agriculture, agrowon, shel pimpalgaon, khed, rajgurunagar, pune | Agrowon

वर्षभर १५ भाजीपाल्यांसह फळबागांची सेंद्रिय प्रमाणीत शेती

मंदार मुंडले
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

कराळे म्हणतात

 • शेतकरी जे पिकवतो त्याच्या उत्पादनाला जगात अजूनतरी पर्याय निर्माण झालेला नाही. बिगर मातीची शेती नाही. त्यामुळे शेतीचे भवितव्य मोठे आहे. शेतकऱ्यांनी अजिबात निराश होऊ नये.
 • ‘मार्केटिंग सिस्टीम’ शेतकऱ्याच्या हाती नाही. ती त्याच्या हाती आल्यास आर्थिक कमजोरीतून तो बाहेर येण्यास मदत होईल.

रसायन अंश विरहीत आरोग्यदायी अन्नाची निर्मिती करून ग्राहकांना पुरवठा, मातीची सुपीकता टिकवून तिची उत्पादकता वाढवणे ही ध्येये घेऊन एकनाथ कराळे (शेल पिंपळगाव, जि. पुणे) अठरा वर्षांपासून साडेपाच एकरांवर सेंद्रिय प्रमाणित शेती करीत आहेत. स्वतःची विक्री व्यवस्था उभी करीत शेतकऱ्याला उत्पादन खर्चाशी निगडित किमान आधारभूत किंमत मिळावी या दृष्टीने त्यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण, काटेकोर असे शेती व्यवस्थापन केले आहे.

वाढलेला उत्पादन खर्च, त्या तुलनेत शेतमालाला मिळत नसलेले दर, रासायनिक निविष्ठांचा अतिरेकी वापर, मातीची घटत चाललेली सुपीकता, त्यामुळे कमी झालेली पीक उत्पादकता या शेतीतील आजच्या मुख्य समस्या आहेत. पुणे जिल्ह्यात राजगुरुनगर (खेड) तालुक्यातील शेल पिंपळगाव येथील एकनाथ कराळे या अभ्यासू, प्रयोगशील वृत्तीच्या शेतकऱ्याने याच समस्यांचा सूक्ष्म पद्धतीने अभ्यास केला. त्याआधारे स्वतःचे शेती पद्धतीचे मॉडेल विकसित केले. त्यातून या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला.

हसतमुख, प्रसन्न, ,सतत प्रयोगशील
संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या श्री क्षेत्र आळंदीपासून सुमारे नऊ किलोमीटर अंतरावर शेल पिंपळगाव आहे. येथे कराळे यांची साडेपाच एकर शेती आहे. वयाची साठी पार केलेला हा ‘तरुण’ म्हणजे कायम हसतमुख, प्रसन्न व्यक्तिमत्त्व आणि उत्साहाचा झराच आहे. प्रत्येक शेतकरी हा शास्त्रज्ञ आहे आणि शेती ही त्याची प्रयोगशाळा आहे हे तत्त्व अंगी बाणवलेले कराळे काही ना काही प्रयोग करण्यामध्येच व्यस्त असतात. मनाने आणि संवाद साधण्यातही दिलदार, मोकळ्या मनाची ही व्यक्ती बोलता बोलता कधी आपलं मन जिंकून घेते ते कळत नाही.

अठरा वर्षांचं अनुभवसिद्ध मॉडेल
शेतकऱ्यांसाठी तयार केलेलं किमान नफा तत्त्वावरील सेंद्रिय शेती पद्धतीचं मॉडेल हे कराळे यांचं वेगळेपण म्हणावं लागेल. ते बागायती शेती पद्धतीसाठी आहे. सन २००० पासून म्हणजे अठरा वर्षांपासून आपल्या शेतात त्याचा अंगीकार करीत ते अनुभवसिद्ध यशस्वी मॉडेल असल्याचं त्यांनी सिद्ध केलं आहे. केवळ पीक उत्पादनातच नव्हे तर शेतीचं अर्थकारण या विषयातही प्रावीण्य मिळवून स्वतःची सक्षम विक्री व्यवस्था त्यांनी भक्कमपणे उभी केली आहे.

कराळे यांचं सेंद्रिय शेतीचं मॉडेल

 •  एकूण शेती साडेपाच एकर
 • सर्व शेतीचे सेंद्रिय प्रमाणीकरण
 • वर्षभरात सुमारे 15 प्रकारचा भाजीपाला घेतला जातो.
 • बहुवीध व मिश्रपीक पद्धतीची रचना
 • जोखीम कमी करणारी तीन प्रकारची पद्धती
  अ) वर्षातील सर्व हंगामात भाजीपाला
  यात वेलवर्गीय व फळभाज्या
  प्रत्येक आठवड्याला ताजे उत्पन्न   
 • ब) हंगामी पीक पद्धती
   तीन ते चार महिन्यांत पैसे देणारी 
  उदा. कांदा, बटाटा
 • क) दीर्घ कालावधीची फळपिके
 • (पहिल्या दोन्ही पद्धतीत नुकसान झाल्यास यातून मोठा आधार)
 • देशी जनावरे संगोपन
 • शेणखत व जमीन सुदृढतेसाठी

अ पीक पद्धती
हंगाम- खरीप

पहिला प्लॉट - वेलवर्गीय भाजीपाला अधिक फळभाज्या

 • दोडका- दोन अोळी
 • भेंडी- दोन अोळी
 • दुधी भोपळा- दोन अोळी
 • गवार- दोन अोळी
 • दोन अोळी- काकडी
 • काकडी
 • कारले
 • दुसरा प्लॉट - १२ ते १५ दिवसांनंतर- हीच पिके याच पद्धतीने

रब्बी

 • भेंडी (यात आधीचे पीक घेवडा)
 • गवार (यात आधीचे पीक दुधी भोपळा)
 • ढोबळी मिरची ( यात आधीचे पीक काकडी)
 • वरील प्लॉटमध्ये सुरवातीला ताग, धेंचा यांसारखी हिरवळीची पिके. ती जागेवरच गाडली जातात.
 • त्यामुळे जमिनीला सेंद्रिय घटक मिळून त्यातील सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होते.
 • फायदा - या चक्राकार पद्धतीमुळे विविध भाज्यांचे उत्पादन सातत्याने सुरू राहते. बाजारात वर्षभर त्यांचा पुरवठा करून दररोज किंवा आठवड्याला ताजा पैसा हाती येत राहतो.

 अन्य क्षेत्रात (थोडे क्षेत्र)

 • पालक
 • मेथी
 • पुदिना
 • गवती चहा
 • कृष्णतुळस
 • कोथिंबीर
 • अन्य प्लॉट- दोन ते तीन प्रकारची चारा पिके
 • एक प्लॉट- मोकळा- पुढील हंगामासाठी चक्राकार पद्धतीने भाजीपाला घेण्यासाठी

 प्रत्येक झाड किती उत्पादन देते यावर हिशेब
कराळे पीक उत्पादन एकरी किती क्विंटल किंवा टन अशा प्रमाणात मोजत नाहीत, तर प्रत्येक गुंठ्यात किती झाडे, त्यातील उत्पादनक्षम झाडांची संख्या व प्रत्येक झाड किती किलो उत्पादन देते यावर त्यांचे सारे गणित असते.
त्याचे उदाहरण पुढीलप्रमाणे

दोडका व काकडी - पाच गुंठे क्षेत्रातील उत्पादन ७५० किलो किंवा प्रतिगुंठा १५० किलो.

 • दुधी भोपळा -तीन बाय तीन फूट पद्धतीने प्रतिगुंठ्यात सुमारे १११ झाडे बसतात.
 • त्यातील १० झाडांची मरतूक किंवा कमी उत्पादनक्षम धरल्यास १०० झाडे उत्पादनक्षम.
 • प्रत्येक झाड 3 किलो उत्पादन म्हणजेच प्रतिगुंठ्यात १०० झाडे 300 किलो उत्पादन देतात.
 • म्हणजेच पाच गुंठ्यांत दीड टन किंवा एकरी12 ते कमाल 15 टन उत्पादन

कारले - तीन बाय तीन फूट अंतरावर लागवड. प्रतिगुंठ्यात १०० उत्पादनक्षम झाडे गृहीत धरल्यास
प्रतिझाड दोन किलो म्हणजे प्रति गुंठ्यात 200 किलो उत्पादन.

भेंडी- प्रत्येकी तीन चौरस फुटांवर भेंडीचे एक झाड. प्रतिझाड सुमारे ५०० ग्रॅमपर्यंत उत्पादन

याचा फायदा काय?
प्रत्येक झाडाचे उत्पादन, त्यासाठी येणारा खर्च व त्यावरून नफा किती हवा हे लक्षात येते. बाजारात दररोज किती मालाची गरज असते, त्यादृष्टीने किती पिकवला पाहिजे, याचेही नियोजन काटेकोर करता येते.

क) समृद्ध फळबाग

 • मिश्रफळबाग पद्धती (झाडे)
 • जांभूळ- ८०
 • पपई- १००
 • आंबा- सुमारे सहा जाती, एकेक झाड
 • चिकू- तीन
 • संत्रा- १०४
 • मोसंबी- २४

 

 • कराळे सांगतात की सध्याच्या काळात मधुमेही रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे जांभळाला मागणी आहे. त्यामुळे पुढील पिढीला भविष्यात हे फळ चांगला पैसा देऊ शकेल अशी तरतूद
 • जांभळाची ३३ बाय ३३ फूट अशा विस्तृत अंतरावर लागवड. मधल्या ३३ फुटांच्या पट्ट्यात प्रत्येकी आठ फुटांवर एक पपई व एक शेवगा अशी रचना.
 • हदग्याचीही लागवड. त्याचे आयुर्वेदिक महत्त्व वाढल्याने फुले व शेंगा दोघांनाही मागणी.
 • शेती प्रयोगशाळा असल्याने वेगळे काही करण्याचे आव्हान समजून संत्रा व मोसंबी लावली.
 • शिवाय सेंद्रिय फळांचा स्वाद आपल्या माणसांना देण्याचे वेगळे समाधान.

कराळे यांच्या शेतीची वैशिष्ट्ये

माती

 • भारी, चांगल्या प्रकारची. पूर्वी केवळ ढेकळे होती. आता माती पूर्ण रवाळ
 • दरवर्षी मातीपरीक्षण.
 • सेंद्रिय कर्ब एकच्या पुढे
 • जमीन थोडी क्षारपड असल्याने थोड्या मर्यादा येतात.
 • विहीर, एक बोअर. पाण्याची उपलब्धता.
 • अनेक ठिकाणी पीक उत्पादन केंद्रित काम होते. मी मात्र माती केंद्रित काम करतो. बाळंतीण सुदृढ असेल तर बाळही सुदृढ राहते. गेल्या १८ वर्षांत जमिनीला रासायनिक निविष्ठांचा स्पर्शही न होता. केवळ सेंद्रिय घटकांचा वापर झाला. त्यामुळे जमीन सुदृढ होऊन पीक उत्पादकता वाढली, असे कराळे सांगतात.

खते व पीक संरक्षण

 • पाच देशी गायी. (गीर, साहिवाल, डोंगरी व स्थानिक). त्यांचे शेण, मूत्राचा व जीवामृताचा वापर. ताकाचा अधिकाधिक वापर
 • कापूर, हिंग हे घटक पीक संरक्षणात प्रभावी आहेत. फळमाशीसाठी तुळशीचा अर्क प्रभावी असल्याचा अनुभव.
 • दशपर्णी अर्काचा वापर. जनावरे ज्या झाडांचा पाला खात नाहीत, त्यांचा वापर यात प्रामुख्याने करणे हा महत्त्वाचा निकष. उदा. पपई, रुई, सीताफळ
 • फवारणीसाठी आठवड्यातील दोन दिवस निश्चित. वेळही सकाळी साडेआठच्या आत किंवा संध्याकाळी पाच वाजेनंतर.
 • पालापाचोळ्याचा खत म्हणून वापर. शेतात खड्डे घेऊन खत कुजविण्याची पद्धत.
 • गांडूळखत युनिट. फळझाडांसाठी प्रतिझाड ३ किलो असा वापर.
 • मासळीखताचा चुरा करून तो बॅरेलमध्ये भिजवून त्याचे द्रवस्थितीत रूपांतर करून दर पंधरा दिवसांनी ठिबकद्वारे संपूर्ण शेताला वापर. स्प्रिंकलरचाही वापर होतो. २५ रुपये प्रतिकिलो दराने मासळी खत उपलब्ध होते.

सेंद्रिय शेतीतील खर्च
कराळे सांगतात की सेंद्रिय शेतीत मजुरीवरील खर्च जास्त असतो. मात्र रासायनिक खते, कीडनाशके आदींवरील खर्चात बचत होते. या पद्धतीत तणनाशक वापरता येत नाही. त्यामुळे भांगलणीसाठी सात ते आठ महिला मजूर कायम तैनात ठेवाव्या लागतात. त्यांची मजुरी जास्त होते. तरीही सेंद्रिय शेतीत एकूण खर्चात साधारण ४० टक्के बचत होते असा १८ वर्षांतील अनुभव आहे.

उच्चशिक्षित कुटुंब, सामाजिक जाणीव
पूर्वी सुमारे १२ वर्षे कराळे ‘ट्रान्सपोर्ट’ व्यवसायात कार्यरत होते. आता पूर्णवेळ त्यांनी शेतीलाच वाहून घेतले आहे. त्यांना पत्नी  सौ. मंदाकिनी यांची समर्थ साथ शेतीत लाभते. त्यांचा मुलगा राहुल भारतीय प्रशासकीय सेवेत सध्या आफ्रिकेत ‘डेप्युटेशन’वर कार्यरत असून, सून डॉ. योगिता  एमबीबीएस आहे. शेतीव्यतिरिक्त सामाजिक सेवा म्हणून समर्थ शांतिदूत परिवार प्रतिष्ठान या स्वयंसेवी संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनदेखील कराळे जबाबदारी सांभाळतात. नजीकच्या काळात पुणे येथे आंतरराष्ट्रीय गो परिषदेचे आयोजनही संस्थेने केल्याचे त्यांनी सांगितले.
 

स्वतःची विक्री व्यवस्था व ब्रॅंड

 • आजच्या विक्री व्यवस्थेत शेतकऱ्याला आपल्या मालाची किंमत ठरवता येत नाही; मग मी उलट्या बाजूने म्हणजे विक्री व्यवस्थेकडून शेती उत्पादनाकडे गेलो. आधी खर्च लक्षात आला तर नफा किती मिळवायचा हे कळतं. त्यादृष्टीने काम केलं.
 • आपल्या सेंद्रिय प्रमाणित मालाला बाजारपेठेत खास अोळख मिळावी म्हणून
 • किचन गार्डन हा खास ब्रॅंड स्थापित केला. त्याचे ‘डुप्लिकेशन’ होऊ नये म्हणून
 • सन २०११ मध्ये त्याचे ‘कॉपिराइटस’ घेतले.
 • कराळे कोणत्याही बाजार समितीत मालाची विक्री करीत नाहीत. त्यांनी पुणे शहर व परिसरातील ५०० ते ६०० ग्राहकांचे नेटवर्क तयार केले आहे. काही मॉल्समध्येही माल जातो. अलीकडेच पुणे
 • शहरातील सहा आठवडी बाजारात भाजीपाला विक्री सुरू केली आहे.
 • विक्रीनंतर शिल्लक राहील असा जास्त माल बाजारात आणायचाच नाही. त्यासाठी तो पिकवायचादेखील मर्यादित प्रमाणात. याच संकल्पनेवर अधिक काळ अभ्यास केल्याचं कराळे सांगतात.

आधारभूत किमतीचा मुद्दा
शेतमालाच्या दरांमध्ये सतत चढउतार होतात. मात्र, या बाबींमध्ये शेतकऱ्याचा उत्पादन खर्च मात्र कुठेही कमी होत नाही. त्यामुळे किमान आधारभूत किंमत त्याला मिळावी. तसेच एक एकर बारमाही शेती असेल तर वर्षाला किमान एक लाख ८० हजार रुपये निव्वळ नफा त्याला मिळावा. यादृष्टीने शेती पद्धतीचे माॅडेल विकसित केल्याचे कराळे सांगतात.

दर
उत्पादन खर्चाच्या निगडित दर ठेवले आहेत. सेंद्रिय माल महाग असतो का, असा प्रश्न मला अनेक ग्राहक विचारतात. मालाचा दर्जा, रंग, स्वाद, टिकवणक्षमता, आरोग्यदायी अशा विविध निकषांवर आमचा कीचन गार्डन ब्रॅंडचा भाजीपाला रासायनिक शेतीतील मालापेक्षा निश्चित सरस असतो. तो वापरायला सुरवात केली तर त्याचे दर रास्तच असल्याची ग्राहकाला खात्री पटते, असे कराळे सांगतात. रासायनिक शेतमाल दरांत सतत चढउतार असतात. आमचे दर मात्र कायम स्थिर असतात. सर्वसाधारण भाजीपाल्याचा किरकोळ विक्रीचा दर किमान ४० रुपये तर कमाल दर ८० रुपये राहतो, असेही ते सांगतात.
 

मालाची गुणवत्ता
कराळे म्हणाले की प्रयोगशाळेत माझ्या सेंद्रिय टोमॅटोचे पृथ्थकरण करून घेतले. त्यात रासायनिक शेतीतील टोमॅटोपेक्षा लायकोपीनचे प्रमाण अनेक पटीने आढळले. आणि त्याची टिकवणक्षमताही कितीतरी अधिक दिवसांची होती. ज्यावेळी टोमॅटोचे दर प्रचंड घसरले होते त्या वेळी मी माझ्या ग्राहकांना ही बाब अहवाल पुराव्यासहित समजावून सांगितली. त्या वेळी मी निश्चित केलेल्या दरांत कोणतीही घासाघीस न करता ग्राहकांनी तो खरेदी केला.

संपर्कः एकनाथ कराळे- ७०२०५८५९८३, ९८५०५०१२७७

 


फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
‘गोकूळ’चे दूध आता टेट्रापॅकमध्येही...कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाने (...
खाद्यतेल आयातशुल्क कपातीने सोयाबीन,...पुणे: केंद्र सरकारने खाद्यतेल आयातशुल्कात कपात...
कांदा लिलाव अखेर सुरूनाशिक: जिल्हा उपनिबंधकांनी तातडीने लिलाव सुरू...
केंद्र सरकार खाद्यतेल आयात शुल्क...नवी दिल्ली ः देशांतर्गत बाजारात खाद्यतेलाचे...
कांदा खरेदीनंतर अवधीच्या निर्णयात गोंधळ...नाशिक : बाजार समितीत कांदा खरेदी केल्यानंतर...
सांगली बाजार समितीत हळदीची उलाढाल २८०...सांगली ः कोरोना विषाणूमुळे बाजार समित्या बंद...
मोसंबी फळपिक विमा अर्जात गारपीटीचा कॉलम...पुणे ः आंबिया बहारातील मोसंबी, डाळिंब,...
पुरानं आमचं जगणंच खरवडून नेलंयसोलापूर ः नदीकाठी शेत असल्यानं दरवर्षी ऊस करतो,...
गुणवत्तापूर्ण सीताफळ उत्पादन हेच ध्येयबाजारपेठेचा अभ्यास आणि योग्य नियोजन केल्यास...
स्पॉन, अळिंबी उत्पादनाचा ‘कोल्हापूर...शिरटी (ता.शिरोळ,जि.कोल्हापूर) येथील उच्चशिक्षित...
धुके पडण्यास प्रारंभ...पुणे ः परतीचा मॉन्सून गेल्यानंतर राज्यातील...
मोह फुलांचा वाढेल गोडवाराज्यामध्ये ऐन नवरात्रीमध्ये मॉन्सून देवतेने...
देखो तो कहीं चुनाव है क्या?‘स रहद पर तनाव है क्या, देखो तो कहीं चुनाव है...
कांदा खरेदीनंतर व्यापाऱ्यांना मिळणार...नाशिक : बाजार समितीत कांदा खरेदी केल्यानंतर...
मराठवाड्यात साठ टक्के कपाशीवर गुलाबी...नांदेड : ‘‘मराठवाड्यात लवकर येणारे कापूस वाण...
कंपन्यांनी सर्वेक्षण न केल्यास विमा...पुणे: राज्यात विमा कंपन्यांनी पीक नुकसानीचे...
इथेनॉल दरात तीन रुपयांपर्यंत वाढकोल्हापूर : यंदाच्या हंगामात इथेनॉलनिर्मितीला गती...
एक लाख टन कांदा आयातीची शक्यतानवी दिल्ली ः देशातील कांदा दरवाढीवर नियंत्रण...
कापूस खरेदीसाठी तीस केंद्रे अंतिमनागपूर : गेल्या हंगामात नव्वद केंद्र आणि १५०...
फळ पीकविमा योजनेवर केळी उत्पादकांचा...जळगाव ः हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत केळी...