दहा वर्षांपासून यशस्वी खजूर शेती, जोखीम करण्यासाठी सीताफळाचे आंतरपीक 

आंतरपिकांतून साधली सुरक्षा राजाभाऊ म्हणाले की, जून-जुलैमध्ये खजूर पक्व होऊन काढणीस येतो. त्या वेळी पाऊस असतो.त्यात फळगळ होऊन बागेचे संपूर्ण नुकसान होऊ शकते. हा संभाव्य धोका लक्षात घेऊन खजुरातसीताफळ आणि गोडचिंचेचे उत्पादन घेत आर्थिक सुरक्षा जपली आहे. खजुराचे नुकसान झालेच तर सीताफळ पैसे देऊन जाते. सीताफळ प्रतिझाड २० किलो तरी उत्पादन व दोन-तीन लाख रुपये मिळवून देते. खजुराचे उत्पन्न हा मग बोनसच ठरतो.
खजूर दाखवताना राजाभाऊ देशमुख
खजूर दाखवताना राजाभाऊ देशमुख

सोलापूर जिल्ह्यात बार्शी येथे राजाभाऊ देशमुख यांनी दहा वर्षांपूर्वी खजूर लागवडीचा दिशादर्शक प्रयोग केला. सहा वर्षांपासून उत्पादनाला सुरवात झाली. आज आपल्या गुणवत्ताप्रधान खजुराचे एकरी पाच टनांपर्यंत उत्पादन घेत त्याला बाजारपेठही मिळवण्यात ते यशस्वी झाले आहेत. खजुरातील जोखीम कमी करण्यासाठी त्यात सीताफळाचे आंतरपीक घेऊन त्यातून पिकांची सुरक्षितता साधली आहे.    सोलापूर जिल्ह्यात बार्शी-सोलापूर रस्त्यावर बार्शीपासून अवघ्या तीन-चार किलोमीटरवर राजाभाऊ देशमुख यांची तीस एकर शेती आहे. त्यात १७ एकर सीताफळ, अडीच एकर द्राक्ष, पाच एकर ड्रॅगन फ्रुट अशी पिके आहेत. तीन बंधूंसह त्यांचे एकत्रित कुटुंब आहे. अन्य बंधू व्यवसाय, नोकरीत आहेत. पत्नी आणि पुतणे यांच्यासह राजाभाऊ शेती करतात.  खजुराचा शोध  दोन विहिरी आणि बागायती, अशी राजाभाऊंची शेती. पूर्वी ज्वारी, गव्हाच्या पुढे शेती जात नव्हती. पण, राजाभाऊ प्रयोगशील आणि सतत नवे काही करण्याचा ध्यास घेऊनच काम करणारे व्यक्तिमत्त्‍व आहे.  त्यातूनच विविध फळांचे प्रयोग त्यांनी केले. बार्शी येथील मित्र उमेश चव्हाण यांच्यामुळे २००९ मध्ये गुजरातला जाण्याचा योग आला. तेथे पाहिलेली खजुराची शेती मनात घट्ट बसली. तेथील अनुभवी शेतकऱ्यांशी चर्चा केली. आपल्याकडील वातावरण, भौगोलिक परिस्थितीत हे पीक रुजेल का, याबाबत त्यांना शंका होती. पण, प्रयत्नवादी व अभ्यासू राजाभाऊंनी हे धाडस करण्याचा निर्णय घेतला.  धाडसी प्रयोग  गुजरातहून खजुराच्या देशी वाणाच्या दोन हजार बिया मिळाल्या. त्यातून झाडे तयार करण्यास सुरवात केली. ठिबकचा वापर केला. या पिकात मार्गदर्शन करणारे त्या वेळी तर कोणीच नव्हते. अठरा बाय ३ फुटांवर लागवड झाली. पुढे ती दाट झाल्याचे व सल्ला चुकीचा मिळाल्याचे लक्षात आले. पण, आता नवीन लागवड करताना ही चूक सुधारून १८ बाय १८ फूट अंतरावर लागवड केली आहे.  आश्‍वासक उत्पादन  बियांपासूनच्या लागवडीनंतर सुमारे पाच वर्षांनी उत्पादन सुरू झाले. सन २०१४ मध्ये पहिले उत्पादन ५०० किलोपर्यंत मिळाले. पुढील वर्षीही तेवढेच उत्पादन मिळाले. मग मात्र उत्पादनात दरवर्षी वाढ होत गेली. यादरम्यान या पिकात सातत्याने येणाऱ्या अडचणींचा अभ्यास केला. गुजरातेतील खजूर उत्पादकांच्या भेटी घेतल्या. त्यावरील साहित्य वाचत, अभ्यास करुरून काही सुधारणा केल्या.  व्यवस्थापनातील ठळक बाबी 

  • जानेवारीत झाडाच्या वाढलेल्या व वाळलेल्या फांद्या काढल्या जातात. 
  • जानेवारी-फेब्रुवारीमध्ये कोंब येण्यास सुरवात. मग फळाचे सेटिंग 
  • त्या वेळी प्रतिझाड एक दिवसाआड प्रत्येकी १०० लिटर पाणी 
  • झाडाच्या बुडात प्रत्येकी पाच टोपली शेणखत आणि पोल्ट्री खत. त्यानंतर उसाच्या पाचटाचे मल्चिंग 
  • कीडरोग फारसे नसल्याने फवारण्या शक्यतो नाहीत. 
  • परागीकरण  खजुरात परागीकरण हा महत्त्वाचा टप्पा आहे. यासाठी फेब्रुवारी-मार्चमध्ये बागेतील नर झाडातील फुलांच्या पाकळ्यातील पोलन (स्थानिक भाषेत पावडर) मादी झाडांवर टाकण्यात येतात. ही प्रक्रिया हातांकरवी करावी लागते. या प्रक्रियेशिवाय चांगली फळधारणा होऊ शकत नाही.    झाडांना बॅगिंग  ऐन पावसाळ्यात येणाऱ्या खजुरांचे नुकसान टाळण्यासाठी बागेतील मधल्या मोकळ्या जागेत प्लॅस्टिक पेपरचा वापर केला. त्यामुळे काही प्रमाणात अतिरिक्त पाणी बाहेर काढणे शक्य झाले. तसेच, फळात पाणी जाऊ नये, यासाठी केळीच्या घडाप्रमाणे खजुराच्या घडांनाही बॅगिंग करण्यास सुरवात केली.    खजुराचे मार्केट  मेमध्ये झाडावरील खजुराचा गडद लाल, पिवळा रंग दिसायला सुरवात होते, त्या वेळी काढणी होते.  ताज्या फळांची विक्री बार्शीसह पुणे आणि मुंबईच्या बाजारात केली जाते. काही मॉल्स, व्यापारी जागेवर येऊन मालाची मागणी करतात. शिवाय, दरवर्षी सोलापूर आणि तुळजापूर रस्त्यावर स्टॉल मांडून थेट ग्राहकांनाही विक्री होते.  आकर्षक पॅकिंग  आपल्या खजुराचे राजाभाऊंनी ब्रॅण्डिंग, मार्केटिंग करण्यावर भर दिला आहे. अर्धा किलोच्या पॅकिंगसाठी पनेटचा वापर तर पाच किलो खजुरासाठी प्लॅस्टिक बॅगमध्ये पॅकिंग केले जाते. सुट्या पद्धतीने किलोच्या हिशेबानेही विक्री होते.    वर्ष उत्पादन (एकरी) 

  • यंदाचे (२०१९) ५ टन 
  • २०१८- ३ टन 
  • २०१७ २ टन 
  • दर (प्रतिकिलो) 

  • व्यापारी -७० ते ८० रु. थेट विक्री -  १०० ते १५० रु. 
  •  प्रतिक्रिया अत्यंत कमी पाण्यात येणारे खजुराचे पीक आहे. मध्यंतरी तीन वर्षे पाणी खूप कमी पडले, तरीही पीक तगले. यास मागणी चांगली आहे. मात्र, पावसाळ्यात उत्पादन येत असल्याचीच मोठी जोखीम या पिकात आहे. आमचे कुटुंब एकत्रित काम करीत असल्यानेच यशापर्यंत पोचणे शक्य झाले.  -राजाभाऊ देशमुख  संपर्क ः राजाभाऊ देशमुख- ७०२०२०५०२८   

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com