शीतगृहात ठेवली शेवंती आणि मिळविला दुप्पट भाव !

भिकाजी बांगर (चांडोली खु.) यांचे शेवंतीचे बहरलेले उत्कृष्ठ पीक
भिकाजी बांगर (चांडोली खु.) यांचे शेवंतीचे बहरलेले उत्कृष्ठ पीक

पुणे जिल्ह्यातील चांडोली (खुर्द) येथील भिकाजी बांगर गेल्या साडेचार वर्षांपासून शेवंतीची यशस्वी शेती करीत आहेत. गणपतीपासून ते दसरा, दिवाळी व पुढे लग्नसराईत जानेवारी, फेब्रुवारीपर्यंत या फुलाला उठाव असतो. कमी दरांच्या काळात शीतगृहात फुले ठेवण्याची सोय आहे. खर्च, मेहनत या पिकाला जास्त असली तरी बाजारातील कायम मागणी असल्याने हे पीक बांगर यांना फायदेशीर ठरले आहे.   पुणे जिल्ह्यात मंचर तालुक्यातील चांडोली (खुर्द) येथील भिकाजी तुकाराम बांगर (बी.टी. बांगर नावाने ओळख) यांची १५ एकर शेती आहे. शेवंती हे त्यांचे हुकमी पीक झाले आहे. त्याचे कारणही तसेच आहे. पूर्वी ते झेंडूचे पारंपरिक उत्पादन घ्यायचे. मात्र, त्यास अपेक्षित दर मिळत नव्हते. अनेकवेळा झेंडू फेकून द्यावा लागे. बाजारपेठांत वर्षभरातील अधिक काळ मागणी असलेल्या व किफायतशीर पिकाचा शोध सुरू होता. दरम्यान, पेठ कारेगाव येथील पाहुणे शरद सणस यांनी शेवंती हे पीक सुचवले. गणपतीपासून ते दसरा, दिवाळी व पुढे लग्नसराईत जानेवारी, फेब्रुवारीपर्यंत या फुलाला चांगली मागणी राहते हे समजले. त्याचे अर्थकारणही समजावले. त्यानंतर मग शेवंती या फूल पिकाची निवड पक्की केली. प्रत्यक्ष पहा बी. टी. बांगर यांची शेती... click video आता सुमारे साडेचार वर्षांचा त्यांचा या पिकातील अनुभव तयार झाला आहे. दरवर्षी सुमारे चार ते साडेचार एकरांपर्यंत त्याची लागवड असते. दरवर्षी सुमारे १ मे च्या दरम्यान लागवड असते. मात्र, रोपे उशिरा मिळाल्याने लागवडीला एक महिना उशिर झाला. परिणामी, गणेशोत्सवाचा हंगाम साधता आला नाही फुले उशिरा सुरू झाली. या काळात केवळ २०० किलोच माल मिळाला. पुणे बाजार समितीत त्यास किलोला १५० रुपये दर मिळाला. प्रकाशाची सुविधा दरवर्षी जूनमध्ये लागवड असते. यंदा ढगाळ वातावरण अधिक काळ राहिल्याने रोपांच्या वाढीसाठी सूर्यप्रकाश कमी प्रमाणात मिळत होता. यामुळे प्रकाश संश्‍लेषणाअभावी रोपांची वाढ होत नव्हती. यासाठी रात्रीच्या वेळी रोपांना प्रकाश मिळावा, यासाठी शेतात शंभर एलईडी बल्बची व्यवस्था केली. यासाठी केबलसह सुमारे २० हजार रुपये खर्च आला. उत्पादन व विक्री भाग्यश्री पांढरी हा वाण आहे. प्रतिरोपाची किंमत सव्वातीन रुपये असते. साडेचार एकरांमध्ये सुमारे साडेसात लाख रुपयांपर्यंत एकूण खर्च येतो. एकरी सात ते आठ टन उत्पादन मिळते. पुणे आणि हैदराबाद बाजारपेठेत चांगले दर मिळण्याचा अनुभव बांगर यांचा आहे. मुंबई बाजार समितीत प्रत्यक्षात विक्री झालेला आणि शेतकऱ्याला मिळणारा दर यात मोठी तफावत असल्याने तेथे फुले पाठवण्याला प्राधान्य नसते. हैदराबाद येथेही दीड टन फुले पाठविण्याचे यंदा नियोजन झाले. अपेक्षित दर मिळाल्यास आणखी दीड टन फुले अधिक पाठविण्यात येतील. गेल्यावर्षी आठ टन फुले या ठिकाणी पाठवली होती. शीतगृहाची सुविधा गणपतीनंतर पितृपक्षात सर्वच फुलांची मागणी घटून दर कमी होतात. यंदा गणेशोत्सवामध्ये १५० रुपये दर असणाऱ्या शेवंतीला पितृ पंधरवड्यात २० ते ३० रुपये दर होता. या काळात उत्पादित झालेली सुमारे तीन टन फुले शीतगृहात ठेवली. मंचर परिसरात विविध शीतगृहे असून या ठिकाणी ११ ते १४ अंश सेल्सिअस तापमानाला फुले ठेवण्यात येतात. यामध्ये प्रती १० किलोच्या क्रेटला दिवसाला १० रुपये यानुसार १५ दिवसांसाठी ३०० क्रेटला सुमारे ३० हजार रुपये भाडे आकारण्यात आले. या वेळी फुलांना बाजारपेठेत ३० रुपये दर होता. आता घटस्थापना झाली आहे. दसरापर्यंतच्या काळात फुलांना चांगली मागणी राहणार आहे. या काळात फुलांना प्रतिकिलो ८० ते १०० रुपयांपर्यत दर मिळण्याचा अंदाज आहे. शीतगृहात भाडेशुल्क जास्त मोजावे लागले तरी सद्य:स्थितीत मिळणाऱ्या दरामुळे ही तफावत भरून निघणार आहे. गणपती ते नवरात्र, दसरा, दिवाळी आणि डिसेंबर ते फेब्रुवारीमधील लग्न हंगामातील मागणी असा सारा विचार केल्यास किमान २० रुपये तर कमाल २०० ते काही प्रसंगी ३०० रुपये कमाल दर मिळतो. बांगर सांगतात की पूर्वी आमच्या गाव परिसरात माझ्याकडेच हे पीक असायचे. आता सुमारे दहा शेतकरी तरी हे पीक घेऊ लागले आहेत. दरवर्षी रोपे नव्याने खरेदी करावी लागतात. यंदा मात्र फेब्रुवारीनंतर ‘रीकट’ घेऊन पुढील उत्पादनाचा प्रयोग करणार असल्याचे बांगर म्हणाले. प्रतिक्रिया गणेशोत्सव काळात पुणे बाजार समितीमध्ये पांढऱ्या शेवंतीला किलोला सरासरी १७० रुपये दर मिळाला होता. हाच दर पितृपंधरवड्यात १० ते ३० रुपये प्रतिकिलो होता. नवरात्रीच्या काळात हेच दर ८० ते १२० रुपयांपर्यत वाढण्याचा अंदाज आहे. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी फुले भिजली. त्यामुळे उत्पादन घटले आहे. चांगल्या दर्जाच्या फुलांची आवक कमी असल्याने दरांत वाढ होण्याची शक्यता आहे. - सागर भोसले संचालक, पुणे फुल बाजार आडते असोसिएशन संपर्क- भिकाजी बांगर- ९८२२२५३००० 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com