जिद्दी बचाटे यांनी उभारले माळरानावर नंदनवन

स्वप्ने पूर्ण केली अशोक बचाटेयांचा मुलगा विवेकानंद व भाऊ विठ्ठल यांचा मुलगा प्रवीण कृषी पदविका अभ्यासक्रम सांभाळून शेती पाहतात. एक मुलगा डॉक्‍टर व एक इंजिनिअर आहे. एकाने ‘फार्मसी’ अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. सोलापूर शहरात चांगले घर असावे हे स्वप्न कुटूंबाने सत्यात उतरवले. दुकान घेतले. घरातील मुलींची लग्ने थाटामाटात केली. सर्व काही शेतीच्या भरवशावर साकारले. भविष्यात कृषी पर्यटन उभारण्याचा मानस असून सेंद्रीय हळद, गूळ बनवून विक्रीस ठेवणार आहेत.
हळदीच्या नगदी पिकाला बचाटे यांनी हुकमी बनवले आहे.
हळदीच्या नगदी पिकाला बचाटे यांनी हुकमी बनवले आहे.

मंगरुळ (ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) येथील बचाटे कुटूंबाने पडीक माळरानावर हिरवाई फुलवली आहे. नंदनवनासारखा हा परिसर दूरवरुन देखील कोणाचेही लक्ष वेधून घेतो. ही किमया चाळीस वर्षांच्या अथक परिश्रमाची अन्‌ कुटूंबाच्या सामुहिक प्रयत्नांची आहे. ऊस, हळद, आंबा, कांदा, त्यांना पारंपरिक पिकांची व पूरक व्यवसायाची जोड देत या कुटूंबाने प्रयोगशील शेतीचा दीडशे एकरांवरील डोलारा उभा केला आहे. जिथे साधे कुसळही उगवत नव्हते. भुकेल्या जनावरांनी दिवसभर शोध घेतला तरी पोटात खडे- माती यांच्याशिवाय काहीच जाण्याची शक्यता नाही. अशी तुळजापूरपासून आठ दहा किलोमीटरवरील मंगरुळ (ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) येथील कसईच्या माळावरली जमीन. उन्हाळ्यात नुसत्या गरम झळा. क्षणभरही थांबणे मुष्कील. सुमारे चाळीस वर्षांपूर्वी मॅट्रिक झालेल्या या गावातील शिवाजी बचाटे यांनी शेती हीच कर्मभूमी मानून आजवर अनेक टक्केटोणपे खात तिथे नंदनवन उभे केले आहे. अशी घडली शेती शिवाजी यांना पत्नी ताराबाई यांची समर्थ साथ आहे. तेव्हा शिवाजी शाळामास्तर झाले असते. पण शेती, मातीची ओढ, रोमारोमात भिनलेली. उपजतच सोशिक स्वभाव. त्यांची ६३ एकर जमीन. सखल चिबड रानात पावसाळ्यात साळीचे पीक तेवढे ते घेत. उघडे माळरान म्हणून गाई, गुरं तेवढी वाढवली. अशोक, मल्लीनाथ व विठ्ठल ही मुले मॅट्रीक झाल्यानंतर शेतीला हातभार लावू लागली. पुढे सुना आल्या. घरचे आठ- दहा जण शेतात दिवसरात्र राबून दरवर्षी एकर- दोन एकरांमध्ये काळी माती टाकून रान तयार करीत. त्यात स्वप्नं पेरीत. तळपत्या उन्हात राबत हुलगा, ज्वारी, बाजरी, कारळं, तूर, सूर्यफूल अशी पिके घेत. शेतीतील प्रयत्न पै- पैका बाजूला ठेवून वर्षाकाठी शेजारची दोन- चार एकर माळरानाची शेती घ्यायला सुरवात केली. पाण्यासाठी विहीर खोदली. पाणी लागले. रब्बी पिके, भाजीपाला घेण्यास सुरूवात केली. केला. ताजा पैसा घरी येऊ लागला. मग बोअर घेतले. ऊस लागवड केली. पाहाता पाहाता दीडशे एकरांपर्यंत शेती तिन्ही भावांनी कधी कमावली ते कळलेच नाही. सिंचनासोबत पिकांचे नियोजन पाण्यासाठी दुसरी विहीर घेतली. बोअर घेतले. तीस- चाळीस गायी, म्हशी यांचे शेण-मूत्र, उन्हाळ्यात शेळ्या, मेंढ्या बसवणे, गीर गायींचा कळप चार-सहा महिने शेतावर आखाडा करुन बसवणे आदी प्रयत्न सुरू झाले. त्यातून हलक्‍या जमिनीत जान आली. उसाचे क्षेत्र वाढवत पस्तीस एकरांवर नेले. त्याला पाटपाण्यावरुन ठिबकवर आणले. पाचट कुट्टी करुन शेतातच कुजवू लागले. शेताच्या मध्यभागी सखल भागात १०० बाय १०० फूट व्यासाचे तीस ते चाळीस फूट खोलीचे शेततळे घरच्या घरीच यंत्र लावून सर्वांनी मिळून खोदले. सात किलोमीटरच्या काळेगावच्या आरळी डॅमखालून पाणी आणले. तिथे ४६ गुंठे जमीन घेत दोन सिमेंट कॉंक्रीटच्या विहीरी कडे टाकून बांधल्या. साठ एकरांवर ठिबक व सहा तुषार संच बसवले. वीस एकर शेती अर्ध बागायती केली. आंबा, केळी, कांद्याचे प्रयोग दापोली येथील डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातून केशर आंब्याचे वाण आणून लावले. त्याचे सेंद्रिय उत्पादन घेण्यास सुरूवात केली. त्यातून दरवर्षी काही लाख रूपयांचे उत्पन्न मिळते. मागील चार वर्षांपर्यंत दहा एकर केळीपासून चांगले उत्पन्न घेतले. पीक बदल म्हणून सहा एकरांवर कडाप्पा जातीची हळद सेंद्रिय पध्दतीवर भर देत घेतली जाते. ती शिजवण्यासाठी कुकर व पॉलिशची आधुनिक यंत्रसामुग्री बसवली अाहे. एकरी पंचवीस क्विंटलपर्यंत सुकवलेले उत्पादन मिळते. कृषी विभागाकडून ४४ बाय ४४ मीटर आकाराचे शेततळे घेऊन त्यात प्लॅस्टीक अंथरले आहे. दरवर्षी घरीच रोपे टाकून आठ-दहा एकरवर कांदा घेतला जातो. को ८६०३२, ८०००५ अादी जातींचा बेणेमळा व यंत्राद्वारे डोळे वेगळे करून रोपवाटिका तयार केली जाते. दरवर्षी ट्रेमध्ये एक डोळ्याची रोपे तयार करून विकली जातात. शेतात स्लरी, दशपर्णी व गांडुळखत तयार केले जाते. त्यासाठी हौद बांधले आहेत. शेणखताचे डेपो वेगवेगळ्या भागात अाहेत. जिद्द सोडली नाही अशोकराव म्हणाले की पहिली काही वर्षे नुसते पेरीत राहिलो. हाती काहीच यायचे नाही. पण जिद्द सोडली नाही. एकदा अडीच एकरात चांगला दर लागला अन दहा लाख रूपयांची हळद झाली. म्हणून पुढे दहा एकर वाढवली. तर दुसऱ्या वर्षी तेवढ्यात फक्त दहा लाख रूपये हाती आले. पीक अवशेष, पाचट सारे कुजवून जमीन सुपीक केली. म्हणून ऊस एकरी ६० टन तर केळीचा एक घड ३० ते कमाल ३५ किलोपर्यंत मिळाला. शेतीतल्या सुधारणा पूर्वी रान चिबड व्हायचे. शेतात चाऱ्या खोदून, दगड गोटे भरुन निचरा काढून दिला. दगड वेचून काळी गाळाची माती आजपर्यंत मोठा खर्च करून वापरली.पूर्वी रानात रानटी प्राणी, विंचू, सापांचा वावर असायचा. उसाला रानडुकरांचा मोठा त्रास. रात्री- बेरात्री तीनेक किलोमीटरच्या शेतावर येऊन उखळीने फटाक्याचा बार उडवायचो. तेव्हा कुठे त्यांच्या तावडीतून पिके हाती लागली. आजही प्रकृती ठणठणीत अशोक यांचे वडील शिवाजीअप्पांचे वय ८७ वर्षे अाहे. सकस अन्न, दुधदुभत्यामुळे अन सततचे कष्ट हे त्यांच्या काटक तब्येतीचे इंगित आहे. शेतात सहा गडी असून तिघे वस्तीला कुटूंबासह राहतात. त्यांना तिथेच घरे बांधून दिली. चाळीस जनावरांसाठीचा गोठा बांधला. मोठा व छोटा ट्रॅक्‍टर व चार बैल आहेत. माणसे जोडली दरवर्षी हुरड्याची ज्वारी पिकवली जाते. मित्र, पाहुणे, अधिकाऱ्यांना आगटीतला गरम हुरडा भाजून दिला जातो. खोबरा, शेंगदाणा, लसणाची चटणी. पुन्हा दुपारी ज्वारीची भाकरी, ठेचा, दही, धपाटे, कांदा असा रानमेवा व अन्‌ चुलीवरले जेवण देऊन तृप्त केले जाते. माणसे जोडण्याची कला या कुटूंबाने अवगत केली आहे. (लेखक निवृत्त कृषी अधिकारी, साहित्यिक व शेती- पर्यावरणाचे अभ्यासक आहेत.) संपर्क-- अशोक शिवाजीराव बचाटे-९९२१६६३६८२ ,९६३७३८३३००vv

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com