उसामध्ये शून्य मशागतीसह तण व्यवस्थापन

उसामध्ये शून्य मशागतीसह तण व्यवस्थापन
उसामध्ये शून्य मशागतीसह तण व्यवस्थापन

या वर्षी महापुरांच्या स्थितीमध्ये प्रचंड नुकसान झाल्याच्या स्थितीमध्ये उसामध्ये शून्य मशागत तंत्र आणि तण व्यवस्थापनाचा मंत्र राबवण्याविषयी चर्चा घडून यायला हवी. माझ्या स्वतःच्या अनुभवावरून तणनाशकांच्या वापरासह काही तंत्र बसवली आहेत. त्याचा फायदा सर्वांना होऊ शकेल, असे वाटते. चालू वर्षी ऊस उत्पादक पट्ट्यामध्ये महापुराच्या स्थितीमुळे उसाच्या उत्पादनामध्ये व साखरेच्या उताऱ्यामध्ये घट होणार आहे. अतिरिक्त साखर उत्पादनाची समस्या हलकी होईल. मात्र, लागवडीचे क्षेत्र कमी झाल्याने उत्पादन घटणे व अतिवृष्टीमुळे उत्पादन घटणे यात अर्थशास्त्रीय फरक आहे. चालू वर्षातील साखर उत्पादन घट ही शेतकऱ्यांनी ऊस शेतीवर संपूर्ण खर्च केल्यानंतर महापुराने झालेली घट आहे. इथे शेतकऱ्यांना मोठी आर्थिक झळ सोसावी लागली आहे. तेजी x मंदी चक्रातील उत्पादन घट-वाढीचे परिणाम वेगळे असतात. अशा संकटांना तोंड देण्यासाठी शेतकऱ्यांना सक्षम करणे ही विज्ञानाची जबाबदारी ठरते. ऊस शेतीतील उत्पादन खर्च न्यूनतम पातळीवर राखण्यासाठी भू-सूक्ष्म जीवशास्त्र व शून्य मशागत शेती शेतकऱ्याला आधार देऊ शकते.

  • शून्य मशागत तंत्रामुळे पूर्व मशागतीसारख्या मोठ्या खर्चात बचत.
  • मागील पिकाचे जमिनीखालील अवशेष व चालू पिकातील तण व्यवस्थापन यामुळे सेंद्रिय खताचा प्रश्‍न फुकटात सोडवता येतो. यात खरेदी, वाहतूक पसरणे, मिसळणे अशा खर्चात बचत. जमिनीला भरपूर सेंद्रिय खत मिळाल्याने जमिनीची सुपीकता टिकून राहते.
  • तण व्यवस्थापनामुळे मजूर खर्चात बचत. भावी काळासाठी मजुरांची कमतरता या समस्येला सामोरे जाण्यासाठी किमान मजुरांमध्ये शेती करण्याचे तंत्र अवलंबावे लागणार आहे.
  • सेंद्रिय कर्ब उच्च पातळीवर राहिल्याने रासायनिक खतांचा व पाण्याचा कार्यक्षम वापर होते. हाही विषय आजच्या परिस्थितीत अत्यंत महत्त्वाचा आहे.
  • उत्पादनाची प्रत व दर्जा सुधारणे. हा विषय गूळ उत्पादकांसाठी महत्त्वाचा आहे. दर्जा सुधारल्यामुळे उत्पन्नात भरघोस वाढ मिळविता येते. साखर कारखान्यासाठी व गूळ उत्पादनासाठी ऊस उत्पादनाच्या तंत्रात खूप मोठा फरक आहे. सध्या गूळ उत्पादक शेतकऱ्यांच्या प्राधान्यक्रमावरील हा विषय नसला तरी भविष्यामध्ये त्याला मागणी येणार आहे. इथे वरील तंत्र शेतकऱ्यांना उपयुक्त ठरू शकते.
  • साखर उतारा वाढणे हे साखर उद्योगासाठी महत्त्वाचे असले तरी शेतकऱ्याला जोपर्यंत वजनाप्रमाणे दर मिळतो आहे, तो शेतकरी त्याला महत्त्व देणार नाहीत. त्याच्या दृष्टीने एकरी किती टन उत्पादन मिळाले, इतकेच पुरेसे आहे. अर्थात, ही मानसिकता एकूण शेती, सहकार आणि साखर उद्योगाच्या दृष्टीने पूर्णपणे चुकीची आहे. शेतकरी व साखर उद्योग या दोघांसाठीही शून्य मशागत व तणव्यवस्थापनाचे सुचवलेले तंत्र उपयोगी ठरू शकते.
  • उसामध्ये शून्य मशागत व तणव्यवस्थापन करण्यासाठी  ऊस शेतीमध्ये पूर्वी ९० सें. मी. अंतरावर सऱ्या काढल्या जात व खांदणीचे काम बैलाद्वारे केले जाई. आता प्रामुख्याने पॉवर टिलरने खांदणी केली जात असल्यामुळे सऱ्या १५० सें. मी. वर पाडल्या जातात. सऱ्या रुंद झाल्यामुळे सुरुवातीच्या काळात तण व्यवस्थापन करण्यासाठी अधिक जागा उपलब्ध होते. उसाची लागवड, खोडवे व तिसऱ्या वर्षी फेरपालटाचे कोणतेही पीक घेऊन अगर थेट अडसाली लागवड शून्य मशागतीवर घेता येते. मी स्वतः सर्व उसाचे पाचट जागेवरच कुजविण्याचा प्रयोग १५ वर्षे केला. मात्र, त्यातून अपेक्षित उत्पादन वाढ मिळाली नाही. उलट पाला, पाचट व्यवस्थापन करण्यास मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात लागते. अलीकडे मनुष्यबळाची कमतरता असल्याने तडजोड म्हणून पाचट जाळावे लागत आहे. फेरपालट करावयाच्या वर्षी उन्हाळ्यात ३-४ महिने रानात मेंढरे चरतात. पुढे खरीप पिकाच्या पेरणीचे दिवस आल्यानंतर रानाला पाणी देऊन टोकण पद्धतीने अगर सरीत भात बियाणे फोकून दिले जाते. किंवा पॉवर टिलरने अवशेष मातीत मिसळून सरीत पाणी सोडल्यानंतर शून्य मशागतीवर पेरणी केली जाते. पेरणी झाल्यानंतर टोकण पद्धतीत पुन्हा एक पाणी दिल्यानंतर फोकून दिलेले पीक उगवते. पाणी दिल्यानंतर बहुतेक पिकांना उगवणीसाठी ५ दिवस लागतात. तत्पूर्वी ग्लायफोसेट तणनाशकाची फवारणी फक्त उसाच्या हिरव्या पानावर केली जाते. ३-४ महिने मेंढरानी खाल्ल्यामुळे खोडव्याची शक्ती आधीच कमी झालेली असते. तणनाशकाचा परिणाम होण्यासाठी जमिनीत २५-३० दिवस सलग ओलावा असणे गरजेचे आहे. पेरणीनंतर ओलावा मिळत असल्याने तणनाशकाचा योग्य परिणाम होतो. अनेक शेतकऱ्यांच्या मनात पेरणीपूर्वी की पेरणीनंतर तणनाशक मारावे, या बद्दल शंका असते. तणनाशकामुळे पिकाचे उगवणीवर काही परिणाम होईल का, अशी शंका असते. मात्र, हे तणनाशक आपण फक्त उसाच्या हिरव्या पानावर फवारत असतो. जमीन भिजवत नाही. फवारणी करतेवेळी काळजी घेऊनही काही थेंब जमिनीवर पडले तरी त्याचा फारसा वाईट परिणाम पिकाच्या उगवणीवर होत नाही, हे मी अनुभवाने सांगतो. उसाचे खोडके व मुळांचे जाळे जमिनीत पसरलेले असते. ते आहे त्या जागीच मृत झाल्यामुळे सेंद्रिय कर्बाची उपलब्धता होते. त्याचे जमिनीला व पुढील खरिपातील किंवा ऊस पिकाला प्रचंड फायदे होतात. हे खोडके व मुळांचे जाळे पुढील ५-६ महिने जमिनीत कुजत राहते. या कुजण्याच्या प्रक्रियेत अनेक सूक्ष्मजीवांना खाद्य मिळते. त्यांची सृष्टी वाढून खरीप अगर आडसाली ऊस पिकास फायदा होतो. या कुजण्याच्या क्रियेच्या फायद्यासंबंधी यापूर्वीच्या लेखात सविस्तर माहिती दिली होती. खरीप पीक घेऊन, त्याची काढणी झाल्यानंतर थेट आडसाली ऊस लागवड करण्यासाठी सरीच्या तळात फक्त नांगराचा एक तास मारून फक्त कांडी पुरण्यापुरती मशागत करून घ्यावी. नेहमीप्रमाणे लागवड करावी. मशागतीचा पिकाच्या वाढीसाठी कोणताही संबंध नाही. खरेतर सरी वरंबे काढून सरीच्या तळात कांडी पुरल्यानंतर त्या कांडीच्या खाली मशागत केलेले किती रान राहते, असा प्रश्‍न शेतकऱ्यांनी स्वतःला विचारून पाहावा. बहुतेक वेळेला कांडी खाली मशागत केलेले फारसे रान नसल्याचे आढळले. पुढील उसांच्या मुळांची वाढ ही मशागत न केलेल्या रानातच होत असते. आपली बहुतेक मशागत ही फक्त सरी वरंबे पाडण्यासाठी केल्याची स्थिती असते. म्हणून शेतकरी बंधूंनी चिंतन करावे. मशागतीचा अतिरेक करून व्यर्थ पैसा खर्च करू नये. इंधन बचत हा वेगळा मुद्दा आहे. मशागतीवर प्रचंड विश्‍वास असणारा मोठा शेतकरी वर्ग आहे. त्यांनी आपण उसाचे खोडवे व बहुवार्षिक तणांची बेटे मारण्यासाठी मशागत करत होतो, हे लक्षात घ्यावे. ती मारण्यासाठी तणनाशकाचा सोपा पर्याय उपलब्ध झाल्यावर पुन्हा जुन्याच विचारसरणीला किती दिवस चिकटून राहायाचे? उसाच्या सरीतील अंतर आता ९० सें. मी. वरून १४०-१५० सें. मी. पर्यंत वाढले. याला कारण बैलाऐवजी पॉवर टिलरने खांदणी लागवड केल्यानंतर लगेच ऊस १५० सें. मी. जागा व्यापत नाही. याला १०० ते १५० दिवस लागतात. या काळात मुख्य पिकाला त्रास होणार नाही, या पद्धतीने तणांचे व्यवस्थापन करण्यास खूप मोठा वाव आहे. एखादे मिश्रपिक घेणे अगर लागवडीपासून १०० टक्के जमीन तणमुक्त राखणे, ही पारंपरिक पद्धत आता हळूहळू सोडली पाहिजे. सुरुवातीला उसाजवळ तण उगवू नये म्हणून तणनाशकाचा वापर करावा. मधल्या ६०-७० सें. मी. च्या पट्ट्यात तण वाढवून तणनाशकाने योग्य वेळी मारावा. असे २-३ फेरे करता येतात. रानातच चांगल्या दर्जाचा सेंद्रिय कर्ब अगदी फुकटात व मोठ्या प्रमाणात करता येतो. जमिनीतील सूक्ष्म जीवशास्त्राचे ज्ञान न पोचल्यामुळे केवळ शेतकरीच नव्हे, तर कृषी तज्ज्ञही अद्यापही पशुपालनातून सुपीकता या विषयातच अडकलेले आहेत. जमिनीच्या व पिकांच्या गरजेइतके सेंद्रिय कर्ब उपलब्ध होत नसल्यामुळे ऊस शेतीचे, पर्यायाने शेतकऱ्यांचे अनेक अंगाने नुकसान होत आहे. या वर्षीच्या अतिवृष्टीने शेतीची झालेली वाताहत व नुकसान यामुळे तरी कमी खर्चाच्या शेतीकडे शेतकरी वळतील का?  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com