पक्ष्यांच्या भ्रमणमार्ग अभ्यासासाठी होणार जीपीएस, जीएसएम यंत्रणेचा वापर 

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  ः केंद्र सरकारने जीपीएस (ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम) आणि जीएसएम (ग्लोबल सिस्टीम फॉर मोबाईल) या यंत्रणांना परवानगी दिली आहे. त्यामुळे दरवर्षी स्थलांतरित पक्ष्यांच्या भ्रमणमार्गाच्या अभ्यासासाठी जीपीएस व जीएसएम ही यंत्रणा वापरली जाणार आहे, अशी माहिती बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे संचालक डॉ. दीपक आपटे यांनी दिली. 

स्थलांतरित पक्ष्यांच्या भ्रमणमार्गाचा अभ्यास करण्यासाठी जीपीएस, जीएसएम टॅगचा वापर करण्याबाबत पक्षी अभ्यासक संघटनांकडून सातत्याने विचारणा केली जात होती. मात्र, राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव केंद्र सरकारकडून या यंत्रणांच्या वापरासाठी परवानगी नाकारण्यात येत होती. मात्र, नुकताच केंद्र सरकारने या यंत्रणाचा वापर अभ्यासासाठी करण्यास परवानगी दिली आहे. 

सेंट्रल एशियन फ्लायवे या पक्षी स्थलांतराच्या महत्त्वाच्या आकाशमार्गामध्ये भारताचा समावेश होतो. या आकाशमार्गावरून उत्तर आशियातील बहुतांश पक्षी हिवाळ्यात भारतात स्थंलातर करतात. बॅाम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीकडून (बीएनएचएस) या स्थलांतराचा शास्त्रीय अभ्यास गेल्या ६० ते ७० वर्षांपासून सुरू आहे. आत्तापर्यंत हा अभ्यास रिंग आणि कलर फ्लॅग या पद्धतीच्या माध्यमातून केला जात होता. यामध्ये पक्ष्यांच्या पायाला सांकेतिक क्रमाक असलेली रिंग आणि विशिष्ठ रंगाचा फ्लॅग लावण्यात येतो. मात्र, या माध्यमातून पक्ष्यांच्या प्रवासाची नेमकी माहिती मिळण्यास बराच कालावधी लागतो. त्यामुळे या पद्धतीचा वापर करण्याबरोबरच पक्ष्यांना जीपीएस आणि जीएसएम टॅग लावण्याबाबत अनेक वर्षापासून मागणी केली जात होती. 

टप्प्याटप्प्याने लावली जाणार उपकरणे  गेल्या काही वर्षांपासून केंद्र सरकार राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव टेलिमेट्रिक पद्धतीने पक्षी स्थलांतरांचा अभ्यास करण्यास परवानगी देत नव्हते. आता सरकारकडून यासाठी परवानगी मिळाल्याने बॅाम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीकडून पक्ष्यांना जीपीएस आणि जीएसएम टॅग लावण्यात येणार आहे. परदेशातून मागवलेली जीपीएस आणि जीएसएम उपकरणे भारतात दाखल झाली असून महिन्याभरात या कामाला सुरूवात होईल. टप्याटप्याने पक्ष्यांना ही उपकरणे लावण्यात येणार असून त्यामध्ये फ्लेमिंगो, मोठा करवानक आणि कुदळ्या पक्ष्यांचा समावेश असल्याची माहिती श्री. आपटे यांनी दिली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com