दुष्काळातही सुरती हुरड्याची  चवच काही न्यारी... 

पारधे यांनी जपलेला वाण पारधे यांची फक्त चार एकर जमीन आहे. त्यांनी २१ एकर शेती भाडेपट्टीवर कसायलाघेतली आहे. दरवर्षी सुमारे १० एकर क्षेत्र ते सुरती हुरडा वाणासाठी राखीव ठेवतात. यंदा त्यांनी १५ एकरांत लागवड केली. सुमारे २० वर्षांपासून त्यांनी हे पारंपरिक वाण अत्यंत काळजीपूर्वक व मेहनतीने जोपासले आहे
 हातावर कणसे मळून हुरड्याचे दाणे वेगळे करताना मजूर.
हातावर कणसे मळून हुरड्याचे दाणे वेगळे करताना मजूर.

औरंगाबाद जिल्ह्यातील सारंगपूर येथील अरुण कडूबाळ पारधे यांनी २० वर्षांपासून सुरती हुरडा या ज्वारी वाणाचे अत्यंत काळजीपूर्वक संगोपन केले आहे. दरवर्षी १० एकरांवर हा हुरडा वाण ते घेतात. गोल आकाराचे चवीला अत्यंत गोड दाणे असलेल्या या हुरड्याला औरंगाबाद, नगर व पुणे अशा विविध ठिकाणचे ग्राहक मिळवण्यात पारधे यशस्वी झाले आहेत. बियाणे विक्रीतूनही उत्पन्नाची जोड त्यांनी मिळवली आहे.  औरंगाबाद जिल्ह्यात सारंगपूर व नरसापूर (ता. गंगापूर) ही दोन गावे सुरती हुरडा वाणाच्या ज्वारी उत्पादनासाठी अनेक वर्षांपासून प्रसिद्ध आहेत. व्यावसायिक पद्धतीने या गावांत हुरडा उत्पादन घेतले जाते. परंपरेने चालत आलेला हा वाण म्हणता येईल. खरिपातील पावसामुळे जमिनीत साठलेल्या ओलाव्यावर रब्बी पिकांची लागवड होते. परंतु, या वर्षी औरंगाबाद जिल्ह्यात एवढा कमी पाऊस झाला, की अनेक शेतकऱ्यांना रब्बीत लागवडच करता आली नाही. पावसाळ्याने ऑगस्टच्या मध्यावरच निरोप घेतला. याचा परिणाम हुरड्याखालील क्षेत्र घटण्यात झाला. ज्यांनी हुरड्यासाठी रब्बी ज्वारीची पेरणी केली, त्यांनाही फारसे उत्पादन मिळाले नाही. परंतु याही परिस्थितीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला तो सारंगपूरच्या अरुण कडूबाळ पारधे यांनी.  पारधे यांनी जपलेला वाण  पारधे यांची फक्त चार एकर जमीन आहे. त्यांनी २१ एकर शेती भाडेपट्टीवर कसायला घेतली आहे. दरवर्षी सुमारे १० एकर क्षेत्र ते सुरती हुरडा वाणासाठी राखीव ठेवतात. यंदा त्यांनी १५ एकरांत लागवड केली. सुमारे २० वर्षांपासून त्यांनी हे पारंपरिक वाण अत्यंत काळजीपूर्वक व मेहनतीने जोपासले आहे.  यंदा दुष्काळातही प्रयत्न  अलीकडे पाऊस कमी होत आहे. त्याचा फटका पारधे यांना बसतो आहे. पण म्हणून त्यांचे प्रयत्न थांबलेले नाहीत. यंदा १५ ऑगस्टच्या सुरवातीस दोन ओळींत १२ इंच अंतर ठेवून पेरणी केली. त्यानंतर ८ ते १० दिवसांच्या अंतराने पेरणी करीत गेले. हुरडा सातत्याने उपलब्ध व्हावा यासाठी हे नियोजन होते. जमिनीत ओल कमी असल्यामुळे वरचे पाणी दिल्याशिवाय हुरड्याचे उत्पादन येणार नव्हते. या वर्षी हुरड्याखालील अन्य क्षेत्रात घट झाल्याने त्यास चांगला दर मिळेल असे पारधे यांना वाटत होते, त्यामुळे ज्वारी टिकवण्याचे कसोशीचे प्रयत्न केले. स्वतःच्या विहिरीतील पाणी पुरत नव्हते. त्यामुळे नोव्हेंबरमध्येच टॅंकरची गरज भासली. सुरवातीला ७०० रुपये प्रतिटँकर याप्रमाणे पाणी विकत घेतले. एका एकराला ४० टँकर पाणी लागले. ते पाणी परवडत नसल्यामुळे पाइपलाइनद्वारे पाणी आणता येईल का याचा विचार सुरू केला.  सुमारे २७ हजार फूट पाइपलाइन  यंदा पीक हातचे घालवू द्यायचे नाही ही खूणगाठ बांधली होती. मग २७ हजार फूट अंतरावरील पिंपरखेडा येथील विहिरीतून पाइपलाइनद्वारे पाणी आणले. टेंभापुरी धरणालगत असलेल्या विहिरीपर्यंत मित्राची जुनी पाइपलाइन होती. त्याचा वापर केला. हे पाणी टेंभापुरी येथील विहिरीत टाकले. टेंभापुरी ते दहेगाव (बंगला) या दरम्यान दुसऱ्या मित्राच्या पाइपलाइनद्वारे टेंभापुरी विहिरीतील पाणी दहेगावच्या विहिरीत टाकले. दहेगाव येथे पारधे यांची बटईची शेती आहे. तेथून सारंगपूर येथील स्वतःच्या शेतीपर्यंत पूर्वीच पाइपलाइन केली आहे. अशारीतीने २७ हजार फुटांचा प्रवास करून पाण्याची सोय तयार केली. इलेक्ट्रिक मोटार, ठिबक, विकतचे पाणी यासाठी जवळपास ८ लाख रुपये खर्च आला.  नरेगा विहिरीचा फायदा  पाणी लागण्याची शक्यता कमी असल्याने या गावात फारशा विहिरी नाहीत. विहीर असेल तर वापर संरक्षित सिंचनासाठी होतो. हे जाणून पारधे यांनी नरेगामधून विहीर घेतली. तीन वर्षांपूर्वी ही विहीर मंजूर झाली होती. तीन वर्षांत त्याचे काम पूर्ण केले. सुमारे ७७ फूट खोलीची ही विहीर आहे. यासाठी सहा लाख रुपये खर्च आला, त्यासाठी तीन लाख रुपये अनुदान मिळाले.  हुरडा विक्री व्यवस्थापन  अनेक वर्षांपासून हुरडा निर्मितीत असल्याने पारधे यांनी औरंगाबाद व नगर येथे आपले मार्केट तयार केले आहे. साधारणतः ७० टक्के विक्री ‘ऑर्डर’प्रमाणे होते. औरंगाबाद व अहमदनगर जिल्ह्यात अनेक लोक व्यावसायिक हुरडा पार्टी आयोजित करतात, त्यांच्याकडून या ‘ऑर्डर्स’ मिळतात.  पहाटेच्या सुमारास कणसे तोडण्यास सुरवात होते. सकाळी सातच्या दरम्यान कणसे पोत्यात भरून  रवाना केली जातात.  मिळणारा दर  गेल्या वर्षी प्रतिकिलो १०० रुपयांप्रमाणे कणसांचा पुरवठा केला. या वर्षी हा दर १५० रुपये होता. औरंगाबाद व नगर येथे पारधे स्वतःही विक्री करतात. रब्बी हंगामात सतत १० ते १५ महिला मजूर कार्यरत असतात. दोन हातांमध्ये कणीस मळून हुरडा वेगळा केला जातो. त्यानंतर वाऱ्याच्या झोतात उफणून स्वच्छ केला जातो. मग ज्यूटच्या पोत्यात भरून हवेशीर ठिकाणी साठवला जातो. अशा हुरड्याला २०० ते ३०० रुपये दर मिळतो.  हवामानाचे संकट झेलले  पारधे यांनी एक लाख रुपये खर्चून ठिबक यंत्रणा बसविली. या वर्षी हुरडा ऐन चिकात असताना हवामान ढगाळ राहिले, त्यामुळे उष्णतेत वाढ झाली. यामुळे हुरडा लवकर पक्व होत गेला. उत्पादन घटले.  अर्थकारण  दरवर्षी एकरी सात ते आठ क्विंटल उत्पादन मिळते. दहा एकरांत चार ते पाच लाख रुपये किमान मिळतात. यंदा चांगल्या नफ्याची अपेक्षा होती. पण दुष्काळ, टॅंकरचे पाणी यामुळे मोठा खर्च सोसावा लागला, तरीही एक लाखापर्यंत नफा हाती आला. जोडीला घरातील १० जनावरांसाठी पाच-सहा हजार पेंड्या चारा मिळाला, हेच काय ते प्रतिकूलतेत समाधान मानायचे.  प्रतिक्रिया  आम्ही सुरती हुरडा ज्वारीचे बियाणे अनेक वर्षांपासून जतन केले आहे. दरवर्षी घरचेच बियाणे वापरतो. आमच्या गावात असंख्य शेतकरी या वाणाची लागवड करतात. एकरी सुमारे ३ किलो बियाणे लागते. साधारण किलोला सातशे ते एक हजार रुपये दराने त्याची विक्रीही साधता येते. 

  • असा आहे सुरती हुरडा 
  •  चवीला अत्यंत गोड, त्यामुळे मागणी चांगली. 
  • दाण्यांचा आकार गोल. कणसांचा आकार थोडा वाकडा. 
  • संपर्क – अरुण पारधे - ९८२२७६४५५२  (लेखक औरंगाबाद येथे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आहेत.) 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com