बेहेरे यांनी कातळावर फुलवलेला भाजीपाला, फुलशेती
बेहेरे यांनी कातळावर फुलवलेला भाजीपाला, फुलशेती

कातळावर लिली; तर टायरमध्ये फुलला निशिगंध 

शेतीत मनापासून काम केल्यास यश निश्‍चित मिळते. वंशपरंपरेने शेतीचा वारसा आला. प्रयोगशील शेतीतून तो पुढे चालवत आहे. पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड देण्यावर भर दिला आहे. - प्रसाद बेहेरे

रत्नागिरी जिल्ह्यातील मेर्वी येथील प्रगतिशील शेतकरी प्रसाद हरिश्‍चंद्र बेहेरे यांनी विविध पिकांचे  प्रयोग करीत कातळावर नंदनवन फुलवले. वाहनांच्या टायरमध्ये भात, विविध भाजीपाला पिके घेतली. अर्थकारणाला गती देण्यासाठी भाजीपाला पिकांऐवजी निशिगंध, लिली व हिरवी डेझी यांची फुलशेती सुरू केली. आंबा, काजू या हुकमी पिकांच्या जोडीला फूलशेतीही अर्थकारणाला चांगला आकार देऊ लागली आहे.  रत्नागिरी जिल्ह्यातील मेर्वी येथील हरिश्‍चंद्र बेहेरे यांनी प्रयोगशील शेतकरी म्हणून ओळख मिळवली आहे. त्यांना भातशेतीतील जिल्हास्तरीय पुरस्कार मिळाला होता. भातशेती हेच या कुटुंबाचे उपजिविकेचे साधन. कुटुंबाच्या गरजेपुरता भात उत्पादित व्हायचा. कातळावर १२ गुंठ्यांत माती वापरून मुणगा वाणाच्या भाताची लागवड करून ६०० किलो गावठी लाल तांदळाचे उत्पादन सुरवातीला घेतले.  उर्वरित तांदूळ ६० ते ७० रुपये प्रतिकिलो दराने ग्राहक आवर्जून घेऊन जात. आजही भातशेती व्यावसायिक साधन बनली आहे.  कातळावर फुलवला भाजीपाला  हरिश्‍चंद्र यांचा मुलगा प्रसाद आज शेतीची सूत्रे सांभाळतात. वडिलांचे मार्गदर्शन व त्यांच्या प्रयोगशील वृत्तीचा आदर्श घेत त्यांनीही कातळावर हिरवाई फुलवण्याचा निर्णय घेतला. उजाड कातळावर लाल माठ, गवार, मुळा, मिरची, भेंडी यांसह कोहळा, काकडी, पडवळ, दुधी भोपळा अ असे विविध भाज्यांचे प्रयोग सुरू केले. उत्पन्न चांगले मिळू लागले. बाजारपेठ जवळच असल्याचा फायदाही मिळू लागला. २००८ पर्यंत भाजीपाला पिकवण्यावर भर होता. आंबा, काजू यादेखील मुख्य पिकांची मोठी जोड शेतीला होती.  टायरमध्ये लागवड  तणांचा प्रादुर्भाव सातत्याने जाणवत असल्याने पर्याय म्हणून २००२ मध्ये वाहनांच्या टायरमध्ये शेती करण्याची संकल्पना बेहेरे यांनी पुढे आणली. कृषी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन मिळत गेले. अनुभवातून ही शेती अधिक सुधारित होत गेली. स्कूटर, रिक्षा आदींच्या विविध आकारांच्या टायरमध्ये लाल भाजी, गवार, मुळा, मिरची, भेंडी ही पिके फुलू लागली. मोठ्या टायरमध्ये कोहळा, काकडी, पडवळ, दुधी अशा वेलवर्गीय भाज्यांचे उत्पादन सुरू झाले. पाण्याची बचत करण्यासाठी ठिबक बसवले. टायरमध्ये तणांचे प्रमाण तुलनेने कमी असल्याचेही अनुभवण्यास आले. गांडूळ खत व सेंद्रिय खते, कडुनिंब, करंज आदींचा अर्क यांचा वापर सुरू झाला. उत्पादनात वाढ होऊन चांगले उत्पन्न मिळत गेले.  भाजीपाला शेतीकडून फुलशेतीकडे  बेभरवशाचे दर, मजुरी, खर्च, हवामान या बाबी पाहता भाजीपाला शेती अडचणीची ठरू लागली. मग अभ्यासातून फूलशेतीचा पर्याय मिळाला. मग टायर्समधून निशीगंधाची शेती सुरू झाली. सध्या एकूण एकहजार पर्यंत टायर्स आहेत. त्यांचा वापर सुरू झाला. स्वरूप देसाई या मित्राचे सहकार्य लाभले. तसेच पत्नी सौ. प्राजक्ता, मुले निळकंठ, मयूरी यांचाही हातभार लागला. वडिलांच्या अनुभवाचा फायदाही जोडीला होता. जोडीला लिलीचे फूलपीकही खुल्या शेतीत घेण्यास सुरवात केली. सुमारे चार वर्षांपासून या फूलशेतीत सातत्य ठेवले आहे. सुमारे ३८ गुंठ्यांत लिली, पंधरा गुंठ्यांवर निशिगंध, तर १० गुंठ्यांवर यंदा हिरव्या डेझीची लागवड केली आहे. डेझीचे पीक कोकणात फारसे कोणी घेत नाही. मात्र मी हा प्रयोग केल्याचे प्रसाद म्हणाले.  उत्साहवर्धक उत्पादन व उत्पन्न  काही हंगाम वा कालावधी वगळता लिलीचे वर्षभर उत्पादन सुरू असते. नियमितपणे फुले काढण्यासाठी दहा मजुरांची नियुक्ती करण्यात आली आहे. एकूण क्षेत्रात दररोज २०० गड्डी एवढे उत्पादन मिळते. सुमारे ४० फुलांची एक गड्डी होते. त्याला ८ ते १० रुपये दर मिळतो. निशिगंधाचे हंगामात दररोज ४ ते ५ किलोपर्यंत उत्पादन मिळते. त्याला किलोला ६० ते ७० रुपये दर मिळतो.  अभ्यास करून विक्री  रत्नागिरी शहरात बहुतांश भाजीपाला, फुले, फळे पश्‍चिम महाराष्ट्र, बेळगावमधून आणली जातात. हेच सर्वेक्षण प्रसाद यांनी भाजीपाला शेतीत केले होते. तसाच अभ्यास फुलांच्या बाजारपेठेबाबत केला. रत्नागिरी शहरातील फुले विकणाऱ्या स्टॉलधारकांशी चर्चा केली. आज सुमारे आठ ते दहा स्टॉलधारकांना नियमितपणे फुलांचा पुरवठा होतो. हा माल स्वतःच्या गाडीतून आणण्याची सुविधा बेहेरे यांनी तयार केली आहे.  आंबा, काजूचा मोठा आधार  बेहेरे कुटुंबीयांचा आंबा, काजूचा मोठा पारंपरिक व्यवसाय आहे. सुमारे साठ एकरांहून अधिक क्षेत्रावर या पिकांची लागवड आहे. वर्षाला आंब्याच्या अडीच ते तीन हजार पेट्या ते मार्केटमध्ये आणतात. तर सुमारे अडीच टन काजू बी विक्रीला आणतात. वर्षाला आठ लाख रुपयांपर्यंत उलाढाल या पिकांमधून होत असावी. नारळ, चिकू, आवळा यांचीही पन्नास ते शंभर झाडे बागेत लावली आहेत. चिकू एकूण लागवड क्षेत्रात वर्षाला तीन ते चार टन तर पपई एक टनापर्यंत उत्पादन देते. त्यातूनही उत्पन्न वाढते.  नारळाच्या बागेत लवंग, दालचिनी, काळमिरी ही आंतरपिकेही घेतात. त्याला स्थानिक बाजारात चांगली मागणी आहे.   संपर्क - प्रसाद बेहेरे - ९४२३०४९९३९   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com