उद्धव ठाकरे लढवणार विधान परिषदेची पोट निवडणूक?

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

मुंबई  ः विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे विधानसभेवर निवडून गेल्यामुळे रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेसाठी निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली आहे. विधानसभा सदस्यांच्या मतदानाद्वारे निवडून द्यायच्या या एका जागेवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. 

मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यामुळे उद्धव ठाकरे यांना विधानसभा किंवा विधान परिषद यापैकी एका सभागृहात सहा महिन्यांच्या आत निवडून येणे अनिवार्य आहे. गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्र्यांसाठी सुरक्षित मतदारसंघाची चाचपणी केली जात होती. मुंबईतील माहिमपासून यवतमाळपर्यंत वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघांची नावे चर्चेत होती. त्यातच आता मुख्यमंत्री ठाकरे विधान परिषदेवर निवडून जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

येत्या २४ जानेवारीला विधान परिषदेच्या रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने यासंदर्भात शुक्रवारी (ता. ३) घोषणा केली. त्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे या जागेवरून लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  उद्धव ठाकरे विधानसभेवर निवडून जाणार का, असा प्रश्‍न विचारला जात होता. मात्र पहिल्यांदा निवडणूक लढवताना उद्धव ठाकरे विधान परिषदेचा सोपा मार्ग निवडण्याची शक्यताही व्यक्त केली जात होती.

राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे हे बीडमधील परळी मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेल्याने त्यांची विधान परिषदेची जागा रिक्त झाली आहे. धनंजय मुंडे यांची विधान परिषद सदस्यत्वाची मुदत ७ जुलै २०२२ पर्यंत होती. विधानसभेतील पक्षीय बलाबल पाहता महाराष्ट्र विकास आघाडीचा उमेदवार सहज जिंकून येऊ शकतो. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांनी ही जागा निवडल्यास त्यांची निवडणूक ही केवळ औपचारिकता असेल.

दरम्यान, तानाजी सावंत हे परांडा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेल्याने आयोगाने यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी निवडणूक जाहीर केली आहे. या पोटनिवडणुकीसाठी ३१ जानेवारीला मतदान होणार आहे. या जागेची मुदत १५ डिसेंबर २०२२ पर्यंत आहे.

असे आहे निवडणुकीचे नियोजन केंद्रीय निवडणूक आयोगाने केलेल्या घोषणेनुसार विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीची अधिसूचना येत्या मंगळवारी (ता. ७) जारी करण्यात येणार आहे. १४ जानेवारी ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. १५ जानेवारीला उमेदवारी अर्जाची छाननी करण्यात येईल. १७ जानेवारी हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. एकापेक्षा जास्त उमेदवारी अर्ज आल्यास २४ जानेवारीला मतदान घेण्यात येईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com