रसदार उन्हाळी काकडी अर्थकारणाला देतेय बळ 

किफायतशीर काकडी चिंचखेडा (ता. जामनेर) येथील ज्ञानेश्‍वर दौलत कोळी यांनी मागील डिसेंबरमध्ये दोन एकरांत ठिबकवर काटेरी वांग्याची लागवड केली. याच वांग्यात काकडीचे पीक घेतले. त्यांना काकडीला चांगला दर मिळतो आहे. या पिकातून अर्थकारण उंचावण्यास मोठी मदत झाली आहे.
 वांग्यातील काकडी आंतरपीक असलेल्या शेतात पत्नी सौ. ललिता, मुलगा धनंजय यांच्यासोबत ज्ञानेश्‍वर कोळी.
वांग्यातील काकडी आंतरपीक असलेल्या शेतात पत्नी सौ. ललिता, मुलगा धनंजय यांच्यासोबत ज्ञानेश्‍वर कोळी.

जळगाव जिल्ह्यात पाचोरा, जामनेर, यावल, जळगाव आदी तालुक्‍यांमध्ये काकडीचे पीक घेतले जाते. त्यातील वाळके नावाने लोकप्रिय असलेल्या काकडीला उन्हाळ्यात सर्वाधिक मागणी असते. ती शेतकऱ्यांना अधिक दरही मिळवून देते. त्याचबरोबर लांब, आखूड सफेद असेही प्रकार जिल्ह्यातील शेतकरी घेतात. मार्च-एप्रिलमध्ये काकडीला मोठा उठाव असतो. या वेळी किमान दर किलोला १५ रुपये, कमाल दर २५ रुपयांपर्यंत मिळतात. शेतकऱ्यांना आश्‍वासक आर्थिक बळ देण्यात या काकडीचा वाटा महत्त्वाचा ठरला आहे.  जळगाव जिल्ह्यात यंदा सुमारे १३० हेक्‍टरवर उन्हाळी काकडीची लागवड झाल्याचा अंदाज सूत्रांनी व्यक्त केला आहे. दरवर्षी ही लागवड १५० ते १७० हेक्‍टरपर्यंत असते. यावर्षी पाणीटंचाई तीव्र असल्याने या काकडीचे क्षेत्र कमी झाले. सर्वाधिक सुमारे ५० हेक्‍टर लागवड जामनेर भागात झाल्याचा अंदाज आहे. तर पाचोरा, एरंडोल भागांत पॉलिहाउसमध्येही काकडी आहे.  काकडीचे प्रकारानुसार दर  सफेद काकडी- (खिरा)- हीची लांबी आठ इंचापर्यंत असते. काढणीनंतर वातानुकूलित यंत्रणेशिवाय दोन दिवस ती टिकून राहते. हॉटेल्स, रेल्वेस्टेशन, बसस्थानकांवर तसेच बाजारात बारमाही मागणी राहते. बियांचे प्रमाण थोडे अधिक असते. जळगाव बाजार समितीत सध्या १० ते १२ क्विंटल आवक असून दर किलोला १५ ते २० रुपये आहेत.  हिरवी आखूड काकडी- ही काकडी आखूड, हिरवी, चमकदार असून पॉलिहाउसमध्ये अधिक घेतली जाते. हॉटेल्स व घरगुतीसाठी मोठी मागणी असते. दर २० रुपयांपर्यंत मिळतो. जळगाव बाजार समितीत प्रतिदिन पाच ते सहा क्विंटल आवक होते. बिया कडक व मोठ्या असतात. संकरित बियाणे शेतकरी बाजारातून आणतात.  वाळके- रंग फिक्कट हिरवा व काही भागावंर हिरवे पट्टे असतात. बिया अतिशय बारीक. खाताना बियांचे सेवनही करणे पसंत केले जाते. पाच ते सहा इंच लांबी असते. लागवडीनंतर दीड महिन्यात उत्पादन सुरू होते. बारमाही उत्पादन घेतले जाते. अनेक शेतकरी घरी साठविलेल्या पारंपरिक वाणांचा उपयोग करतात. उन्हाळ्यात मोठी मागणी असते. सध्या जळगाव बाजार समितीत प्रतिदिन अडीच ते तीन क्विंटल आवक आहे. बाजारात हातोहात लिलाव आटोपतात. दर किलोला २५ रुपयांपर्यंत जातात. ही काकडी दोन ते तीन दिवस टिकून राहते. पाण्याची गरज अन्य वाणांपेक्षा कमी राहते.  लांब फिकट हिरवी- हिची लांबी तीन फुटांपर्यंतही जाते. बाजारात संकरित बियाणे उपलब्ध. बिया अधिक कडक, मोठ्या व रसाळ असतात. वाळवून खाण्यासाठीही उपयोगात येतात. उन्हाळ्यातच उत्पादन घेतले जाते. खानदेशात भोई समाजातील मंडळी पूर्वी नद्या प्रवाही असताना वाळूमय नदी परिसरात या काकडीची लागवड करायचे. आता ही लागवड पाणीटंचाईमुळे जवळपास थांबली आहे. काढणीनंतर चार ते पाच तास काकडी टवटवीत असते. सध्या तीन ते साडेतीन क्विंटल आवक असून दर २० रुपये आहे. रोगांना लवकर बळी पडते. कुरंगी (ता. पाचोरा) येथील धनराज भोई आठवड्यातून चार- पाच दिवस आपल्या भागातील शेतकऱ्यांकडून या काकडीची खरेदी करून हातविक्री करण्यासाठी जळगाव शहरात येतात. ती ३० ते ४० रुपये प्रतिकिलो दराने विकतात.  काकडी मार्केट-ठळक बाबी 

  • मागील हंगामात किमान १० ते तर कमाल २० रुपये दर. 
  • या हंगामात आवक कमी. त्यामुळे दर १५ ते २५ रु. 
  • मोजक्‍या सहा अडतदारांकडे आवक. वाळक्याची आवक एकाच अडतदाराकडे. 
  • लिलाव सकाळी साडेसहापर्यंत आटोपतात. 
  • पाचोरा तालुक्‍यातील कुरंगी, लोहारा, कळमसरे, जामनेरातील हिंगणे, चिंचखेडे, पहूर, शेंदूर्णी, यावलमधील डांभुर्णी, किनगाव, जळगावमधील उमाळे, धानवड, म्हसावद, भुसावळमधील सुनसगाव, बेलव्हाय, कुऱ्हे भाग लागवडसाठी प्रसिद्ध. 
  • शेतकरी व्यवस्थापन  चिंचखेडा (ता. जामनेर) येथील ज्ञानेश्‍वर दौलत कोळी यांनी मागील डिसेंबरमध्ये दोन एकरांत ठिबकवर काटेरी वांग्याची लागवड केली. त्यांच्या विहिरीला पाणी मुबलक आहे. दहा एकरांत कापूस, केळी ही त्यांची प्रमुख पिके आहेत. पत्नी सौ. ललिता यांची त्यांना शेतीत मोठी मदत मिळते. वांगे लागवडीनंतर दोन प्रकारच्या काकडींची लागवड केली. तुकाराम पाटील, नेरी (ता. जामनेर) येथील भूषण पाटील व विनोद माळी (पाथरी) यांचे त्यांना मार्गदर्शन मिळाले. सुमारे दीड महिन्यात काढणी सुरू झाली. दोन दिवसाआड आठ क्विंटल काकडी व सहा क्विंटल वांगी मिळत आहेत. गावातील आठ महिला मजुरांना शेतीतून रोजगार मिळाला आहे. काकडीच्या वेलांमुळे वांग्यासाठी नैसर्गिक आच्छादन तयार झाले आहे. परागीकरणासाठी ठिकठिकाणी झेंडू आहे. वांग्याला प्रतिकिलो १० रुपये तर काकडीला किमान १५ रुपये दर या महिन्यात मिळतो आहे. वाहतूकदार गावानजीकचा असल्याने काकडी, वांगी वेळेत बाजारात पोचण्याची व्यवस्था होते. 

    संपर्क- ज्ञानेश्‍वर कोळी-९८९१८६५४७३  गोकूळ पाटील-८४५९६२८३७३  धनराज भोई-९८२३५६७१५३

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com