agriculture, agrowon, lime farming, mahuli chor, khandeshwar, amaravati | Agrowon

आठ एकरांतील लिंबू ठरले हमखास उत्पन्नाचा मार्ग 

विनोद इंगोले
शुक्रवार, 29 मार्च 2019

किफायतशीर लिंबू पीक 
झंझाट सांगतात की लिंबू हे पीक आर्थिक दृष्ट्या परवडणारे असते. एकतर त्याला वर्षभर मागणी असते. 
तसेच अन्य पिकांच्या तुलनेत फवारणी तसेच अन्य खर्च कमी असतात. वर्षातून मृग व हस्त असे दोन बहार घेता येतात. दोन्हीतून पैसे मिळवण्याची संधी असते. यातील हस्त बहाराची फळे मार्च- एप्रिलमध्ये बाजारात येतात. याच लिंबांना अधिक मागणी व दरही असल्याचे ते सांगतात. 

अमरावती जिल्ह्यात माहूली (चोर) येथील अंकुश कृष्णराव झंझाट यांनी सुमारे वीस वर्षांपासून लिंबूझाडांची जोपासना काळजीपूर्वक करीत आज आठ एकरांपर्यंत बागेचा विस्तार केला आहे. वर्षभर मागणी असलेले व अन्य पिकांच्या तुलनेत कमी श्रमाचे लिंबू वर्षाला हमखास चांगले उत्पन्न देत असल्याचे ते सांगतात. 
 
अमरावती जिल्ह्यात नांदगाव खंडेश्‍वर तालुक्‍यातील माहूली (चोर) येथील अंकुश कृष्णराव झंझाट 
यांची एकूण ११ एकर शेती आहे. त्यापैकी आठ एकरांत लिंबू तर तीन एकरांत टोमॅटो आहे. या दोनच मुख्य पिकांवर त्यांची भिस्त आहे. सुमारे २० वर्षे वयाची लिंबाची झाडे त्यांच्या बागेत पाहण्यास मिळतात. दोन वर्षांपूर्वी नव्याने काही झाडे लावली आहेत. सध्या झाडांची एकूण संख्या ८०० पर्यंत आहे. पाच वर्षांपूर्वी चार एकरावर संत्रा लागवड केली होती. परंतु काही तांत्रिक कारणांमुळे त्यांना या पिकाने म्हणावा तसा फायदा दिला नाही. आता त्याच जागेवर लिंबाची नवी बाग जोपासली जात आहे. 

किफायतशीर लिंबू पीक 
झंझाट सांगतात की लिंबू हे पीक आर्थिक दृष्ट्या परवडणारे असते. एकतर त्याला वर्षभर मागणी असते. तसेच अन्य पिकांच्या तुलनेत फवारणी तसेच अन्य खर्च कमी असतात. वर्षातून मृग व हस्त असे दोन बहार घेता येतात. दोन्हीतून पैसे मिळवण्याची संधी असते. यातील हस्त बहाराची फळे मार्च- एप्रिलमध्ये बाजारात येतात. याच लिंबांना अधिक मागणी व दरही असल्याचे ते सांगतात. 

जलस्त्रोत 
अलीकडील काळात पाण्याचे स्त्रोत घटच चालले आहेत. मात्र बोअरवेल, विहीर यांच्या माध्यमातून ठिबकद्वारे पाणी दिल्याने बागेला पाण्याचा चांगला पुरवठा होतो असे झंझाट सांगतात. लिंबाचे संपूर्ण क्षेत्र त्यांनी ठिबकखाली आणले आहे. 

उत्पादन 
प्रति झाड (मोठे) - सुमारे तीन पोती- अंदाजे ४५ ते ५० किलो. प्रति पोते सुमारे १५ किलो माल 

विक्री व मार्केट 
झंझाट दोन पद्धतीने विक्री करतात. एकतर संपूर्ण बाग व्यापाऱ्याला हुंडी पद्धतीने द्यायची. दुसरा पर्याय म्हणजे अमरावती, नागपूर बाजारपेठेत विक्री करायची. बाजारपेठ, आवक व दर यांचा अंदाज घेत विक्रीचा निर्णय त्या-त्या वेळी घेतला जातो. यंदा व्यापाऱ्याला सहाशे झाडांची बाग सहा लाख २५ हजार रुपयांना हुंडीत दिली आहे. ते सांगतात की लिंबाला बाजारात सध्या ६० ते ७० रुपये दर सुरू आहे. आमच्या भागात कट्ट्यांवर दर असतो. वर्षभराचा विचार केला तर एकरी सरासरी एक लाख रुपये उत्पन्न ही बाग देऊन जाते. 

उत्पन्नाचा सक्षम स्त्रोत 
याच पिकाच्या उत्पन्नातून कुटुंबातील अनेकांची उच्च शिक्षणे पूर्ण करता आली. अंकुश यांच्यासह कुटुंबात तीन भावंडे आहेत. अंकुश हे सर्वात लहान आहेत. त्यांचे मोठे भाऊ अभियंते असून ते कंत्राटदार आहेत. एक भाऊ पुण्यात शासकीय सेवेत आहेत. शेतीची सारी जबाबदारी अंकुश यांच्यावरच असते. वडिलांचे संपूर्ण मार्गदर्शन त्यांना मिळते. 

झंझाट सांगतात... 

  • मध्यम हलकी किंवा तीन फूट खोल माती, त्याखाली कच्चा मुरुम, निचरा होणारी जमीन लिंबासाठी पोषक 
  • वर्षभरात पाण्याचे सुमारे २८ हप्ते होतात. पाणी कमी असेल तरी नुकसान होत नाही. परंतु उत्पादनावर त्याचा फरक पडतो. 
  • लागवडीनंतर सुमारे २० वर्षे लिंबाचे झाड उत्पादन देत राहते. त्यासाठी शास्त्रोक्‍त पद्धतीने व्यवस्थापन होणे गरजेचे राहते. सप्टेंबर १५ ते ऑक्‍टोंबर १५ या कालावधीत पाऊस झाल्यास त्याचा परिणाम हस्त बहारावर होतो.  

लिंबू उत्पादकांचे गाव 
माहूली चोर गावात झंझाट कुटुंबीयांनी सर्वात आधी लिंबू लागवडीसाठी पुढाकार घेतला. त्यापासून चांगले उत्पन्न मिळू लागल्याने समृद्धीचा हा मंत्र इतरांपर्यंत पोचला. टप्‍प्याटप्‍प्याने लिंबू उत्पादकांची संख्या शंभरावर पोचली. तर लागवड क्षेत्र २५० एकरांवर पोचले. झंझाट संयुक्त कुटुंबातच १६ एकरांवर लागवड आहे. गावाचे अर्थकारण या पिकामुळे बदलल्याचे चित्र येथे अनुभवता येते. विदर्भातील शेतीत हा बदल सुखावणारा आहे. 

हुंड्यात देतात बाग 
उन्हाळ्यातील चार महिने लिंबाचा मुख्य हंगाम राहतो. या काळात लिंबूला मागणी वाढून दरात तेजी येते. त्यामुळे या हंगामावर लक्ष्य केंद्रीत केले जाते. नागपूर किंवा अमरावती या बाजारपेठेत विक्री होते. हुंडा पद्धतीनुसार देखील विक्री होते. चार महिन्याकरिता बाग व्यापाऱ्याला दिली जाते. त्याकरिता एक दर निश्‍चीत केला जातो. त्यानंतर तोडणी आणि इतर सर्व कामे व्यापाऱ्यांकरवीच होतात. मार्केटला जाऊन दर आठवड्याला विक्री करण्याऐवजी हुंड्यात बाग देण्यावर नजीकच्या काळात अनेक शेतकऱ्यांनी भर दिला आहे. यामध्ये वाहतूक खर्च, हमाली, मापाई, अडत असे अनेक छुपे खर्च वाचण्यास मदत होते. व्यापाऱ्यांना देखील एकाच भागात एका पिकाखालील मोठे क्षेत्र उपलब्ध होत असल्याने त्यांच्याकडून खरेदीसंदर्भाने उत्साह असतो. 

शेतकरी अनुभव 
आमची एकत्रित कुटुंबाची १८ एकर शेती आहे. यात सव्वा दोन एकरांत लिंबू आहे. आठ वर्षांपूर्वी मी या पिकाकडे वळलो. वर्षभर दर कमी जास्त होत असले तरी खेळता पैसा राहतो. अमरावती बाजारपेठेत हर्रासीत माल दिला जातो. प्रतिपोत्यात १३ ते १५ किलो लिंबू असतात. त्याला सरासरी ६५० ते ७०० रुपये दर मिळतो. 
-विपीन काकडे- ९६८९४१८११५ 

पहिल्या दर्जाचे पीक म्हणून लिंबाला आमच्या गावात मान्यता मिळाली आहे. त्यामुळे दर्जेदार व्यवस्थापनावर सर्वांनी भर दिला आहे. माझ्याकडे पाच एकरात लिंबाची ६३० झाडे आहेत. जमिनीनुसार पाण्याची गरज या पिकाला भासते. माझी चोपण जमीन असल्याने ठिबकचा पर्याय अवलंबिला आहे. हंगामात प्रतिझाडापासून एक हजार रुपये मिळतात. हुंड्यात देण्याऐवजी अमरावती मार्केटला लिंबू पाठवितो. उन्हाळा वगळता अन्य दिवसांत दर कमी मिळत असले तरी व्यवस्थापन खर्चाची भरपाई होते. 
- उमेश तिखीले-९४२०१८७४९४ 
 

संपर्क- अंकुश झंझाट - ८७६६५५७३६६ 

लिंबाच्या बागा व मार्केटसाठी विदर्भ प्रसिद्ध 
कागदी लिंबाचे राज्यात सुमारे ४५ ते ५० हजार हेक्टर क्षेत्र सांगितले जाते. त्यापैकी १५ ते २० हजार हेक्टर क्षेत्र विदर्भात तर एकट्या अकोला जिल्ह्यात हे क्षेत्र चार हजार हेक्टरपर्यंत असावे. जिल्ह्यात बाळापूर, पातूर, मूर्तिजापूर, बार्शीटाकळी या तालुक्यांत व त्यातही बाळापूर, पातूर या दोन तालुक्यांत क्षेत्र अधिक असून तेथे लिंबू उत्पादकांचा पट्टा तयार झाला आहे. 

हस्त बहाराकडे कल 
कागदी लिंबाला वर्षभर मागणी राहते. उन्हाळ्यात फेब्रुवारी ते मे दरम्यान मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असतो. परिणामी, दर चांगले मिळतात. यामुळे शेतकऱ्यांचा कल हस्त बहराकडे वाढू लागला. 
अन्य बहरांच्या तुलनेत हा बहर अधिक फायदेशीर ठरतो. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात अखिल भारतीय समन्वयीत संशोधन प्रकल्प (लिंबूवर्गीय फळे) कार्यरत आहे. त्याअंतर्गत घेतलेल्या प्रयोगावरून हस्तबहार नियोजन तंत्रज्ञान विकसित करण्यात आले. अभ्यासाअंती लिंबूवर्गीय फळ झाडांमध्ये आंबीया बहर ६० टक्के, मृगबहार ३० टक्के तर हस्त बहार अवघा १० टक्के येत असतो. यासाठी हस्तबहार घेण्यासाठी शास्त्रीय दृष्टीकोन ठेवून मशागत, खत, पाणी व्यवस्थापन व संजीवकांचा वापर करून हमखास बहाराची फुले आणणे व उत्पादनात वाढ करणे शक्य झाले आहे. 
निकोप रोपांच्या निर्मितीसाठी फळ संशोधन केंद्राने पुढाकार घेतला आहे. वऱ्हाडात अनेक शेतकऱ्यांकडे दहा वर्षांपेक्षा अधिक काळापासून लिंबाच्या बागा आहेत. अकोल्यात लिंबाची खरेदी-विक्री होते. स्थानिक पातळीवरही खरेदी करणारे व्यापारी तयार झाले आहेत. येथील लिंबू वर्षभर उत्तरेकडील राज्यांमध्ये पाठविले जात असते. 

भारतभर जातो लिंबू 
लिंबाची विक्री करण्यासाठी अकोला ही बाजारपेठ आहे. स्थानिक पातळीवर वाडेगाव येथे व्यापारी येऊन खरेदी-विक्री करीत असतात. या भागातील लिंबू मुंबई, पुणे तसेच गुजरात, राजस्थान, दिल्ली तर दक्षिणेत हैद्राबाद, चेन्नईपर्यंत जातो. वर्षभर ही साखळी काम करते. 

(शब्दांकन- गोपाल हागे)

 


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
कुऱ्हा गावाने तयार केली भाजीपाला पिकांत...अमरावती जिल्ह्यातील वरुड, मोर्शी हे तालुके संत्रा...
बदनापूर येथे कडधान्य पिकांचे आदर्श ‘...वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत...
बोराच्या दोनशे झाडांची उत्कृष्ट बागढवळपुरी (जि. नगर) येथील सुखदेव कचरू चितळकर यांनी...
यांत्रिकीरणातून शेती केली सुलभ,...नगर जिल्ह्यातील बेलापूर येथील बाळासाहेब मारुतराव...
हिंगणघाट झाले कापूस व्यवहाराचे ‘हब’कापूस प्रक्रिया उद्योगाचे जाळे विस्तारले गेल्याने...
तंत्रशुद्ध व्यवस्थापनातून मधमाशीपालनात...नाशिक शहराजवळील पाथर्डी येथील गौतम डेमसे या...
खेड शिवापुरात केली स्ट्रॉबेरी लागवड...खेड शिवापूर (जि. पुणे) येथील मयूर कोंडे या...
शेतकरी कंपनीमुळे तयार झाले उत्पन्नाचे...पुणे जिल्ह्यातील मढ पारगाव आणि परिसरातील सात...
पूरकउद्योग अन् शेती विकासात श्री भावेश्...बेलवळे खुर्द (ता. कागल, जि. कोल्हापूर) येथील श्री...
शाश्वत ग्राम, शेतीविकासाची 'जनजागृती'औरंगाबाद येथील जनजागृती प्रतिष्ठान या स्वयंसेवी...
कमी खर्चातील गांडूळखतनिर्मिती तंत्राचा...अंबेजोगाई (जि. बीड) येथील शिवाजी खोगरे यांनी कमी...
आरोग्यदायी अन्ननिर्मितीबरोबरच जपली...धानोरा- भोगाव (जि. हिंगोली) येथील दादाराव राऊत आठ...
वेळूकरांनी एकजुटीने दूर केली पाणीटंचाईसातारा जिल्ह्यातील वेळी गावाने एकजुटीने...
अर्थकारण उंचावण्यासाठी मोसंबीसह पेरू,...अस्मानी, सुलतानी संकटे आली तरी त्यातून मार्ग काढत...
सिंचनाची गंगा अवतरली बांधावरयवतमाळ जिल्ह्यात अवकाळी पावसानंतर नोव्हेंबरमध्ये...
मराठवाड्याच्या मोसंबीची पुण्यात मोठी...मोसंबी हे पीक मराठवाडा, विदर्भ व नगर जिल्ह्यात...
सुशिक्षित तरुणाने शोधला मधमाशीपालनातून...बीएससी. मायक्रोबायोलॉजीपर्यंत शिक्षण झालेल्या...
शेतीला दिली मधमाशीपालनाची जोडएखादा पूरक व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असेल तर...
मिरची पिकात प्रमोद पाटील यांनी तयार...सावळदा (ता. जि. नंदुरबार) येथील प्रमोद हिरालाल...
आंबा निर्यातीत नाव कमावलेले दामले कुटुंबतीनहजारांहून झाडांच्या चोख व्यवस्थापनातून...