कलिंगड, डाळिंब, कांद्यासह  वेगवेगळे यशस्वी प्रयोग 

यंदाच्या दुष्काळात घेतलेले दर्जेदार कलिंगड दाखवताना सोपानराव, कमलबाई यांच्यासह राहुल, अतुल, कुणाल या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता.
यंदाच्या दुष्काळात घेतलेले दर्जेदार कलिंगड दाखवताना सोपानराव, कमलबाई यांच्यासह राहुल, अतुल, कुणाल या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता.

उत्कृष्ट पीक व्यवस्थापन, दुष्काळातही पाण्याचा संतुलित वापर याआधारे कांदा शेती, बीजोत्पादन, कलिंगड, डाळिंब अशी विविध पिके तांबेवाडी (ता. श्रीरामपूर) येथील सोपानराव तांबे यांनी यशस्वी केली आहेत. पाण्याच्या संतुलीत वापर आणि खत व्यवस्थापनातून उत्पादनात टप्प्याटप्प्याने वाढ केली आहे.  नगर जिल्ह्यात तांबेवाडी (ता. श्रीरामपूर) येथील सोपानराव तांबे यांची ११ एकर जमीन आहे. सध्या अडीच एकर डाळिंब, चार एकर कांदा, दीड एकर कलिंगड तर २० गुंठ्यांत कांदा बीजोत्पादन केले आहे. राहुल, अतुल व कुणाल ही त्यांची पदवीधर मुले शेतीत सातत्याने वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी प्रयत्नशील असतात. तांबेवाडी परिसराला भंडारदरा, निळवंडे प्रकल्पाचे पाणी मिळते. त्यामुळे पाण्याची बऱ्यापैकी उपलब्धता असते.  कांदा बीजोत्पादन  पाण्याची टंचाई लक्षात घेऊन तांबे यांनी ऊसक्षेत्र कमी करून अन्य पिके घ्यायला सुरवात केली. दहा वर्षांपासून ते रब्बी कांदा सुमारे चार एकरांवर घेतात. त्यासाठी घरीच दहा ते पंधरा गुंठ्यांत बीजोत्पादन करतात. दरवर्षी ५० किलोपर्यंत एकूण उत्पादन झाल्यास त्यातील वीस किलो बियाणे स्वतःसाठी वापरतात. सुमारे १२०० रुपये प्रति किलो दराने विक्री करतात. शेतकऱ्यांत या बियाण्याने खात्रीशीर नाव तयार केले आहे. कांद्याचेही एकरी उत्पादन १२ टनांपर्यंत मिळते. यंदा ते १५ टनांपर्यंत मिळाले आहे.  कलिंगड शेती  ऊस, फळपिकांचे सर्वाधिक उत्पादन घेत असलेल्या या भागात तांबे यांनी दोन ते तीन वर्षांपासून साधारण दोन एकरांत कलिंगड घेण्यास सुरवात केली आहे. दर्जेदार फळ असल्याने जागेवरच व्यापारी खरेदी करतात. यंदा प्रचंड तापमानात परिसरात आपल्यासह केवळ एकेच ठिकाणी कलिंगडाचा प्लॉट होता. ठिबकमधून दर तासाला चोवीस हजार लिटर पाणी दिले जायचे. सात हजार ड्रिपर्स व प्रत्येक ड्रिपरमागे दोन रोपे होती. दीड एकरांत सुमारे ५१ टन उत्पादन मिळाल्याचे अतुल यांनी सांगितले. मात्र प्रति किलो साडेआठ रुपये दरावरच समाधान मानावे लागल्याचेही त्यांनी सांगितले. दरवर्षी एकरी वीस ते २२ टन उत्पादन मिळते.  व्यवस्थापनातील ठळक बाबी 

  • प्रयोगशील शेतकरी डॉ. दत्तात्रय वने (मानोरी, त. राहुरी, जि. नगर) यांच्याकडून पाणी व्यवस्थापनाचे मार्गदर्शन घेत पाण्याचा वापर. त्यातून उत्पादनात टप्प्याने वाढ. 
  • ठिबक सिंचनासोबत पीकनिहाय तुषार सिंचनाचा वापर. त्यातून चाळीस टक्के पाण्याची बचत. तुषार सिंचनाचा कांदा पिकास फायदा. 
  • गोमूत्र, शेणखताची स्लरी तयार करण्याचे युनिट उभारले आहे. दर आठ दिवसांनी त्याचा वापर. त्यातून रासायनिक खताचा वापर कमी. 
  • डाळिंबाला मल्चिंग   सन २०१६ मध्ये एक कोटी लिटर क्षमतेचे शेततळे उभारले आहे. सन २०१० मध्ये अडीच एकरांत भगवा डाळिंबाची लागवड केली आहे. यंदा दुष्काळाचा फटका बसल्याने अनेक शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध नाही. धरणाचे आवर्तन पुरेसे आलेले नाही. त्यामुळे डाळिंबाला बहार धरता आला नाही. मात्र काटेकोर पाणी वापरातून शेततळ्यात आज ५० टक्के पाणी उपलब्ध आहे. पालापाचोळ्याचे मल्चिंग तसेच प्लॅस्टिक मल्चिंगही केले आहे. त्यामुळे कमी पाण्यात बाग जगवता आली. बहारही धरता आला. बागेत परागीकरणासाठी मधमाशा असणे गरजेचे आहे. अलीकडील काळात त्यांचे प्रमाण कमी झाल्याने मधमाशी पेट्या विकत आणल्या आहेत. डाळिंबाचे अडीच एकरांत ३६ टन उत्पादन त्यांनी घेतले आहे.  मार्गदर्शनातून वाढले सोयाबीन उत्पादन  शेतीत वेगवेगळे प्रयोग करत असताना ॲग्रोवनमध्ये प्रकाशित झालेली डॉ. वने मॉडेल ही लेखमाला वाचनात आली. त्या वेळी म्हणजे २००७ च्या सुमारास डॉ. वने यांची भेट घेत त्यांच्याकडून पाणी व्यवस्थापनाचे धडे घेण्यास सुरवात केली. कांदा, सोयाबीन, फळपिके, कलिंगडात त्याचा वापर सुरू केला. तीन वर्षांपासून डॉ. वने यांच्या मार्गदर्शनाखाली सोयाबीनचे पीक तुषार सिंचनावर घेत आहेत. यंदाच्या खरिपात चार एकरांत या सोयाबीनचे एकरी १४ क्विंटल उल्लेखनीय उत्पादन घेण्यात त्यांना यश आले. त्याआधी एकरी दहा क्विंटलहून अधिक उत्पादन मिळालेले नव्हते. लागवडीच्या पाण्यानंतर ११ दिवसांच्या अंतराने पाण्याचे नऊ हप्ते दिसे. प्रति एकराला दर हप्त्याला चाळीस हजार लिटर पाणी लागले. चारा पिकांसाठीही ठिबक व तुषारचा वापर होत आहे. परिसरात असलेल्या डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याकडून अनेक वेळा प्रशंसनीय ऊस उत्पादनाबाबत त्यांचा गौरव झाला आहे.  संपर्क- सोपानराव तांबे - ९८९०१८२३८९  अतुल तांबे - ९५२७४४१५१७   

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com