
रत्नागिरी ः अपारंपरिक ऊर्जा संसाधनांसाठी जिल्हा नियोजनामध्ये राखीव असलेल्या पाच टक्के निधीमधून गोळप (ता. रत्नागिरी) येथे १ मेगावॉट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प (Solar Energy Project) उभारण्यात येणार आहे. सौरऊर्जा प्रकल्पांसाठी राज्यातील हा प्रकल्प पथदर्शी ठरणार आहे. जिल्हा परिषद कृषी विभागाकडून (Agriculture Department) नियोजनाकडे सात कोटींचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. ग्रामपंचायत कार्यालयांसह प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी या विजेचा वापर केला जाणार आहे.
जिल्हा नियोजनांतर्गत २०२२-२३ या आर्थिक वर्षात अपारंपरिक ऊर्जा विकास कार्यक्रम जिल्हा परिषद कृषी विभाग राबवत आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायत हद्दीतील सर्व पथदीपांची (स्ट्रीट लाइट) वीजबिले मोठ्या प्रमाणावर येतात. ती देण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध होत नाही. परिणामी, महावितरणकडून वीजपुरवठा खंडित केला जातो. हीच स्थिती प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्येही दिसते. त्यामुळे स्थानिक जनतेची वारंवार गैरसोय होते. पथदीप आणि प्राथमिक आरोग्य केंद्राची वीजबिले भरण्यासाठी सादिल निधीही तुटपुंजा पडतो.
जिल्ह्यातील ग्रामपंचायत हद्दीतील सर्व पथदीपांसाठी ११ लाख ८० हजार युनिट्सचा, तर प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी १ लाख ५० हजार ७७३ युनिट्सचा वापर होतो. दोन्ही मिळून १३ लाख ५० हजार युनिट्सचा वार्षिक वापर होतो.
भविष्यातील वाढती गरज लक्षात घेता दोन्हींसाठी १५ लाख ५० हजार युनिट्सची गरज भासणार आहे. हे लक्षात घेऊन रत्नागिरी जिल्ह्यात १ मेगावॉटचा सोलर प्रकल्प उभारल्यास १६ ते १७ लाख एवढ्या युनिट्सची निर्मिती होऊ शकते. त्यामधून पथदीपांचे आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वीजबिल नगण्य तथा शून्यावर येईल.
१ मेगावॉट क्षमतेच्या सौर प्रकल्पाचा डीपीआर तयार केला असून, अंदाजे रक्कम रुपये ७ कोटी खर्च येणार आहे. गोळप ग्रामपंचायतीमधील ५ गुंठे जागेत प्रस्तावित आहे. याबाबतचा संयुक्त सर्वे महावितरण, गोळप व जिल्हा परिषदेकडून नोव्हेंबर महिन्यात झाला आहे.
याला पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून हिरवा कंदील मिळाला असून, निधी उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, जिल्हा कृषी विकास अधिकारी अजय शेंडे यांच्याकडून प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आला आहे.
पुढील टप्प्यात क्षमता वाढविणार
पहिल्या टप्प्यात एक मेगावॉटची वीजनिर्मिती केली जाणार असून, पुढील टप्प्यात आणखीन तीन मेगावॉटची क्षमता वाढवली जाणार आहे. त्यासाठीचा आणखी २१ कोटींचा प्रस्तावही नियोजनाकडे पाठवला आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.