शेततळी झाली, शेती बागायती झाली

-मारुती नाथा गीते यांनी शेततळे घेऊन त्यात मत्स्यसंवर्धन केले आहे.
-मारुती नाथा गीते यांनी शेततळे घेऊन त्यात मत्स्यसंवर्धन केले आहे.

सध्या राज्यातील अनेक भागांत पावसाने उघडीप दिली आहे. उभी पिके वाळून चालली आहेत. खरीप धोक्यात आला आहे. अशावेळी संरक्षित पाण्याचा वापर करून शेतकरी पिकांचे नियोजन करण्याची धडपड करताहेत. चिंचविहिरे (जि. नगर) येथे १० शेततळी झाली आहेत. त्याद्वारे शेतकरी खरिपासह अन्य हंगामांत म्हणजे वर्षभर विविध पिके घेऊन उत्पन्नवाढ करू लागले आहेत. जिरायत शेतीकडून बागायत शेती असा बदल घडतो आहे . नगर जिल्ह्यात राहुरी तालुक्यातील चिंचविहीरे हे संपूर्ण जिरायती गाव. पिण्याचा पाण्याचा प्रश्न इथे नेहमी गंभीर असतो. शेतीत खर्च करणे एवढेच शेतकऱ्याच्या हाती असते. उत्पादन पूर्णपणे निसर्गावरच अवलंबून असते. साहजिकच या समस्येवर उत्तर शोधण्यासाठी कृषी विभागाने गावात पाण्याचा संरक्षित पर्याय शेततळ्याच्या माध्यमातून देण्याचे ठरवले. तशी योजना राबवण्याचे ठरवले. मात्र, गावात शेततळे घेण्याची फारशी कुणाची तयारी नव्हती. उगीचच जमीन त्यासाठी अडकून पडते असा काहींचा मानस होता. मात्र, कृषी विभागाने शेततळ्याचे महत्त्व शेतकऱ्यांना समजावून दिले. गावात झाली शेततळी मागेल त्याला शेततळे ही योजना राबवण्यासाठी कृषी सहायक रायभान गायकवाड यांनी विशेष प्रयत्न केले. त्यातूनच गावात आज सुमारे दहा शेततळी उभारली आहेत. जिरायती शेतीत त्यातून बदल घडण्यास मदत झाली आहे. पीकपद्धतीदेखील बदलू लागली आहे. गीते यांची शेती होतेय बागायती मनरेगा योजनेतून गावातील मारुती नाथा गीते यांनी वीस बाय वीस मीटर व ३० फूट खोलीचे शेततळे उभारले आहे. त्यासाठी प्लॅस्टिक अस्तरीकरणही केले आहे. प्रत्यक्षात त्यांना एकूण खर्च एक लाख ८७ हजार रुपये आला. सुमारे आठ लाख लिटर अशी शेततळ्याची पाणीधारण क्षमता आहे. त्याद्वारे वर्षभर विविध पिके घेणे त्यांना शक्य होऊ लागले आहे. खरिपात बाजरी, ज्वारी याशिवाय एक एकर क्षेत्रात डाळिंब व अन्य क्षेत्रात वांगी अशी पीकपद्धती राबवण्यास त्यांनी सुरवात केली आहे. मागील वर्षी उन्हाळ्यात त्यांनी याच शेततळ्याच्या भरवशावर कांदा घेतला. त्याचे एकरी आठ टन उत्पादन मिळाले. मेथीही थोडीफार केली. त्याचेही काही उत्पन्न आले. जिथे शेतीलाच काय पण पिण्यासाठीसुद्धा पाणी मिळत नव्हते तिथे आता वर्षभर बागायती पिके घेण्याची आशा तयार झाल्याचे गिते सांगतात. मत्स्यशेती देणार पूरक उत्पन्न गीते यांनी शेततळे तर उभारले. पण, त्यात शेवाळ साठू लागले. त्यातून उत्पन्नाचा पूरक स्राेत म्हणून मासेमारीचा पर्याय पुढे आला. त्यानुसार त्यांच्या शेतात आज माशांचे संगोपन होत आहे. सहा हजार मत्स्यबीज व किमान पाचशे ग्रॅमचा प्रतिमासा या हिशोबाने तीन टनांपर्यंत उत्पादन होऊ शकेल, असा गीते यांना अंदाज आहे. सध्या प्रतिकिलो ७० रुपये त्याचा त्याचा दर आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणारी ही योजना महात्मा फुले कृषी विद्यापीठ सरकारच्या मदतीने राबवित आहे. गावातील काही शेततळ्यातील मत्स्यसंवर्धन प्रकल्पांना लाभार्थींनी भेटी दिल्या आहेत. प्रशिक्षणही घेतले आहे. मच्‍छिंद्र शेटे, दिलीप नालकर, मारुती गीते, इंदूबाई वाळके, संजय कदम यांची या प्रकारची शेती यशस्वी होताना दिसते आहे. पक्ष्यांसाठी ‘नेट’ संरक्षण पक्ष्यांपासून माशांचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने तळ्यावर ‘नेट’ टाकणे हा चांगला पर्याय आहे. साप किंवा सरपटणारे कोणतेही जनावर आत प्रवेश करू नये म्हणून तळ्याला नेटलगत जाळी टाकायची. त्यासाठी एक हजार रुपये खर्च येतो. शेततळ्यात एक ते सव्वा किलो वजनापर्यंत एकेक मासा वाढू शकतो. गीते यांनी सध्या वरच्या तीन ते सहा फूट थरात सायप्रिनस, मधल्या थरात राहू व खालील थरात कटला यांचे संगोपन केले आहे.

शेती झाली बागायती  चिंचविहीरे गावाचा शिवार सुमारे सातशे हेक्टरपर्यंत आहे. पूर्णपणे पावसावरच आधारित शेती होती. शेतकरी मोलमजुरीसाठी अन्य गावांत जायचे. केवळ बाजरी, रब्बीत ज्वारी, कडधान्ये अशीच पिके घेतली जायची. शेतीत नफा हा फारसा विषयच नव्हता. उन्हाळ्यात दूरवरून ड्रमच्या साह्याने पिण्यासाठी पाणी आणावे लागे. परिस्थिती बदलण्याच्या दृष्टीने कृषी विभागाने पाऊले उचलली. तीन वर्षांत विविध योजनांमधून सुमारे अठरा शेततळी आकारास आली. त्यासाठी सरकारने पंचवीस लाख रुपये अनुदान दिले. शेती शाश्वत होऊ लागली. आता बागायती म्हणून कपाशी, ऊस, फळबागा, चारापिके, कांदा, भाजीपाला आदी पिकांचा समावेश झाला आहे. हमखास पाण्यामुळे शेतीची उत्पादकता वाढण्यास हातभार लागत आहे. शेतीच्या जोडीला पूरक व्यवसाय सुरू झाले आहेत. ज्या गावात दहा पंधरा हेक्टरपर्यंतच कपाशी होती तेथे आज दीडशे एकर क्षेत्र या पिकाखाली आले आहे. यात फळबागा, ऊस, मका, कांदा व रब्बीसाठी दीडशे एकर क्षेत्र असा बदल झाला आहे. गावातील साडेपाचशे खातेदारांपैकी ६५ टक्के अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्यांच्या शेतीतील उत्पन्नवाढीमुळे कुटुंबास आर्थिक स्थैर्य आले आहे.  

प्रतिक्रिया केंद्र सरकारच्या मदतीने तीन वर्षांसाठी आम्ही शेततळ्यातील मत्स्यसंवर्धन ही योजना राबवित आहोत. त्याअंतर्गत चाळीस शेततळ्यांत प्रत्येकी सहा हजार मत्स्यबीज गेल्यावर्षी आॅगस्टमध्ये सोडले. गेल्या महिन्यात तपासणी केली असता एक ते सव्वा किलो वजनापर्यंत मासे वाढलेले होते. खाद्य व्यवस्थापन व नेटद्वारे संरक्षण केल्याने ही शेती यशस्वी होत आहे. त्यामुळे शेततळ्यातील शेवाळीसह दूर होण्यास मदत झाली. पाणी स्वच्छ झाले. -डॉ. पंडित खर्डे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

पूर्वी पावसावर येणारी बाजरी घेत होतो. माझे ४८ गुंठे क्षेत्र असून तीन वर्षांपूर्वी मनरेगा योजनेद्वारे एक लाख २२ हजार रुपये अनुदानातून शेततळे घेतले. तीन वर्षांपूर्वी भगवा डाळिंबाची ६३० झाडे लावली आहेत. शेतीची उत्पादकता पाण्यामुळे वाढण्यास मदत होणार आहे. आता मजुरीने अन्यत्र जाण्याची गरज राहिलेली नाही. सुनील वाळके  ​ संपर्क-९५१८९०६७८२ सहा एकर जिरायती शेतीत या आधी बाजरी, मूग, तूर, रब्बीत ज्वारी अशी पिके घेत होतो. उत्पन्न पूर्णपणे पावसावरच अवलंबून होते. मागेल त्याला शेततळे योजनेतून शेततळे घेतले. त्यानंतर सहा एकरांवर डाळिंब घेतले आहे. तिसऱ्या वर्षी सहा लाख रुपये उत्पन्न हाती आले तेव्हा कष्टांचे चीज झाले. कूपनलिका व पावसाचे पाणी शेततळ्यात साठविले जाते. पाण्याची शाश्वतता तयार झाल्याने शेती बऱ्यापैकी भरवशाची झाली आहे. मच्छिंद्र शेटे   ​ संपर्क-७०२०७७१४२६

संपर्क- मारुती गीते-९२७३०७७४८४. रायभान गायकवाड- कृषी सहायक ९४२३४६५११४​

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com