ग्लॅडिअोलस, गुलछडीतून दरवळला यशाचा सुगंध

-चांगदेव मोरे यांची ग्लॅडीओलस फुलांची शेती
-चांगदेव मोरे यांची ग्लॅडीओलस फुलांची शेती

तांत्रिक शिक्षणाचा पुरेपुर वापर, नावीन्यांचा शोध, कुटुंबाची लाभलेली साथ यातून सातारा जिल्ह्यातील सासुर्वे येथील प्रगतशील शेतकरी चांगदेव विष्णू मोरे यांनी ग्लॅडीओलस, गुलछडी या फुलांची यशस्वी शेती केली आहे. स्वतःसोबतच परिसरातील युवकांच्या जीवनात फुलांचा सुगंध दरवळावा यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न प्रशंसनीय आहेत.   सातारा जिल्ह्यातील सासुर्वे (ता. कोरेगाव) हे सुमारे २२०० लोकसंख्येचे गाव. गावालगत कॅनाॅल गेल्याने गावाला पाण्याची तशी कमतरता भासत नाही. साहजिकच ऊस हे गावचे मुख्य पीक झाले आहे. गावातील चांगदेव विष्णू मोरे हे उच्चशिक्षित प्रगतशील शेतकरी आहेत. ‘बीएस्सी अॅग्री’ पर्यंत त्यांचे शिक्षण झाले आहे. शेतीसोबत खेळातही प्रावीण्य चांगदेव यांचे वडील विष्णू मोरे हे सैन्यातून सुभेदार पदावरून निवृत्त झालेले प्रगतशील शेतकरी होते. शेती शाश्वत करण्यासाठी त्यांनी त्या काळात तीन विहिरी घेऊन भाजीपाला शेती केली. त्यांना संपतराव, गणपतराव, अंकुश, चांगदेव ही चार मुले. पैकी संपतराव यांनी त्या काळात बीएस्सी अॅग्रीचे शिक्षण पूर्ण करून शेती महामंडळात अधिकारी म्हणून काम पाहिले. चांगदेव यांनाही शेतीचे बाळकडू घरूनच मिळाले. कोल्हापूर येथील कृषी महाविद्यालयात शिक्षण सुरू असताना खेळाची आवड कायम जपली. ‘अॅथलॅटिक्स’ मध्ये सतत तीन वर्षे ‘जनरल चॅंपियनशीप’ तसेच नामदार बाळासाहेब देसाई ढाल अेस सन्मान त्यांनी मिळवले. कुस्तीतही ४८ किलो वजनी गटात हरियाणा येथे ‘इंटर युनिव्हर्सिटी’ स्पर्धेत भाग घेतला. शिक्षण पूर्ण झाल्यावर ते नोकरी करू लागले. कृषी सेवा केंद्रही सुरू केले. नोकरीत मन लागत नव्हते. शेतीत ओढा कायम असल्याने नोकरी सोडून पूर्णवेळ शेतीच करण्यास सुरवात केली. शेतीतील प्रयोग पूर्णवेळ शेती करण्याचा निर्णय घेतल्यानंतर नावीन्यपूर्ण काही करण्याची खूणगाठ मनाशी बांधली. नव्या पिकांचा शोध घेत असताना १९९० मध्ये महाबळेश्र्वर येथून स्ट्राॅबेरीची रोपे आणून थोड्या क्षेत्रात लागवड केली. पठारावर या पिकाच्या लागवडीचा प्रयोग यशस्वी केला. यातून चांगले उत्पादन मिळाल्यावर रोपे तयार करून एक ते दोन एकर क्षेत्रावर वाढविली. त्या वेळी एकरी चार लाख रुपयांपर्यंत उत्पादन मिळाले होते. ग्लॅडीओलस पिकाची संधी स्ट्राॅबेरीनंतर नव्या पिकांचा शोध सुरू होता. अशातच पणन विभागाकडून ग्लॅडीओलस फुलाविषयी व त्याच्या हॉलंडवरून आणलेल्या कंदांविषयी माहिती झाली. हे कंद ज्या शेतकऱ्यांसाठी मागवले होते त्यांनी काही कारणाने लागवड करण्याविषयी असमर्थता दाखविली. मात्र, ही संधी चांगदेव यांना चालून आली. त्यांनी हे कंद घेतले. या पिकाबाबत फारशी माहिती नसतानाही कृषी विद्यापीठ आणि अभ्यासातून त्याची अधिक माहिती घेतली. नव्या पिकाचे व्यवस्थापन घेतलेल्या कंदांची साधारणपणे पाच गुंठे क्षेत्रात लागवड केली. व्यवस्थापनही बऱ्यापैकी जमले. त्या वेळी ३० हजार रुपयांची कमाई झाली. बियाण्यासाठी कंदही तयार झाले. ते शीतगृहात ठेवले. तिसऱ्या वर्षी २० गुंठे क्षेत्रावर लागवड केली. सद्यस्थितीत वर्षातून दोन वेळा हे पीक घेतले जाते. लागवड करताना मशागत करून शेणखताचा वापर केला जातो. तीन फुटांचा गादीवाफा तयार करून दोन ओळींत अर्धा फूट अंतर ठेऊन कंदाची लागवड केली जाते. साधारण ७५ ते ८० दिवसांनी उत्पादन सुरू होते. साधारणपणे एक महिना उत्पादन मिळते. सकाळी लवकर कांड्या काढून मुंबई मार्केटसाठी ५० तर पुणे मार्केटसाठी १० कांड्याची मोळी बांधली जाते. प्रति वर्षी साधारणपणे दीड लाख कंदांची विक्री जाते. उन्हाळ्यात तसेच गणपती उत्सवाच्या हंगामात फुलांना मागणी जास्त असते. हॉलंडमधील वाणासह महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या फुले गणेश, निलरेखा या वाणांचीही लागवड केली जाते. अर्थकारण साधारण ३० गुंठे क्षेत्रात भांडवली खर्च ३० हजार रुपये (कंद वगळता) येतो. साधारणपणे ५० हजार काडी एवढे उत्पादन मिळते. सरासरी प्रति काडीस पाच ते सात रुपये दर मिळतो. सुमारे अडीच लाख रुपये उत्पन्न फुलांपासून मिळते. फुलांच्या विक्रीबरोबर महाराष्ट्रासह कर्नाटक, म्हैसूर आदी ठिकाणीही कंदाची विक्री केली जाते. गावातील तरुणांनी संघटित करून शेतकरी बचत गटाची स्थापना केली आहे. त्यांना फूलशेतीकडे वळवत प्रयोगशील शेतीत उभे करण्याचा प्रयत्न केला आहे. निशिगंधाची जोड ग्लॅडीओलस फुलाला गुलछडीची (निशिगंध) जोड दिली आहे. गणेशखिंड येथून त्याचे ३०० कंद मिळाले होते. सन २१११-१२ मध्ये एक गुंठ्यात लागवड केली. फुलांच्या उत्पादनाबरोबर कंदांचे उत्पादन वाढविले. साधारणपणे दहा गुंठे क्षेत्रावर त्याची सद्यस्थितीत लागवड केली जाते. प्रतिकाडी दोन ते अडीच रुपये दर मिळतो. वार्षिक एक लाख ते सव्वा लाख रुपये उत्पन्न मिळते. कंदापासून वेगळे उत्पन्न मिळते. फुलांची विक्री सातारा येथे होते. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या फुले रजनी सिंगल व सुहासिनी डबल या वाणांची लागवड होते. परदेश दौरे तरुणांना शेतीतील नवीन माहिती मिळावी यासाठी चांगदेव यांनी पुढाकार घेत कर्नाटक, तामिळनाडू, केरळ आदी ठिकाणी शेतकरी सहली आयोजित केल्या. सपत्नीक इस्त्राइल, इजिप्त दौराही केला आहे. गावचे उपसरपंच असताना गावच्या पाणलोट विकास योजनेतून १३ शेततळी खोदली आहेत. त्यांच्यासह ग्रामस्थांच्या प्रयत्नांतून २५ एकर क्षेत्रावर वनीकरण झाले आहे. सन्मान

  • कराड येथील यशंवतराव चव्हाण कृषी प्रदर्शनात २००५ व ०८ मध्ये ग्लॅडीओलस फुलास अनुक्रमे प्रथम व दुसरा क्रमांक. याच प्रदर्शनात २०१५ मध्ये गुलछडी फुलास दुसरा क्रमांक
  • सेवागिरी व अजिंक्यतारा फळ, फुले संस्थेचा शेतीनिष्ठ पुरस्कार
  • भारतीय कृषी संशोधन परिषदेतर्फे नवोन्मेषी कृषी सन्मान (२०१६) पुरस्कार
  • मार्गदर्शन व मदत डॉ. राम खर्चे, महात्मा फुले कृषी विद्यापाठाचे डॅा. सुनील काटवटे, डॅा. गणेश कदम, जिल्ह परिषद कृषी विभागाचे प्रकाश पवार, मनरेगाचे उपायुक्त अजित पवार यांच्यासह बंधू संपतराव, गणपतराव, अंकुश मोरे तसेच कृषी पदवीधर मित्रांचे मार्गदर्शन चांगदेव यांना होते. पत्नी प्राथमिक शिक्षिका असून त्यांचीही शेतीत महत्त्वाची मदत होते. मुलगा सत्यम ‘बीटेक’ झाला अाहे. मुलगी तन्वी आठवी इयत्तेत पुणे येथे शिकत आहे. कुस्ती खेळात प्रावीण्य मिळावे, यासाठी पुणे येथील सह्याद्री कुस्ती संकुल येथे ती सरावानिमित्त राहते.  संपर्क- चांगदेव मोरे-९९७५७२७४६३  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com