ठिबक सिंचनासाठी पंप निवड करताना

ठिबक सिंचनासाठी पंप निवड करताना
ठिबक सिंचनासाठी पंप निवड करताना

महाराष्ट्रामध्ये शेतकरी विविध पिकांसाठी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करतात. मात्र, पिकांना योग्य प्रमाणात पाणीपुरवठा होण्यासाठी पंपाची निवड करण्यासंदर्भात काही तांत्रिक मुद्दे मागील टेक्नोवनमध्ये पाहिले, या भागामध्ये एका उदाहरणासह ते समजून  घेऊ. 

ठिबक सिंचन व्यवस्थित चालण्यासाठी  पाण्याचा एक ठराविक दाब आवश्यक असतो. त्याविषयीच्या तांत्रिक बाबी मागील भागामध्ये पाहिल्या होत्या. या भागामध्ये केळी पिकाच्या एक हेक्टर लागवड क्षेत्रासाठी पंपाची क्षमता मिळवण्याचे गणित कसे करायचे, ते समजून घेऊ. 

केळी पिकाचे दोन झाडातील अंतर    १.५ मी.,  दोन ओळीतील अंतर    १.५ मी.,  ड्रिपरचा प्रवाह दर    ४ लि/तास 

  • ठिबक सिचन संचातील इमीटर्स/ड्रीपर्समधून निश्‍चित केलेल्या प्रवाह दराने पाणी मिळण्यासाठी लागणारा पाण्याचा कमीत कमी दाब  (मी)  = १ kg/cm२ = १० मीटर
  • विहीर किंवा बोअरवेलमधील स्थिर पाण्याची पातळी व जवळच्या जमिनीचा पृष्ठभाग यामधील उभे अंतर (मी) (HL) = ३० मीटर (उदाहरणादाखल, प्रत्यक्षात मोजून घ्यावे)
  • विहीर किंवा बोअरवेलजवळील जमिनीचा पृष्ठभाग व ज्या क्षेत्रामध्ये ठिबक संच बसवायचा आहे त्या क्षेत्राचा पृष्ठभाग यातील उभे अंतर (मी) (Hd)= २  मीटर (उदाहरणादाखल, प्रत्यक्षात मोजून घ्यावे)
  • फिल्टर व वॉल्व्हमध्ये घर्षणामुळे होणाऱ्या पाण्याच्या दाबाचा अपव्यय (Hfv) = २ ते ३ मीटर.
  •  मेन लाइनमध्ये घर्षणामुळे होणा­ऱ्या पाण्याच्या दाबाचा अपव्यय (मी).  मागील भागामध्ये दिलेल्या तक्ता क्र. १ मधून योग्य किमतीची निवड करावी   
  •  बोअरवेलमधील पंपाला जोडलेल्या पिव्हीसी पाइपमध्ये घर्षणामुळे पाण्याच्या दाबाचा अपव्यय  Hfm (मी) ​ खालील माहितीचा उपयोग करून मेनलाइनमध्ये घर्षणामुळे होणाऱ्या पाण्याच्या दाबाचा अपव्यय (मी.) मागील भागामध्ये दिलेल्या तक्ता क्र.१ चा उपयोग करून काढता येतो. 

    अ)  पीव्हीसी मेन पाइपचा आकार    ७५ मि.मी. 

    ब)  पीव्हीसी मेन पाइपची लांबी    २०० मी.

    क) पीव्हीसी मेन पाइपमधील प्रवाह दर    ४.९४ लि./सें.  = ५ लि/सें.

     तक्ता क्र.१ वरून, ५ लि./से. प्रवाह दर ७५ मी.मी. आकाराच्या पीव्हीसी मेन पाइपमधून वाहत असल्यास प्रति १०० मी. लांबीच्या पीव्हीसी पाइपमध्ये १.९५ मी. घर्षणामुळे अपव्यय होतो. पीव्हीसी मेन पाइपची लांबी २०० मी. आहे.

    घर्षणामुळे पाण्याच्या दाबाचा अपव्यय (मी.) = ? = प्रति १०० मी. पीव्हीसी पाइपमध्ये घर्षणामुळे होणारा पाण्याच्या दाबाचा अपव्यय x  पीव्हीसी पाइपची एकूण लांबी =  १.९५ x २०० /१००  =  ३.९० मी. ड) बोअरवेलमधील पीव्हीसीमध्ये घर्षणामुळे पाण्याच्या दाबाचा अपव्यय HS बोअरवेलमधील पीव्हीसी पाइपची लांबी  = ३० मी., पीव्हीसी पाइपचा आकार = ७५ मी. मी. HS        =  १.९५ x  ३० /  १००              =  ०.५८५ मी. एकूण पंपाचा दाब (TH)  =  HO + HL + Hd +Hfm + Hfv+ HS =  १०+३०+२+३+३.९०+ ०.५८५ =  ४९.४८  मी.  =   ५० मीटर  पंपाचा प्रवाह दर ः पंपाचा प्रवाह दर काढण्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीखाली घेण्यात येणा­ऱ्या पिकाची माहिती, पिकाखालील क्षेत्र, एकाच वेळी ठिबक सिंचनाने भिजवायचे क्षेत्र, तसेच एका झाडाजवळ दिलेल्या ड्रीपरची संख्या व प्रवाह दर पिकाच्या रांगेतील व दोन झाडातील अंतर इत्यादी माहिती आवश्यक आहे.  खालील उदाहरणावरून आपणास ठिबक सिंचन संचासाठी पंपाचा प्रवाह दर किती असावा हे समजून घेता येईल. समजा, शेतकऱ्यास एक हेक्टर क्षेत्रावर १.५ मी. x १.५ मी. अंतरावर केळी पिकाकरिता ठिबक सिंचन संच बसवायचा आहे. केळीच्या प्रत्येक झाडाजवळ ४ लिटर प्रति तास प्रवाह दर असणारे ड्रिपर्स/ ईमिटर्स लॅटरलला दिलेले आहे. तर एकूण प्रवाह दर किती असावा? केळीच्या दोन रांगेमधील अंतर   =  १.५ मी.     केळीच्या दोन झाडातील अंतर   = १.५ मी. एका केळीच्या झाडासाठी लागणारे क्षेत्र  = १.५मी. x १.५मी. = २.२५ वर्ग मी.,       (एक हेक्टर = १०,००० वर्ग मी.) एक हेक्टर क्षेत्रामध्ये एकूण केळीच्या झाडांची संख्या =  एकूण क्षेत्र/एका केळीच्या झाडासाठी  लागणारे क्षेत्र  =  १०,००० वर्ग मी./२.२५ वर्ग मी. = ४४४४

    एक हेक्टर क्षेत्रास लागणारा पंपाचा प्रवाह दर  = एकूण झाडांची संख्या x ड्रिपरचा प्रवाह दर    = ४४४४ x४   = १७७७६ लिटर/ तास, (१ तास   = ६० मिनिटे  = ६० x ६० सेकंद  = ३६०० सेकंद ) प्रवाह दर (Q)       =  १७७७६/३६००                              = ४.९४ लि/से.                             = ५ ली./से.     

    एक हेक्टर क्षेत्रास एकाच वेळी ठिबक संचाचे पाणी देण्यासाठी पंपाचा प्रवाह दर ५.० लिटर प्रति सेकंद असावयास पाहिजे. तसेच एकाच वेळी एक हेक्टर क्षेत्रास ठिबक सिंचन संचाने पाणी देण्याऐवजी अर्ध्या हेक्टर क्षेत्रास पाणी दिल्यास पंपाचा प्रवाह दर २.५ लिटर प्रति सेकंद असावयास पाहिजे. एका वेळी किती क्षेत्रास ठिबक सिंचनाचे क्षेत्र भिजवायचे हे पाण्याची उपलब्धता व एका सबमेन खाली किती क्षेत्र आहे यावर अवलंबून आहे. अशा पद्धतीने आपण घेत असलेल्या पीक व क्षेत्राची माहितीच्या आधारे तसेच पिकाची पाण्याची गरज या बाबीवरून पंपाचा प्रवाह दर ठरवावा.

    पंपाची हॉर्स पॉवर (HP) कशी काढावी?  हॉर्स पॉवर (HP) =  पंपाचा प्रवाह दर (Q) x एकूण पाण्याचा दाब (TH)/७५ x पंपाची कार्यक्षमता x मोटारची कार्यक्षमता

  • प्रवाह दर (Q)    ५ लि/सें.
  • एकूण पाण्याचा दाब (TH)    ५० मी.
  • पंपाची कार्यक्षमता (p)    ०.७५,  
  • मोटारची कार्यक्षमता (m)    ०.८०
  • साधारणपणे ५ एच. पी. पेक्षा कमी एच.पी. च्या पंपाची कार्यक्षमता ०.६० ते ०.७०  व ५ एच.पी. पेक्षा जास्त एच.पी. च्या पंपाची कार्यक्षमता ०.७५ गृहित धरावी तर साधारणपणे इलेक्ट्रिक मोटारची कार्यक्षमता ०.८०  गृहित धरावी.

    पंपाची हॉर्स पॉवर  =     ५ x ५० / ७५ x०.७५ x ०.८०                        =  २५० / ४५                         =  ५.५५                          =  ६.० बाजारामध्ये ५.५५ एच.पी. पंप उपलब्ध नसतो, त्यामुळे ६ एच.पी.चा पंप निवडावा.  पंप विक्रेत्याकडे विविध पंप उत्पादन कंपन्यांच्या विशिष्ट एच.पी.च्या पंपाचे प्रवाह दर व एकूण पाण्याचा दाब, या संदर्भातील तक्ते उपलब्ध असतात. त्या तक्त्यांचा उपयोग करून आपणास ठिबक सिंचन संचासाठी आवश्यक प्रवाह दर व एकूण आवश्यक पाण्याचा दाब यासाठी किती एच.पी.चा पंप लागेल याची निवड करता येणे शक्य आहे. पंप विक्रेत्यास आवश्यक प्रवाह दर (Q) व एकूण आवश्यक पाण्याचा दाब (TH) ही माहिती उपलब्ध करून दिल्यास आपणास योग्य एच.पी.चा, पंप ठिबक सिंचन संच कार्यक्षमरीत्या कार्य करण्यासाठी निवडता येणे शक्य आहे. वरील उदाहरणामधील परिस्थीतीनुसार पंप निवडताना पंपाचा प्रवाह दर (Q) ५ लि./सें. व एकूण पाण्याचा दाब (TH)  ५० मी. असावा लागेल.  वरीलप्रमाणे मार्गदर्शक बाबींची माहिती  संकलित करून आपल्या क्षेत्रावरील ठिबक सिंचन पद्धतीकरिता योग्य पंपाची निवड करावी. ठिबक सिंचन पद्धती कार्यक्षमपणे चालून पाण्याचे समान वितरण होईल.  

     ः डॉ. अशोक कडाळे, ७५८८०८२०६७,   ः प्रा. गजानन गडदे, ०२४५२-२२१९३८   (अखिल भारतीय समन्वयित सिंचन पाणी व्यवस्थापन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com