमदारांना कडक शब्दांत समज दिली. ही घटना चुकीची आणि न शोभणारी आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला आपली भूमिका मांडावी लागते. परंतु, नेत्यांसमोर फलक फडकावणे ही दुर्दैवी घटना आहे. भूमिका मांडताना एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याची गरज नाही, असेही श्री. पटोले यांनी बजावले.

ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यांत राज्यात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसला होता. त्या वेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जात त्यांचे दुःख समजून घेतले होते. त्या वेळी त्यांनी शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी केली होती. या मागणीचा संदर्भ देत श्री. फडणवीस यांनी श्री. ठाकरे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.

पुरवणी मागणीत शेतकऱ्यांच्या तोंडाला सरकारने पाने पुसली आहेत, तथापि उद्धव ठाकरे दिलेला शब्द पाळत असल्याने त्यांनी तात्काळ मदत जाहीर करावी, अन्यथा आम्ही कामकाज चालू देणार नाही, असा इशारा फडणवीस यांनी दिला. सभागृहात झालेल्या गोंधळाबद्दल श्री. फडणवीस यांनी खेद व्यक्त केला. 

भाजपचा शेतकऱ्यांबाबतचा पुळका नाटकी ः जयंत पाटील भाजप आमदारांचा गोंधळ सुरू असतानाच अर्थमंत्री जयंत पाटील यांनी विरोधकांचा जोरदार समाचार घेतला. ते म्हणाले, की जेव्हा तुम्ही सत्तेत होता तेव्हा शेतकऱ्यांची चिंता केली नाही. तुमचा शेतकऱ्यांबाबतचा पुळका नाटकी आहे; म्हणूनच जनतेने तुम्हाला विरोधी बाकावर बसवले आहे. तुम्ही सत्तेत होतात तेव्हाचे हे संकट आहे. तुम्ही सत्तेत असताना काही केले नाही. तेव्हा तुमचे हात कुणी धरले होते? असा सवालही त्यांनी केला.

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य शासनाने ६,६०० कोटी मंजूर केले असून, त्यापैकी २१०० कोटी रुपये वितरितही केले आहेत. महापूर आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे १४,६०० कोटी रुपयांची मागणी केली आहे, अशी माहितीही त्यांनी या वेळी दिली. 

यात महापूरग्रस्तांसाठी ७४०० कोटी आणि अवकाळी ग्रस्तांसाठीच्या ७२०० कोटींचा समावेश आहे. आमचे सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी या वेळी दिली. तसेच इथे फलक फडकावण्यापेक्षा दिल्लीत केंद्र सरकारकडे जाऊन मदतीची मागणी करण्यासाठी सोबत चला, असे आवाहनही श्री. पाटील यांनी विरोधी पक्षाच्या आमदारांना केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com