सोनाई डेअरीचा दूध पावडरचा कंटेनर पश्चिम बंगालमध्ये लुटला

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे : सोनाई डेअरीचा दूध पावडर वाहून नेणारा कंटेनर पश्चिम बंगालमध्ये लुटण्यात आला असून, या घटनेमुळे राज्यातील डेअरी उद्योगात खळबळ उडाली. या घटनेत कंटेनरचालकाचा खून करून ८५ लाखांची दूध पावडर लुटून नेण्यात आली आहे.   

पश्चिम बंगालच्या कटक भागात ३० डिसेंबरला ही घटना घडली. पोलिस लुटारूंचा शोध घेत असून, याबाबतचा तपशील अद्याप हाती आलेला नाही. पुण्याच्या इंदापूर भागात मुख्यालय असलेला ‘सोनाई’ हा राज्यातील सर्वांत मोठा दुग्ध उद्योग समूह आहे. ‘सोनाई’कडून परराज्यांतील दूधदेखील स्वीकारले जाते. दूधपुरवठ्यानंतर उर्वरित दुधापासून पावडर निर्मिती करून विविध राज्यांना पाठविण्याचे काम स्वतंत्र प्रकल्पामार्फत चालते. 

सोनाई डेअरीचे अध्यक्ष दशरथदादा माने यांनी सांगितले, की २८ डिसेंबरला इंदापूरमधून दूध पावडरची डिलिव्हरी घेऊन पश्चिम बंगालकडे एक मालवाहू कंटेनर रवाना झाला होता. पुण्यातील मंगलम् ट्रान्सपोर्टची मालकी असलेल्या या कंटनेरमध्ये ८५ लाख रुपयांची दूध पावडर होती. ३० डिसेंबरला या ट्रकवर हल्ला करण्यात आला. या घटनेत चालकाचा मृत्यू झाला असून, पावडरसहित कंटेनर घेऊन मारेकरी फरार झाले  आहेत.

दरम्यान, महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाने या घटनेनंतर हळहळ व्यक्त केली आहे. “या घटनेमुळे डेअरी उद्योगाला धक्का बसला आहे. दूध व दुग्धजन्य पदार्थांची वाहतूक अशा पद्धतीने असुरक्षित बनल्यास भविष्यात व्यावसायिक विस्ताराला अडचणी येतील. दूध पावडरची आधी चोरी करून नंतर बाजारात विकण्यासाठी हे कृत्य झालेले असून शकते. त्यामुळे राज्यातील डेअरीचालक सावध झाले असून कुठेही चोरीची पावडर विकली जात असल्याचा सुगावा लागल्यास पोलिसांना कळविण्यात येईल, अशी माहिती सहकारी दूध संघाच्या एका अधिकाऱ्याने दिली.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com