अडीच एकर क्षेत्राला मोगरा, लिलीचा मोठा आधार

विक्रीसाठी करार सेलू, मानवत, पाथरी या शहरांमध्ये फुलांना मागणी आहे. या ठिकाणच्या फुलांच्या व्यापाऱ्यांना फुलांची विक्री होते. त्यांना वर्षभर फुलांचा पुरवठा करण्याबाबत जाधव यांनी करार केले आहेत. त्यासाठी विक्रीचा दरही निश्चित केला आहे. त्यामुळे मार्केटमध्ये विविध कारणांनी दर कमी झाल्यानंतर होणारे नुकसान सोसावे लागत नाही.
 मोगऱ्याच्या कळ्यांचा तोडा करताना बबनराव (वडील) व मधुकर जाधव.
मोगऱ्याच्या कळ्यांचा तोडा करताना बबनराव (वडील) व मधुकर जाधव.

परभणी जिल्ह्यातील करंजी (ता. मानवत) येथील मधुकर जाधव यांची केवळ अडीच एकर शेती आहे.  मात्र, त्यातील सुमारे दीड एकरात मोगरा व लिली या फूल पिकांतून त्यांनी वर्षभर हमखास उत्पन्नाचा मार्ग तयार केला आहे. व्यापाऱ्यांशी करार करून बांधीव दर मिळवले आहेत. अलीकडे सातत्याने उद्‍भवणाऱ्या दुष्काळी स्थितीतही या फूल शेतीनेच जाधव कुटुंबीयांच्या जीवनात आर्थिक स्थैर्याचा सुगंध तयार केला आहे.  परभणी जिल्ह्यातील करंजी (ता. मानवत) येथील मधुकर बबनराव जाधव यांचे दोन भावांचे कुटुंब आहे. करंजी शिवारात मानवतरोड ते सेलू रस्त्याच्या बाजूला त्यांची अडीच एकर वडिलोपार्जित शेती आहे. पैकी मधुकर शेती कसतात, तर धाकटे मुंजाभाऊ शिवणकाम करतात. मध्यम ते भारी प्रकारची जमीन असलेली शेती सुरवातीला कोरडवाहू होती. त्या वेळी संपूर्ण अडीच एकरांवर या भागातील प्रमुख नगदी पीक असलेल्या कपाशीची लागवड असे. शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्यामुळे दरवर्षी उत्पादनाची खात्री नसायची. त्यातच बाजारभावाची हमी नसल्याने  उत्पन्नालाही मर्यादा असायच्या. मधुकर यांनी गावात किराणा मालाचा व्यवसाय सुरू केला. त्यातून उत्पन्नाचा पर्यायी स्रोत उपलब्ध झाला.  सिंचनाची सोय केली  शेती आणि व्यवसायातील उत्पन्नातून कुटुंबाच्या गरजा भागू लागल्या. काही प्रमाणात बचतदेखील होऊ लागली. शेतीतील शाश्वतीसाठी ओलिताची सुविधा निर्माण करणे आवश्यक होते. त्यासाठी २००० मध्ये जाधव यांनी स्वखर्चाने ५० फूट खोल विहीर खोदली. सिंचनाची सुविधा निर्माण झाल्यानंतर पीकपद्धतीत बदल केला. वांगे, पालक आदी भाजीपाला पिकांचे उत्पादन घेण्यास सुरवात केली. सोबतच एक एकर क्षेत्रावर कपाशीचे किंवा सोयाबीन, तूर आदींचे उत्पादन सुरू झाले.  फूल शेतीचा पर्याय  भाजीपाला शेतीत जम बसला. दररोजचे उत्पन्न मिळू लागले. मग अन्य व्यवसायांपेक्षा पूर्णवेळ शेती करण्याचा निर्णय घेतला. भाजीपाला उत्पादकांची संख्या भरपूर आहे. मार्केटमध्ये आवक वाढल्यास  दर कोसळून नुकसान होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे जाधव यांनी दररोज उत्पन्न देऊ शकणाऱ्या  व या भागात फारसे शेतकरी करीत नसलेल्या फूल शेतीची निवड केली. सन २००८-०९ च्या दरम्यान  १० गुंठे क्षेत्रावर गुलाब लागवडीद्वारे फूल शेतीचा श्रीगणेशा केला. त्यापुढील वर्षी १० गुंठ्यांत मोगरा आणि २० गुंठे क्षेत्रावर लिलीची लागवड केली. पाणी कमी पडू लागल्याने गुलाब क्षेत्र कमी केले. यंदा १० गुंठ्यांत निशिगंधाची लागवड केली आहे. पाणी उपलब्ध झाल्यानंतर गुलाब लागवडीचे नियोजन असेल.  विक्रीसाठी करार  सेलू, मानवत, पाथरी या शहरांमध्ये फुलांना मागणी आहे. या ठिकाणच्या फुलांच्या व्यापाऱ्यांना फुलांची विक्री होते. त्यांना वर्षभर फुलांचा पुरवठा करण्याबाबत करार केले आहेत. त्यासाठी विक्रीचा दरही निश्चित केला आहे. त्यामुळे मार्केटमध्ये विविध कारणांनी दर कमी झाल्यानंतर होणारे नुकसान सोसावे लागत नाही.  जाधव यांचे सध्याचे पीक नियोजन 

  • संपूर्ण क्षेत्र - २.५ एकर 
  • मोगरा - १० गुंठे 
  • लिली - २० गुंठे 
  • निशिगंध - १० गुंठे (अलीकडेच हे पीक निवडले) 
  • अन्य क्षेत्रात - कपाशी, सोयाबीन, तूर 
  • उत्पादन, उत्पन्न  मार्च ते जून हा मोगऱ्याचा हंगाम बहरात असतो. या एकूण हंगामात एकूण ५ क्विंटल कळ्यांचे उत्पादन मिळते. यंदा दुष्काळात ते दोन ते अडीच क्विंटलपर्यंतच मिळाले. केलेल्या करारानुसार २०० रुपये प्रतिकिलो दर मिळतो. पावसाळ्याचे ठरावीक महिने वगळता लिलीचा हंगाम असतो. लिलीच्या कळ्या तोडल्यानंतर गड्ड्या बांधल्या जातात. प्रत्येक गड्डीत ४० कळ्या असतात. हंगाम बहरात असताना दररोज २०० पर्यंत गड्ड्या निघतात. लिलीच्या प्रतिगड्डीस वर्षातील सहा महिने पाच रुपये, तर उर्वरित महिने १० रुपयांपर्यंत दर मिळतो. एकूण फूल शेतीतून दरवर्षी सरासरी दोन ते अडीच लाख रुपये उत्पन्न मिळते.  अन्य पिकांमध्ये कपाशीचे एकरी १० ते १२ क्विंटल, तर सोयाबीनचे ८ ते १० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते.  किफायतशीर फूलशेती  कपाशीचा उत्पादन खर्च वाढला आहे. कपाशीच्या तुलनेत मोगऱ्यावर किडी-रोगांचा कमी प्रादुर्भाव होतो. या फुलाला वर्षभर मागणीही असते. दुष्काळात पाणी कमी पडले तरी पुढे पाणी उपलब्ध झाल्यानंतर फुटवाही येतो, हा फायदा फूल पिकांत मिळतो, त्यामुळे अन्य कोणत्याही पिकापेक्षा ही फूल शेती परवडण्याजोगी असल्याचे जाधव सांगतात. त्यांच्याकडे जनावरे नाहीत. मात्र, गरजेनुसार शेणखत विकत घ्यावे लागते.  पाण्याचा काटेकोर वापर अलीकडील काही वर्षांपासून पाऊस कमी पडत असल्यामुळे विहिरीत पाण्याची उपलब्धता कमी राहात आहे. उपलब्ध पाण्याचा काटेकोर वापर करण्यासाठी फूल शेती तसेच कपाशीला ठिबकद्वारे पाणी दिले जाते.  शेतीत राबतात कुटुंबातील सदस्य  गावापासून दोन किलोमीटर अंतरावर जाधव यांची शेती आहे. परंतु शेतात जाण्यासाठी जवळचा पक्का रस्ता नाही. त्यामुळे पावसाळ्याचे चार महिने लांबून सहा ते सात किलोमीटर अंतरावरून ये-जा करावी लागते. त्यातच जमीनधारणा क्षेत्र कमी असल्याने सुरवातीपासून बैलजोडी नाही. पेरणीपूर्व मशागत, आंतरमशागतीची कामे भाडेतत्त्वावर बैलजोडी आणून किंवा ट्रॅक्टरद्वारे करून घेण्यात येतात. मधुकर आणि वडील बबनराव व्यवस्थापन तसेच फुलांच्या तोडणीची जबाबदारी सांभाळतात.  घरातील अन्य सदस्यही त्यांना हातभार लावतात. फुलांच्या हंगामात मजुरांची मदतही घेतली जाते. तोडणीनंतर कापडामध्ये व्यवस्थित बांधून मोटारसायकलवरून व्यापाऱ्यांकडे फुले पोचवण्याचे काम मधुकर करतात. दोन ते अडीच एकर शेती तसेच सिंचनाची व्यवस्था असल्यास अशा अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी दररोजचे उत्पन्न देणारी फूल शेती किफायतशीर ठरते. त्यामुळे मजुरांवरील अवलंबित्व तसेच खर्च कमी झाल्यामुळे अधिक फायदा होतो, असा जाधव यांचा अनुभव आहे. 

    संपर्क- मधुकर जाधव - ९९७५००२४११

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com