
वाशीम : जिल्ह्यात या हंगामात रब्बी पेरण्यांनी (Rabi Sowing) सरासरी क्षेत्राचा टप्पा पूर्ण केला आहे. जिल्ह्यात सरासरी ८९,७८१ हेक्टरच्या तुलनेत एक लाख ३,४७८ हेक्टरवर पेरण्या आटोपल्या आहेत. सरासरीच्या ११५ टक्के क्षेत्र लागवडीखाली आले. या हंगामात गहू, हरभऱ्याशिवाय (Chana Sowing) राजमा (Rajma Sowing), मोहरी, मसूर, जवस या पिकांचाही चंचुप्रवेश झालेला दिसून येत आहे.
हंगामात चांगला पाऊस झालेला असल्याने रब्बी लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल दिसून आला. आतापर्यंत त्यामुळेच सरासरीपेक्षा अधिक लागवड झाली. अद्यापही पेरणी सुरू असल्याने या क्षेत्रात वाढ अपेक्षित आहे.
वाशीम जिल्ह्यात सरासरी ८९ हजार ७८१ हेक्टर क्षेत्र असून, आतापर्यंत हरभऱ्याची सुमारे ७२ हजार हेक्टरपेक्षा जास्त लागवड झाली. गव्हाचे क्षेत्र सुद्धा २८ हजार हेक्टरवर पोहोचले आहे. सोबतच रब्बी ज्वारी २६७, मका १९९, चिया सीड्स १४५ हेक्टरवर लागवड झाले. अद्यापही रब्बी पिकांची लागवड होत आहे. आणखी या आठवडाभर पेरणी होण्याची शक्यता पाहता जिल्ह्याचे एकूण लागवड क्षेत्र वाढू शकते.
कडधान्य, गळीतधान्याचे क्षेत्र
जिल्ह्यात हरभरा हे कडधान्य दरवर्षी सर्वाधिक पेरले जाते. परंतु या वर्षी राजमा (२४६ हेक्टर), मसूर २२७ हेक्टरवर पेरण्यात आले. तर गळीत धान्यात करडई ७६२ हेक्टर, सूर्यफूल २८, मोहरी ४६६, जवस ७१ हेक्टरवर पेरण्यात आले आहे. जिल्ह्यात रिसोड तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रयोगशीलता अधिक जोपासली. या तालुक्यात मका, चिया, राजमा, मसूर, करडई, सूर्यफूल, मोहरी, जवस अशा सर्वच रब्बी पिकांची लागवड झालेली आहे.
बीज प्रक्रियेवर जोर
जिल्ह्यात रब्बीत पेरणी करताना बहुतांश शेतकरी जैविक, रासायनिक बीजप्रक्रिया केली आहे. कृषी खात्याने सातत्याने केलेल्या जनजागृतीमुळे जिल्ह्यात बीज प्रक्रियेविषयी शेतकरी जागरूक झाला आहे.
तालुका सरासरी प्रत्यक्ष लागवड
वाशीम १७४०८ १९११९
मालेगाव १०२१३ १५६६३
रिसोड ३३३६९ ३१७०६
मंगरूळपीर ९७९६ १७३८६
मानोरा १२७६२ १२५८१
कारंजा ६२३७ ७०२२
एकूण ८९७८१ १०३४८८
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.