
नाशिक : विभागात लोकसहभागातून वनराई बंधारे (Vanrai Bandhare) बांधण्याचे काम प्रगतिपथावर असून विभागात लोकसहभागातून १ हजार ७१९ बंधारे बांधण्याचे काम लोकसहभागातून पूर्ण झाले आहे. या बंधाऱ्यांच्या माध्यमातून विभागामध्ये एकूण ३४४ दशलक्ष घनमीटर जलसाठा अडविला असून रब्बी हंगाम (Rabbi Season) २०२२ मध्ये ३ हजार ४३८ हेक्टर क्षेत्रावर गहू, हरभरा, तूर, मका, टोमॅटो, वाल व इतर भाजीपाला पिकांचे क्षेत्र सिंचनाखाली आले असून लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे, अशी माहिती नाशिक विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांनी दिली.
विभागात लोकसहभागातून एकूण ११ हजार ५६० वनराई बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट आहे. डिसेंबरअखेरपर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले असून त्याद्वारे २ हजार ३१२ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा निर्माण होऊन २३ हजार १२० हेक्टर क्षेत्रावरील रब्बी पिकांना संरक्षित पाणी देण्याची सोय होणार आहे. एका वनराई बंधाऱ्यापासून सरासरी दोन हेक्टर क्षेत्राला संरक्षित सिंचन उपलब्ध होणार आहे. काही ठिकाणी जास्तीचा पाणीसाठा उपलब्ध होणार असून संरक्षित सिंचन क्षेत्रात वाढ होणार आहे.
समाधानकारक पाऊस झाल्याने नाले व ओढ्यांमधून पाणी प्रवाही आहे. हे पाणी पारंपरिक पद्धतीने अडवून पुढील आठ महिन्यांसाठी पुरविणे खूप गरजेचे असून त्यासाठी वनराई बंधारे बांधणे आवश्यक आहे. उपलब्ध साधनसामग्रीचा वापर करून वनराई बंधारा बांधण्यात येतो. यामध्ये सिमेंट, खतांची रिकामी पोती, माती वाळू इत्यादींचा वापर करून तात्पुरता बंधारा बांधला जातो. बंधाऱ्याच्या माध्यमातून रब्बी पिके, बिगर हंगामातील पिकांची तसेच ग्राम पातळीवर पाण्याची गरज काहीअंशी भागविता येईल.
वनराई बंधाऱ्यांचे फायदे :
पिण्याचे पाणी, गुरांना पाणी, कपडे धुण्याकरिता यासह वनराई बंधाऱ्यांच्या आजूबाजूला असलेल्या विहिरींच्या पाणी पातळीत वाढ होण्यास मदत होते. वनराई बंधाऱ्यांच्या पाणी साठ्यांमधून पाण्याचा उपसा करून रब्बी व उन्हाळी हंगामात भाजीपाला, कडधान्य, कलिंगड, रब्बी तृणधान्य, गळीत धान्यासारखी पिके घेण्यासाठी मदत होते.
विभागात जिल्हानिहाय
वनराई बंधाऱ्यांची कामे
जिल्हा बंधाऱ्यांची संख्या
नाशिक ९५९
धुळे २१६
नंदूरबार २८१
जळगाव २६३
एकूण १,७१९
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.