साथी हात बढाना....लोकसहभागातून घडली पाटस गावची यशकथा

तरुणांनो पुढे या पुणे जिल्ह्यात आदर्श चळवळ म्हणून पुढे येत असलेल्या ‘पाटस ग्रामविकास फाउंडेशन’ने अन्य गावांतील तरुणांनाही पुढे येण्याचे आवाहन केले आहे. ग्रामविकासात अजिबात राजकारण नको, ग्रामपंचाय-पंचायत समिती-जिल्हा परिषद, आमदार, खासदार यांच्याशी समन्वय ठेवून चळवळ करावी, संकलित प्रत्येक रुपयाचा हिशेब द्यावा, कितीही संकटे आले तरी नाऊमेद होऊ नये, राजकीय गटातटाकडे दुर्लक्ष करून आपली कामे करावीत, हेच फाउंडेशनचे ध्येय आहे.
पाटस गावातील गाळाने भरलेला गावकऱ्यांनी एकत्र येऊन स्वच्छ केला.
पाटस गावातील गाळाने भरलेला गावकऱ्यांनी एकत्र येऊन स्वच्छ केला.

साथी हाथ बढ़ाना, साथी हाथ बढ़ाना  एक अकेला थक जाएगा, मिल कर बोझ उठाना  साथी हाथ बढ़ाना…  प्रख्यात गीतकार साहिर लुधियानवी यांनी लिहिलेल्या या गीताची साक्ष पुणे जिल्ह्यात दौंड तालुक्यातील पाटस गावात पाहण्यास मिळते. ग्रामविकास हा अजेंडा मनाशी बाळगून काही साथीदार एकत्र येतात.  त्यातून गावात जलसंधारणासह विकासाची विविध कामे लीलया उभी रहातात. कोणतेही राजकारण  हे उपक्रम यशस्वी पार पडतात. ‘पाटस ग्रामविकास फाउंडेशन’ने घडवलेला हा चमत्कार निश्‍चितच आदर्शवत असाच आहे.  पुणे जिल्ह्यात पाटस (ता. दौंड) हे तसे पाण्याची सुबत्ता असलेले गाव. ब्रिटिशांनी बांधलेल्या गावतळ्यात पुढे खडकवासला धरणातून इंदापूरकडे जाणाऱ्या उजव्या कालव्यामुळे पाणी साठू लागले. सन १९५० च्या सुमारास रोहयोच्या कामात या तळ्यावर बंधारा तयार झाला. विहिरी तुडूंब भरल्या. पाण्यामुळे गावात समृध्दी आली. पुढे तलाव गाळामुळे भरू लागला. सन २०१६ मध्ये पूर्ण आटला. पाण्याचे मोठे संकट उभे राहिले. या संकटातूनच ‘पाटस ग्रामविकास फाउंडेशन’चा जन्म झाला. शेतकरीपुत्र प्रा.रवींद्र शाळू, हर्षद बंदिष्टी, विनोद कुरुमकर, गणेश जाधव, तत्कालीन उपसरपंच कै. मंगेश जोशी हे फाउंडेशनचे सदस्य. गावासाठी राजकारणविरहीत काम करण्याचा निर्धार या तरुणांनी केला.  संगीत, निधी व विधायकता  रवींद्र शाळू म्हणाले की, मी शेतकरी कुटुंबातून आलेलो आहे. प्राध्यापक असलो तरी गावविकासाची नाळ कायम ठेवली होती. आम्ही ‘स्वच्छंद म्युझिकल ग्रूप’ची स्थापना २००४ मध्ये केली. त्या माध्यमातून गाण्यांचे कार्यक्रम करतो. त्या माध्यमातून निधी गोळा करून त्याचा विविध विधायक कामांसाठी वापर करतो.  पाणीटंचाई दूर करण्याचा निर्धार  सामाजिक कामे सुरू असताना गावातील भीषण पाणीटंचाईवर ठोस उपाय करावेसे वाटू लागले. मदतीसाठी लोकांना आवाहन करू लागलो. त्यातून प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत फाउंडेशन व  ग्रामपंचायतीला झाली. गाळाने भरलेले तळे साफ करण्याचा संकल्प सोडला. मात्र ८० एकरांत पसरलेला हजारो ट्रॅक्टर गाळ कसा आणि कोणी काढायचा हा प्रश्न होता. आम्ही गावाला साद घातली.  गावकऱ्यांनी प्रतिसाद देत गावतळे सफाई अभियानाची घोषणाही केली.  बघता बघता गाळ उपसला  तरुणांसह थोरामोठ्यांनी तलावाकडे धाव घेतली. कोणी ट्रॅक्टर, कोणी डंपर, कोणी ट्रक आणले. खोदाईला सुरवात झाली. दौंडचे आमदार राहुल कूल यांनी पोकलॅन तर बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सात जेसीबींची मदत केली. तलावाची खोदाई, गाळाचा उपसा, त्याची वाहतूक सुरू झाली. शेतकरी हा गाळ आपल्या शेतासाठी नेऊ लागले. याच गाळाची भर टाकून तलावाची मातीची भिंत मोठी करण्याचे काम सुरू करण्यात आले.  तलाव गाळमुक्त  सुमारे २२ यंत्रे, शेकडो ट्रॅक्टरद्वारे ६५ दिवसांत संपूर्ण तलाव गाळमुक्त करण्यात आला. त्यानंतर लोकसहभागातून गावाचा बुजलेला ओढा साफ करण्यास सुरवात झाली. अकरा दिवस काम चालले. त्यानंतर पहिल्यांदाच ओढा तुडुंब भरला. आटलेल्या विहिरींना पाणी आले. पाण्याची पातळी वाढली. टॅंकरच्या कचाटयातून गावाची सुटका ‘पाटस ग्रामविकास फाउंडेशन’च्या पुढाकारातून झाली.  पारदर्शक व्यवहार  आता फाउंडेशनला लोक स्वतःहून मदत देऊ लागले. व्यवहार पारदर्शक ठेवण्यासाठी जमा झालेली मदत, वाटलेली रक्कम, त्यांची नावे यांची नोंद फ्लेक्सवर नोंदवण्यास सुरवात झाली. यातून लोकांचा अजून विश्वास वाढला. रुपयाचा देखील हिशेब दिला जातो अशी प्रतिमा तयार झाल्याचे फाउंडेशन सदस्य हर्षद बंदिष्टी यांनी सांगितले.  आपली समृद्धी आपल्याच हातात  गावविकासाची जबाबदारी शासन, ग्रामपंचायत किंवा लोकप्रतिनिधींवर टाकून चालणार नाही. आपणच आपल्या समृध्दीसाठी पुढे आले पाहिजे, असे प्रबोधन फाउंडेशनकडून करण्यात आले. त्यातूनच ग्रामस्वच्छता मोहीम, बाभूळमुक्त पाटस अभियान पार पडले. गावच्या शाळेला कंपाउंड तयार झाले. शाळेचा वर्ग फाउंडेशनच्या वर्गणीतून बांधण्यात आला. फाउंडेशनच्या सदस्यांनी बांधकामावर मुरूम वाहण्यापासून ते भिंतींवर पाणी मारण्यापर्यंत काम केले. शाळेचे दगडधोंड्यांनी भरलेले मैदान साफ केले. प्रार्थनेसाठी व्यासपीठ तयार झाले. शाळेत झाडे लावण्यात आली. चेतन शाळूचा वाढदिवस वृक्षारोपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्याद्वारे गावात वनीकरणाचा संदेश पोचला. गावकरी लग्नाचे वाढदिवस वृक्षारोपणाने साजरे करू लागले. बघता बघता अडीच तीन हजार झाडे गावाभोवती लावण्यात आली. अनेक झाडे टंचाईच्या काळात तग धरून आहेत. पाटस रेल्वे स्टेशनजवळचा रस्ताही लोकसहभागातून झाला. त्यासाठी जेसीबी, ट्रॅक्टर पुरविण्यात आले.  विद्यार्थ्यांना मदत  फाउंडेशनने जिल्हा परिषदांच्या शाळांमधील गरजू विद्यार्थ्यांना बारा महिने वही वाटप अभियान सुरू केले. आर्थिक दृष्ट्या गरीब घरातील विद्यार्थी पायी शाळेत येतात. त्यासाठी जुन्या सायकलींची दुरुस्ती करून मुलींना त्यांच्या वाटपाचा अभिनव उपक्रम फाउंडेशनने राबवला. सौ. सोनाली बंदिष्ठी, सौ. अपर्णा कुरूमकर, सौ. वैशाली शाळू, सौ. निकिता जाधव या फाउंडेशनच्या महिला सदस्यांनी मोठी मदत केली.  काही उल्लेखनीय कामे 

  • गरीब, अनाथ मुलांना दिवाळीसाठी फराळ, नव्या कपड्यांचे वाटप 
  • गावात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा पाटस भूषण पुरस्काराने फाउंडेशनकडून गौरव 
  • यात आदर्श शेतकरी, सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती, आदर्श कुटुंबांचा समावेश. 
  • गावातील सफाई कामगारांचाही गौरव 
  • सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, गणेशमूर्तीदान उपक्रम 
  • लोकसहभागातून दोन हजार पुस्तकांचे संकलन. ज्ञानदीप ग्रंथालयाची स्थापना. 
  • फाउंडेशनचे पुढील संकल्प 

  • तलावाच्या भिंतीवर जॉगिंग ट्रॅक 
  • लोकसहभागातून वनीकरण, जलसंवर्धन, भूजल स्त्रोत वाढविणे 
  • कचऱ्याचे वर्गीकरण 
  • शेतकऱ्यांसाठी माहिती केंद्र 
  • रोजगार व कौशल्य विकासासाठी मेळावे 
  • सोशल मीडियाचा वापर  शहरांमध्ये शेतकरी आणि ग्रामीण भागाविषयी आस्था असलेली हजारो कुटूंबे आहेत. त्यांच्यापर्यंत  व्हॉटसॲप व फेसबुक अशा सोशल मीडियातून पोचता येते. लोकसहभागातून होणारा कार्यक्रम वा अभियानाचीही माहिती होते. त्यातूनच गावातील गरजूंना कपडे, सायकल, वही-पेन अशा उपयुक्त बाबी मिळाल्या.  अडचणींवर मात  फाउंडेशनला काम करताना असंख्य अडचणीही आल्या. मात्र ग्रामपंचायतीचे प्रोत्साहन, लोकप्रतिनिथींची साथ आणि गावकऱ्यांच्या सहभागामुळे ‘फाउंडेशन’चा पाया पक्का झाला आहे. पाटस गावासाठी एसटी स्थानक मंजूर करण्यासाठी आंदोलनाचा मुद्दा फाउंडेशनने गावकऱ्यांसमोर मांडल्यावर एक दिवस गाव कडकडीत बंद ठेवण्यात आले. हर्षद बंदिष्ठी, गणेश जाधव, विनोद कुरूमकर यांनीही आमरण उपोषण सुरू केले. अखेर शासनाने दखल घेत बसस्थानकासाठी १३ लाख रुपये मंजूर केले.  कवी साहिर लुधियानवी म्हणतात...  माटी से हम लाल निकालें मोती लाएँ जल से  हाथ बढ़ाकर छीन लो अपने सपनों की तस्वीरें,  साथी हाथ बढ़ाना, साथी हाथ बढाना, साथी रे...   संपर्क : रवींद्र शाळू - ९८९०९९९६५७  हर्षद बंदिष्ठी - ८८०५०१११८०   

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com