उष्णतेमुळे कापूस लागवड रखडली

कापूस लागवड
कापूस लागवड

जळगाव ः खानदेशात पूर्वहंगामी कापूस लागवड वाढत्या उष्णतेमुळे रखडत सुरू आहे. मे अखेरीस उष्णता कमी होते, परंतु या मोसमात मात्र उष्णता वाढत असून, मागील तीन दिवसांत पारा ४३ वरून ४५ अंश सेल्सिअसवर पोचला आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी लागवड टाळली आहे.  तापी, गिरणा, पूर्णा नद्यांच्या लाभक्षेत्रातील शेतकरी, वाघूर प्रकल्पाचे लाभधारक २५ मे नंतर कापूस लागवड करतात. चोपडा तालुक्‍यात २५ मे नंतर अनेक शेतकऱ्यांनी लागवड केली. परंतु २७ मेपासून उष्णता वाढू लागली. ३० मे रोजी कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअसपर्यंत पोचले. किमान तापमान ३० अंश सेल्सिअसपर्यंत होते. दुपारी तीन ते पाच यादरम्यान उष्णता अधिक होती.  उष्णतेत कापसाचे बीजांकुरण व्यवस्थित होत नाही. ठिबकच्या नळ्यांमधून गरम पाणी येते. यामुळे कोवळ्या अंकुरांना फटका बसतो. हलक्‍या, मुरमाड जमिनीत तर मोठे नुकसान होते व नांग्या भरण्याची वेळ येते. यामुळे तापीकाठावरील शहादा, सातपुडा पर्वत भागातील तळोदा (जि. नंदुरबार), धुळ्यातील शिरपूर, जळगावमधील चोपडा, यावल, रावेर, मुक्ताईनगर, अमळनेर भागात शेतकरी लागवड टाळत आहे. तसेच जळगाव जिल्ह्यातील गिरणा काठावरील पाचोरा, चाळीसगाव, भडगाव, धरणगाव, जळगाव भागांतही कापूस लागवड रखडत सुरू आहे. ज्यांनी लागवड केली, ते पीक व्यवस्थित जगविण्याची धडपड करीत आहेत.  या आठवड्याच्या सुरवातीपर्यंत एकट्या जळगाव जिल्ह्यात सुमारे अडीच हजार हेक्‍टवर पूर्वहंगामी कापूस लागवड झाल्याचा अंदाज होता. यानंतर लागवड अपवादाने झाली असून, पूर्वहंगामी लागवडीचे क्षेत्र तीन हजार हेक्‍टरपेक्षा कमी असल्याचा अंदाज आहे. नंदुरबार, धुळे जिल्ह्यांतही पूर्वहंगामी लागवड कमी असून, ती मिळून सुमारे दोन ते अडीच हजार हेक्‍टरपर्यंत आहे.  वातावरणात बदल शक्‍य सध्या उष्णता असली तरी पुढील आठवड्यात वातावरणात बदल होऊ शकतो. ढगाळ व सकाळी १० पर्यंत थंड वारे, अशी स्थिती राहू शकते. तसेच कमाल तापमानही ४० ते ४१ अंशांपर्यंत खाली येऊ शकते. मोसमी पाऊस येण्यासंबंधी वेगवेगळे अंदाज असले. तरी वळवाचा पाऊस १५ जूनपर्यंत विविध भागांत पडू शकतो, असा अंदाज जळगाव येथील तेलबिया संशोधन केंद्रातील हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com