
Pesticide Industry News पुणे ः देशातील स्थानिक कीडनाशके निर्मिती उद्योगाला (Pesticide Production Industry) प्रोत्साहन देण्यासाठी आयात (Pesticide Import) होणाऱ्या पेस्टिसाइड्स फॉर्म्यूलेशन्सवर (Pesticide Formulation) (कीडनाशकांचे स्वरूप) अबकारी कर वाढविण्यात आला आहे.
देशी उद्योगांशी स्पर्धा करणारी ही परदेशी उत्पादने आयात करण्यासाठी आता १५ टक्के अबकारी कर भरावा लागेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
“देशी कीडनाशके उद्योगांना संरक्षण देण्यासाठी केवळ अबकारी कर वाढविण्यात आलेला नाही; तर यापुढे आयात होत असलेल्या सर्व कीडनाशके व संलग्न उत्पादनांवर नियंत्रण आणण्यासाठी स्वतंत्र ‘एचएस कोड’ लागू केले जातील.
या दोन्ही मागण्यांसाठी गेल्या काही वर्षांपासून आमचा लढा सुरू होता,” असे भारतीय कीडनाशके उत्पादक व घटक मिश्रण उत्पादने संघटनेच्या (पीएमएफएआय) सूत्रांनी स्पष्ट केले. या संघटनेत देशाच्या कीडनाशके क्षेत्रातील लहान मोठ्या २२१ कंपन्या कार्यरत आहेत.
आंतरराष्ट्रीय व्यापारात एचएस कोड (हार्मोनाइज्ड सिस्टिम कोड) महत्त्वाचा मानला जातो. जागतिक व्यापार संघटना आणि आंतरराष्ट्रीय चेंबर ऑफ कॉमर्सच्या मदतीने ही कोड प्रणाली तयार करण्यात आली आहे.
देशातून निर्यात होणाऱ्या, तसेच आयात होत असलेल्या कृषी व संलग्न उत्पादनांचे कोड यापूर्वीच तयार झालेले आहेत. मात्र कीडनाशक उद्योगांमध्ये कोड व्यवस्था अर्धवट आहे.
देशात गेल्या अनेक वर्षांपासून पेस्टिसाईड्स फॉर्म्यूलेशन्सवर (कीडनाशकांचे स्वरूप) व तांत्रिक अर्थात सक्रिय घटक (टेक्निकल ग्रेड पेस्टिसाइड्स) यांच्यासाठी स्वतंत्र एचएस कोड नाहीत. या दोन्ही उत्पादनांना चॅप्टर ३८ मध्ये ठेवण्यात आले आहे.
त्याला १० टक्के अबकारी कर असतो. स्वतंत्र एचएस कोड नसल्यामुळे हा कर आकारताना घोळ होतो आणि दोन्ही (टेक्निकल व फॉर्म्यूलेशन्स) उत्पादनांना सारखाच कर लावला जातो.
अबकारी कर आकारणीतील हा गोंधळ आता कायमचा मिटविण्यासाठी तांत्रिक दर्जा असलेल्या कीडनाशकांना (टेक्निकल ग्रेड्स पेस्टिसाइड्स) ‘चॅप्टर ३८’ मधून वगळून ‘चॅप्टर २८’ मध्ये आणले गेले आहे.
त्याला १० टक्के अबकारी कर असेल. दुसऱ्या बाजूला तयार कीडनाशके स्वरूपांना (रेडिमेड पेस्टिसाइड्स फॉर्म्यूलेशन्स) स्वतंत्र ‘एचएस कोड’ लागू करीत त्यावरील अबकारी कर मात्र १० टक्क्यांवरून १५ टक्क्यांवर नेण्यात आला आहे. या दोन्ही निर्णयांमुळे आयात नियंत्रणात येईल.
देशातील उलाढाल १७ हजार कोटींच्या पुढे
देशातील कीडनाशके उद्योगातील उलाढाल १७ हजार कोटी रुपयांच्या पुढे आहे. मात्र देशी उद्योग पिछाडीवर जात आहेत. २०२०-२१ मधील आयात वाढून ४१ टक्क्यांवर गेली होती. तर, देशी उत्पादने ११ टक्के इतक्या नगण्य दराने पुढे सरकली, असे कीडनाशके उद्योगाचे म्हणणे आहे.
पेस्टिसाइड्स फॉर्म्यूलेशन्सची आयात नियंत्रित करण्यासाठी देशी उद्योजक सतत पाठपुरावा करीत होते. केंद्राच्या या निर्णयामुळे कृषी क्षेत्रातील ‘मेक इन इंडिया’ तसेच ‘आत्मनिर्भर भारत’ या उपक्रमांमधील उद्योगांना बळ मिळेल.
- प्रदीप दवे, अध्यक्ष, पीएमएफएआय.
अबकारी कर वाढविण्याच्या निर्णयाचे स्थानिक कीडनाशके निर्मिती उद्योगावर सकारात्मक परिणाम होतील. आयात कीटकनाशकांचे दर वाढल्यास शेतकरी अनावश्यक वापर कमी करतील. तसेच जैविक कीडनाशकांचा वापरही वाढेल.
- ॲड. रामनाथ जगताप, कृषितज्ज्ञ
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.