तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रण

 तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रण
तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रण

काही दिवसांपासून असलेले ढगाळ वातावरण तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीसाठी पोषक आहे. या किडींचा प्रादुर्भाव कळ्या व फुले लागल्यापासून शेंगांपर्यंतच्या काळात आढळून येतो. शेंगा पोखरणाऱ्या अळ्या सुरवातीला पिकाच्या कोवळ्या पानांवर, फुलांवर किंवा शेंगांवर उपजीविका करतात. नंतर शेंगा भरतेवेळी दाणे खात असल्याने कोवळ्या दाण्याचे सुमारे ६०-८० टक्के नुकसान होते. किडीची ओळख- शेंगा पोखरणारी अळी (Pod Borer) : शास्त्रीय नाव ः हेलिकोवर्पा आर्मिजेरा. तूर पिकावरील शेंगा पोखरणाऱ्या अळीचा रंग हिरवट पिवळसर असून, अंगावर तुरळक समांतर रेषा असतात. एक मादी मादी कोवळी पाने, कळ्या, फुले तसेच शेंगावर सरासरी ८०० अंडी घालते. एक अळी सुमारे ३० ते ४० शेंगांना नुकसान करून आपली अवस्था पूर्ण करते. या अळीचा जीवनक्रम ४ ते ५ आठवड्यात पूर्ण होतो. १) सध्या तूर पीक फुले व शेंगा लागण्याच्या अवस्थेत आहे. सद्यःपरिस्थितीत तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळीचे पतंग मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. या किडीच्या अळ्या कळ्या व फुलांवर दिसू लागल्या आहेत. २) सध्या आढळणारी कीड ही अंडी अवस्था, प्रथम अवस्थेतील अळी असून, वेळीच उपाययोजना केल्यास कमी खर्चात किडींचे नियंत्रण करता येते. ३) प्रथिनांचे प्रमाण जास्त असलेल्या दाण्यावर अळी उपजीविका करते. उपाययोजना १) तुरीमध्ये एकरी चार कामगंध सापळे (फेरोमोन ट्रॅप्स) पिकांपेक्षा एक फूट उंचीवर लावावेत. २) तुरीवरील मोठ्या अळ्या वरचेवर वेचून त्यांचा नायनाट करावा. ३) पीक कळी अवस्थेत असताना ५ टक्के निंबोळी अर्क किंवा कडूनिंबयुक्त कीटकनाशक (ॲझाडिरेक्टीन १० हजार पीपीएम) ३ ते ५ मि.लि प्रति लिटर या प्रमाणे फवारणी करावी. ४) घाटे अळी लहान अवस्थेत असताना एच.ए.एन.पी.व्ही. (२५० एल.ई.) विषाणूजन्य कीटकनाशकाची १ मि.लि. प्रति लिटर पाणी प्रमाणे हेक्टरी ५०० लिटर पाणी घेऊन फवारणी करावी. ५) जर किडींचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसानाच्या पातळीच्या वर आढळून आल्यास फवारणी प्रति लिटर पाणी क्विनॉलफॉस (२५ टक्के प्रवाही) २.८ मि.लि. किंवा लॅंबडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के प्रवाही) १ मि.लि. अळीचा प्रादुर्भाव जास्त असल्यास इमामेक्टीन बेंझोएट (५ टक्के) ०.५ ग्रॅम किंवा फ्ल्युबेन्डायअमाईड (३९.३५ एस.सी.) ०.२ ग्रॅम किंवा स्पिनोसॅड ०.२५ मिली पुढील फवारणी १० दिवसांच्या अंतराने कीडनाशक बदलून करावी. डॉ. पी. आर. झंवर (सहयोगी प्राध्यापक), ७५८८१५१२४४ योगेश मात्रे (पी.एचडी. विद्यार्थी), ७३८७५२१९५७ (कृषी कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com