राज्यात आजही शीत लहर; पिकांचे नुकसान

वाढत्या थंडीमुळे द्राक्ष मण्यांची फुगवण मंदावली आहे. काही बागांमध्ये तडे जात असून व्यापारी लक्ष देत नसल्यामुळे द्राक्ष बाजारात मंदी आली आहे. व्यापारी काही ठिकाणी पडलेल्या भावात खरेदी करत आहेत. जर अशीच थंडी राहिली तर केलेला खर्च सुद्धा वसूल होऊ शकणार नाही. - अभिमन्यू वाघ, द्राक्ष उत्पादक, रानवड, ता. निफाड
थंडी परिणाम
थंडी परिणाम

पुणे  : उत्तरेकडून येणाऱ्या शीत लहरींनी केलेल्या स्वारीमुळे शनिवारी (ता.९) महाबळेश्वर, पुणे, नाशिकसह काही ठिकाणी दवबिंदू गोठल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भात आजही (ता. १०) थंडीची लाट कायम राहणार आहे. रात्रीबरोबरच दिवसही थंड ठरण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात आजपासून, तर मराठवाडा आणि कोकणात उद्या (ता.११) पाऊस पडण्यास पोषक हवामान आहे. तर मंगळवारी (ता.१२) उत्तर महाराष्ट्रात गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.  उत्तर भारतातील पश्चिमी चक्रावातामुळे देशाच्या उत्तर आणि मध्य भागातील राज्यांमध्ये थंडीची तीव्र लाट आली आहे. शुक्रवारपासून (ता.८) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर विदर्भात गारठा वाढला आहे. शनिवारी थंडीचा कडाका खूपच वाढला होता. यामुळे पिकांवर, जमिनीवर दवबिंदू गोठले. महाबळेश्वर येथील वेण्णालेक आणि स्ट्रॅाबेरीच्या बांगावर हिमकण जमा झाल्याचे दिसून आले. तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातही पिकांसह, पाइपलाइन, ठिबक सिंचनचे पाईप, उसाच्या पाचटावर बर्फाची चादर पाहायला मिळाली. द्राक्ष बागांमध्ये द्राक्षाच्या घडांवरही बर्फाचे थर साचले, तर थंडीमुळे द्राक्षमण्यांना तडे गेल्याने नुकसान झाले आहे. खानदेशात दोन दिवसांत किमान तापमान पुन्हा झपाट्याने कमी झाले आहे. हुडहुडी भरविणारी थंडी आल्याने केळीला फटका (चिलींग इंज्युरी) बसत असल्याची स्थिती आहे.  उत्तरेकडून जमिनीलगत वाहत असणाऱ्या शीत लहरींमुळे राज्याच्या अनेक भागात थंडीची लाट आली आहे. धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी २.५ अंश सेल्सिअस, नाशिक जिल्ह्यातील निफाड येथील गहू संशोधन केंद्रात ३ अंश, तर परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात ७.६ अंश किमान तापमानाची नोंद झाली आहे. राज्यात बहुतांशी ठिकाणी तापमान १० अंशांच्या खाली आले असून पुणे, नाशिक, सांगली येथे तापमानाचा पारा ६ अंशांच्या खाली घसरला आहे. रात्रीचे (किमान) तापमान १० अंशांपेक्षा कमी असेल आणि तापमानात सरासरीपेक्षा ४.५ अंशांची घट झाली असेल तर थंडीची लाट, तसेच ६.५ अंशांपेक्षा अधिक घट झाली असेल तरी ‘तीव्र लाट’ समजली जाते.  राज्यातील थंडीची लाट आज कायम राहणार असली तरी उद्यापासून (ता. ११) थंडी हळूहळू कमी होत जाण्याचा अंदाज आहे. दरम्यान राज्यात पुन्हा पावसाला पोषक हवामान होत आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकणात ढगाळ हवामानासह हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून होत असलेल्या बाष्पाचा पुरवठा आणि तापमानात झालेली घट यामुळे उत्तर महाराष्ट्रात मंगळवारी गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.  शनिवारी (ता. ९) सकाळी राज्यातील विविध ठिकाणचे किमान तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत तफावत (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ५.१(-६.३), नगर ६.१ (-६.९), जळगाव ८.०(-४.८), कोल्हापूर १३.१(-३), महाबळेश्‍वर ९.०(-५), मालेगाव ७.८(-३.३), नाशिक ४.०, सांगली ८.४(-७.१), सातारा ६.८(-६.१), सोलापूर १२.१(-५.६), सांताक्रुझ ११.०(-६.५), अलिबाग १३.२(-४.४), रत्नागिरी ११.७(-७.३), डहाणू १३.०(-४.६), आैरंगाबाद ६.५(-७.०), परभणी ११.० (-४.८), नांदेड ९.५ (-४.७), अकोला १०.०(-५.४), अमरावती ९.०(-७.३), बुलडाणा ९.२ (-६.८), चंद्रपूर १३.२(-२.८), गोंदिया १२.४(-२.६), नागपूर ८.९(-५.८), वर्धा १३.०(-१.६), यवतमाळ १०.४(-६.०). थंडीचा परिणाम

  •   द्राक्ष मण्यांना तडे जात आहेत
  •   तयार द्राक्ष लाल पडत आहेत
  •   द्राक्ष मण्यांच्या निर्यातक्षम आकारावर परिणाम
  •   द्राक्षांमध्ये साखर उतरण्यास विलंब 
  •   भुरी रोगासह वेली आणि पाने सुकत आहेत
  •   स्ट्रॉबेरी पिकावर करपा वाढण्याची शक्यता
  •   डाळिंबाची फुलगळ होण्याची भीती
  • प्रतिक्रिया आमच्या परिसरात सातत्याने थंडी आहे. मात्र शनिवारी थंडीत अचानक वाढ झाली. याचा परिणाम द्राक्ष पिकांवर होणार आहे. या थंडीमुळे द्राक्षाला क्रॅकिंग होण्याबरोबरच भुरीचा प्रादुर्भाव होणार आहे. - अनिल दबडे,  द्राक्ष उत्पादक शेतकरी, कलेढोण, जि. सातारा

    दोन- तीन दिवसांपासून रात्री जोरात वारे वाहत आहेत. मात्र शनिवारी (ता. ९) पहाटे पिकांच्या पानांवर दवबिंदू गोठल्याने पाने काळी पडली. याचा जास्त फटका कोवळ्या पिकांना झाला. मी आता ३ एकर काकडी आणि १ एकर झेंडू लावला आहे. ही पिके उगवणीच्या अवस्थेत असून, त्यांची पाने काळी पडली आहेत.  - राजू कोंडे,  धामणखेल, ता. जुन्नर थंडीचा परिणाम

  •     गहू ः  फुटवे आणि दाणे वाढण्यासाठी सध्याची थंडी फायदेशीर आहे.
  •     हरभरा ः हवामान पीक वाढीस पोषक आहे. परंतु पाच अंश सेल्सिअस तापमान जास्त दिवस राहिले तर पीक वाढीवर परिणाम होतो. 
  •     भुईमूग, सूर्यफूल, तीळ ः सध्या जेथे पेरणी झाली आहे तेथे उगवण संथ गतीने होईल. मात्र वाढीच्या टप्प्यातील पिकावर थंडीचा वाढीवर फारसा परिणाम होणार नाही.
  •     ऊस ः नवीन लागवडीच्या वाढीवर परिणाम होईल. मात्र थंडीमुळे उसात साखरेचे प्रमाण चांगले राहील.
  •     द्राक्ष ः  माळरानावरील हलक्या जमिनीचा भाग, तसेच नदी, तलाव किंवा नाले असे पाण्याचे स्रोत जवळ असलेल्या व खोलगट भागात तापमान अधिक घटू शकते. अशा भागांमध्ये बागेला थंडीमुळे नुकसान पोचू शकते. ज्या ठिकाणी तापमान ४ ते ५ अंश सेल्सिअसपेक्षा कमी होण्याची शक्यता आहे, अशा ठिकाणी पहाटे लवकर बागेच्या जवळपास शेकोट्या पेटवाव्यात. ज्या दिशेने बागेकडे हवा येते, त्या दिशेला शेकोटी पेटवल्यास बागेतील तापमान वाढते. विशेषतः खोलगट भागामध्ये अशी काळजी घेतल्यास बागेचे अतिथंडीपासून बचाव होण्यास मदत होते. थंडीच्या काळात बाष्पोत्सर्जनाचा (पानातून होणाऱ्या बाष्पीभवनाचा) वेग कमी होतो. अशा वेळी  पाण्याचे योग्य व्यवस्थापन आवश्यक आहे. 
  •     केळी ः थंडी जास्त काळ राहील तर नवीन लागवड केलेल्या रोपांच्या वाढीवर परिणाम होण्याची शक्यता असते. वाढीच्या टप्प्यातील पिकाला योग्य प्रमाणात पाणी, खतमात्रा द्यावी.
  •     आंबा ः कोकणात सध्याच्या थंडीमुळे परागीकरणावर परिणाम होईल. जेथे फळे वाढीच्या टप्प्यात आहे तेथे वाढ संथगतीने होईल. पहाटे थंड वातावरण आणि दुपारचे तापमान ३० ते ३२ अंश सेल्सिअसपर्यंत गेल्यास फळगळ होण्याची शक्यता असते. 
  •     काजू ः थंडीमुळे परागीकरणावर परिणाम होईल. जेथे फळे वाढीच्या टप्प्यात आहे तेथे वाढ संथगतीने होईल.
  •     संत्रा ः सध्या जेथे अंबिया बहराचा उशिरा फुलोरा फुटला आहे त्याची वाढ संथ गतीने होईल.
  •  पशुपालन ः 

  •     जनावरे ः गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्यांच्या आरोग्यावर फारसा परिणाम होणार नाही. परंतु वासरे, करडांचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी गोठा उबदार राहील याची सोय करावी.
  •     कोंबड्या ः पोल्ट्री शेडमध्ये कोंबड्यांवर थंडीचा परिणाम होऊ नये, यासाठी पुरेसा उबदारपणा राहण्यासाठी बल्ब लावावेत.   
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com