
पुणे : राज्य सरकारच्या कृषिपंप वीजजोडणी धोरण २०२० (Agriculture Pump Connection Policy) चा लाभ घेत आतापर्यंत पुणे परिमंडलातील २१ हजार ९६९ शेतकऱ्यांनी कृषिपंपांचे थकीत वीजबिल (Electricity Bill) भरले असून आता ते वीजबिलमुक्त झाले आहे. आत्तापर्यंत एकूण ५३ हजार ६९६ शेतकऱ्यांनी थकबाकीमुक्तीच्या योजनेत सहभाग नोंदविला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
पुणे परिमंडलातील एक लाख २६ हजार ४५९ शेतकऱ्यांकडे एकूण ९२६ कोटी ६४ लाख रुपयांची एकूण थकबाकी होती. महावितरणकडून व्याज व दंडमाफी आणि वीजबिल दुरुस्तीनंतर एकूण २०१ कोटी ८१ लाख रुपयांची रक्कम कमी झाली आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांकडे आता ७२४ कोटी ८३ लाख रुपयांची सुधारित थकबाकी आहे. थकबाकीदारांपैकी ५३ हजार ६९६ शेतकऱ्यांनी थकबाकीमुक्त योजनेत सहभाग घेतला. यामध्ये त्यांनी थकबाकी व चालू वीजबिलांपोटी १२५ कोटी ७२ लाख रुपयांचा भरणा केला आहे.
त्यामुळे या शेतकऱ्यांना थकबाकीपोटी भरलेल्या रकमेएवढी सूट, महावितरणकडून निर्लेखनाद्वारे मिळालेली सूट तसेच विलंब आकार व व्याजातील सूट, असे एकूण ९३ कोटी ४७ लाख रुपये माफ झाले आहेत. त्यातील २१ हजार ९६९ शेतकरी वीजबिलांमधून संपूर्णपणे थकबाकीमुक्त झाले आहेत. त्यांनी चालू वीजबिलासह सुधारित थकबाकीची ५० टक्के रक्कम असा एकूण ६४ कोटी ४७ लाख रुपयांचा भरणा केला आहे. त्यामुळे सुधारित थकबाकीमध्ये त्यांना आणखी ३९ कोटी ८४ लाख रुपयांची सूट व संपूर्ण थकबाकीमुक्ती मिळाली आहे.
कृषिपंपांच्या थकीत व चालू वीजबिलांच्या भरणामधून पुणे परिमंडलामधील ग्रामपंचायत व जिल्हा क्षेत्रासाठी प्रत्येकी ५८ कोटी ६० लाख असे एकूण ११७ कोटी २० लाख रुपये कृषी आकस्मिक निधीमध्ये जमा झाले आहेत. या निधीमधून वीजयंत्रणेच्या विस्तारीकरण व सक्षमीकरणाची कामे करण्यात येत आहे.
वीजजोडण्यांची ७८४ कामे प्रगतिपथावर
पुणे परिमंडलामध्ये आतापर्यंत एक एप्रिल २०१८ पासून प्रलंबित असलेल्या कृषिपंपाच्या ८ हजार ६२९ पैकी ७ हजार ८४५ नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत, तर ७८४ वीजजोडण्यांची कामे प्रगतिपथावर आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.