व्यापार युद्धामुळे अमेरिकेचा कापूस दबावात

व्यापार युद्धाने कापूस बाजारासंबंधी महत्त्वाच्या असलेल्या सर्व आशियाई देशांवर परिणाम केला असून, निर्यात रखडत सुरू आहे. अमेरिकन व भारतीय कापसाचे दर एकसारखेच झाले आहेत. कारण अमेरिकेला कुठल्याही स्थितीत आपल्या कापूस गाठी आंतरराष्ट्रीय बाजारात विकायच्या आहेत. - दिनेश हेगडे, कापूस निर्यातदार, मुंबई
कापूस
कापूस

जळगाव ः व्यापार युद्धाच्या झळा चीनप्रमाणेच अमेरिकेला बसू लागल्या असून, जगात क्रमांक एकचा कापूस निर्यातदार देश असलेल्या अमेरिकेला आपल्या कापूस गाठींच्या विक्रीसाठी दरात मोठी घट करावी लागली आहे. अमेरिकेच्या २७ व २८ मिलिमीटर लांब धाग्याच्या कापूस गाठींचे दर व भारतातील दर्जेदार रुईसाठी प्रसिद्ध असलेल्या गुजरातच्या शंकर-६ या कापूस गाठींचे दर आजघडीला एकसारखेच झाले आहेत.  चीन-अमेरिकेतील व्यापार युद्धामुळे कापड उत्पादनात अग्रेसर असलेल्या चीनसह तुर्कीच्या चलनाचे मागील काही महिन्यांमध्ये सतत अवमूल्यन झाले आहे. कापड, सूत व रुईच्या दरात १५ टक्के दरवाढ अपेक्षित आहे. अन्यथा वस्त्रोद्योगासमोर वित्तीय अडचणी आणखी वाढतील, असे संकेत जाणकारांकडून मिळत आहेत.  अमेरिका जगातील क्रमांक एकचा कापूस निर्यातदार आहे. यापाठोपाठ भारत व ऑस्ट्रेलिया कापूस गाठींची निर्यात करतात. २०१७-१८ मध्ये भारताने ६७ लाख गाठींची निर्यात केली. यातील ५० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक गाठींची निर्यात बांगलादेशात झाली होती. यंदा समारे ५५ ते ५६ लाख गाठींच्या निर्यातीची अपेक्षा आहे. परंतु जगातील आघाडीच्या कापूस निर्यातदार असलेल्या अमेरिकेच्या कापूस गाठींवर चीनने मोठे आयात शुल्क लावले आहे. अमेरिकेतून चीनमध्ये कापूस निर्यात जवळपास ठप्प आहे. अमेरिकेने २०१७-१८ च्या हंगामात २०३ लाख गाठींची निर्यात केली. सर्वाधिक निर्यात आशियाई देशांमध्ये केली. चीन अमेरिकेच्या निम्मे कापूस गाठींचा खरेदीदार असलेला देश म्हणून जगात ओळखला जातो. कारण चीनला दरवर्षी किमान ५५० ते ६०० लाख गाठींची गरज असते. अर्थातच चीन जगातला सर्वांत मोठा कापूस आयातदार देश आहे.  चीनमध्ये पीक नियोजनाच्या सूत्रामुळे कापसाचे उत्पादन ३५० ते ३६५ लाख गाठींपर्यंत येते. मग उर्वरित गाठींची आयात चीन अमेरिका, ऑस्ट्रेलिया व भारताकडून करतो. परंतु मागील हंगामा जसे चीन व अमेरिकेत व्यापार युद्ध सुरू झाले, तशी अमेरिकेच्या कापूस गाठींच्या निर्यातीवरही परिणाम झाला. अमेरिकेत २३८ लाख गाठींच्या उत्पादनाचा अंदाज आहे. या म्हणजेच २०१८-१९ च्या हंगामात अमेरिकेने १९२ ते १९३ कापूस गाठींची निर्यात करायचे उद्दिष्ट ठेवले आहे. कारण अमेरिकेत जिनिंग प्रेसिंग कारखाने, सूतगिरण्या व कापड उद्योग अपवाद वगळता नाही. कारण मजुरांची अडचण अमेरिकेत मोठी आहे. अर्थातच वस्त्रोद्योग आशियाई देशांमध्ये आहे. चीनमध्ये अमेरिकेतून तेवढ्या कापसाची निर्यात अपेक्षित होती, तेवढा कापूस चीनमध्ये जात नसल्याचे लक्षात घेता अमेरिकेने आपल्या रुईचे किंवा कापूस गाठींचे दर खाली आणले आहेत.  अमेरिकेच्या २७ ते २८ मिलिमीटर लांब धाग्याच्या कापूस खंडीचे दर (३५६ किलो रुई) ४२ ते ४३ हजार रुपयांपर्यंत आहेत. एवढेच दर भारताच्या रुईचे आहेत. देशातील रुईचा नामांकित ब्रॅंड असलेल्या शंकर -६चे दरही अमेरिकेच्या खंडीएवढेच झाले आहेत. जवळपास ४८ दिवसांपूर्वी भारतीय खंडीच्या तुलनेत अमेरिकेची खंडी दोन ते अडीच हजार रुपयांनी अधिक मिळत होती. कापूस बाजारासंबंधी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या न्यूयॉर्क वायदामध्ये कापूस दर ७३ सेंटवर आले आहेत, अशी माहिती जाणकारांनी दिली. भारताला सर्वाधिक अडचण सूत निर्यातीसाठी येत आहे. तर रुईची निर्यातही रखडत सुरू आहे. देशातून सुमारे २० ते २२ लाख गाठींची निर्यात बांगलादेश व इतर आशियाई देशांमध्ये झाली आहे.  परकीय चलनाची अडचण परकी चलन कमविण्यासंबंधी चीन व इतर आशियाई देशांसमोर व्यापार युद्धामुळे अडचणी येत आहेत. अशातच चीनच्या चलनाचे मागील काही महिन्यांत १० टक्‍क्‍यांनी, तर तुर्कीच्या चलनाचे महिनाभरात पाच टक्‍क्‍यांनी अवमूल्यन झाले आहे. पाकिस्तानचे चलन असलेला रुपया डॉलरसमोर कमजोर होत असून, त्यांना १४२ रुपयांत एक डॉलर पडत आहे. तर बांगलादेशचे चलन असलेले टाकाही अवमूल्यनाचा सामना करीत असून, एक डॉरलसाठी बांगलादेशला ८५ ते ८६ टाका मोजावे लागत आहेत. पाकिस्तान, बांगलादेश, चीन, तुर्की हे सर्व देश भारतीय रुईचे खरेदीदार असून, त्यांना भारतीय रुई महाग पडू लागली आहे. कारण त्यांच्यासाठी डॉलर महाग झाला आहे.  प्रतिक्रिया चीन व अमेरिकेतील व्यापार युद्ध संपुष्टात येऊन निर्यातवाढ झाली तरच कापूस बाजारातील मंदी दूर व्हायला मदत होईल. अपेक्षित सूत निर्यात सध्या चीन व तुर्कीमध्ये होत नाही. कारण त्यांच्या चलनाचे अवमूल्यन झाल्याने त्यांना आपले सूत, रुई महाग पडत आहे. - दीपकभाई पाटील, संचालक, अखिल भारतीय वस्त्रोद्योग महासंघ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com